बंगाल मधल्या हिमालयातलं पक्षी नंदनवन


- एप्रिल २०२१

  Great Hornbills  

पूर्वतयारी

खरंतर गेल्या दोन-तीन वर्षांपासून ह्या भागातली ट्रिप माझ्या विचारात होती आणि अभय (Nature Clicks) ने हि बऱ्याच वेळा आग्रह केला होता, पण योग येत नव्हता. डिसेंबर (२०२०) मध्ये अभयनी परत एकदा विचारलं... त्यावेळी covid ची भीती जरा कमी झालेली होती, त्यामुळे लगेचच हो म्हंटल.

पण एप्रिल मध्ये आता जाण्याची वेळ आली, तो पर्यंत परिस्थिती बरीच बदललेली होती, केसेस दिवसेंदिवस वाढतच होत्या आणि त्यात आमच्या ७ जणांच्या ग्रुप पैकी ३ जण कॅन्सल झाले (covid मुळेच). शेवटच्या दिवसापर्यंत आमची चर्चा सुरूच होती, शेवटी ठरवलं कि जायचंच (अर्थातच हिमालयातील वैशिष्टपूर्ण पक्षी बघण्याचा मोह हे त्यामागचं सर्वात मोठं कारण).

पहिला दिवस: २-एप्रिल-२०२१

सकाळी ८ वाजताच्या विमानाने आम्ही बागडोगरा ह्या आर्मी च्या एअरपोर्ट वर पोहोचलो आणि लगेचच पुढचा प्रवास सुरु केला. तिथले घाट आणि रस्ते बघता ४ तास तरी लागणार होते आमच्या इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी.

सकाळी लवकर घरून निघाल्यामुळे खूप भूक लागलेली होती म्हणून प्रवासाच्या सुरुवातीलाच थांबायचं ठरवलं. लड्डू-गोपाळ नावाचं एक सुप्रसिद्ध रेस्टॉरंट आमच्या वाटेत होत (अर्थातच हि माहिती अभय ची, कारण तो २०११ सालापासून ह्या भागात ट्रिप घेऊन येतोय). आणि इथली गर्दी बघता, हे नक्कीच योग्य हॉटेल असावं. आमच्याच विमानात असणारी बरीचशी मराठी मंडळी पण इथेच आलेली दिसत होती (ते बहुदा दार्जिलिंग ला जाणारे असावेत, ठाण्याचाच एक ग्रुप होता त्यांचा).

खरंतर हे ठिकाण काही एअरपोर्ट पासून फार लांब नव्हतं पण रस्त्यात खूप ट्रॅफिक होता त्यामुळे वेळ लागला (आणि पोटात भुकेचे कावळे ओरडत असले, कि तसाही वेळ जाता जात नाही)

पण तिथून पुढे निघाल्यानंतर रस्ता छान होता, दुतर्फा झाडी आणि जसे जसे वर जात होतो तसं तापमान सुद्धा खाली येऊ लागलं होतं. प्रवास मोठा असल्याने गाडी न लागण्यासाठी गोळी घेतलीच होती, शिवाय अश्या मोठ्या प्रवासात मी पुढची सीट सोडतच नाही (त्यामुळे त्रास थोडा कमी होतो).

आमचं अंतिम गंतव्य स्थळ होतं रिश्यप नावाचं, लावा भागातील एक छोटंसं गाव. अगदी दरीच्या टोकावर असलेलं आमचं हॉटेल (Passerine Retreat होम स्टे) खूपच सुंदर होतं. इथे पोहोचताना लावा ह्या थोड्या मोठ्या गावापर्यंत रस्ते तसे ठीक होते, पण मग अचानक आम्ही एक अगदी कच्च्या रस्त्याला लागलो. ह्याला रस्ता म्हणण्यात तसा काही अर्थ नव्हता पण आम्ही तिथूनच पुढचा ३-४ किलोमीटर चा प्रवास करणार होतो. एका बाजूला खोल दरी आणि दुसरीकडे डोंगर आणि एक गाडी कशीबशी जाईल एवढाच रस्ता पण परिसर निसर्गरम्य होता.

घाटात आमहाला एक ठिकाणी माउंटन hawk Eagle आणि Verditer Flycatcher ह्या पक्षांनी दर्शन दिलं (आणि खऱ्या अर्थाने आमची birding ट्रिप सुरु झाली).

साधारण ५ च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. नोरबू (होम-स्टे चा मालक आणि पुढच्या तीन दिवसांचा आमचा लोकल गाईड) आमच्या स्वागतासाठी तयारच होता. बॅगा खोलीत ठेवल्या आणि लगेचच चहाचा आस्वाद घेतला.

इथे येताच लगेच नजरेत भरतात ती इथली बहरलेली फुलझाडं. इथले लोक काही श्रीमंत नाहीत पण प्रत्येकाच्या घरासमोर खूप सगळी फुलं दिसतात. प्लास्टिक च्या पिशव्यांमध्ये माती भरून त्यात हि रंगीबेरंगी फुलझाडं.लावलेली दिसली. ह्या भागातली हि खुबी असावी. हा प्रदेश जरी पश्चिम बंगाल मध्ये असला तरीही बहुतेक लोक हि गुरखा (नेपाळी भाषा बोलणारी) जमातीचीच होती. सगळे जण आहे त्या परिस्थितीत आनंद मानणारे वाटत होते.

इथे नक्कीच खूप थंडी होती आणि थोड्याच वेळात गार वारे (दरीकडून येणारे) वाहू लागले, त्याबरोबर कडाक्याची थंडी जाणवू लागली. एप्रिल मधल्या मुंबईच्या उन्हाळ्यातून आम्ही थेट फ्रिज मध्ये आल्यासारखं वाटत होत. लगेच थंडीचे कपडे चढवले गेले (अभयने आधीच थंडीची कल्पना देऊन ठेवली होती म्हणून बरं).

  Flowers at our Homestay  

   

   

  The Rooms  

  Valley Next to us  


दुसरा दिवस: ३-एप्रिल-२०२१


ह्या पूर्वेकडील भागात सूर्योदय लवकर होत असल्याने, आम्ही रोजच लवकर बाहेर पडत होतो. सकाळी ५:३० ला बाहेर छान उजेड होता. आज आमच्यासाठी गाडी नव्हती. रिश्यप गावात पायी फिरून पक्षी बघण्याचे ठरवले होते.

सुरुवातीलाच असं कळलं कि, २-३ दिवसांपूर्वी इथे खूप जास्त पाऊस झाला, त्यामुळे इथल्या फुला-फळांचं खूप नुकसान झालं. नाहीतर आमच्या हॉटेल समोरच फिंच पक्षांची खूप गर्दी असते, तिथे एकही फिंच दिसत नव्हता. आमच्याच हॉटेल मध्ये एक कलकत्त्याच्या birder राहत होता, तो पंधरा दिवसांपूर्वी इथे आला होता, त्यावेळी इथे एवढे पक्षी होते कि तो अजून फोटो काढायला आज परत आला होता. त्याची (आणि हे कळल्यामुळे आमचीपण) खूपच निराशा झाली.

अर्थात फिंचेस जरी नव्हते तरी, Verditer, Bushchats, blue-fronted redstarts, little bunting, and russet sparrows हे पक्षी दिसत होते.

   

  Verditer Flycatcher  

  Blue-fronted Redstart  

चालत birding आणि तेही सकाळच्या वेळी तसं त्रासदायक नसत पण इथे सपाट भाग असा कुठे नव्हताच, फक्त उंच-सखल डोंगराळ भागच. त्यामुळे खाली-वर करतांना खूप दमछाक होत होती, त्यात आम्ही साधारण ९००० फूट उंचीवर होतो, म्हणजे प्राणवायू सुद्धा कमी होता. पण अर्थात आमच्या उत्साहापुढे हे काही फार आव्हानात्मक नव्हते.

जाता-जाता रस्त्यात आम्हाला yellow-nape woodpecker, grey-winged blackbirds, western crowned warbler, black-chinned babbler आणि खूप सगळे verditers बघायला मिळाले.

  Western-crowned warbler  

  Rufous-capped Babbler  

  Grey-winged Blackbird  

फिरत असतांना आम्हाला आपल्या पावश्या पक्षाचे (common hawk-cuckoo) आवाज सतत ऐकू येत होते. नंतर एक दिसला सुद्धा, पण थोड्याच वेळात हि माहिती कळली कि आवाज जरी सारखाच असला तरी इथे पावश्या दिसण्याची शक्यता नाही, हे आवाज Large hawk-cuckoo ह्या पक्षाचे होते.

