जिम कॉर्बेट अभयारण्याची अविस्मरणीय सहल
- विहंग ट्रॅव्हल्स बरोबर, मे २०२१

  Indian Paradise Flycatcher  
सहलीची पूर्व-तयारी
सफर होणार कि फक्त suffer?
२०१७-१८ च्या हंगामात मी वन-सफरींची सुरुवात केली तेव्हापासून ह्या कॉर्बेट च्या अभयारण्याबाबत खूप ऐकलं होतं. त्यात शिवाय लहानपणापासून जिम कॉर्बेट ह्यांची पुस्तके देखील वाचली होतीच, त्यात ह्या भागाचे खूप निसर्गरम्य वर्णन आहे. त्यामुळे इथे यायची ओढ होतीच, पण संधी अजून मिळाली नव्हती.
२०१९ च्या डिसेंबर महिन्यात मकरंद ने ह्या सहलीची घोषणा केली. एप्रिल-२०२० च्या पहिल्या आठवड्यात ९ सफारीचा प्लॅन होता आणि फक्त ८ जणांचा छोटा ग्रुप. तो पर्यंत माझी एप्रिल मधली कुठलीही सहल ठरलेली नव्हती, त्यामुळे मी लगेचच होकार दिला.
ह्या ट्रिप चा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भर-जंगलात असलेल्या विश्रामगृहात राहण्याची संधी. प्रत्येक जंगलात पर्यटकांच्या दृष्टीने काही विभाग केलेले असतात आणि सफारी बुक करतांना त्यात हे भाग (किंवा काही जंगलांमध्ये वेग-वेगळे गेट नंबर असतात) नमूद केलेले असतात. कॉर्बेट मध्ये ढिकाला भाग हा त्यादृष्टीने महत्वाचा मानला जातो. इथे जरी वाघ जास्त दिसले नाहीत, तरी घनदाट जंगल, प्रचंड मोठे गवताळ प्रदेश, हत्तीच्या मुक्त फिरणाऱ्या टोळ्या ह्या सर्वांमुळे इथे येण्यात सर्वच निसर्ग प्रेमींची पहिली पसंती असते. त्यात परत इथे जंगलाच्या आत असणारे विश्रामगृह, म्हणजे अगदी "सोने पे सुहागा".
हा दुग्ध-शर्करा योग जानेवारीमध्ये जुळून आला आणि आम्ही लगेचच प्रवासाची तिकिटे काढली. कॉर्बेट ला जायला मिळणार ह्या नुसत्या कल्पनेनेच खूप आनंद झाला. मी तर, तिथे कुठले पक्षी दिसतील ह्याची पडताळणी पण सुरु केली (अशा सफारीचं मुख्य आकर्षण नेहमीच वाघ असतात, पण माझ्या दृष्टीने तिथे होणारं पक्षी-निरीक्षण हि तितकंच महत्वाच).
पण म्हणतात ना "आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना"
२०१९ च्या डिसेंबर मधेच जगाला एका राक्षसाची चाहूल लागली होती आणि त्याने मार्च महिन्यात भारतात उच्छाद मांडायला सुरुवात केली. कोविड ची महामारी एवढ्या वेगात पसरली कि सगळीकडे टाळेबंदी चे वारे सुरु झाले आणि त्यात आमची कॉर्बेट ची स्वप्न धुळीत मिळाली. ट्रिप रद्द करण्याशिवाय काही पर्यायच नव्हता आमच्यापुढे.
२०२० चं वर्ष असंच सरलं पण शेवटी शेवटी थोडी परिस्थिती सुधारण्याची चिन्ह दिसू लागली. मी तर छोट्या ट्रिप्स करायलाही सुरुवात केली होती सप्टेंबर पासून.
जानेवारीत मकरंद चा पुन्हा फोन आला, "जायचं का परत तोच ग्रुप घेऊन कॉर्बेट ला? फक्त, एप्रिल ऐवजी मे मध्ये जाऊ?" मी पुन्हा एका पायावर तयार (तसं तर अर्ध्या पायावर सुद्धा तयार झालोच असतो मी). नशिबाने सगळ्यांचाच होकार आला. मग काय, झाली परत तयारी सुरु.. सर्वप्रथम ढिकाला चं बुकिंग. ते हि झालं फेब्रुवारी मध्ये. मग काय सर्व मंडळी परत उत्साहात तयारीला लागली. सफारी, हॉटेल, विमान, रेल्वे सगळी बुकिंग्स सहज पार पडली. १-मे संध्याकाळी मुंबईहून दिल्लीला विमान आणि तिथून रात्रीच्या गाडीने रामनगर. येतांना मात्र आम्ही काही जणांनी दिल्ली-मुंबई हा प्रवास रेल्वे ने करायचं ठरवलं.
मार्च च्या मध्यापर्यंत सर्व काही सुरळीत घडत होतं (नाही म्हणजे तसे होते काही प्रॉब्लेम्स, फेब्रुवारीत भरतपूर येथे पक्षी-निरीक्षणासाठी गेलेलो असतांना दीपाच्या हाताला आणि साकेत च्या पायाला एकाच वेळी प्लास्टर घालावं लागलं होतं, पण ते सोडलं तर ह्या ट्रीपच्या दृष्टीने काही अडचणी नव्हत्या).
अचानक कोरोना च्या दुसऱ्या लाटेने उसळी मारली, सगळीकडे रुग्णांची संख्या वाढायला लागली आणि परत एकदा टाळेबंदी सुरु झाली. मी एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हिमालयात ट्रिप केली, त्यामुळे माझा उत्साह वाढलेला होता, काहीही झालं तर कॉर्बेट ला जायचंच असा माझा तरी निश्चय होता, पण बाकीच्यांचं काय?
मग हळू-हळू धक्के बसायला सुरुवात झाली. साधारण १०-एप्रिल च्या सुमारास विमान कंपनीने कळवलं कि आम्ही जाणार असलेल मुंबई-दिल्ली विमान त्यांनी रद्द केलेलं आहे. मग सगळ्या ग्रुप ची परत चर्चा झाली. अर्थातच प्रत्यक्ष भेटणं शक्य नसल्याने, कायप्पा (म्हणजे whatsapp) वर. असं ठरलं कि आपण रात्री उशिराच्या ट्रेनने मुंबई हुन निघू, दिल्लीला थोडं जास्तच लवकर पोहोचू (४ वाजता) पण त्याला इलाज नव्हता.
होता होता एप्रिल चा शेवटचा आठवडा उगवला. आता RTPCR चाचणी करावी लागणार होती सर्वांना (कारण त्याशिवाय कॉर्बेट मध्ये प्रवेश मिळाला नसता). पण तो पर्यंत आमच्या ८ पैकी ३ जण गळले होते. काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना येत येणार नव्हतं !! पण आम्ही ५ खंबीर होतो.
सर्वांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले होते, त्यामुळे ती काळजी नव्हती पण अचानक रेल्वे कडून संदेश आला, आम्ही जाणार असलेली ट्रेन रद्द झाली होती!! आता आली का परत पंचाईत? नियतीला बहुतेक आमचं जाणं मंजूर नव्हतं. आता काय करायचं, परत एकदा आपापसात खलबतं झाली. मग आम्ही ऑगस्ट-क्रांती राजधानी एक्सप्रेसनि जायचं ठरवलं (इतर गाड्या जाऊदेत, पण राजधानी तरी कॅन्सल करणार नाहीत, ह्या आशेवर).
