अंदमान बेटावरील पक्षांची दुनिया
- With Nature Clicks (Abhay Kewat)
- Feb, 2022
  Team Collage  
आधी थोडंसं अंदमान विषयी ...
आपल्या सर्वांना अंदमान म्हंटलं कि वीर सावरकर आठवतातच, अर्थात ते महत्वाचं आहेच पण ह्या माझ्या सफरी चा विषय वेगळा आहे, त्यामुळे त्या अनुषंगानेच पुढील सर्व.
अगदी पाहिलं म्हणजे आपण अंदमान म्हणतो, पण तिथे गेल्यावर सर्वत्र अंडमान असच लिहिलेलं आढळलं. तसं असलं तरी आपल्या सोयीसाठी मी अंदमान असाच उल्लेख येथे करणार आहे.
तर नक्की कुठे आहेत हि बेटं आणि आहेत तरी किती. आपण नेहमीच अंदमान आणि निकोबार असं म्हणतो तशी २ आहेत कि अजून काही?
मग थोडी माहिती मिळवली आणि असं कळलं कि हा भारताच्या अग्नेय दिशेस असलेला एक द्वीप-समूह आहे, म्हणजे खूप सगळ्या लहान लहान बेटांचा मिळून बनलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. सगळ्या बेटांची मिळून लोकसंख्या साधारण ४.५ लाख. (तुलनाच करायची तर फक्त आपल्या ठाणे शहरात १५ लाखांपेक्षा जास्त लोक राहतात). त्यातही काही बेटं तर अशी आहेत कि जिथे अजूनही काही आदिवासी जमाती राहतात आणि तिथे आपण जाऊ शकत नाही. काही बेटांवर फक्त आपली आर्मीच असते (आणि देशाच्या सुरक्षिततेकरता ते खूप महत्वाचे आहे). एकूण ५७२ बेटांपैकी फक्त ३८ बेटांवर लोकं राहतात. तसं पाहिलं तर हि बेटं थायलंड, म्यानमार ह्या देशांना जास्त जवळ आहेत (भौगोलिक दृष्ट्या).
पुढचा प्रश्न असा पडला कि तिथे जाऊन कुठले पक्षी दिसणार आणि कुठल्या कुठल्या बेटांवर जाता येईल?
मी वाचलेल्या माहितीच्या आधारे, साधारण ४० लाख वर्षांपूर्वी हि बेटं भारतीय उपखंडापासून वेगळी झाली. म्हणजे त्या सुमारास असणारे प्राणी-पक्षी दोन्हीकडे सारखेच असावेत पण त्यानंतर मात्र दोन्ही भागात वेगवेगळी जेनेटिक डेव्हलोपमेंट झाली असणार. त्यामुळे आता अंदमान मध्ये असणाऱ्या काही प्रजाती ह्या भारतातल्या प्रजाती पेक्षा वेगळ्या गणल्या जातात. ह्यामुळे भारतात इतरत्र आढळणारे बरेच पक्षी इथेही दिसतात पण ते वेगळ्या प्रजाती मध्ये मोडतात. उदा. Andaman Drongo, Andaman Shama, Andaman treepie, Andaman Crake, ई.
इथेही साधारण जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस असतो. आणि पक्षी-निरीक्षणासाठी उत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च (स्थलांतर करणारे पक्षीही तेव्हा दिसू शकतात आणि शिवाय तापमान थोडं सुसह्य असतं म्हणून).
इथे येण्यापूर्वी थोडी अजून माहिती गोळा केली तेव्हा कळलं कि बहुतेक birding ट्रिप्स ह्या दक्षिण अंदमान भागात (पोर्ट ब्लैअर ह्या राजधानी च्या बेटावर) होतात. त्याशिवाय निकोबार बेटांवर हि काही विशेष पक्षी दिसतात पण तिथे जाणं हे जरा कठीणच काम. एकतर खूप सगळा बोटीचा प्रवास करावा लागतो, किंवा मग हेलिकॉप्टर ने जावं लागत असं कळलं. तशीच गत नॉरकाँडम बेटाची. हे अंदमान बेटांच्या पूर्वेला असणार एक छोटं बेट (पूर्वी म्हणे ह्या बेटावर बर्मा चा हक्क होता पण आता ते भारताचाच भाग आहे). तिथे जाणंही होणार नव्हतं.
अंदमान ला पोहोचल्यावर आणि तिथल्या लोकल गाईड्स बरोबर बोलल्यावर कळलं कि पक्षी निरीक्षणासाठी इथे काही ठराविक जागा आहेत, आणि आमच्या ४. ५ दिवसांच्या भेटीत आम्ही खालील ठिकाणी जाणार आहोत.
१) चिडिया टापू
२) शोल बे / काला टांग
३) सिप्पी घाट
४) ओग्राब्राज
५) बाठू बस्ती (फक्त एका घुबडा साठी)
गेले काही दिवस मुंबईत सुद्धा चांगली थंडी पडली असल्याने इथले तापमान त्यामानाने गरमच वाटत होतं. त्यात परत एखादा दिवस पावसाचीही शक्यता होती. त्यामुळे त्या दृष्टीने सर्व तयारी करून आम्ही अंदमान च्या पक्षी निरीक्षण सहलीला सुरुवात केली.
मी इथे पक्षी छायाचित्रण (फोटोग्राफी) म्हणण्या पेक्षा पक्षी निरीक्षण का म्हणतोय हे फोटो बघितल्यावर कळेलच म्हणा. कारण इथले पक्षी बहुतेकदा झाडा -झुडपात (तेही उंच झाडे) दडून राहतात. त्यामुळे बरेच वेळा त्यांना फक्त बघण्यावर समाधान मानावे लागते. चांगले फोटो मिळणं तसं कठीणच.
असो.. अजून जास्त पाल्हाळ लावण्यापेक्षा आपण लगेचच आमच्या ५ दिवसांच्या सहली कडे वळूया...