आज अभय ने २-४ विशेष पक्षी दाखवण्याचे ध्येय ठेवले होते (Golden bush robin, आणि Green-tailed sunbird हे त्यातले दोन). त्याला एक अशी जागा माहित होती कि इथे तो शिंजीर (Sunbird ) पक्षी दिसण्याची खूप शक्यता होती. ती जागा खूप लांब होती, पोहोचे पर्यंत आम्ही खूपच दमलो होतो. पोहोचल्यावर तिथे १ शिंजीरांची जोडी दिसली (अभय च्या अनुभवाप्रमाणे इथे ७-८ तरी Sunbirds दिसायला हवे होते, पण आज फक्त दोनच होते). ces of finding sunbirds (multiple numbers) were very high.

जमेची बाजू एवढीच कि तिथे थांबल्यामुळे आम्हाला दूरवरची Himalayan cuckoo बघता आली. थोड्याच वेळात तिथे दुसरा नर आला आणि त्या दोन नरांची झटापट सुद्धा झाली (बहुतेक जागेवरचा ताबा सिद्ध करण्यासाठी असावी).

  Himalayan Cuckoo  

  Green-tailed sunbird  

  Large Hawk-cuckoo  

परत येतांना आम्ही वेगळ्या वाटेने आलो. इथे उंचावरच्या एका झुडुपात प्रशांतला काहीतरी लालसर दिसलं. दुर्बिणीत बघून त्याने पक्षीच असल्याची खात्री केली व आम्हाला सांगितलं. नीट बघितल्यावर कळलं कि तो नर Scarlet finch होता. त्या पानाच्या दाटीतून कसेबसे १-२ फोटो मिळाले. खूप वेळ थांबून सुद्धा त्या पक्षाने आपलाही जागा सोडली नाही. थोडं पुढे आल्यावर अभयने एका वेगळ्या पक्षाचा आवाज ऐकला, आवाजाचा वेध घेत मग त्याने तो Striated bulbul शोधलाच.

थोड्या वेळाने त्याने आम्हाला एक पक्षी नीट बघायला सांगितलं. पण आम्ही एवढे Verditer Flycatchers बघितले होते तिथे, त्यात तोच परत काय बघायचा म्हणून दुर्लक्ष करत होतो. मग त्याने खुलासा केला रंग साधारण तसाच वाटलं तरी हा pale-blue flycatcher आहे, verditer नाही.

एव्हाना १०:३० वाजून गेले होते आणि भुकेची जाणीव सर्वांनाच होत होती. हॉटेल च्या पासून १०० मिटर अंतरावर अजून एका पक्षाचा आवाज ऐकू आला. थोड्याच वेळात तो Grey-headed canary flycatcher दिसला सुद्धा.

  Scarlet Finch  

  Striated Bulbul  

इथलं जेवण-खाण एवढं चांगलं नसतं अशी अभय ने आधीच आम्हाला कल्पना देऊन ठेवली होती, त्यामुळे आमच्या अपेक्षा फार नव्हत्या. पण न्याहारी (आणि काल रात्रीचं जेवण सुद्धा) खूपच चांगलं होतं. इथल्या सगळ्याच पदार्थांमध्ये बटाट्याचं प्रमाण थोडं जास्त होतं, पण चव छानच होती.

न्याहारी नंतर आम्ही थोडा वेळ आवारातच फिरत होतो (आवार म्हणजे असं काही कंपाऊंड वगैरे नाही, पण राहण्याच्या जागेपासून ५०-१०० फुटांच्या जागेत फिरत होतो). खूप सुंदर जागा होती ती. लांबवर पसरलेलं डोंगर आणि खाली दरी. नेहमीच्या बंटिंग, रेडस्टार्ट ह्या पक्षांबरोबर इथे आम्हाला large आणि rufous-bellied दोन्ही Niltava दिसले. अभयने मग समोरच्या डोंगरातला एक भाग दाखवला, जिथे आम्ही उद्या जाणार होतो (कोलाखाम).

  Verditer Flycatcher  

  Little Bunting  

दुपारच्या जेवणानंतर आम्ही परत जवळच्या जंगलात (दुसऱ्या दिशेला) फिरलो. परत एकदा Grey-headed canary flycatcher ने आम्हाला छान दर्शन दिले. छान फोटो सुद्धा मिळाले. पण टार्गेट पैकी कोणतेही पक्षी दिसत नव्हते. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एका विस्तीर्ण बुंध्याच्या झाडाच्या खोडापाशी काहीतरी हालचाल जाणवली. अशी हालचाल म्हणजे एकतर treecreepers किंवा nuthatches असण्याची शक्यता होती, (बाकीचे पक्षी फांद्यांजवळ जास्त दिसतात पण है दोन प्रजाती खोडांवर खाली-वर फिरत असतात). नीट निरीक्षण केल्यावर आम्हाला Indian nuthatch आणि white-tailed nuthatch दोन्हीही पाहायला मिळाले (काही फोटोही मिळाले).

थोडं पुढे गेल्यावर fire-breasted flowerpeckers दिसले. जवळपासच्या फुला-फळांमध्ये त्यांचा मुक्त विहार चालू होता.

  Grey-headed Canary Flycatcher  

  Fire-breasted Flowerpecker  

आता ३:३० वाजले होते पण सकाळच्या चालण्यामुळे आम्ही दमलो होतो. त्यात खूप जास्त पक्षीही दिसत नव्हते, त्यामुळे मग आम्ही परत फिरायचं ठरवलं.

मग संध्याकाळी भजी-चहा आणि खूप गप्पा असा बेत रंगला. तसंही, अभय बरोबर असेल तर त्याच्या stories ना कधीच अंत नसतो. ८ वाजता रात्रीच जेवण आणि ९:३०/१० पर्यंत आम्ही पांघरुणात गुरफटून (थंडी खूपच होती) निद्रेच्या आधीन झालो होतो.


तिसरा दिवस: ४-एप्रिल-२०२१


आज आम्ही थोडा दूरचा पल्ला गाठायचं ठरवलं होतं, त्यामुळे आज गाडीनेच जाणार होतो. आज Mrs. Gould’s sunbird व Golden-throated Barbet हे मुख्य आकर्षण असणार होते (म्हणजे दिसले तर).

परत एकदा आम्ही त्या कच्च्या रस्त्यानेच प्रवास सुरु करणार होतो आणि रस्त्यात जिथे कुठे पक्षी दिसतील तिथे गाडी थांबवायची असा प्लॅन होता. इथे गाड्यांची तशी वर्दळ नसल्याने भर-रस्त्यात कुठेही थांबलो तरी चालण्यासारखं होतं.

निघाल्यापासून लगेचच उतरावं लागलं (म्हणजे पक्षांची हालचाल दिसली), आणि हे नंतर सतत दर ५-१० मिनिटावर होतंच राहिलं. हा रस्ता खराब असल्याचा थोडा फायदा असा कि गाडी वेगात चालवणं शक्यच नव्हतं, त्यामुळे आजूबाजूला पक्षांची हालचाल सहज जाणवत होती.

सुरुवातीला नेहमीचेच कलाकार (म्हणजे blue-capped rock thrush, niltavas, buntings) दिसले. laughingthrushes ह्या पक्षांची हालचाल जमिनीलगत जाणवत होती, पण ते झुडुपांमधून अजिबात बाहेर निघत नव्हते, त्यामुळे फोटो काढणं कठीणच होतं.

त्यांच्या हालचालींचा मागोवा घेता घेता अचानक एक छोटासा पक्षी जवळच्या फांदीवर येऊन बसला. लगेच कॅमेरे सरसावले आणि फोटोस काढून घेतले. ती Himalayan Bluetail पक्षाची मादी होती.

थोड्याच अंतरावर अजून एक नवीन पक्षी दिसला (Himalayan Cutia). त्यांचा एक छोटा थवा पानांमधून पटापट वर खाली करत होता. त्यांची हालचाल इतकी जलद होती कि फोटो मिळणं मुश्किल होत होतं. कसेतरी १-२ फोटो काढले त्यांचे आणि बसलो परत गाडीत. पण परत पाचच मिनिटात पुन्हा खाली... जवळच्या फळझाडात हालचाल जाणवली. Green-tailed आणि Fire-tailed दोन्ही शिंजीर होते तिथे. पण चांगले फोटोस नाही मिळाले. समोरच Rufous Sibia तसंच whiskered Yuhinas सुद्धा दिसले.