इथे थोडा प्रश्न होता, हि गाडी सकाळी १० वाजताच दिल्लीला पोहोचणार होती. म्हणजे रात्रीच्या रामनगर गाडी साठी आम्हाला दिल्लीत १२ तास काढावे लागणार होते. तोपर्यंत दिल्लीत रुग्णसंख्या खूपच धोकादायक वाढलेली होती. म्हणजे तिथे शहरात फिरणं काही शहाणपणाचं नव्हतं. पण मग मकरंद ने त्यावर तोडगा काढला. अर्ध्या दिवसाकरता आम्ही दिल्लीत एक हॉटेल घेतलं. स्टेशन मधून टॅक्सी ने हॉटेल आणि रात्री तिथून परत टॅक्सी ने स्टेशन. म्हणजे दिल्ली शहराचा फारसा संपर्क नको..
झाले तेवढे प्रॉब्लेम बास झाले, आता पुढे तरी काही विघ्न नकोत म्हणून विघ्नहर्त्याला मोरया करून ३० एप्रिल ला दुपारी मुंबई सेंट्रल येथून निघालो. गाडीत अजिबात गर्दी नव्हती आणि आमच्या सीट्स जवळ-जवळ होत्या त्यामुळे गप्पा मारत मजेत निघालो. रात्री गाडीत व्यवस्थित झोपही काढून झाली.
सकाळी माझं फोन कडे लक्ष्य गेलं तर ३ मिस्ड कॉल्स दिसले. १ अजय चा (माझा लहान भाऊ) आणि २ समीर चे (समीर जयवंत हा नुकताच माझ्या बरोबर हिमालयात सहलीला आला होता आणि तो कॉर्बेट चा चाहता होता). फोन केला तेव्हा कळलं कि आदल्या दिवशी (म्हणजे ३० तारखेलाच) केंद्र सरकार कडून एक आदेश निघालेला आहे, त्यानुसार संपूर्ण भारतातली सर्व अभयारण्य लगेच बंद ठेवायची आहेत. कारण असे कि corona ची लागण आता वन्य प्राण्यांनाही होण्याची शक्यता होती.
हा म्हणजे आत्तापर्यंत आलेल्या सर्व अडचणींचा कळस होता. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे हि बातमी जर खरी असेल, तर बहुतेक आम्हाला दिल्लीतूनच हात हलवत परत यायला लागणार.
काय करावं काही सुचत नव्हतं. हि बातमी मी युवराज, मकरंद ना पण सांगितली. तो पर्यंत त्यांनाही ह्याबाबत कुणकुण लागलीच होती. मग आम्ही असं ठरवलं कि जास्त विचार करत बसण्यापेक्षा आधी दिल्लीला पोहाचु आणि तिथून कॉर्बेट ला फोन करू.
त्याप्रमाणे मग आम्ही दिल्लीत उतरलो, टॅक्सी ने हॉटेल वर पोहोचलो. आणि तिथून मग रामनगर मधले सुनील नामजोशी (ज्यांनी आमचं बुकिंग करून दिलं होतं) ह्यांच्याशी संवाद साधला. त्यांना काही कल्पना नव्हती, त्यांनी मग एका फॉरेस्ट ऑफिसर चा नंबर दिला, त्यांच्याशीही बोललो. त्यांनाही नक्की काही सांगणं शक्य नव्हतं. मग आम्ही अजून थोडी रिस्क घ्यायची ठरवली. जाऊया तर रामनगर ला, मग बघू काय होतंय ते? (तरीही हि धाकधूक होतीच, कि कदाचित रामनगर हुन लगेचच परतीचा प्रवास करावा लागेल).
तसं पाहिलं तर हे सरकारी फर्मान १-२ आधी निघालं असत तर आम्ही प्रवासाची सुरुवातच केली नसती.. अर्थात हे म्हणजे आत्याबाईला मिश्या असत्या तर ..... जाऊदे काय असेल नशिबात ते होईल..
पहाटे रामनगर ला पोहोचलो आणि तिथून ढेला गावातील कॉर्बेट view रिसॉर्ट ला. २ रात्री ढिकाला येथे राहून नंतर पुढच्या २ रात्री आम्ही येथेच राहणार होतो. त्यामुळे नामजोशींनी आमची व्यवस्था इथेच केली होती. इथे मग फ्रेश होऊन चहा-पोह्यांचा नाश्ताही झाला. तो पर्यंत आम्हाला अशी खबर मिळाली कि १ दिवसाकरता आम्हाला ढिकाला येथे परवानगी मिळाली होती,. म्हणजे संध्याकाळची एक सफारी तरी नक्की मिळणार.
तसाही आम्हाला काही पर्याय नव्हताच, त्यामुळे एक सफारी मिळत असेल तर निदान ती तरी पदरात पाडून घ्यावी ह्या सुज्ञ विचारानी आम्ही उत्साहात निघालो. रिसॉर्ट वरून निघाल्यावर साधारण अर्धा तासाच्या प्रवासात आम्ही घनगडी गेट जवळ पोहोचलो. हे ढिकाला ला जाण्याचे प्रवेश द्वार. इथे आमच्या RTPCR रिपोर्ट ची तपासणी झाली.
पण सर्वात आश्चर्याची (आणि सुखद) गोष्ट म्हणजे इथल्या फॉरेस्ट ऑफिसर ने आम्हाला चक्क दोन रात्र राहण्याची परवानगी दिली... हे म्हणजे "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन…." तशी गत झाली आमची. दिल्लीत असताना तिथूनच परत जावं लागेल असं वाटत होतं आणि इथे २ रात्री. म्हणजे आजची १ आणि उद्या २ अशा एकूण तीन सफारी मिळणार तर !!
2-May-2021
मला वाटतं हा माझा पहिलाच ब्लॉग असावा ज्यात ट्रिपच्या फोटोंच्या आधी इतकं जास्त लिहिलंय. पण अर्थातच इतकं काही घडलं होतं इथे पोहोचण्याआधी (आणि पोहोचण्यासाठी) कि ते लिहिलं नसत तर हे प्रवासवर्णन अपुरंच राहिलं असतं.
धनगडी गेट ते ढिकाला विश्रामगृह हे अंतर साधारण ३५ किलोमीटर आहे आणि सगळा जंगलातलाच रस्ता आहे, त्यामुळे थोडंसं सफारी वर जाण्यासारखंच होता हा प्रवास. रस्ते अर्थातच कच्चे व खडबडीत, पण दोनही बाजूला भरपूर झाडी आणि मध्येच दिसणारं नदीचं पात्र, ह्यामुळे प्रवास मस्त होतो. ह्या जंगलाच्या भागात ढिकाला शिवाय इतर विश्रामगृहाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत पण ढिकाला सर्वात मोठे आणि त्याच्या जवळपास खूप सगळं वन्यजीवन दिसतं तेवढं इतर कुठे नाही. त्यात सध्या तिथे काही वाघांच सहज दर्शन घडत असल्याचं कळलं होतं त्यामुळे आमची तिथे पोहोचायची उत्सुकता खूपच वाढली होती.
जंगलात शिरल्या-शिरल्या लगेचच पक्षी दिसायला सुरुवात झाली. २ ठिकाणी आम्हाला तुरेवाल्या सर्पगरूडाने छान दर्शन दिलं. त्यातला एक मस्त घरट्याची राखण करतांना आढळला.
अरे हो, पण त्या आधी जेव्हा सकाळी आम्ही रिसॉर्ट च्या आसपास फिरत होतो, तेव्हा आम्हाला Indian white-eye, शिंपी, आणि जांभळे शिंजीर सुद्धा दिसले होते.