पहिला दिवस आणि चिडिया टापू ची ओळख
हल्लीच्या कोरोना काळात विमान प्रवासाचं गणित पूर्ण अस्ताव्यस्त झाल्यामुळे आमचा मुंबई अंदमान प्रवास दिल्लीमार्गे झाला (बरोबर वाचलंत ... दिल्ली जरी उलट्या दिशेला असलं तरी IndiGo कंपनी ने आमचं विमान तसंच ठरवलं होतं आणि त्यात परत ७ तास दिल्लीत थांबाव लागलं ते वेगळंच). त्यामुळे १९-फेब्रुवारी ला रात्री ८:३० ला निघून आम्ही पोर्ट ब्लेअर येथे २० ला सकाळी ८:३० ला पोहोचलो.
इथला विमानतळ छोटा असेल ह्याची कल्पना होती पण आत जी काही गर्दी होती त्या दिवशी त्याला तोड नाही!! मुंबई च्या लोकल मध्ये शिरायला जशी गर्दी असतेना अक्षरशः तशी गर्दी होती विमानातून बाहेर येऊन विमानतळाच्या इमारतीत शिरलो तेव्हा. हि अतिशयोक्ती नाही, खरंच लोकांमधून वाट काढत-काढत आमच्या बॅग असणाऱ्या पट्ट्यापाशी पोहोचलो. आणि तिथून मग परत बाहेर पडण्यासाठी मोट्ठी रांग.
पण हे बहुतेक २-३ विमानं एकदम उतरल्यामुळे झालं असावं कारण आमची काही मंडळी पुण्याहून येणार होती, जी २ तासांनी तिथे पोहोचली. त्यांना असा गर्दीचा त्रास अजिबात झाला नाही.
विमानतळावरून आमचं हॉटेल १५ मिनिटावर होत, त्यामुळे लगेचच तिथे पोहोचलो. दुपारी २.३० वाजता निघायचं असल्यामुळे थोडा वेळ होता आमच्याकडे आणि रात्र दिल्ली विमानतळावर जागून काढल्यामुळे थोडी झोपही येत होती (पण झोप लागली मात्र नाही).
आमची लोकल गाईड जबिली (हि २०-२२ वर्षाची मुलगी गेल्या २-४ वर्षांपासून हे काम करत असल्याचं कळलं) हिला रस्त्यात pickup करून आम्ही चिडिया टापू कडे निघालो. वाटेत एका समुद्र किनाऱ्यापाशी थांबलो (तसेही इथे दर थोड्या अंतरावर समुद्र दिसतच असतो म्हणा) कारण जवळच एक pacific reef heron ह्या पक्षाची जोडी दिसली. गाडीतून उतरल्यावर जवळच एक collared kingfisher सुद्धा दिसला.
साधारण ३:३० वाजता आम्ही चिडिया टापू इथे असणाऱ्या पार्क जवळ पोहोचलो. ह्या भागात एक फेमस बीच पण आहे, त्यामुळे खूप सगळ्या टूरिस्ट्स ची जवळपास बरीच गर्दी होती. मुंडा पहाड नावाचा बीच/ट्रेकिंग पॉईंट सुद्धा तिथूनच पुढे आहे.
आम्ही लगेचच पार्क मध्ये शिरलो (साडेचार वाजता पार्क बंद होत असल्याने, जास्त वेळ तिथे देता येणार नव्हता). पार्क तसं फार मोठं नाहीये फिरायला आणि त्यात व्यवस्थित पायवाटा केलेल्या आहेत (२-३ इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या छोट्या गाड्या देखील आहेत फिरण्यासाठी). पूर्ण पार्क भर उंचच उंच झाडे आहेत आणि दिसलेले सगळे पक्षी अगदी वरच्याच फांद्यांवर बसणं पसंत करत होते.
आमच्या तासाभराच्या भटकंतीत तिथे मग अंदमान बुलबुल, व्हाईट हेडेड स्टर्लिंग, आशियाई ग्लॉसी स्टर्लिंग, लांब शेपटीचा पोपट (long -tailed parakeet), लाल छातीचा पोपट (Red-breasted Parakeet), alexandrine parakeet, अंदमान कोतवाल (Andaman Drongo), असे बरेच पक्षी दिसले. त्याच बरोबर अंदमान मध्ये दिसणाऱ्या दोनही जातींचे सुतार पक्षी सुद्धा दिसले, पण म्हणावे तसे फोटो काही तिथे मिळाले नाहीत.
ह्या पार्क च्या एका भागात जखमी पक्षांच्या सुश्रुषेसाठी एक भाग आहे, तिथे असणाऱ्या पिंजऱ्यांमध्ये White-bellied Sea-Eagle आणि ३-४ Andaman Serpent Eagles सुद्धा दिसले.
साधारण ५ च्या सुमारास तिथे काळोख व्हायला सुरुवात होते (आपल्यापेक्षा पूर्वेला असल्याने दिवस लवकर सुरु होतो आणि लवकर संपतो). काळोख पडल्यावर घुबडांचा शोध घेण्याचा आमचा प्लॅन होता त्यामुळे मग अर्धा पाऊण तास आम्ही तिथल्याच एका चहाच्या टपरीवर वेळ घालवला
सहा वाजता मग आम्ही अखेरीस घुबड दर्शनासाठी बाहेर पडलो. चिडिया टापू च्या जवळच असलेल्या एका भागात आमची गाईड आम्हाला घेऊन गेली. तिथे मग गाडीतून उतरून आम्ही पायउतार झालो. आजपर्यंत चा माझा अनुभव असा होता कि इथे मग आम्हाला जंगलात शिरावं लागत पण ह्या वेळी मात्र आम्ही फक्त डांबरी रस्त्याच्या कडेनेच फिरत होतो. आणि आमच्या नशिबाने २ प्रजातींची घुबडं आम्हाला रस्त्याजवळ असणाऱ्या झाडांवरच दिसली.
सर्वात आधी दिसलं ते Hume's Hawk Owl (आता ह्या सगळ्या प्रजाती महाराष्ट्रात दिसत नसल्याने त्यांची मराठी नावं प्रचलित नाहीत). मग पुढच्या अर्ध्या तासात आम्हाला ४-५ Hume's Hawk Owl दिसली. काही वेळा चांगले फोटो देखील मिळाले.