एवढे पक्षी दिसत असल्यामुळे मग आम्ही परत गाडीत न बसता चालतच पुढे जायचं ठरवलं (ड्राइवर गाडी घेऊन हळू हळू येत राहिला मागे.. पण थोडं अंतर ठेवूनच - नाहीतर गाडीच्या आवाजाने पक्षी पळून जायचे)

  Whiskered Yuhina  

  Himalayan Cutia  

  Himalayan Bluetail  

अचानक आम्हाला लांबलचक शेपटीचा एक पक्षी उडत पुढे जाताना दिसला. हळूच त्याच्या मागे जाऊन कुठे बसतोय ते पाहिलं आणि जवळजवळ धावतच तिथे पोहोचलो. तो yellow-billed blue magpie निघाला (त्याचा भाऊबंद म्हणजे red-billed blue magpieमी आधी सात्ताल, उत्तराखंड इथे पहिला होता). तो फार वेळ बसला नाही, पण होता तोपर्यंत २ फोटो मिळाले.

तो पर्यंत अभय चे लक्ष जवळच्या झाडीतील आवाजाने वेधले होते. तिथे काही छोट्या पक्षांची हालचाल जाणवत होती. त्यांच्या जलद हालचालींमुळे त्यांचा मागोवा घेणं कठीण होत होतं, परत एकदा १-२ फोटो मिळाले. ते होते Hoary-throated Barwing (मी पण पहिल्यांदाच ऐकलं नाव 😜).

त्याच वेळी समोरच्या बाजूला अजून एक ग्रुप दिसला, ते झाडाच्या खोडावरून हालचाल करत असल्याने फोटो घ्यायला थोडं बरं होत, पण होते सावलीतच त्यामुळे प्रकाश चांगला नव्हताच. हे Rufous-winged fulvettas सुद्धा नवीनच होते मला.

  Red-billed Blue Magpie  

  Hoary-throated Barwing  

  Rufous-winged Fulvetta  

हे सगळं पक्षी निरीक्षण होत असतांना अजूनही आम्ही त्या कच्च्या रस्त्यावरच होतो, म्हणजे हॉटेल पासून फक्त ३-४ km च्या परिघात. शेवटी जेव्हा आम्ही लावा च्या रस्त्यावर पोहोचलो तो पर्यंत ८:३० झालेले होते. सकाळी ४:३० ला उठल्यामुळे आता नाश्त्यासाठी थांबायला हवं होतंच. मग तिथल्याच एका restaurant मध्ये ऑम्लेट पाव आणि लोकल मॅगी सारख्या (वाई वाई नावाच्या) नूडल्स व चहा असा झकास नाश्ता झाला.

पोटोबा झाल्यावर आता आम्ही विठोबा (म्हणजे आमच्यासाठी बर्डिंग) च्या मार्गाला लागलो परत. भक्तांना जसं विठ्ठलापुढे काहीच दिसत नाही, तसं पक्षी दिसायला लागले कि आम्ही तहान-भूक विसरतोच.

थोड्या अंतरावर मग आम्ही highway सोडून कोलाखाम च्या मार्गाला लागलो. थोडं पुढे जाताच, अभय ने एका ठिकाणी गाडी थांबवली. मागच्या अनुभवांवरून त्याला कल्पना होती कि इथे Mrs. Gould’s sunbird नक्की दिसणार. शिंजीराने आम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावली नाही पण दुर्दैवाने त्याच वेळी एक गाडी खूप आवाज करत तिथून गेली आणि त्यामुळे तो शिंजीर उडून गेला.

मग तिथून आम्ही परत चालत पुढे जायचा निर्णय घेतला. साधारण २०० मीटर पुढे परत आम्हाला Sunbird दिसला. आणि इथे आमचं नशीब जोरावर होतं. शिंजीर बराच वेळ थांबला आणि फोटो देखील मिळाले.

थोड्याचं अंतरावर मग आम्हाला warblers आणि मिनिव्हेट्स दिसले. हे सगळं रस्त्यालगतच्या झाडांजवळ होत असतांना खाली दरीत white-throated fantail दिसला. जरा पुढे मग अजून काही मिनिव्हेट्स होते. त्यांचे फोटो काढलं असतांना अचानक कुठूनतरी २ black-throated bushtits आले. आले आणि पटकन खाली दरीकडे गेले सुद्धा.

  Minivet-male  

  Kolakham Valley  

  Mrs. Gould's sunbird  

वेळ खूप भरभर जात होता. आम्ही कोलाखाम ला पोहोचेपर्यंत ११:३० झाले होते.तिथे थोडा वेळ आम्ही पुलाच्या बाजूने जाऊन नदीच्या पात्रात शोधाशोध केली पण एकच water redstart दिसला, तोही खूप अंतरावर आणि पुढे जाईपर्यंत तोहि उडून गेला.

  River Bridge  

परत एकदा आम्ही गाडीत बसलो. थोडं पुढे एका छोट्या रेस्टॉरंट पाशी आम्ही गाडी वळवून परत फिरणार होतो. पण तिथे आधीच बऱ्याच गाड्या (टुरिस्ट वेहिकल्स) होत्या, त्यामुळे आमच्या ड्राइवर ने थोडं पुढे जायचं ठरवलं (तेही फक्त गाडी वळवण्यासाठी). पण तेच थोडं अंतर आमच्यासाठी खूप लकी ठरलं.

थोडे पक्ष्यांचे आवाज येत असल्याने आम्ही तिथे उतरलो (आणि ड्राइवर ला गाडी वळवून घ्यायला सांगितलं). तिथल्याच एका मोठ्या झाडावर आम्हाला एक वेगळा पक्षी दिसला. अभय ने त्याचं नाव Little-pied flycatcher असं सांगितलं. आत्ता पर्यंत आम्हाला Golden -throated बार्बेट दिसला नव्हता, तोहि इथे दिसावा अशी आम्ही अशा करत असतांना प्रशान्त ला त्याच झाडावर अजून एक पक्षी दिसला (त्याच्या दुर्बिणीतून). अभय ने सहज म्हणून तिथे बघितलं आणि तो जवळ-जवळ ओरडलाच! अरे बार्बेट आहे हा.. काढा फोटो लवकर!! लगेच आमचे कॅमेरे तिथे रोखले गेले. त्या बार्बेट नि आमची अजिबात पर्वा केली नाही (नशीब आमचं), तो आपल्याच नादात गात होता आणि त्याच जागेवर ५-१० मिनिटे मजेत बसलेला होता.

  Little Pied Flycatcher  

  Golden-throated Barbet  

मग बार्बेट जिथून उडाला तिथेच एक black-throated sunbird आला. पण तो केवळ क्षणभरच थांबला तिथे. आणि कसाबसा एक फोटो काढतो न काढतो तोच, तिथून पसार झाला.

दोनच मिनिटात मग बाजूच्या झाडावर Orange-bellied leafbird ची मादी आली. नराने पण एक ओझरतं दर्शन दिलं पण फोटो काढायच्या आत तो गायब झाला.

ते फोटो काढत असतांनाच अभय परत ओरडत आला. अरे Sultan Tits आलेत तिथे. चांगले ४ सुलतान tits आधीच्याच झाडावर येऊन विराजमान झालेले होते. मग काय, परत झाले क्लीक-क्लीक सुरु...

अक्षरशः ३०-३५ मिनिटात तिथे आम्हाला ४ नवे पक्षी (lifers ) बघायला मिळाले.. आणि विशेष म्हणजे आम्ही आधी इथे कसलीही अपेक्षा ठेवलेली नव्हती,, अर्थातच आमच्या खुषीला पारावार नव्हता... ह्या विशेष पक्ष्यांच्या जोडीला तिथे fire-breasted flowerpeckers, minivets आणि black-bulbul सुद्धा येऊन गेले होते, पण lifers च्या नादात त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.

  Orange-bellied Leafbird  

  Sultan Tit  

हे सगळं होईपर्यंत १ वाजून गेले होते, त्यामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परत येतांना रस्त्यात थोडे पक्षी दिसत होते पण आम्ही तिथे थांबलो नाही. साधारण ३ च्या सुमारास आम्ही लावा गावात पोहोचलो, तो पर्यंत आकाशात काळे ढग जमा झाले होते, कधीही पाऊस सुरु होईल असंच वाटत होतं.

मग आम्ही तिथल्याच एका छोट्या हॉटेलात जेवलो (मोमोस वगैरे लोकल खाणं). बाहेर आलो तर पाऊस चालू झाला होता. कॅमेरा सांभाळत धावत-धावत गाडीत जाऊन बसलो आणि हॉटेल काढे निघालो. रिश्यप मध्ये सगळं कोरडं दिसत होतं पण काळे ढग मात्र होतेच. आम्ही आमच्या खोलीत शिरलो आणि पाचच मिनिटात तिथेही जोरदार पाऊस सुरु झाला.