  Indian white-eye  

  Common Taiorbird  

  Purple Sunbird  

  Joy of doing the safari!  

  Crested Serpent Eagle  
जंगलाच्या रस्त्यातून जात असताना दोन्ही बाजूला वाळलेली पाने पडलेली दिसत होती अचानक त्या पानातून सळसळ आवाज झाला. आवाज ऐकताच आमच्या ड्रायव्हर (यामीन) ने गाडी थांबवली आणि तो म्हणाला तिथे लक्ष द्या कदाचित मॉनिटर लिझर्ड असेल. ती मॉनिटर लिझर्ड रस्त्यावर होती पण आमच्या गाडीचा आवाज ऐकून तिने जंगलाकडे पलायन केलं होतं. आता हे आमच्या लक्षात आलं की असा आवाज म्हणजे मॉनिटर लिझर्ड असू शकते त्यामुळे नंतरच्या प्रवासात दोन वेळा आम्हालाच ह्याची जाणीव झाली, काही फोटो सुद्धा मिळाले.
रस्त्यात आम्हाला काही इतर पक्षी सुद्धा दिसले. त्यात lineated बार्बेट, ग्रे हेडेड वूडपेकर, व्हाईट क्रेस्टेड लाफिंग thrush, क्रेस्टेड hawk- ईगल, हिमालयन बुलबुल, रेड junglefowl, येलो फुटेड ग्रीन पिजन आणि विशेष म्हणजे Kalij Pheasant सुद्धा दिसले.

  Woodpecker  

  Green Pigeon  

  Kalij Pheasant  

  White-crested Laughingthrush  
बऱ्याच ठिकाणी रस्त्यात नदीची सुकलेली पात्र दिसत होती. आता जरी त्यात पाणी दिसत नसलं तरी पूर्ण भरल्यावर हा सगळा प्रदेश खूपच सुंदर दिसत असणार ह्याची जाणीव होत होती.
सगळे पक्षी बघत-बघत आम्ही साधारण १ च्या सुमारास विश्रामगृहात पोहोचलो. लगेचच आमचं सामान डॉर्मिटरी मध्ये नेलं. जेवणाची वेळ झालीच होती. इथलं मुख्य कॅन्टीन जरी बंद असलं (सगळं अभयारण्य बंद होणार होत, त्यामुळे स्टाफ घरी निघून गेला होता) तरी आमच्या सारखे काही guests असल्यामुळे एक छोटं कॅन्टीन चालू ठेवलं होतं.
जेवून लगेचच तिथल्या परिसरात एक फेरफटका मारायला बाहेर पडलो. दुपारची सफारी २:४५ ची होती, त्यामुळे हाताशी थोडा वेळ होता. येतांना आम्ही ज्या दिशेने आलो त्याच्या विरुद्ध दिशेला खाली नदीचं पात्र होत. म्हणजे आम्ही एका पठाराच्या टोकावर होतो. इथून खाली बघतांना दूरवर आम्हाला हत्तींचा एक कळप दिसला. आवारातच आम्हाला एक white-browed wagtail सुद्धा दिसला.

   

   

  White-browed Wagtail  

   
सफारी ला निघताना आमच्या असं लक्षात आलं कि फक्त स्टाफ नाही तर इथले गाईड सुद्धा घरी निघून गेलेले आहेत. त्यामुळे आमची सफारी हि यामिन च्याच हातात होती (तोच ड्राइवर आणि तोच गाईड सुद्धा).
सुरुवातीलाच आम्हाला हि माहिती कळली कि इथे २ ठिकाणी वाघ दिसण्याची शक्यता आहे. एक म्हणजे सांबर रोड (ह्या भागात नदीच्या पात्रात उभे असलेलं सांबर बरेच वेळा दिसते, म्हणून त्या रस्त्याला हे नाव पडलं) आणि दुसरं ठिकाण विरुद्ध दिशेला असणारा गवताळ भाग. आमच्या पुढे असणाऱ्या गाड्या सांबर रस्त्याकडे वळल्या आणि यामिन ने विरुद्ध दिशेला जायचा निर्णय घेतला.
पहिल्या काही मिनिटातच आम्हाला एका Red-breasted parakeets ची जोडी दिसली. मी हा पक्षी पहिल्यांदाच बघत होतो (पक्षी निरीक्षक ह्याला lifer म्हणतात, म्हणजे एखादा पक्षी जर आपण पहिल्यांदाच बघत असू, तर तो ठरतो आपल्यासाठी lifer). त्या भागात आम्हाला वाघांचे पंजे किंवा इतर काही लक्षण दिसली नाहीत त्यामुळे तसेच पुढे आम्ही एका पाणवठ्याकडे निघालो. इथे एक हत्तींचा कळप मस्त पाण्यात डुंबत होता. लहान-थोर सगळे हत्ती एकत्र पाण्यात खेळत होते. १५-२० मिनिटांनंतर ते सर्वच जण बाहेर आले. पण त्यातल्या एकाला बहुतेक आमचं तिथे असणं आवडलं नाही. त्यामुळे त्याने एक गर्जना करून आमच्या दिशेला पावलं वळवली. तो आम्हाला इशारा होता, त्यामुळे आम्ही लगेचच तिथून निघालो.
तिथून मग आम्ही सांबर रोड कडेच जायचं ठरवलं. तिथे एका वळणापाशी आम्हाला एक oriental honey buzzard (मधुबाझ) दिसला, त्याला एक टिटवी पळवत होती (बहुतेक तिची अंडी जवळपास असावीत).