जबिली चे (आमची गाईड) अथक प्रयत्न चालू होते इतर घुबडं शोधण्याचे. त्यासाठी ती एकटीच पुढे जात होती (आणि सतत आम्हाला "अजिबात आवाज करू नका" अशी सूचना सुद्धा करत होती). जरा वेळाने तिने हळूच आम्हाला पुढे येण्याचा इशारा दिला. तिथे एकाच झाडावर तिला २ Walden's Scops Owl दिसली होती (कदाचित ती जोडी असावी). अगदी थोडाच वेळ त्यांनी दर्शन दिले आणि त्यानंतर आत जंगलात उडून गेली. ह्या घुबडाचे फोटो जरी चांगले मिळाले नाहीत तर बघायला मात्र मजा आली.
आज आमच्या wishlist मध्ये Andaman Scops Owl चा पण समावेश होता, पण बऱ्याच वेळ प्रयत्न करून सुद्धा त्यांनी दर्शन दिले नाही (एक दोन वेळा आवाज ऐकला त्यांचा पण तेवढंच). हे सगळं होईपर्यंत आठ वाजत आले होते, त्यामुळे आम्ही परत फिरायचा निर्णय घेतला.
आता थोडं ह्या निशाचर पक्ष्यांच्या निरीक्षणाबाबत ... इथे नुसत्या चंद्र प्रकाशात घुबड शोधणं म्हणजे जवळ-जवळ अशक्यच. तसं स्थानिक मार्गदर्शकांना (गाईडस) पक्षांच्या साधारण जागा माहित असतात पण ती नक्की कुठे बसलेली असतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे मग ह्या पक्ष्यां सारखे आवाज काढून त्यांना बोलावणं अपरिहार्य ठरतं. बरं, हे करून हि ते पक्षी येतील ह्याची काहीच खात्री नसते फक्त थोडी शक्यता वाढते इतकंच.
आणि मग हे सगळं करून ते आलेच तरी बघण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी ते पुरत नाही, त्यामुळे मग टॉर्च चा वापर हि करावा लागतो. तिथे मात्र चांगले गाईडस थोडं तारतम्य ठेवतात. अगदी थोडाच काळ टॉर्च चा प्रकाश ठेवतात, जेणेकरून पक्षी जास्त विचलित होत नाहीत. त्यात बरेच वेळा असं होतं कि आम्हा बघणाऱ्यांचं पूर्ण समाधान कधीच होत नाही, त्यामुळे परत थोडा प्रकाश असुदे अशी मागणी होते. अथात इथेही आमची गाईड अगदी स्ट्रिक्ट होती. थोडा वेळ म्हणजे थोडा वेळ, नाही मिळाला फोटो तर तुमचं नशीब असा तिचा नियम होता.
आता हे सगळं किती बरोबर आणि किती चूक ह्या वादात मला पडायचं नाही पण बहुतेक सगळे गाईड ह्याच मार्गाचा अवलंब करत असावेत. आणि आपल्याला पक्ष्यांची नीट माहिती हवी असेल तर काही फोटो मिळणं हे हि महत्वाचं होतंच.
दुसरा दिवस – फेरी (boat) ची फेरी आणि शोल-बे तले पक्षी
आज सकाळी आम्ही शोल-बे येथे निघालो होतो. इथे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे समुद्रातून जाणारी फेरी बोट. समुद्रातला प्रवास तसा २०-२५ मिनिटांचा आणि त्यात आपल्या गाडी सकट जाऊ शकतो आपण.
आधी म्हंटल्याप्रमाणे इथे उजाडतं लवकर. पण पहिली बोट जेट्टीतून सकाळी सहा वाजता सुटत होती, त्यामुळे मग ५:४५ ला हॉटेल मधून निघालो. आम्ही राहत असलेला Haddo भाग विमानतळापासून जवळ होता तसाच तो फेरी पासूनही जवळच होता.
शोल-बे येथे आम्ही जरी बोटीने जाणार असलो तरीही ते काही वेगळं बेट नाही (पोर्ट ब्लेअर चाच भाग). पण रस्त्यावरून इथे जायचं तर निदान २ तास तरी जास्त लागले असते, त्यामुळे बोटीने जाणं सोयीस्कर होतं.
फेरी तुन उतरून मग आम्ही पुढे ८-१० km आत कालाटांग भागात गेलो आणि तिथून मग एका छोट्या पायवाटेने निघालो. सकाळची वेळ असल्याने पक्षांचे खूप आवाज येत होते. पण अर्थातच परत-एकदा सगळे पक्षी उंच झाडांवर होते. अगदी सुरुवातीलाच आम्हाला अतिशय सुंदर असं Indian Cuckoo चं गुंजन ऐकू आलं. इथे शब्दात सांगणं कठीण आहे तसं, पण जर तुम्ही cuckoo-clock ऐकलं असेल तर बराचसा तसा होता आवाज. पण त्याने दर्शन दिलं नाही. त्या ऐवजी दिसली ती आपली कोकिळा.
उंचावर असले तरी इथे खूप वेग-वेगळे पक्षी दिसत होते. Asian Glossy Starling आणि Andaman Drongo तर होतेच पण त्यात भर पडली ती Black-naped Oriole, Andaman cuckooshrike, Square-tailed Drongo-cuckoo, आणि White-tailed Starling यांची.
इथे एकच रॅकेट असलेला racket-tailed drongo सुद्धा होता. थोडं पुढे गेल्यावर दिसली ती Andaman Cuckoo-Dove ची जोडी. एक scarlet minivet ची जोडी सुद्धा जवळच बागडत होती. ह्याला मराठीत निखार असंही म्हणतात (का ते रंगावरून कळेल बहुतेक). त्यानंतर दिसले ते दोन Andaman Drongo आणि दोन Asian Glossy Starling (म्हणजे आपल्या मैनेचीच भावंडं .. पण चमकदार पिसांमुळे त्यांना हे नाव मिळालंय).