पाच वाजता थोडी उघडीप आली, बाहेर जाऊन पक्षी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण फार काही हाती लागलं नाही. मग आम्ही उगाचच मोबाईल वर फोटोस आणि नंतर अभय च्या ड्रोन ची माहिती घेतली. ड्रोन थोडा वर उडवून दिसणारे विहंगम दृश्य स्क्रीन वर बघितले. गमतीचा भाग म्हणजे, जेव्हा अचानक ड्रोन उडू लागलं, तेव्हा जवळ असणाऱ्या एका कुत्र्याची घाबरगुंडी उडाली आणि तो पळत सुटला.

  Checking the surroundings  

  Sameer with Drone  


चौथा दिवस: ५-एप्रिल-२०२१

आज आमचा रिश्यप मधला शेवटचा दिवस. सकाळी थोडा वेळ फिरून मग आम्ही लाटपंचर ला जाणार होतो, तोही ४-५ तसंच प्रवास असल्याने आम्ही ९:३० पर्यंत इथून निघण्याचा प्लॅन केला होता. म्हणजे न्याहारी करून निघायचे आणि थोडं उशिरा जेवायला तिथे.

त्यानुसार सकाळचे ५:३० ते ८:३० जवळच जायचं ठरलं (बॅगा तर रात्रीच भरून ठेवल्या होत्या, त्यामुळे त्यात फारसा वेळ जाणार नव्हता). आज रोजच्या कलाकारांबरोबर काही Doves आणि green-backed tits सुद्धा दिसले. आमच्या homestay पासून थोडं वर असण्याऱ्या Lovely Resort च्या जवळ Golden Bush Robin ची एक ठरलेली जागा होती, तिथे अर्थातच फोटोग्राफर्स ची गर्दी होतीच, मग आम्हीही त्या गर्दीत सामील झालो. रॉबिन होता तिथेच जवळपास पण झुडुपांमधून अजिबात बाहेर येत नव्हता. त्याच्या प्रत्येक हालचाली मागोमाग आम्ही सगळे पक्षी-निरीक्षक पण धावपळ करत होतो. मला एकच फोटो मिळाला आणि तेवढ्यात अभय चं बोलावणं आलं. त्याला वर कुठेतरी fire-tailed sunbird असल्याची चाहूल लागली होती, आणि हा आम्ही काल मिस केला होता त्यामुळे लगेचच निघालो.

आमची नशीब इथे जोरात होतं. थोड्याच वेळात पहिला शिंजीर दिसला, तो green-tailed होता पण लगेचच fire-tailed नि पण हजेरी लावली. तेही २ एकदम, दोघेही eclipse plumage (म्हणजे त्याची चमकदार रंगीत पिसे अजून पूर्ण दिसत नव्हती, कदाचित ते अजून वयात आलेले नसावेत) मध्ये होते पण बऱ्यापैकी जवळच्या झाडांवर बसत होते. त्यांचे फोटो काढून मग खाली परत आम्ही आधीच्या जागेवर आलो, तर तिथेही एक fire tailed sunbird हजर होता आणि ह्याला पूर्ण रंग सुद्धा होते.

  Minivet  

  Green-tailed Sunbird  

  Fire-tailed Sunbird  

साधारण ८:१५ च्या सुमारास आम्ही परत जायला निघालो. वाटेत एक छान बसलेला Little Bunting दिसला.

होम-स्टे ला परत आल्यावर लगेच न्याहारी केली, थोडंसं उरलेलं सामान बॅगेत भरलं आणि गाडीची वाट बघत बसलो. तिथे बसल्या-बसल्या अचानक वर आकाशात एक शिकारी पक्षी उडतांना दिसला, वेगळा वाटला म्हणून अभय ला बघायला सांगितलं, तर तो म्हणाला लगेच कॅमेरा घेऊन या, हा Black Eagle आहे. धावपळ केली आणि तो पक्षी लांब जायच्या आत १-२ फोटो काढून घेतले.

इथे गाडीची बात बघत असतांना अभय कडून काही गोष्टी कळल्या. इथल्या टुरिस्ट गाड्यांची एक union आहे आणि कुठली गाडी मिळणार हे तेच ठरवतात (म्हणजे रोटेशन तत्वाने सगळ्या गाडीवाल्यांना धंदा मिळतो). आणि इथे आम्ही एका जिल्ह्यातून दुसरीकडे जात असल्याने, पहिली गाडी थोड्याच अंतरावर आम्हाला सोडणार होती आणि तिथून दुसरी गाडी असणार होती. लाटपंचर इथे मात्र अभय ने एकच ड्राइवर पूर्ण चार दिवस manage केला होता

  Black Eagle  

आम्हाला निघेपर्यंत १० वाजून गेले होते. आजचा आमचा प्रवास कलीमपॉंग ह्या शहरातून असणार होता. तिथे आज काहीतरी राजकीय सभा होती (तिथल्या भागातील निवडणूक ह्या १७ तारखेला होणार होत्या, त्यामुळे प्रचार जोरात चालू असावा). त्या कारणाने, वाहतूक मार्गात बदल केलेले होते, परिणामस्वरूप आम्हाला तिथल्या २ km चा रस्ता पार करायला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागला.

बहुतेक सगळं प्रवास हा घाट मार्गातूनच होता आणि त्यातही बराच वेळ एका बाजूला तिस्ता नदी चं पात्र दिसत होतं.

बरंच अंतर पार केल्यावर एका ठिकाणी मला एक वेगळा पक्षी दिसला म्हणून तिथे थांबलो. खरंतर ह्या नदीच्या बाजूचा परिसर तसा सेन्सिटिव्ह आहे (देशाचा सीमावर्ती भाग असल्यामुळे), त्यामुळे तिथे उतरून फोटोग्राफी करणं हे तेवढं संयुक्तिक नव्हतं. पण उतरलो आणि आम्हाला एक सहसा ना दिसणारा असा black-crested bulbul दिसला (अभय म्हणाला खरा कि rare आहे, पण पुढच्या २-३ दिवसात आम्हाला तो बऱ्याच वेळा दिसला). आणि हो, ज्याला बघून आम्ही थांबलो तो पक्षी होता common hill myna, तोही नवीनच होता मला.

मोठ्या रस्त्यावरून आम्ही कालिझोरा च्या इथून वळलो आणि अजून एका घाट रस्त्याला लागलो. हा रस्ता आता सरळ (घाटाचा रस्ता म्हणजे वळणा-वळणाचाच पण थेट तिथे घेऊन जाणारा म्हणून सरळ म्हंटल) लाटपंचर गावातच घेऊन जाणार होता.

थोडा वर जाताच एका ठिकाणी अभय ने गाडी थांबवली, बाजूला एक खारुताई बागडत होती, थोडी वेगळी होती ती orange-bellied squirrel. आम्ही गाडीत बॅगा पॅक करून ठेवलेल्या असल्या तरी कॅमेरे वरच ठेवले होते, ते लगेच बाहेर आले. तिथून मग कॅमेरा हातातच राहिला कारण पक्षी दिसायला लागले होते.

त्यात सर्वात पहिला होता फळं मटकावत असलेला blue-throated barbet. बेरी सारखी फळ असल्याने त्या झाडावर इतर पक्षी सुद्धा होते. त्यात प्रामुख्याने लक्ष गेलं ते Black-crested bulbuls कडेच. तिथे झाडांवर काही orchids सुद्धा दिसत होती छानशी. जरा पुढे गेल्यावर आम्हाला ट्रिप मधलं पहिलं (आणि एकुलतं एक) घुबड दिसलं (Asian barred owlet).

  Blue-throated Barbet  

  Black-crested Bulbul  

  Asian Barred Owlet  

  Orange-bellied Squirrel  

ह्या सगळ्या फोटोंच्या नादात आणि ट्रॅफिक मुळे आम्हाला लाटपंचर ला पोहोचायला ४ वाजले. आटा जर आम्ही उतरून बॅगा ठेवून जेवून घेतलं असतं तर परत बाहेर पडेपर्यंत निदान ५ वाजले असते, म्हणजे अंधार व्हायला लागलं असता. त्यामुळे आम्ही सुरज (आमचा तिथला गाईड) ला त्याच्या घरातून गाडीत घेतलं आणि तडक birding साठी निघालो (सुरजने आधीच सांगितलं होत कि त्याने एक जागा बघून ठेवली आहे जिथे Hodgson’s frogmouth बसलेले होते, त्यामुळे आम्ही ;लगेच तिथे जायला निघालो. वाटेत सुरजने हि बातमी दिली कि २-३ दिवसांपासून ह्या भागात जंगली हत्तींचा कळप आलेला आहे, त्यामुळे थोडं सावधपणेच तिथे जावं लागेल. सुदैवाने तसं काही झालं नाही म्हणा !