  Red-breasted Parakeets  

   

   

  Lone aggressive Elephant  

   
आम्ही त्या buzzard चे फोटो काढत असताना आमची दुसरी gypsy वळणावरून पुढे गेली. त्यांना समोरच रस्त्यात मस्त पसरून बसलेली वाघीण दिसली. त्यांच्या हे लक्षात आलं नाही कि आम्ही मध्येच थांबलो आहोत आणि आम्ही विचार करतोय कि हे buzzard चे फोटो काढायला का थांबले नाहीत.
आमचे फोटो झाल्यावर आम्ही निघालो, पण नशिबाने काही नुकसान झालं नाही कारण ती वाघीण मस्त पैकी एकाच जागी आराम करत होती. तिच्या दोन्ही बाजूला सुरक्षित अंतर राखून वाहने उभी होती पण त्याचे तिला काही पडलेलं नव्हतं. कदाचित तिला ह्याची जाणीव असावी कि हि वाहने आपल्या जास्त जवळ येत नाहीत (अर्थातच तसं कोणी केलं तर, त्या गाडीचे ड्राइवर/गाईड हे suspend होऊ शकतात वन खात्याकडून).
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ४ वाजलेले होते आणि पुढचा अर्धा तास ती वाघीण ठिय्या मारून बसली होती. मधेच कुठेतरी एखादा डोळा उघड, मान इकडे-तिकडे वळंव, जांभई दे असले प्रकार चालू होते. त्यानंतर तिने १-२ वेळा आपली जागा बदलली (बहुतेक उन्हापासून बचाव करण्यासाठी), पण त्यामुळे आम्हाला काही बरे फोटो तरी मिळाले.

   

   

   
इथे बराच वेळ आम्ही नुसते बसून होतो (कारण वाघिणीची फारशी हालचाल नव्हती). अचानक कांचन ला दूरवर काही हालचाल जाणवली (दुर्बिणीतून बघतांना). तिथे नदीच्या पलिकडच्या काठावर (पण आमच्या पासून खूप लांब) पाण्यामध्ये अजून एक वाघ होता. जाणकारांकडून (म्हणजे बाजूच्या गाडीतले लोक) कळलं कि समोर बसलेल्या वाघिणीची ती बहीण होती. दोन्ही बहिणी हल्लीच आईपासून वेगळ्या झाल्या होत्या पण अजूनही त्या दोघी एकत्र दिसत होत्या. पण ते अंतर इतकं जास्त होत कि आमचे कॅमेरे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते.
मधेच केव्हातरी मागच्या बाजूने आम्हाला काही आवाज ऐकू आले. आम्ही असलेला हा रस्ता एका कड्यावर होता, खाली नदीचे पात्र दिसत होते. त्या पात्रातून अचानक एक हत्तीची टोळी नदी पार करत होती, त्यामुळे आवाज होत होता. साहजिकच, त्या आवाजाने मग ती वाघीण थोडी सतर्क झाली. एक-दोन वेळा तिने मान वाळवून हत्तींकडे बघितलं देखील. हत्ती आणि वाघ दोघेही जंगलात खूप ताकदवान आहेत आणि त्यांना एकमेकांच्या ताकदीची पुरेपूर जाणीव असते. त्यामुळे सहसा ते एकमेकांच्या वाटेला जात नाहीत.

  Elephants  

  Alert Tigress  

   

   
पण हे आमच्या दृष्टीने बरं झालं कारण त्या प्रसंगानंतर वाघिणीने आपली जागा बदलली (आणि इतका वेळ जी आमच्याकडे पाठ करून होती, ती आता थोडा वेळ तरी आमच्या बाजूला बघत होती).
पण थोड्याच वेळात तिने नदीच्या दिशेला मोर्चा वळवला. जाता-जाता ती भांगेच्या झुडुपांतून पुढे गेली आणि मधेच भांगेच्या पानांचाही आस्वाद घेतला. त्यामुळे तिच्यावर काही परिणाम झाला कि नाही हे माहित नाही पण अशी २-४ पाने खाऊन त्यांना बहुतेक काही होत नसावं

   

   

   

  in Bhang plants  
आता प्रकाश खूप कमी झाला होता पण तरीही एक चक्कर गवताळ भागात मारायची असं वाटलंच, न जाणो तिथेही वाघ दिसला तर? तिथे सर्व-प्रथम दर्शन दिलं ते स्वर्गीय नर्तकाने. आणि थोड्याच वेळात आम्हाला पाठमोरं जाणारं वाघाचं पिल्लू हि दिसलं (पिल्लू म्हंटल तरी तस लहान नव्हतं ते).