खरंतर आम्ही फिरत होतो तो एक छोटासाच भाग होता (१००-१५० मीटर ची पायवाट असेल जेमतेम). पण तिथे एवढं वैविध्य होतं पक्षांचं कि हाच भाग त्यांनी का निवडला असेल पक्षी बघायला ते उमजलं. दुतर्फा असलेल्या उंच झाडांमध्ये सगळेच पक्षी मुक्त विहरत होते. मला वाटतं इथे शिकारी पक्षी थोडे कमीच आहेत, त्यामुळे हि असेल कदाचित.
एवढा वेळ वर बघून-बघून आता मान खरंच दुखायला लागली होती पण पक्षी दिसत असल्याने त्याचा साहजिकच विसर पडला होता (पण नंतर दुपारी मला व्हर्टिगो साठी गोळी घ्यावी लागली).
अचानक जबिली ने आम्हाला सुतार पक्षांच्या आगमनाची वर्दी दिली. इथे दिसणारे दोनही प्रकारचे सुतार-पक्षी जवळच दिसले मग आम्हाला.
साधारण २ तास तिथे फिरून मग आम्ही जवळच्या दुसऱ्या भागाकडे गेलो (म्हणजे चालतच... फार लांब नव्हतं अंतर). तोपर्यंत आमचे उशिरा आलेले २ सहकारी हि आम्हाला येऊन मिळाले (त्यांनी पहाटे लवकर निघण्या ऐवजी थोडा आराम करणं पसंत केलं होतं).
इथे सर्वप्रथम दिसला तो vernal hanging parrot. हा तसा खालीच होता (बाकीच्या वर-वर बसलेल्या पक्षांपेक्षा) पण त्याने फार जवळ येऊ दिलं नाही आम्हाला. त्याच्याच बाजूला एक Chestnut-headed Bee-eater ची जोडी होती (म्हणजे आपल्या इथे दिसणाऱ्या वेड्या राघू चे भाऊबंद). आधी आम्ही तिथे दुर्लक्षच केलं होत पण पोपट उडून गेल्यावर लगेच तिकडे वळलो.
थोडं पुढे आम्हाला एका ashy minivet ने सुद्धा दर्शन दिलं (minivet आपल्या इथे सुद्धा दिसतात पण ही त्यातली वेगळी प्रजाती आहे, आपल्या इथे दिसत नाही). तेवढ्यात Asian Glossy Staarling पक्षांचा एक छोटा थवा तिथे उंच झाडावर दिसला.
जवळच अभय (आमचा कप्तान किंवा मुख्य गाईड) आम्हा सगळ्यांचं लक्ष एका छोट्या पक्षाकडे वेधत होता (पण एक छोटा पक्षी उंच झाडावर शोधणं म्हणजे केवळ अशक्य, त्याने काढलेला एक फोटो बघितला तेव्हा कळलं कि ती violet cuckoo होती. अजून एक दुर्मिळ पक्षी पण आम्हाला कळेपर्यंत तो उडून गेला होता तिथून. मग आम्ही सर्वांनी त्याला बोलण्याची संधी सोडली नाही (कि तू आम्हाला इथे आणलंस आणि आम्हाला संधी देण्याआधीच स्वतः फोटो काढून मोकळा झालास). म्हणजे आपलं लटक रागावणं हो, त्यात त्याची काही चूक नव्हती हे सर्वांनाच माहित होत.
पुढचा तासभर खाण्यात गेला (जवळपास कसलीच सोय नसल्याने आम्ही ब्रेकफास्ट निघताना बरोबर घेतला होता). तेवढ्यात सुद्धा तिकडच्या दुसऱ्या गाईडने (आमच्याशिवाय अजून एक ग्रुप होता तिथे) आम्हाला Andman Green Pigeon दाखवले. खूप लांब झाडीत होते ते पण आमच्यासाठी नवीनच होते (आजपर्यंत न बघितलेले पक्षी म्हणजे लाइफर), त्यामुळे फोटो तर काढलेच.
त्यानंतर आम्ही परत एकदा सकाळच्याच पायवाटेकडे वळलो. पण आता जवळ जवळ १० वाजले होते आणि उन्ह चांगलीच वर आली होती, त्यामुळे साहजिकच पक्षांचा किलबिलाट खूपच कमी होता. २ तासात केवढा फरक पडतो, हे तिथे स्पष्ट झालं (म्हणूनच अनुभवी पक्षी निरीक्षक सकाळी लवकर सुरुवात करण्यावर नेहमीच भर देतात). अर्थात कमी हालचाल असली तरी ती काही अगदी शून्य नव्हती झाली, त्यामुळे तिथेही आम्हाला काही पक्षी दिसलेच.
त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे Dollarbird. ह्याला असं नाव मिळण्याचं कारण म्हणजे, उडतांना त्याचा पंखांवर दिसणारे गोलाकार ठिपके (डॉलर च्या नाण्या सारखे). एक Asian fairy Bluebird सुद्धा दिसला. आणि हो, वर आकाशात उडणारा Black Baza सुद्धा दिसला तेवढ्यात. अभय च्या तेज नजरेने त्याला बरोब्बर टिपला.
थोडा वेळ थांबून मग आम्ही तिथून निघायचं ठरवलं. जाता जाता अजून एका विशेष पक्षाचा शोध घेणं बाकी होत. ह्या ट्रीपचं मुख्य आकर्षण असलेला Ruddy Kingfisher. हा तिथल्या कांदळवनात (म्हणजे मराठीत mangroves हो 😉) आढळणारा खंड्या. पण ह्याचा शोध घेणं म्हणजे महा-कठीण काम. झाडीमध्ये असा काही लपलेला असतो कि समोर असून कधी-कधी कळत नाही.