त्या विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यावर सुरज गाडी थांबवून पटकन पुढे दरीत उतरला. खूपच तीव्र उत्तर होता आणि जमीन थोडी भुसभुशीत. त्यात कॅमेरा/ ट्रायपॉड सगळं घेऊन उतरणं म्हणजे दिव्यच होत. सुरुवात केली आणि एक १० मीटर खाली जातो तोच, सुरज वर आला. ते पक्षी तिथून उडून गेले होते, त्यामुळे खाली जाण्यात काही अर्थ नव्हता.

परत एकदा आम्ही गाडीत बसलो. गाडी वळवण्यासाठी थोडं पुढे जायला लागणार होतं त्यामुळे अभय आणि सुरज इतर पक्ष्यांच्या शोधार्थ तिथेच थांबले. अभयला तिथे अचानक Red-headed trogons ची जोडी दिसली. सुरजचा विश्वास बसला नाही कारण त्या भागात आधी त्याने कधी बघितले नव्हते. मग त्याने हि खात्री करून घेतली आणि आम्हाला बोलवायला तो धावत निघाला (तिथे फोने चालत नसल्याने, तो ड्राइवर ला कळवू शकत नव्हता).

आम्ही पोहोचेपर्यंत ती जोडी खाली दरीत उडून गेली होती, त्यामुळे आम्हाला फक्त ओझरतं दर्शन झालं. पण खूपच दुर्मिळ पक्षी असल्याने २ फोटो घेतलेच..

  Red-headed Trogons (male/female)  

परत जातांना सुरज म्हणाला कि अजून एका ठिकाणी तो प्रयत्न करू शकतो (फ्रॉगमाऊथ साठी). मग तिथे उतरून तो एकटाच झाडीत गायब झाला. १० मिनिटांनी हसऱ्या चेहेर्याने परत आला. लगेच आम्ही सगळे निघालो त्याच्या मागे, ह्या वेळेस ड्राइवर (नानी भैया.. हा स्वतः सुद्धा चांगलं गाईड होई शकेल पुढे, चांगलीमाहिती होती त्याला) सुद्धा आमच्या बरोबर आला

निघालो खरे पण हि वाट ("वाट" - म्हणजे "वाट लागणं" हाच अर्थ जास्त योग्य होता इथे) तर फारच भयंकर होती. इथे पायवाट वगैरे काही नव्हतं. झाडांच्या आधाराने आम्ही पुढे जात होतो (आणि एका बाजूला खोल दारी). १०-१५ पावलं व्यवस्थित गेलो आणि अचानक माझा पाय घसरला, काही कळायच्या आत मी (कॅमेरासकट) २ फूट खाली आलो, पण झाडांच्या आधाराने तिथेच थांबता आलं, कॅमेरा ला छान धूळ-स्नान झालं तो पर्यंत. परत उठून पुढे हॅलो पण मार्ग अजूनच खडतर होता पुढचा. शेवटी तिथेच थांबलो आणि बाकीच्या पुढे जाऊ दिलं. परत येतांना पुन्हा एकदा पाय थोडा घसरलाच.

अभय आणि प्रशांत (त्याने खूप दुर्ग-भ्रमण केले असल्याने असल्या वाटेला तो सरावलेला होता तसा) पुढे जाऊन आणि फोटो काढून आले. त्यांच्याकडून पुढच्या वाटचालीची माहिती कळली आणि मी पुढे गेलो नाही ते फार योग्य केलं, हे लक्षात आलं.

पण ह्या २० मिनिटांनी मला एक धडा शिकवला. ह्या पुढे असल्या वाटेला फिरकायचं नाही !! २ पक्षी कमी दिसले तरी चालेल, पण त्याकरता जीव धोक्यात घालण्यात अर्थ नाही.

इथून पुढे हॉटेल (होम स्टे) पर्यंत बिनबोभाटपणे गेलो. लगेचच चहा झाला आणि त्यांनी स्नॅक्स म्हणून भजी आणली. इतकं बरं वाटलं ते बघून कारण सकाळी १० वाजता नाश्त्यानंतर आम्ही पूर्ण उपाशीच होतो. पक्षी बघतांना भूक कळत नाही पण आता ती जाणवत होती.

हे गाव (लाटपंचर) तसं रिश्यप पेक्षा खूप मोठ आणि सुधारलेलं वाटत होत पण इथे मोबाइलला सिग्नल अजिबात नव्हता.


पाचवा दिवस: ६-एप्रिल-२०२१

आज आम्ही थोडे उशिरा म्हणजे ६ वाजता निघालो. इथलं विशेष आकर्षण म्हणजे Rufous-necked Hornbills. त्या पक्षाची एक जोडी हल्लीच सुरज ला दिसली होती आणि त्यांनी बहुतेक एक झाड घरट्यासाठी निवडलेलं होतं त्यामुळे रोजच ते दोघेही तिथे येण्याची खूप शक्यता होती (तसे ते काळ अलेलही होते सकाळी १० च्या सुमारास). त्या दृष्टीने आम्हीपण त्याच सुमारास तिथे जायचं ठरवलं.

अर्थातच तो पर्यंत आमच्याकडे इतर पक्षी बघण्यासाठी वेळ होता. महानंदा भागात शिरतानांच आम्हाला एक Large Cuckooshrike दिसला. प्रकाश तसा कमीच होता पण पक्षी ओळखण्यासाठी पुरेसा होता. थोडं पुढे जाऊन आम्ही एका छोट्या पठारापाशी थांबलो (ती बहुतेक सगळ्याच birders साठी थांबायची जागा होती, तिथून पुढे मग पायी फिरत होते सगळेच जण). गाडीतून उतरून आधी सर्व परिसर न्याहाळला. सर्व बाजूंनी दिसणारे डोंगर मन मोहून टाकत होते. सर्वत्र हिरवेगार आणि काही ठिकाणी फळझाडे सुद्धा होती

गेल्या-गेल्याच आम्हाला २ हिमालयन ब्लॅक बुलबुल दिसले. थोड्याच वेळात Sultan Tit ने त्याच्या आगमनाची वार्ता दिली (repeated कॉल्स). आम्ही त्याचे फोटो काढत असतांनाच एक मोठ्या शेपटीचा काळसर पक्षी (Hair-crested drongo) उडत आमच्या जवळच्याच झाडावर येऊन बसला. थोड्या अंतरावर मग एक olive-backed pipit हि दिसला. दूरवर आम्हाला मिनिव्हेट्स सुद्धा दिसत होते, थोडे वेगळे वाटले म्हणून सुरजने दुर्बिणीतून पाहिलं, तर ते Grey-chinned minivets होते. त्याचे फोटो काढतो-न-काढतो तोच Large Woodshrike आणि pygmy woodpecker (Brown-headed one) ह्यांनी दर्शन दिलं. हे असं सगळं पक्षी-वैभव दिसल्यामुळे आम्ही अगदी आनंदात होतो. तेवढ्यात सुरज ला एक ओळखीची शीळ ऐकू आली. त्याने लगेच आम्हाला Asian Emerald Cuckoo विषयी सांगितलं. त्याच बोलणं पूर्ण व्हायच्या आत ती cuckoo तिथे आली सुद्धा. खूप सगळे फोटोग्राफेर्स तिथे होते तरीही तिने आम्हाला व्यवस्थित फोटो घेऊ दिले.

  Hair-crested Drongo  

  Himalayan Black bulbul  

  Mahananda Valley  

  Asian emerald cuckoo  

त्यानंतर सुरज आम्हाला एका पायवाटेने घेऊन गेला (कालच्यापेक्षा खूपच सोपा होता हा रस्ता). इथे खूप सगळी फुलपाखरे दिसत होती, पण आमच्या बरोबर कोणीही तज्ज्ञ नसल्याने त्यांची नावे कळू शकली नाहीत. इथे अजून थोडे मिनिव्हेट्स दिसले आणि परत एक Blue-throated barbet. थोड्या वेळाने तिथे आम्हाला Maroon Oriole ची एक जोडी आकाशात घिरट्या घालताना दिसली. पण त्यांनी बसण्यासाठी एक खूप लांबचं झाड निवडलं. पहिल्यांदाच बघत असल्याने फोटो काढायचेच होते (कुठेही असले तरी).