  Indian Paradise Flycatcher  

   
त्या व्याघ्र दर्शनाने आम्ही आजचा दिवस (यशस्वी दिवस) संपवला. खूप चांगले फोटो मिळाले होते त्यामुळे चहा नि स्नॅक्स जास्तच चवदार लागत होते.
८ वाजता आम्ही जेवलो आणि १० च्या आधीच सगळे निद्राधीन झालो. नाही म्हंटल तरी गेल्या २ दिवसांचा शारीरिक (आणि जास्त मानसिक) ताण आता जाणवत होता.
3-May-2021
सकाळी ५ वाजताचा गजर लावून उठलो आणि सर्व जण तत्परतेने तयार होऊन ५:३० ला चहाला हजर .. ड्रायव्हर्स हि तयारच होते.
आज आमच्या ड्राइवर/गाईड ह्यांनी काल संध्याकाळी दिसणाऱ्या वाघांविषयी (३ बच्चे) काही माहिती मिळवली होती. त्यांच्या मते सकाळीच तिघे व त्यांची आई दिसू शकतील. लगेच आम्ही तिथे निघालो. आमच्या आधीपासून ३-४ gypsy गाड्या तिथे फिल्डिंग लावून बसलेल्या होत्या. आम्हीही आमच्या अंदाजाप्रमाणे एका ठिकाणी थांबलो. ह्या दिवसात पर्यटकांची गर्दी जास्त नव्हती म्हणून, (सगळ्या मिळून फक्त ७-८ गाड्याच होत्या इथे) नाहीतर जी मिळेल ती जागा पकडावी लागली असती.
आमच्या अशा लवकरच फलद्रुप झाल्या. एकापाठोपाठ एक, तीनही बच्चे हळू हळू बाहेर आले. ते साधारण कुठे जाणार हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहित होतं. पाणवठ्यावरून दाट जंगलाच्या भागात जाणार हे नक्की, फक्त तिथे जाण्यासाठी सरळ वाट निवडणार कि वळसा घेऊन जाणार हे बघायचं. आमच्या नशिबाने, ते वळसा घेऊन निघाले. म्हणजे ते आम्हाला २ ठिकाणी रस्ता क्रॉस करताना दिसू शकणार होते.
सगळं मिळून इन-मिन फक्त १४ मिनिटं ते आमच्या समोर होते, पण तेवढा वेळ पुरेसा होता, बरेच फोटो मिळाले. अगदी कॅमेऱ्यात नजर टाकून असणाऱ्या पोझेस सुद्धा मिळाल्या. प्रकाश जरा कमीच होता पण सगळंच आपल्या मनासारखं होणं तसंही अशक्यच. आणि त्यातून आम्हा फोटोग्राफर मंडळींच्या इच्छा/आकांशा सतत वाढतच असतात... चांगल्या पोझेस मिळाल्या, तर प्रकाश हवा, प्रकाश असेल तर तो बरोबर मागच्या बाजूने येणार असावा (आणि प्रखर प्रकाश नको), ते असेल तर eye-level फोटो हवा, एक ना दोन.. म्हणून म्हंटल, सगळ्या अपेक्षा पूर्ण करणं कदाचित ब्रह्मदेवालाही नाही जमणार.

   

   

   

   

   

   
अशा ह्या मस्त सुरुवातीनंतर आम्ही परत एकदा हत्तींच्या कळपाच्या दिशेने निघालो. रस्त्यात आम्हाला crested hawk-eagle, मोर, स्वर्गीय नर्तक, red junglefowl, आणि एक warbler हि दिसले. अर्थातच आमचा जास्त वेळ हा परत एकदा हत्तींनीच घेतला.

   

   

   

   
साधारण तासभर तिथे थांबून मग आम्ही परत सांबर रोड कडे मोर्चा वळवला. तिथे २ जिप्सी थांबलेल्या होत्याच. त्यात एक वन अधिकाऱ्याचीच होती. त्याने सांगितलं कि थोड्या वेळा पूर्वी एक वाघीण नदी पात्रातून समोरच्या बाजूला गेली आहे. आम्हीही मग वाट बघत थांबलो थोडा वेळ पण वाघिणीची बाहेर येण्याची काही चिन्ह दिसत नव्हती.
इथे थांबलेलो असतांना वेळ फुकट गेला नाही. समोरून उडत जाणारा एक Lesser fish eagle दिसला. समोरच्या एका झाडावर खूप सगळ्या साळुंक्या बसल्या होत्या.. तिथे जवळच एक कापशी घार (black-winged kite) सुद्धा होती.

  Sambar road - river bed  

  Sambar road - river bed  

   

  Lesser Fish-eagle  
मग यामिन ने एक पर्याय दिला, इथे थांबण्यापेक्षा आपण नदीच्या विरुद्ध बाजूला जाऊया. तिथे वाघ दिसण्याची शक्यता खूप कमी आहे पण जंगलाचा वेगळा भाग बघायला मिळेल. आम्ही लगेचच तो पर्याय निवडला, पण फक्त आमच्या जिप्सी ने, आमची दुसरी गाडी तिथेच थांबली. त्यांनी जवळपास राहण्याचा निर्णय घेतला (आणि त्याचा फायदा झाला त्यांना, ह्या वेळेस वाघिणीने त्यांना खूप जवळून दर्शन दिलं नंतर).
ह्या नवीन भागात एक छोटं तळ आहे हे पूर्वी पारवाली वाघिणीचा पोहोण्याचा तलाव असं समजलं जायचं (कारण ती बरेचदा तिथे दिसायची). पण सध्या मात्र ह्या भागात काहीच वर्दळ नव्हती. वाघ दिसत नसल्याने कुठल्याच गाड्या इथे आल्या नव्हत्या. इथे जातांना एका लाकडी पुलावरून जावं लागलं. हा पूल दरवर्षी पावसाळ्यात नादुरुस्त होतो आणि त्याची डागडुगी करावी लागते.
इथे जात असतांना आम्हाला एक छान बसलेला Chestnut-headed bee-eater आणि एक grey-headed woodpecker दिसले. एक मधाच्या पोळ्यांनी लगडलेलं झाड सुद्धा दिसलं.

  Wooden Bridge  

  Chestnut-headed bee-eater  

  Bee- hives  

  Hive closeup  
परतीच्या वाटेवर एक हिमालयन बुलबुल पक्षांची जोडी दिसली. थोडं पुढे दोन कोल्हे दिसले. ते अगदी संथ पणे समोरून चालत येत होते. आमची जिप्सी होती, तेवढा रस्त्याचा भाग त्यांनी टाळला (तेवढ्यापुरते बाजूच्या गवतात गेले) आणि लगेच परत रस्त्यावरून चालू लागले).

  Himalayan Bulbuls  

  Jackals  
९:४५ पर्यंत सफारी संपवून आम्ही परत विश्रामगृहाकडे आलो. तिथे आम्ही सगळ्यात आधी कांचन आणि श्वेता कडून वाघीण त्यांच्या किती जवळ आली होती त्याच्या रम्य कहाण्या ऐकल्या आणि मगच न्याहारी.
कॅन्टीन कडून आमच्या डॉर्मिटरी कडे जातांना वाटेत आम्हाला एक बहुतेक नुकतच जन्मलेलं माकडाचं पिल्लू दिसलं. त्याच्या इतक्या मजेदार हालचाली चालू होत्या कि थोडा वेळ आम्ही तिथेच थांबून त्याचे फोटो/विडिओ करत बसलो.