परत जाताना कांदळवनाचा भाग सुरु झाल्यावर आम्ही गाडी थांबवली आणि चालत पुढे निघालो, सर्वांच्या शोधक नजरा झाडीत लागलेल्या होत्या. उतरल्या उतरल्या समोरच मला एक वेगळा खंड्या दिसला (Collared Kingfisher). त्यांचे फोटो घेऊन मग पुढे गेलो. बराच वेळ शोधून सुद्धा काहीच दिसत नव्हतं. नाही म्हणायला समोर च्या एका झाडावर Changeable Hawk Eagle आणि Crested Serpent Eagle हे गरुड बसले होते.
पण तितक्यात आमच्या गाईड चा दबक्या आवाजातला इशारा आला.. मिळाला वाटत किंगफिशर.. सगळे जवळ-जवळ धावतच तिथे पोहोचलो. थोडा वेळ शोधा-शोध केल्यावर एकदाचा आम्हाला तो दिसला. झाडीत असला तरी त्याच्या काही भागावर ऊन पडलं होतं. मग मिळेल तसा ट्रायपॉड ठेवून आधी फोटो काढले.
२-५ मिनिटेच मिळाली फोटो काढायला पण सगळेच खूप खुश होतो Ruddy बाबा दिसल्यामुळे.
परतीच्या वाटेवर एका झाडावर बसलेली White-bellied Sea-Eagle ची जोडी दिसली. हे समुद्र गरुड अंदमान मध्ये खूप असावेत बहुतेक कारण अगदी रोज ते दिसतच होते कुठे ना कुठे. तसं पाहिलं तर त्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे समुद्र किनारे, आणि इथे तर बघावं तिथे समुद्रच. त्यामुळे त्यांचं असणं स्वाभाविकच होत म्हणा.
साधारण ११:३० ते २:३० आम्ही हॉटेल मध्ये होतो. त्यात जेवण, आराम उरकून मग २:४५ परत बाहेर पडलो. आज परत चिडिया टापू ला जायचं होत. काळोख झाल्यावर कालच राहिलेलं घुबड आणि Nightjar ह्यांना शोधायचं होतं. वाटेत पुन्हा एकदा Pacific Reef Heron ची जोडी दिसली, ह्या वेळेस त्यांचे एकत्र फोटो देखील मिळाले.
त्यांचे फोटो काढून परत गाडीकडे वळलो तर समोर झाडावर एक समुद्र गरुड मस्त विश्रांती घेत होता.
आज आम्ही पार्क च्या आत जाण्याऐवजी थोडे बाहेरचे भाग फिरायचं ठरवलं. भरपूर भटकलो तिथे, पण फार काही वेगळं मिळालं नाही बघायला. नाही म्हणायला एक लाइफर झाला तो म्हणजे Amur Stonechat किंवा Stejneger's Stonechat. मग कालच्याच टपरी वर चहा-भजी झाली. त्या टपरीतून मस्त सूर्यास्त दिसत होता, तिथे थोडे फोटो काढले आणि काळोख झाल्यावर घुबड दर्शनासाठी निघालो. पण आज सगळाच नन्नाचा पाढा होता आमचा. खूप वेळ फिरल्यानंन्तर सुद्धा काहीच मिळालं नाही, अगदी आवाज सुद्धा नाही ऐकले. आमच्या पेक्षा आमची गाईडच जास्त निराश झाली होती. पण असतो एखादा असा दिवस. हे काही प्राणी-संग्रहालय नाही कि हवं तेव्हा प्राणी-पक्षी दिसतील. कधी नशीब जोरात असतं तर कधी नाही. तरीपण दीड दिवसात बरेच नवे पक्षी (मोजून सांगायचं तर २०) बघायला मिळाले होते इथे.
दिवस तिसरा - अंदमान टील
आज सकाळी परत एकदा आम्ही चिडिया टापू जवळच्या भागात गेलो. इथे आज andaman treepie आणि andaman serpent eagle दिसू शकेल असा आमच्या गाईडचा दावा होता. त्याप्रमाणे सुरुवात तर केली, घाटाच्या रस्त्यात थोडं थांबून पायी चाललो देखील पण आज तिथे गरुड नव्हताच बहुतेक. एक scarlet minivet चे फक्त फोटो काढता आले तिथे.
नंतर आमच्या गंतव्य स्थानी आल्यावर परत पायी भटकंती सुरु झाली. पण १५-२० मिनिटे चालून सुद्धा फार काही हालचाल जाणवत नव्हती. फक्त एका ठिकाणी मला (आणि १-२ जणांना) andaman shama चं ओझरतं दर्शन झालं. छान बाहेर झाडावर बसलेली होती बया पण आमची चाहूल लागताच झुडुपात गुडूप झाली. त्यामुळे कॅमेरा काढण्याइतकाही वेळ मिळाला नाही
तितक्यात कोणाला तरी दूरवर एक मोठा पक्षी उडताना दिसला आणि लांबच्याच एका झाडावर तो बसला देखील. दुर्बिणीतून बघून जबिली ने खात्री केली कि हाच तो andaman serpent eagle (अंदमान सर्प गरुड असं आपण मराठीत म्हणू शकू). अगदी २-3 मिनिटेच बसला तो तिथे, त्यातही आमचा बराचसा वेळ त्याची नक्की जागा शोधण्यात गेला. मला तर फक्त उडताना मिळाला त्याचा फोटो.
पण थोडं पुढे गेल्यावर काही उंच झाडांमध्ये पक्षांचे आवाज येत होते. अचानक ३-४ Andaman Treepie चा थवा उडत आला पण तेही अगदी झाडांच्या शेंड्यावर होते (पानांमधून जेमतेम दिसत होते एवढंच). ह्या फोटो मध्ये थोडा अंदाज येईल त्याचा.
फार काही मिळत नाही म्हणून आम्ही कंटाळून परत फिरलो. थोड्याच अंतरावर अभय ला परत एकदा Violet Cuckoo ची चाहूल लागली. आणि १,२ नाही तर चक्क ३ cuckoo होत्या तिथे. मग सर्वांची परत एकदा धावपळ सुरु झाली, नक्की कुठे दिसतायत? त्यात परत गाईड्स जोरात बोलू नका म्हणून दटावत होतेच. शेवटी एकदाचे मिळाले थोडे फोटो.