आता ८:३० झाले होते आणि इतका वेळ आम्ही फक्त चालत किंवा उभेच होतो. मग सर्वांनीच तिथे थंड वातावरणात छानपैकी वैठक मारली. ५ मिनिटे बसल्यावर थोडा शीण कमी झाला.

  Minivet-female  

  Maroon Oriole  

  Prashant, Suraj & Sameer  

नऊ वाजता मग सुरज ने परत आम्हाला आवाज दिला आणि आम्ही मुख्य वाटेकडे निघालो (म्हणजे हॉर्नबिल साठी). हि पायवाट अगदी अरुंद होती त्यामुळे आम्हाला त्याच्या मागेच (म्हणजे एका रांगेत खरंतर) राहण्याशिवाय पर्याय नव्हता. बराच वेळ आम्ही त्या वाटेने खाली खाली दरीत जाताच होतो, शेवटी एकदाचा तो थांबा आला. त्याच्या जरा आधी त्याने आम्हाला खाली दूर झाडीत २ पक्षी दाखवले, ते होते white-throated Bulbuls (आपल्या कडे बुलबुल दिसतात त्यांच्यापेक्षा खूपच वेगळे)

आम्ही बराच वेळ तिथे बसून होतो पण हॉर्नबिल येण्याची काहीही चिन्हे दिसत नव्हती. नाही म्हणायला १-२ वेगळे पक्षी तरी येऊन गेले तेवढ्यात तिथे. आधी yellow-vented warbler दिसला आणि नंतर Black-throated Sunbird (हा आम्हाला काल दिसला होता पण तेव्हा फोटो नव्हते मिळाले नीटसे). तिथे आम्हाला अतिशय सुंदर असं Paris Peacock नावाचं फुलपाखरू देखील दिसलं बसल्या बसल्या.

खरंतर त्या पायवाटेवर आम्ही एक छोटा ट्रॅफिक जॅमच केला होता. ती वाट तुडवणारे खूप सगळे गावकरी दिसले तिथे (बहुदा ते लाकूडफाटा किंवा इतर काही जंगल संपत्ती गोळा करत असावेत). आमच्या शिवाय तिथे अजून २ ग्रुप्स सुद्धा होते.

११:३० पर्यंत आम्ही वाट बघितली आणि मग जड अंतःकरणाने तिथून निघायचा निर्णय घेतला. तोपर्यंत खूप भूकही लागली होती,. येता-येता त्याच पायवाटेवर आम्हाला मग Pin-striped Tit Babbler हा अजून एक छोटासा पक्षी दिसला. त्याच्या मानेवर असणाऱ्या बारीक अशा रेषांमुळे त्याला हे नाव पडले असावे.

  Just enough width  

  Pin-striped Tit babbler  

  White-throated Bulbul  

१२:३० च्या सुमारास आम्ही हॉटेलात परतलो आणि नाश्ता-जेवण एकत्रच झालं. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली (चालून चालून दमलो होते, आणि ५० म्हणजे वय पण झालं कि आता 😩).

दोन वाजता परत बाहेर पडलो (पाच पर्यंतच उजेड असल्याकारणाने जास्त वेळ थांबता आलं नाही). आज आम्ही इथल्या नर्सरी भागात जाणार होतो (म्हणजे हा तोच घाट रस्ता जिथून आम्ही काल आलो होतो). इथे एका भागात हेल्मेटवाले पक्षी (Long-tailed broadbill) दिसू शकतात म्हणून जवळच गाडीतून पायउतार झालो.

आम्ही असं ऐकून होतो कि ह्या भागात खूप पक्षी दिसतात (अगदी रस्त्याच्या जवळ काही वेळा त्यांची घरटी सुद्धा असतात). पण इथे रस्ते दुरुस्तीची कामे चालू असल्याने पक्षी डिस्टर्ब झाले असावेत त्यामुळे अगदीच शुकशुकाट (पक्षांचा) होता तिथे.

उतरलो तिथे खाली एक ओढा वाहत होता (रस्त्याच्या खालून). त्या पात्रात प्रशांत ला एका पक्षाची हालचाल जाणवली. नीट बघितल्यावर आम्हाला Slaty-backed Forktail दिसला. जवळच एक nuthatch व एक woodpecker सुद्धा दिसले.

सुरज आधीच पुढे गेलेला होता त्याने तिथून आवाज दिला. त्याला broadbills चा एक छोटा थवा दिसला होता. ते कळल्यावर थोडेसे धावतच आम्ही तिथे गेलो. होते तिथे ३-४ पक्षी पण ते एवढे पानामध्ये बसले होते कि एवढ्या अंतरावरून त्यांचे फोटो काढणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे कुठूनतरी त्यांच्या थोडं जवळ जाणं आवश्यक होतं. मग सुरु झाला अजून एक ट्रेल, ह्या वेळी खाली दरीत जाण्याच्या ऐवजी आम्ही वरच्या दिशेने डोंगराकडे चालत होतो. आमच्या जवळचे कॅमेरे सांभाळत वर जाण थोडं त्रासदायकच होत, पण सांगतो कोणाला, फोटो तर हवेच होते.

वर जातांना बऱ्याच झाडा-झुडुपांतून जावं लागत होतं. मधेच खाली वाकून, मधेच फांद्या-पानं बाजूला सारून आम्ही वर जात होतो. त्रास होताच पण मजाही येत होती. फक्त प्रॉब्लेम एवढाच होता, कि आम्ही थोडं अंतर गेलो कि ते पक्षी अजून पुढे सरकत होते. त्यांच्या बरोबरीने जाणं शक्यच नव्हतं आम्हाला. अधून-मधून काही वेळेस आम्हाला एखादा ब्रॉडबिल छान दिसत होता पण लगेच तो जागा बदलायचा. असा हा खेळ जवळ-जवळ तासभर चालू होता. त्यात मग थोडे बरे फोटो मिळाले आम्हाला.

  Long-tailed Broadbill  

  Long-tailed Broadbill  

  Slaty-backed Forktail  

हे सगळं होत असतांना आमच्या ड्राइवर ला वाटलं आम्ही सरळ रस्त्यावरून खाली गेलो, म्हणून त्याने वेळ वाचवण्यासाठी गाडी स्वतःच खाली नेली. आम्ही मधेच आडवाटेने वर गेल्यामुळे आमची चुकामुक झाली. आता परत त्याच्या पर्यंत खाली जाण्याची आमच्यात ताकद नव्हती (आणि त्याचा फोन हि लागत नव्हता). मग बिचारे अभय आणि सुरज चालत गेले आणि त्याला बोलावून घेऊन आले. गाडीत बसल्यावर आणि थोडं पाणी प्यायल्यावर मगच आमच्या जीवात जीव आला.

काही बुलबुल आणि एक घुबड सोडलं तर फारसं काही नाही दिसलं नंतर. मग ५ वाजता आम्ही परतायचा निर्णय घेतला. वाटेत रस्त्यात आमच्या ड्राइवर च्या गावातला एक मित्र दिसला, त्याच्याकडून कळलं कि हॉर्नबिल आहेत जवळंच. मग उतरलो परत खाली आणि निघाली आमची फौज. आम्ही धडाधड खाली उतरायला सुरुवात केली (वर चढण्यापेक्ष उतार सोपा), अर्थात आम्ही आमच्यापरीने भराभर होतो पण सुरज तोपर्यंत खूपच लांब पोहोचला होता. आणि आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते पक्षी उडून सुद्धा गेले होते. परत एकदा आम्ही रिकाम्या हाताने निघालो.

वर येतांना जाणीव झाली कि आम्ही किती खाली उतरलो होतो दरीत. आमची चांगलीच दमछाक होत होती. रस्त्याच्या जवळ पोहोचणार तोच अभयने Common Green Magpie चा आवाज ऐकला. तुमच्या पैकी जे birding शी फारसे परिचित नसतील त्यांच्यासाठी सांगतो, का "कॉमन" शब्द खूप फसवा आहे. असे खूप पक्षी आहेत ज्यांच्या नावात कॉमन आहे पण ते दिसणं खूप uncommon असतं (उदा. Common Starling, Common cuckoo, Common Quail, Common Shelduck, ई.). थोडा वेळ सगळी पानं धुंडाळल्यानंतर आम्हाला एकदाचा तो पक्षी दिसला. कसा-बसा एक फोटो काढला त्या अंधारात आणि आलो वर रस्त्यावर.