   

   
दुपारचं जेवण आणि नंतर सफारी ह्यात थोडा वेळ होता. हा वेळ मी आणि युवराज ने सत्कारणी लावायचं ठरवलं. लगेच कॅमेरे घेऊन बाहेर पडलो आणि विश्रामगृहातला परिसर धुंडाळला.
लगेचच आम्हाला एक वेगळा पक्षी दिसला, निरखून बघितल्यावर लक्षात आलं हा बहुतेक डॉलर बर्ड आहे (मी त्याला आधी थत्तेकाड, केरळ मध्ये बघितलं होता, त्यामुळे साधारण कसा दिसतो ते माहित होत, तरी नंतर पुस्तकात पाहून खात्री करून घेतलीच). मग त्याच्या मागे हिंडण्यात पुढची १५ मिनिटे गेली.
त्यांनतर जवळच एक lineated बार्बेट दिसला, तोंडात काहीतरी शिकार धरून चाललेला किंगफिशर दिसला. जवळपास जमिनीवर काही पारवे (doves), rose finches आणि माकडे सुद्धा होती.

  Lineated Barbet  

  Oriental Dollarbird  

  Red Collared Dove  
दुपारी परत आम्ही हत्तींच्या भागात गेलो. तिथे यामिन ने आम्हाला एक खूप मोठ्या खोडाचं एक झाड दाखवलं. त्याचा फक्त खोडाचा भागच उरला होता बाकीचा वरचा भाग काही वर्षांपूर्वी वीज पडून जळून गेला होता. पण फक्त त्या खोडावरून सुद्धा हा अंदाज येत होता कि झाड किती मोठं असेल.
तिथे थोडा वेळ थांबून मग पुन्हा एकदा सांबर रोड कडे गेलो. आणि ह्या वेळी खरंच तिथे एक सांबर नदीच्या पात्रात उभं होत. साळुंक्यांचा एक थवा त्याच्या भोवती नाचत होता (सांबराच्या अंगावरील किडे खाण्यासाठी). आमचं तिकडे लक्ष असताना अचानक आमच्या डोक्यावरून एक पक्षी भर्रकन उडून गेला. थोडं पुढे जाऊन तो एका झाडाच्या शेंड्यावर बसला तेव्हा कळलं कि तो crested kingfisher होता.

   

  Sambar deer  

  Crested kingfisher  
काल इथे आम्हाला ती वाघीण भांगेच्या झुडुपांमधून जातांना दिसली, आज तिथे एक हत्ती जात होता (पण त्याने पानांना स्पर्श केला नाही). तो सरळ नदीतून चालत समोरच्या किनाऱ्यावर गेला. जाता-जाता सोंडेने पाणीहि पिऊन गेला.

   
तिथून पुढे पुन्हा एकदा आम्ही त्या लाकडी पुलाकडे गेलो. आज ह्या तळ्यापाशी आम्हाला पक्षांच्या खूप हालचाली दिसत होत्या. एक red junglefowl ची मादी समोरच्या झाडीतून आली आणि पाणी पिऊन निघून गेली. बाजूला एका खडकावर white-throated kingfisher अंग सुकवत बसला होता.
पण सर्वात जास्त धावपळ होती ती एका स्वर्गीय नर्तक जोडीची. त्यातला नर मधूनच पाण्यातून डुबकी मारत होता आणि वर जाऊन पिसे साफ करत होता.
हे सगळं निरीक्षण करतांना वेळ कसा जातो हे समजत सुद्धा नाही.

  Gypsy on wooden bridge  

  Indian Paradise Flycatcher  
परतीची वाट दुसऱ्या एका विश्रामगृहातून जात होती. छोटंसं होत हे पण नुकतंच त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती कारण आपले पंतप्रधान मोदीजी स्वतः तिथे राहिले होते. ते Bear Grylls च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा.
इथे थांबलो असतांना आम्हाला अचानक एक वेगळा पक्षी दिसला, थोडासा आपल्या कोतवाल (drongo) पक्षा सारखा).पण हा बहुतेक Drongo Cuckoo होता (फोटो काढून नंतर आम्ही तज्ज्ञांकडून खात्री करून घेतली), जवळच्या एका झाडावर आम्हाला २ जोड्या दिसल्या. एक जोडी आपल्या इथेहि दिसणाऱ्या डोमकावळ्यांची आणि दुसरी जोडी होती spotted doves ची.

  Pair of spotted dove  

  Drongo Cuckoo  
इथून परत जातांना आज आम्ही जंगलाचा अजून एक वेगळा भाग बघितला. हा रस्ता एका डोंगराळ भागातला होता आणि झाडी खूप गर्द होती इथली. बहुतेक सगळे साल वृक्ष होते, जे सदाहरित असतात (ह्यांची पानगळ एकदम होत नाही, त्यामुळे बाराही महिने हिरवी दिसतात हि झाडं). ह्या उलट जर आपण सागाची झाडं बघितली तर त्याची सगळी पाने ह्या दिवसात एकदम गळून जातात).
सफारी संपता-संपता आमच्या विश्रामगृहाच्या जवळच blue-tailed bee-eaters चा एक मोठ्ठा थवा किलकिलाट करत होता. बहुतेक ते सर्व रात-थाऱ्यासाठी (रुस्टींग) इथे जमा झाले होते. जवळच एक हत्तींचा कळप गवतात चरत होता.