परततांना वाटेत मग एका ठिकाणी निळ्याशार समुद्राजवळ थांबलो. तिथे बरोबर आमच्या डोक्यावर एक समुद्री गरुड घिरट्या घालत होता. चांगला वयात आलेला पक्षी होता तो (जुवेनाईल असतात तेव्हा त्यांच्या पोटाचा आणि शेपटीचा भाग असा छान पांढरा दिसत नाही, त्यांचाही फोटो मिळाला नंतर).
तिथून हॉटेल वर परतण्यापूर्वी आम्ही परत एकदा चिडिया टापू पार्क च्या आतून फेर फटका मारायचं ठरवलं. ह्या वेळी तिथली एक वेगळी पायवाट निवडली. पण तो पर्यंत सकाळ उलटून गेलेली असल्याने पक्षी मात्र जास्त दिसले नाहीत. इथे जखमी झालेल्या पक्षांची वेगळी काळजी घेतली जाते, त्यांना जंगलात सोडण्याआधी काही काळ ते इथल्या पिंजऱ्यांमध्ये असतात (बरे होई पर्यंत). तिथे आम्हाला Nicobar Pigeon नावाचं एक सुंदर असं कबुतर दिसलं. इतरही काही पक्षी होत तिथे.
बाहेर पार्क मध्ये आम्हाला एका ठिकाणी White-throated Kingfisher ची जोडी दिसली. ह्यातला एक फोटो तुम्ही नीट बघाल, तर खंड्याचे डोळे थोडे वेगळे दिसतील. हे आहे त्यांचं nictitating membrane. हा त्यांच्या डोळ्यावर असणारा एक अर्ध-पारदर्शक असा पातळ पडदा. धूळ/माती किंवा इतर काही धोक्यांपासून हा पडदा त्यांच्या डोळ्याचं रक्षण करतो. आणि विशेष म्हणजे, थोडा पारदर्शक असल्यामुळे त्यांची दृष्टी हि पूर्ण जात नाही. हा पडदा बहुतेक सगळ्या पक्षांना असतो (विशेषकरून शिकारी पक्षांना).
दुपारी २:३० ला निघून आज आम्ही ओग्राब्राज ला जाणार होतो. वाटेत सिप्पीघाट लागला. ह्या भागात खूप सगळे तलाव दिसत होते. आमच्या गाईड कडून कळलं कि हे सगळे पाणथळ भाग हे २००४ मध्ये आलेल्या सुनामी चे परिणाम होते. पूर्वी इथे असणाऱ्या जमिनीवर अचानक खूप सगळे तलाव तयार झाले.
त्यातल्याच एका तळ्यापाशी आमच्या गाड्या थांबल्या. आणि जबिली च्या सूचनेप्रमाणे आम्ही हळू हळू पाण्याच्या दिशेला सरकू लागलो. ह्या उथळ पाण्यामध्ये खूप सगळे andaman teal होते. इतरही काही पाण-पक्षी (moorhens, बगळे, swaphens, इ.) होते तिथे पण आम्हाला फक्त टीलच दिसत होते (म्हणजे काहीसं ते अर्जुनाला फक्त माशाचा डोळाच नव्हता का दिसतं, तसंच 😉). सावधपणे आम्ही आधी लांबून फोटो काढले आणि मग जवळ जवळ जात पाण्याच्या काठापर्यंत पोहोचलो (आम्ही घेत होतो एवढी काळजी पण त्या पक्षांना काही पडलेली नव्हती.. ते बिनधास्त पणे पाण्यात विहरत होते).
इथे मोठे ट्रक्स बरेच दिसत होते, ते ह्या पाणथळ भागात मातीची भर टाकून ती तळी बुजवण्याचे काम करत होते बहुतेक. ज्या तऱ्हेने कामं चालू होती, ते बघता हि पाणथळ जागा लवकरच नष्ट होईलस वाटतं (म्हणजे तिथे सहज दिसणारे पक्षी दिसायचं बंद होईल बहुतेक)
तिथे साधारण तासभर थांबून मग आम्ही ओग्राब्राज ला निघालो. इथे प्रथमतः आम्ही mangrove (कांदळवन) जंगलाकडे आलो. पहिला शोध घेतला तो परत एकदा Ruddy Kingfisher चा पण खूप वेळ शोधून सुद्धा तो दिसला नाही. आमचं पुढचं लक्ष होतं mangrove Whistler हा पक्षी. हा तर म्हणे Ruddy पेक्षा पण बुजरा पक्षी, त्यामुळे त्याला शोधण्यासाठी आम्हाला मॅन्ग्रोव्ह मध्येच उतरावं लागणार होतं. मग पुढची १५-२० मिनिटे हि त्या चिखलातून कसाबसा मार्ग काढत आम्ही आत शिरलो. पण आमचे सगळे प्रयत्न फोल ठरले, त्याने आम्हाला हुलकावणी दिलीच. फक्त एकदा त्याचा आवाज पुसटसा ऐकला आणि त्यावरच समाधान मानावं लागलं.
आता आम्ही जवळच्या गवताळ भागातले पक्षी बघायला निघालो. गवताळ प्रदेश असला तरी आजूबाजूला पाणी होतंच थोडं. ऊन खूप कमी झालं होत तोपर्यंत पण त्या भागात खूप सगळे पक्षी दिसले (म्हणजे warblers, बी-इटर्स अशी छोटी मंडळी). सगळ्यात आधी दिसले ते गवतावर बागडणारे Eastern Yellow Wagtails. Warblers दिसत होते पण ते खूपच लांब होते. आकाशात Plume-toed Swift (Andaman Glossy Swiftlet) सुद्धा होते खूप सगळे. मग दिसले २ Blue-tailed Bee-eaters. एवढं सगळं असूनही फोटो मात्र मिळत नव्हते (कारण पुरेसा प्रकाश नव्हता आणि सगळेच छोटे पक्षी लांब अंतरावर होते). मग आम्ही ठरवलं की उद्या सकाळी इथे परत यायचं. सकाळच्या वेळात पक्षांची हालचाल पण जास्त असण्याची शक्यता होती.