  Common Green Magpie  

आता बराच उशीर झाला होता, त्यामुळे घरी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. मागे वळून पाहता (म्हणजे शब्दशः नाही हो) आजचा दिवस तसा चांगला होता पण हॉर्नबिल नि मात्र निराशा केली थोडी.

उद्या आम्ही लवकर निघून थोडं लांब जाणार होतो, त्यामुळे जेवून अगदी लवकर म्हणजे ९:३० लाच झोपून गेलो. इथे दिवसभर दमल्यामुळे सगळ्यांना अगदी मस्त झोप लागत होती.


सहावा दिवस: ७-एप्रिल-२०२१

आज आम्ही ३-४ वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला होता पण रात्रीत अशी बातमी मिळाली कि निवडणूक प्रचाराच्या सभा इथे काही भागात असणार होत्या त्यामुळे १-२ जागांना जाणं थोडं त्रास-दायक ठरू शकेल. त्यामुळे मग कुठे जायचं हा निर्णय आम्ही सुरज च्याच हाती सोपवला, तो नेईल तिथे जायचं!

५:४५ ला निघालो, आज थोडं वरच्या वाटेनी जात होतो (म्हणजे लाटपंचर ज्या डोंगरावर वसलेलं आहे, त्याच्या शिखराच्या इथून आजचा रस्ता होता शिवखोला इथे जाणारा. जाताना सुरुवातीला Blue-capped Rock thrush आणि Tickell’s thrush ह्यांनी श्री-गणेशा केला. तिथून मग दर ५-१० मिनिटांवर आम्ही पक्षी बघत होतो आणि थांबत होतो.

एका ठिकाणी ४ डोंगरी मैना मस्त पैकी बसलेल्या दिसल्या, पण आम्ही खाली उतरेपर्यंत त्या उडून लांब निघून गेल्या होत्या. पण तिथेच आम्हाला एक छानसा Blue rock-thrush दिसला आणि मग एक Common Iora (सुभग पक्षी). सुभग छान जवळ बसला होता पण तेवढ्यात भरधाव येणाऱ्या एका वाहनाच्या आवाजाने तो उडून गेला. आता परत एकदा आम्हाला Common Green Magpie.चे आवाज ऐकू आले. पण पुन्हा एकदा ते लांबवरच बसले होते. अजुन पुढे गेल्यावर मग pygmy woodpecker आणि Great Barbet ह्यांनी दर्शन दिलं

  Hill Myna  

  Blue Rock-thrush  

  Common Iora  

ह्या वेळी गाडीत बसल्यावर १५-२० मिनिटे एकही पक्षी दिसला नाही. अचानक एका वळणावर blue-throated barbet चं एक जोडपं दिसलं. त्यांचं घरटं बनवण्याचं काम पाळी-पाळीने सुरु होतं. तिथे आम्हाला चांगले फोटो आणि विडिओ सुद्धा मिळाले. आतापर्यंत आमचं लक्ष उंच झाडांवर होतं पण अचानक चहाचे मळे दिसू लागले आणि पानं खुडणारे काही गावकरी देखील. ह्याच मळ्यांमध्ये आम्हाला २ Green-billed Malkoha दिसले. झुडुपांमधून त्यांच्या थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्यात फारसं यश मिळालं नाही. शेवटी लांबूनच फोटो घेऊन आम्ही परत फिरलो.

साधारण ९ च्या सुमारास आम्ही शिवखोला येथील शिव मंदिरापाशी पोहोचलो. (खोला म्हणजे इथल्या नेपाळी भाषेत नदीचं पात्र आणि तिथे असलेल्या ह्या मंदिरामुळे जागेचं नाव शिवखोला). इथून जवळच मग आम्हाला पाचवा शिंजीर (Crimson Sunbird) दिसला. त्याने अगदी छान फोटो देखील काढू दिले.

मग इथेच जवळपास आम्हाला खूप सगळे पक्षी दिसू लागले. त्यात होते Black-crested bulbul, long-tailed and scarlet minivets, brown-capped pygmy woodpecker आणि त्याच बरोबर काही फुलपाखरे सुद्धा. आणि हो, Nuthatches व leafbirds सुद्धा होते तिथे.

  Crimson Sunbird  

  Pygmy Woodpecker  

  Blue-throated Barbet  

तिथून मग आम्ही रॉन्गटॉन्ग च्या दिशेने कूच केलं. इथे खासकरून ग्रेट हॉर्नबिल साठी आम्ही जात होतो. पण घाटात एका ठिकाणी आम्हाला थांबायलाच लागलं. रस्त्यांची कामे चालू होती आणि पुढे जाण्याचा रस्ता बंद होता. नशिबाने जवळच एक खोपटं होत ज्यात आम्हाला चहा आणि मॅग्गी मिळू शकलं. १० वाजले होते त्यामुळे भूक लागलीच होती. त्या हॉटेलात १-२ जण वाटण्याच्या उसळीसारखं काही तरी खाताना दिसले, मग आम्ही त्याचा समाचार घायचं ठरवलं. भुकेपोटी काहीही छानच लागतं म्हणा, पण ह्याला खरंच चांगली चव होती.

नाश्ता होईपर्यंत, रस्ताही मोकळा झाला होता. तिथून पुढे जवळ-जवळ अडीच वाजे-पर्यंत आम्ही खूप भटकलो. पण काही मिनिव्हेट्स, Himalayan griffon नावाचं गिधाड आणि १ black-winged cuckooshrike सोडले तर जास्त काहीही दिसलं नाही. सुरजने त्याच्या इतर मित्रांना फोन करून चाचपणी केली (जे इथे जवळपास फिरत होते) पण कोणालाच आज ग्रेट हॉर्नबिल्स दिसले नव्हते.

  Himalayan Vulture  

  another Minivet  

शेवटी मग आम्ही नाईलाजाने जेवणासाठी थांबायचं ठरवलं. जेवणानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. आता ४ वाजत आले होते. काल Rufous-necked आणि आज ग्रेट अशा दोनही हॉर्नबिल्स नि आम्हाला दगा दिला होता.

दमून आणि थोड्या निराशेनेच आम्ही प्रवास करत होतो, तेवढ्या एका वळणावर मला २ खूप मोठे पक्षी उडताना दिसले आणि अचानक मला जाणीव झाली कि हेच ते हॉर्नबिल्स (प्रत्यक्ष जरी बघितले नव्हते, तरी ह्यांचे फोटोस मी बरेच बघितले होते). अतिशय उत्साहात मी ओरडलो आणि सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या. आता सुरज ने परिस्थितीचा ताबा घेतला, त्याला साधारण अंदाज होता कि हे उडणारे पक्षी आता कुठे जाऊन बसतील. त्याम्प्रमाणे त्याने ड्राइवर ला सूचना दिल्या आणि पाचच मिनिटात आम्ही समोर झाडावर ते हॉर्नबिल्स बसलेले बघितले. त्या जोडीचे मग आम्ही मनसोक्त फोटो काढले.

  Great Hornbill - Male  

  Great Hornbill  

  Great Hornbill - Female  

ह्या अनपेक्षित हॉर्नबिल-दर्शनाने सुखावून आम्ही सकाळच्याच टपरीपाशी चहा साठी थांबायचे ठरवले. अजून एक कारण होतं त्याला, सकाळी त्या मालकानी आम्हाला सांगितलं होत कि जिथे तो उष्ट-खरकटं फेकतो, ते खायला neckless thrush नावाचा पक्षी येतो.

पण तिथे बसतो तोच आम्हाला अशी बातमी मिळाली कि थोड्याच अंतरावर एक Black Baza पक्षाची जोडी दिसते आहे बऱ्याच वेळापासून. लगेच आम्ही तिथे आधी जायचं ठरवलं. पोहोचलो त्या जागेपाशी १० मिनिटात पण बाजा कुठेही दिसले नाहीत. Baza नाही पण तिथे आम्हाला ग्रेट हॉर्नबिल ची अजून एक जोडी दिसली. खूप लांब होते पण त्यांचा एक छान विडिओ करता आला.

चहासाठी परत त्या टपरी पाशी आलो आणि इथे बोनस म्हणून आम्हाला समोरच Chestnut-headed bee-eaters आणि golden-fronted leafbirds दिसले.

  Leafbird  

  Chestnut-headed Bee-eater  

काय नशीब असतं बघा हं .. सकाळपासून आम्ही हॉर्नबिल शोधात वणवण करत होतो सगळीकडे आणि आता त्या टपरी च्या बाजूला एक झाड होतं त्यावर एक हॉर्नबिल येऊन बसला होता. अगदी १० फुटावर निवांत बसला होता, खाली खूप सगळी लोक होती (त्या टपरीवर आलेली) पण त्याला काहीही फरक पडत नव्हता.