  Sal Jungle  

  Blue-tailed Bee-eaters  
आज संध्याकाळच्या सफारी मध्ये एकही वाघ दिसला नाही पण आज आम्ही जंगलाचा एक वेगळा भाग बघितला. जर तुम्ही फक्त फोटोग्राफी आणि वाघ/हत्ती/पक्षी ह्याच अपेक्षेने फिरत असाल तर कदाचित तुमची निराशा होऊ शकते. पण जर तुम्ही जंगलात फिरण्याचा अनुभव एन्जॉय करत असाल, तर तुमच्या सारखे आनंदी तुम्हीच.
खरंतर जंगल हे फक्त बघण्याचा विषय नाहीच मुळी. डोळ्यांबरोबर, कानही इथले अनुभव घेतात. विविध पक्षांची मंजुळ गाणी, वारा-पानांची सळसळ, खाली पडलेल्या सुकलेल्या पानांतून चालणारी हरणे, माकडे किंवा हरणाचे वॉर्निंग-कॉल्स, मधेच एखाद्या हत्तीचा चित्कार, आणि हे काहीही नसेल तेव्हा फक्त निरव शांतता हे सगळं अगदी मस्त अनुभवता येत जंगलात.
संध्याकाळी परतल्यावर आम्ही लगेचच उद्या ची चौकशी सुरु केली. २ रात्री राहण्याची परवानगी होती, म्हणजे आज रात्री पर्यंत. मग उद्या सकाळी सफारी करता येईल का?
रात्री जेवायला गेलो तेव्हा कळलं, कि आम्ही सकाळची सफारी करणार होतो .. !!
यामिन आणि इतर ड्रायव्हर्स ह्यांची वन अधिकाऱ्यांबरोबर काहीतरी चर्चा झाली होती आणि त्या अंतर्गत उद्याच्या सफारीची परवानगी मिळाली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ५:४५ ला निघून ९-९:१५ पर्यंत परत यायचे, लगेच ब्रेकफास्ट करायचा आणि १० च्या आत इथून बाहेर पडायचे असा प्लॅन ठरला.
आमच्या बरोबरच इथला कॅन्टीन स्टाफ (आणि इतर टेम्पररी कामगार वर्ग) सुद्धा परत जाणार होता, कारण अभयारण्य परत कधी चालू होईल याची काहीच शाश्वती नव्हती. त्यातल्या बहुतेकांनी तर मनात हि खूणगाठ बांधली होती कि आता परत यायचं ते नोव्हेंबर मध्येच.
4-May-2021
बॅगा आधीच भरलेल्या असल्याने, सकाळी पटकन तयार होऊन आम्ही जिप्सीत बसलो सुद्धा. शेवटच्या सफरीत काय होईल ह्याची उत्सुकता होतीच थोडी पण तसं वाघ, हत्ती बघून झाल्यामुळे काही टेन्शन नव्हतं.
आज आम्ही त्या गवताळ प्रदेशात अजून थोडं लांबवर गेलो. हा भाग थोडा पठारावर होता आणि खाली एक विस्तीर्ण मैदान दिसत होत, एवढं मोठं कि त्यात हत्तींचा कळप सुद्धा लहान भासत होता. एका कोपऱ्यात हत्ती चरत होते आणि दुसरीकडे हरणं. नीट बघितल्यावर एक रानडुक्करांचा थवा सुद्धा दिसला. त्या हत्तींचे (त्यात काही पिल्लं सुद्धा होती) भरपूर फोटोस आणि विडिओ केले तिथे.
इथे येतांना एका ठिकाणी काही वाळलेली झाडे दिसली. १०-१२ फूट उंचीची झाडे, ज्यांचा वरचा भाग जळून गेला होता (परत एकदा पडलेली वीज हेच कारण होत म्हणे). वर्तुळाकार मांडून ठेवावीत अशी ती झाडं होती आणि सगळी जळून गेलेली.
परत येतांना अजून एक हत्तींचा कळप दिसला रस्ता ओलांडतांना.

  Spotted Deer  

  Elephants  

  Deer & Elephant together  

   

   
एव्हाना ७:३० वाजले होते. आमच्याकडे अजून १.५ तास तरी होता अजून जंगल फिरायला. मग परत एकदा आमची पाऊलं सांबर रोड कडेच वळली, आणि आजही हा निर्णय फलदायीच ठरला.
गेल्या दोन वेळे पेक्षा थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एका ठिकाणी ३ जिप्सी कड्याजवळ उभ्या दिसल्या. लांबूनच ते काही हातवारे करत होते, पण काय सांगत आहेत ते कळत नव्हतं. साहजिकच आम्हीहि तिथे जायचं ठरवलं, आणि बघतो तर काय ... खाली नदीच्या कोरड्या पात्रात दोन्ही भगिनी मस्त विसावलेल्या होत्या.
त्यांनी अगदी छान जागा निवडली होती. नदीचा कोरडा भाग होता तो आणि दोन्ही बाजूला उथळ पाणी वाहात होतं. छान ऊन खात बसल्या असाव्यात.

   
आता इथून पुढे कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. जोपर्यंत वाघिणी हलत नाहीत, तो पर्यंत आम्ही असेच ठाण मांडून बसणार हे नक्की (अर्थातच परत जायच्या वेळेचं भान ठेवून). मनातल्या मनात माझा असाही विचार करून झाला कि, वेळ पडली तर आपण ९:४५ पर्यंत थांबू इथेच.. फारतर काय, न खाताच निघावं लागेल. पण वाघ दिसत असतील, तर ब्रेकफास्ट काय चीज आहे त्यापुढे.. आणि मला वाटत नाही इतर कोणीही ह्याला विरोध केला असता.
पण नाही आली तशी वेळ. पुढच्या तासाभरात दोघी बहिणी आपल्या जागेवरून उठल्या, नदीत पाणी पिऊन आल्या, आळोखे-पिळोखे दिले आणि आम्हाला अगदी मनसोक्त फोटोस मिळाले. एकदा तर थोडं दूरवर एक हत्तींचा कळप आला होता तेव्हा हत्ती आणि वाघ दोन्ही एका फोटोत मिळाले.

   

   

   

   

  Siblings  

   

  Tigers & Elephants  

   

   
मग एकामागोमाग दोघी बहिणी समोरच्या तीराकडे दृष्टीआड झाल्या आणि आम्ही समाधानाने निघायचा निर्णय घेतला. सगळ्या सातही जिप्सी होत्या तिथे आणि बहुतेक सगळ्यांना चांगले फोटो मिळाले असावेत.
पण "पिक्चर अभि बाकी था..." दोस्तो. सगळ्या जिप्सी एका रांगेत निघाल्या आणि दोनच मिनिटात आमच्या पुढची जिप्सी सुसाट रिव्हर्स मध्ये येतांना दिसली. आम्हीहि थांबलो, मागचे पण थांबले. मग कळलं कि समोर रस्त्यावर एक हत्तीण आक्रमक झाली होती. हत्तीसमोर आपण म्हणजे किस झाड कि पत्ती.. त्यामुळे गुपचूप थांबलो (हत्तीण थोडी पुढे आली असती, तर आम्हाला भरधाव मागे जाण्याशिवाय पर्याय राहिला नसता. पण २-३ मिनिटात ती शांत होऊन बाजूच्या जंगलाकडे निघाली. ते बघून मग आम्हीहि हळू-हळू पुढे निघालो (वन खात्याच्या नियमाप्रमाणे सांबर रोड हा वने-वे होता, त्यामुळे मागे जाण्याचा पर्याय नव्हता).
एक एक करत निघालो आम्ही पुढे पण गाड्या चालतांना बघून परत ती हत्तीण चवताळली आणि रस्त्याकडे चाल करून आली, एव्हाना आमची गाडी पुढे आली होती पण आमची दुसरी गाडी मागेच होती. पण थोड्याच वेळात वेगात येणारी त्यांची गाडी दिसली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
असे प्रसंग नंतर वर्णन करताना खूप मजेदार वाटतात पण हे घडत असतांना खूप धाकधूक असते मनात. उद्या मारली हत्तीने एखाद्या गाडीला धडक, तर काय होईल? विचारही नाही करता येत.. !
परतीच्या प्रवासात अजून एक हत्तींचा कळप दिसला. शांत होते ते सगळे आणि रस्ता ओलांडत होते. त्यांना वाट देण्यासाठी मग गाड्या थांबवून ठेवल्या आम्ही.
इथे आम्ही १ विशेष घटना बघितली. एक अगदी छोटं पिल्लू होतं त्या कळपात. रस्ता ओलांडताना दोन मोठ्या हत्तींनी त्याला दोन्ही बाजून संरक्षण दिलं आणि मग तश्याच formation मध्ये त्यांनी रस्ता ओलांडला. हि बहुतेक त्यांची धोका टाळण्यासाठीची नेहमीची पद्धत असावी (आणि माणूस म्हंटल कि धोका आलाच).
इथे आम्ही अजून एक मजेदार घटना बघितली. वाटेत जाता -जाता एका मोठ्या हत्तीने मागे वळून एका छोट्या हत्तीचा रस्ता आडवला, जणू त्याला काहीतरी शिक्षा झाली असावी.. पण मग थोड्या वेळाने केला सर्वांनी रस्ता पार. नशिबाने मी त्या वेळी विडिओ करत होतो, त्यामुळे हा प्रसंग व्यवस्थित टिपता आला.