आज निघण्यापूर्वी आमचा मैदानातच भेळ बनवण्याचा बेत होता. रेडिमेड मसाले होते आणि कांदे,टोमॅटो हे हॉटेल मधून येतांना बरोबर आणले होते. मग सूर्यास्त होत असताना तिथे आमचा झकास फराळ झाला (कमी होती ती फक्त गरमागरम चहा ची).
इथे आमचा दिवस अजून संपला नव्हता. अजून एका घुबडाच्या शोधात आम्हाला जायचं होत. परतीच्या वाटेवर मग एका शाळेपाशी (इथे जंगल अजिबात नव्हतं, चांगली भर वस्तीत होती शाळा) आम्ही थांबलो. काही कळायच्या आत जबिली पुढे निघाली आणि आम्ही तिच्या मागे. शाळेच्या बिल्डिंग मध्ये शिरून आम्ही एका व्हरांड्यापाशी आलो. पण ह्या गर्दीत आम्ही काही जण एवढे पुढे आलो होतो, कि मागे राहिलेल्यांना नक्की कुठे जायचं ते कळतंच नव्हतं. हा सगळा गोंधळ निस्तरण्यात मग ५ मिनिटे गेली. शेवटी सगळे स्थिर-स्थावर झालयावर जबिली ने आम्हाला एका कोपऱ्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं (तिला तिथे काळोखात ते घुबड दिसलं होतं). कॅमेरे सरसावून आम्ही तयारीत होतो. काही क्षणांपुरता टॉर्च चा प्रकाश पडला आणि आम्ही पटकन फोटो काढून घेतले. फक्त २-३ वेळा टॉर्च चा झोत मारून आम्ही परत निघालो. जर जास्त वेळ तिथे थांबून आम्ही त्या घुबडाला त्रास दिला असता, तर ते तिथून निघून गेलं असतं (आणि मग गाईड लोकांना नंतर च्या दिवशी येणाऱ्यांसाठी दाखवायला हि सोपी जागा उरली नसती).
इथे दिसलेलं Andaman Masked Owl म्हणजे पुष्कळस आपल्या इथल्या गव्हाणी घुबडा (Barn Owl) सारखंच. पण हि एक वेगळी प्रजाती गणली जाते (थोडं छोटं असतं ते गव्हाणी घुबडा पेक्षा आणि रंगही थोडा गडद असतो).
चवथा दिवस - ओग्राब्राज चे लाइफर्स
काल ठरवल्याप्रमाणे आज ओग्राब्राज ला सकाळ घालवायची हे नक्की होत. नेहमीप्रमाणे ६ च्या सुमारास निघालो. गेल्या २-३ दिवसात एवढे लाइफर्स (नवे पक्षी) ऑलरेडी दिसले होते, त्यामुळे इथे फार काही मिळेल अशी अपेक्षा नव्हती मला पण एखादा नवीन warbler मिळाला तर बरं एवढीच इच्छा होती.
माळरानात शिरता शिरताच Andaman Coucal (म्हणजे तिथला भारद्वाज) दिसला. गाडीतून न उतरताच त्याचे १-२ फोटो काढून घेतले, आणि तेच बरं झालं कारण गाडीतून उतरताक्षणीच तो उडून गेला. इथे पुन्हा एकदा Eastern Yellow Wagtail दिसला. त्याच्या जवळच मला एक थोडा वेगळा पक्षी दिसला, आधी फोटो काढला त्याचा आणि मग कळलं कि तो Red-throated Pipit होता. चला, म्हणजे लाइफर्स ला सुरुवात तर चांगली झाली. दूरवर गवतात खुप सगळे छोटे पक्षी भक्ष शोधत बागडत होते. जबिली ची नजर त्यांच्यावर होतीच, तिने भराभर नाव सांगायला सुरुवात केली Dusky Warbler, Black-browed Reed Warbler, Oriental Reed Warbler. च्यायला, सगळेच लाइफर कि. लांब होते सगळे पण कसंही करून १-२ फोटो मिळवलेच. तिथे मग एक खाटीक (Shrike) पक्षी पण दिसला. त्याचं नाव Philippine Shrike, आधी वाटलं हा पण लाइफर, पण नंतर कळलं हि Brown Shrike ची उप-जात आहे.
ह्या गवताळ भागाच्या कडेला एक छोटं तळं होत आणि त्या पलीकडे पाण्यातून जाणारी (म्हणजे दोन्ही बाजूला पाणी) एक पायवाट होती. Warbler शो नंतर आता आम्ही तिथे वळलो. लगेचच एक Yellow Bittern दिसला. मस्त गवताच्या कडेकडेने हळू हळू चालत होता. लांब होता, त्यामुळे परत एकदा नक्की कुठे आहे अशी शोधाशोध झालीच.
पाण्यात छोटे छोटे stint पक्षी दिसत होते आता त्यांच्याकडे नजर वळवली. कुठले आहेत ते कळायच्या आधी फोटो काढून घेतले (नाहीतर ओळख पटवण्याचा नादात वेळ जातो, आणि बरेचदा पक्षी उडून जातात). जबिली ने मग त्यांची ओळख सांगितली. ते होते Long-toed Stint आणि Red-necked Stint. त्यांच्याच जवळ एक Pin-tailed Snipe सुद्धा दिसला. तिथेच आकाशात काही White-nest Swiftlet (Edible-nest Swiftlet) चा थवा उडत होता. अतिशय वेगात उडत असल्यामुळे जवळ असूनही त्यांचे फोटो काही घेता येत नव्हते. ह्या Swiftlets चं वैशिष्ठ्य असं कि त्यांची घर हि पूर्णपणे त्यांच्या लाळे पासून बनतात. म्हणजेच ती माणसांनासुद्धा खाण्यायोग्य असतात (चीन मध्ये त्यांचं सूप खूप आवडीने पितात) ... म्हणून नाव Edible-nest.