तो पर्यंत साडेपाच वाजले होते आणि आमचा परतीचा प्रवास निदान दोन-अडीच तास तरी होताच, त्यामुळे घाई-घाईने निघालो. थोड्याच वेळात वाटेत पूर्ण काळोख झाला होता. त्या घाटातल्या खराब रस्त्यांवरून रात्री प्रवास तसा धोक्याचा होता पण आमचा ड्राईव्ह अनुभवी होता, त्याने काळजीपूर्वक गाडी चालवली सगळा वेळ आणि ८:३० पर्यंत आम्ही सुखरूप घरी आलो.

पण ह्या प्रवासादरम्यान आम्हाला एक खूप वेगळा प्राणी दिसला. मांजरीचाच प्रकार पण ह्याला "लेपर्ड कॅट" असं म्हणतात. अंगावर बिबळ्या सारखा पॅटर्न असल्यामुळे हे नाव पडलं आहे. गाडीच्या प्रकाशात ते मांजर थोडं गोंधळल होत (म्हणून बाजूला पळून नं जाता, ते मिनिटभर समोरच रस्त्यावर चालत राहिलं) आणि त्याहून जास्त आम्ही हरखून गेलो होतो. त्या आनंदाच्या भरात कोणालाही साधा मोबाइलने फोटो काढावा हेही सुचलं नाही.


सातवा दिवस: ८-एप्रिल-२०२१


आज आमचा ट्रिपचा तसा शेवटचाच दिवस होता. कारण उद्याचा पूर्ण दिवस हा प्रवासात जाणार होता. विमानकंपनी च्या कृपेने संध्याकाळी ७ वाजता असणारं आमचं विमान आता सकाळी ११ ला निघणार होतं त्यामुळे सकाळी birding करून निघणं शक्यच नव्हतं.

आम्ही आज थोडं उशिरा म्हणजे ६:३० ला बाहेर पडलो. आजही Rufous-necked Hornbill.साठी प्रयत्न करणार होतो. अभय आणि सुरज ह्यांची आज इज्जत पणाला लागली होती. २०११ पासून अभय ट्रिप घेऊन येतोय पण हॉर्नबिल दिसला नाही असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं. खरंतर तो दिसणं - न दिसणं हा काही आमच्या ट्रीपच्या यशापयशाचा मानबिंदू नव्हता पण प्रयत्न करायला कोणाचीच ना नव्हती.

पहिल्यांदा आम्ही नर्सरी एरिया मधेच गेलो. तिथे तासाभरातच आम्हाला blue-capped rockthrush, काही मिनिव्हेट्स, सुतारपक्षी, आणि २ chestnut-tailed मैना दिसल्या. त्याच बरोबर एक छान बसलेला leafbird आणि घरट्याची राखण करणारा bar-winged flycatcher-shrike सुद्धा दिसला.

मग पाळी होती fire-breasted flowerpeckers ची. तो तर अगदी मस्त जवळच्या फांदीवर बसून मुक्त गान करत होता. त्याचे काही छान फोटो आणि विडिओ तिथे करता आले.

  Bar-winged flycatcher Shrike  

  Fire-breasted Flowerpecker  

८ च्या सुमारास मग आम्ही पार यायला निघालो. वाटेत एका ठिकाणी खूप सगळी कबुतरं दिसली. ती सगळी green pigeons होती पण त्यातही काही Wedge-tailed होती आणि काही Pin-tailed होती, दोन्हीही माझ्यासाठी नवीनच होती म्हणा.

आता हॉर्नबिल्स करता जाण्याचा रस्ता हा आमच्या हॉटेलवरूनच होता त्यामुळे मग आम्ही आधी न्याहारी करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आणि तेही योग्यच होतं कारण नंतर तिथं वाट बघण्यात कितीहि वेळ गेला असता. तिथे खाता-खाता समोरच आम्हाला barn swallow पक्ष्यांची धावपळ बघता आली.

  Himalayan Black Bulbul  

  Barn Swallow  

१० च्या सुमारास आम्ही परत एकदा त्याच पायवाटेवर बसलो होतो. त्याच वेळी आमच्या ओळखीचा अजून एक ग्रुप आला होता. त्यांच्या गाईडने एक शहाणपणाचा निर्णय घेतला. आमच्यासारखा तिथे ना थांबता ते सर्व दरीत अजून खाली जाऊन उभे राहिले. थोड्या वेळाने जेव्हा हॉर्नबिल ची जोडी आली तेव्हा त्यांना अगदी छान समोर दर्शन झालं.

मग आम्हीही खाली जाण्याचा निर्णय घेतलाच (देर आये दुरुस्त आये) . तिथून मग पुढचा तासभर आम्ही सर्व जण चांगल्या फोटो साठी संधी शोधत होतो. जसे ते पक्षी आपली जागा बदलत होते, तसे आम्ही कधी पुढे जा, कधी मागे ये असं करत फिरत होतो. एकदातर त्या उत्साहाच्या भरात मी एक चांगली संधी गमावली. हॉर्नबिल नर बऱ्यापैकी आमच्या समोर बसला होता पण ट्रायपॉड अड्जस्ट करण्यात उशीर झाला आणि तेवढ्या ५-१० सेकंदांमध्ये त्याने जागा बदलली. पण तरीही थोडेसे बरे फोटो मिळाले आणि मग सर्वांनी तिथून मुक्काम हलवायचं ठरवलं. त्यावेळी दरीत निदान २०-२५ जण तरी होतो (birders , गाईड सगळे धरून) आणि त्यातले बहुतांश मुंबई/पुण्याचे होते त्यामुळे खाली बऱ्याचदा मराठीतच गप्पा रंगल्या होत्या.

आम्ही वर यायला निघालो तोपर्यंत पावसाळी ढग जमा झाले होते. म्हणजेच हॉर्नबिल दिसण्याची हि आमची शेवटचीच संधी होती. पण दिसले बुवा एकदाचे (आणि अभयचा जीव भांड्यात पडला 😜).

  Eager Photographers  

  Rufous-necked Hornbills-Pair  

  Rufous-necked Hornbill-Male  

तिथून आम्ही हॉटेलला पोहोचेपर्यंत पाऊस जोरात सुरु झाला होता, धावत पळतच आम्ही हॉटेलात शिरलो.

साधारण तीनच्या सुमारास मग पाऊस थोडा कमी झालेला वाटला म्हणून आम्ही पुन्हा निघालो. परत एकदा नर्सरी च्याच दिशेला गेलो. तिथे थांबलो आणि लगेचच Red-headed trogon चे आवाज ऐकू आले. थोड्याच वेळात ती जोडी दिसली सुद्धा. फोटोसाठी प्रकाश पुरेसा नव्हता पण डोळ्यांनी छान बघता आले. तेवढ्यात परत पावसाची लक्षणे दिसायला लागली आणि आम्ही परत फिरलो.

संध्यकाळी मग बॅग भरणे आणि त्याच बरोबर झालेल्या ट्रिप चा आढावा अशी छान चर्चा रंगली. एकंदरीत काही पक्षी जरि दिसले नाहीत तरी ह्या ६ दिवसात मला ५० नवीन पक्षी बघायला मिळाले, हि नक्कीच जमेची बाजू होती.


आठवा दिवस : ९ एप्रिल २०२१

आजचा शेवटचा दिवस जो एकतर पूर्ण प्रवासात जाणार होता पण त्याहून जास्त म्हणजे आम्ही परत एकदा COVID ग्रस्त जगात प्रवेश करणार होतो. परत एकदा मुखवटे, sanitizers , containment झोन्स वगैरे प्रकार कानावर पडणार होते.

इथे आठवडाभर आम्ही ह्या सर्वांपासून मुक्त होतो. केवळ निसर्ग, पक्षी आणि इथली आनंदी माणसे एवढंच आमचं जग होतं. पण अर्थात घरी परतण्याचा आनंद होताच.

सकाळी ५ वाजता आम्ही लाटपंचर चा निरोप घेतला आणि गाडी, विमान, टॅक्सी करत करत दुपारी ४ वाजता घरी पोहोचलो.

आता पुढच्या ट्रिप पर्यंत घरी आराम ......

Additional Info - Camera Gear

    • Camera: Canon 80D (Crop-sensor body)
    • Lens: Tamron 150-600 mm (version G2)
    • Tripod: Most of the Photos are taken using Tripod (Sirui N3004 with K-30x Ball head)
    • Exposure: Manual Exposure for all photos
    • Focus Mode: AUTO – except for bird in clutter