   
अशा तर्हेने आमच्या ढिकाला टप्प्याचा शेवट अगदी शानदार झाला. दिल्लीहून निघतांना एक सफारी तरी मिळूदे म्हणून निघालो आणि आता मस्तपैकी चार सफारी करून निघत होतो आम्ही.
एकूण ९ सफारींपैकी ४च मिळाल्या पण जे मिळालं ते अविस्मरणीय होतं ह्यात शंका नाही. बऱ्याच जणांचे विरोध पत्करून इथे येण्याचं सार्थकच झालं म्हणायचं.
सामान तयारच असल्यामुळे पटकन पुरी-भाजी चा आस्वाद घेतला आणि निघालो रामनगर कडे. पुढच्या ३५ किलोमीटर च्या प्रवासात (धनगडी गेट पर्यंत) १ तास गेला. रस्त्यात परत एकदा आम्हाला काही वन्यजीव दिसले. त्यात प्रामुख्याने होते Pallas’ Fish-eagle, कोल्हे, सुंदर दिसणारा Kalij pheasant (ज्याने पिस फुलवून मस्त प्रदर्शन हि केलं, अर्थातच मादी साठी),.Red Junglefowl, आणि २-३ monitor lizard.

  Crested Serpent Eagle  

  Kalij Pheasant  

  Pallas' Fish-eagle  
साधारण एक वाजण्याच्या सुमारास आम्ही ढेला गावातल्या रिसॉर्ट मध्ये होतो. आमच्या मूळ प्लॅन प्रमाणे इथून आम्ही ५ सफारी करणार होतो (ढिकाला सोडून कॉर्बेट मधल्या इतर भागातल्या) पण ते आता शक्यच नव्हतं. रिसॉर्ट च्या मालकाने अगदी गावाबाहेर जायलाही मनाई केली होती. इथे खूप स्ट्रिक्ट टाळेबंदी लागू झाली होती, त्यामुळे बाहेर निघण्याचा धोका पत्करण्यास तो अजिबात तयार नव्हता.
फार फार तर रिसॉर्ट च्या जवळ एखाद किलोमीटर पर्यंत चालत जाण्यास त्याची हरकत नव्हती पण त्यात हि एक बाजू जंगलाच्या कडेला होती, तिथे जाण्याची त्याने पूर्ण मनाई केली (कारणही रास्तच होतं त्याचं - ३-४ दिवसांपूर्वी इथे गावकऱ्यांना वाघ दिसला होता, त्यामुळे इथे फिरणं नक्कीच धोकादायक होतं)
म्हणजे तसं पाहता आमची ट्रिप हि इथेच संपल्यात जमा होती. तरीही आम्ही पुढच्या दोन दिवसात जवळपासच्या भागात थोडे फिरलोच, दिसले काही पक्षी आणि काही कोल्हे सुद्धा. निघायच्या दिवशी तर एकदम ७ कोल्हे दिसले जवळच्या कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात. त्यातले हे काही फोटो ...

  Jackal in river bed  

  Spotted Owlet  

  Indian Rollers  

  Hair-crested Drongo  

  Jungle Owlet  
6-May-2021
रामनगर स्टेशन मधून आमची गाडी १० वाजताची होती पण आम्ही स्टेशनवर लवकर जायचं ठरवलं. आणि तो निर्णय खूपच योग्य ठरला आमच्यासाठी. आम्ही ८:३० वाजता रामनगर स्टेशन ला पोहोचलो, सामान उतरवलं आणि स्टेशन मधले दिवे गेले. स्टेशन मास्तर च्या केबिन मधले emergency दिवे सोडले तर पूर्ण स्टेशनात मिट्ट काळोख होता. कसंबसं आम्ही सामान फलाटावर नेलं आणि तितक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. फक्त ५ मिनिटे उशीर झाला असता तर आमचं सगळं सामान (कॅमेरा बॅग सकट) भिजलं असतं कारण आम्ही प्रवास ओपन टॉप वाल्या जिप्सीतून केला होता, त्यामुळे पाउसापासून आम्हाला काहीच संरक्षण नव्हतं.
गडगडाट आणि पावसाचा खेळ १५-२० मिनिटे सुरु होता, त्यानंतर पाऊस थांबला आणि स्टेशनवरील दिवे सुद्धा चालू झाले.

   

   
पुढच्या प्रवासात तसं सांगण्यासारखं काहीच नाही. गाड्या वेळेत होत्या. परत एकदा आम्ही दिल्लीत हॉटेल मध्ये १२ तास काढले आणि ८ तारखेला सकाळी बोरिवलीत पोहोचलो. तिथून टॅक्सिने घरी.
परत आल्यावर मित्र/नातेवाईक ह्यांच्या मनात एकंच प्रश्न होता कि दिल्लीत (आणि इतरत्र देखील) कोविद चे एवढे थैमान चालू असतांना आम्ही ट्रिप ला का गेलो?
खरं सांगायचं तर माझ्याकडे द्यायला असं काही फार संयुक्तिक उत्तर नव्हतं, पण जंगलाची ओढ.. दुसरं काय?
Background music used for the videos is courtesy BenSound (Music: https://www.bensound.com)
Additional Info - Camera Gear
- Camera: Canon 80D (Crop-sensor body)
- Lens: Tamron 150-600 mm (version G2)
- Tripod: Most of the photos (and videos) from the safari vehicles are taken using Beanbag
- Exposure: Manual Exposure for all photos
- Focus Mode: AUTO – except for objects in clutter