Swiftlets कडे बघतांना अचानक एक समुद्री गरुड दिसला. घिरट्या घालत घालत एक-दोनदा तो बऱ्यापैकी जवळ दिसला. फोटो बघून कळलं कि हा अजूनही बच्चा आहे (पूर्ण वाढ झालेल्या गरुड पेक्षा बरेच गडद रंग होते पिसांचे आणि शेपटीचे सुद्धा).
परतीच्या वाटेवर जबिली ने एक red-whiskered bulbul चे फोटो घ्यायला सांगितलं. बुलबुल चे काय फोटो काढायचे, ते तर आमच्या इथे पण दिसतात, म्हणून टाळणार होतो पण बघितलं तर हा जरा वेगळा वाटला. त्याचा डोक्यावरचा तुरा चक्क पांढरा होता. काही पक्षांमध्ये रंगद्रव्यांची कमतरता असेल, तर असं होऊ शकतं. इंग्रजीत त्याला leucistic असं म्हंटल जात. हा त्यापैकीच होता.
एकंदरीत सकाळचं birding एकदम मस्त झालं. ध्यानी-मनी नसतांना अचानक ६-७ लाइफर्स दिसले इथे.
दुपारी आम्ही परत एकदा शोल-बे लाच जाणार होतो. मुख्य उद्दिष्ट होतं Mangrove Whistler आणि मिळाला परत तर Ruddy Kingfisher. ह्या वेळेस फेरी बोटीतून जाताना पूर्ण प्रवासाचं मोबाईल मध्ये शूटिंग केलं. तेवढीच एक वेगळ्या प्रवासाची आठवण.
पलीकडच्या तीरावरून कालाटांग एरिया कडे निघालो. कांदळवन चालू झाल्यावर लगेच गाडीतून उतरलो आणि प्रथम किंगफिशर चा शोध घेतला. पण बराच वेळ घालवून सुद्धा नाही दिसला आज. मग तिथून पुढे जाऊन, Whistler चा शोध चालू केला. त्यानेसुद्धा खूप वेळा हुलकावणी दिली (त्याचा आवाज येतोय असं वाटायचं पण दिसायचं काहीच नाही). खूप वेळ देऊन सुद्धा नाहीच दिसला शेवटपर्यंत. एक सुतारपक्षी तेवढा दिसला त्या काळोख्या झाडीत.
नाही म्हणायला थोडी excitement निर्माण झाली तिथून परत गाडी कडे येतांना. जाताना आम्ही एका ठिकाणी एक रेडा बांधलेला पहिला होता. येतानाही तिथूनच परत येत होतो. बाकी सगळे जरा लांब होते पण मी थोडा शॉर्टकट घेऊन जात होतो. ते थोडं त्या रेड्या जवळ होतं, (बहुतेक माझ्या कडचा ट्रायपॉड बघून) काही कळायच्या आत तो रेडा माझ्या दिशेने आला, नशीब त्याला बांधलेले दोरखंड चांगले मजबूत होते, नाहीतर त्या दिवशी माझं काही खरं नव्हतं.
रस्त्याच्या कडेला थोडं फिरून बघितलं पण तिथेही काही हालचाल नव्हती आज. मग परत एकदा कांदळवनाच्या दुसऱ्या भागात गेलो आणि किंगफिशर / Mangrove whistler चा शोध घेतला. पण आज संध्याकाळ अगदीच रिकामी राहिली. सकाळी अचानक मिळालेल्या लाइफर्स मुळे जो उत्साह वाढलेला होता तो संध्याकाळी अगदी फुस्स झाला.
पण अजून एक संधी होती. काळोख झाल्यावर आम्ही परत घुबड शोध घेतला. २-३ वेगळ्या जागा त्या साठी आमच्या गाईड ने पाहून ठेवल्या होत्या. सगळीकडे आम्ही भरपूर वेळ दिला, अगदी मिट्ट काळोखात जंगलात फिरलो. एकदा Hume's Hawk Owl दिसलं पण ते सोडलं तर फक्त एक साप दिसला वाटेत (नशीब आमच्या पायाखाली नाही आला, कारण काळोखात खाली काय आहे, हे कळणं शक्यच नव्हतं .. पण तो बिनविषारी होता)
शेवटचा दिवस
आज कुठे जायचं ह्या विषयी थोडी खलबतं झाली आदल्या रात्री. पण इथल्या बहुतेक प्रजाती पाहून झाल्या होत्या (काही अपवाद वगळता). मग आमच्या पैकी सर्वात तरुण दाम्पत्य श्री. व सौ. वनारसे ह्यांनी तो दिवस त्यांच्या पद्धतीने फिरायचं ठरवलं (Cellular Jail आणि इतर ठिकाणे). संध्याकाळी त्यांना खरे मंडळीही जॉईन झाली. आम्ही मात्र birding धर्म निभावला (त्यात फार काही मिळालं नाही तो भाग सोडा).
सर्वानुमते परत एकदा शोल-बे इथेच जायचं ठरलं. प्रजाती जरी त्याच दिसल्या तरी काही चांगले फोटो मिळाले तर बघू असा विचार होता त्यामागे.
सुरुवात बरी झाली आज. इतके दिवस लांबून दिसणाऱ्या अंदमान Treepie ने आज जरा जवळून दर्शन दिलं. Andaman Woodpecker बरेच वेळा एकाच झाडावर फेऱ्या मारून गेला, त्याचेही काही बरे फोटो मिळाले. कोतवाल, Oriole, Starlings, Minivets हे नेहेमीचे कलाकार तर होतेच सोबतीला. ह्यातल्या काहींनी तर छान विडिओ करण्याचीही संधी दिली. सुतार पक्षी त्याच्या घरट्यात शिरून बहुतेक काही साफ-सफाई करत असावा.
न्याहारी साठी थांबलो होतो तिथे थोडी हालचाल दिसली. नीट बघितलं तर तो Andaman Bulbul होता. ह्याचाही आत्तापर्यंत चांगला फोटो मिळाला नव्हता, मग लगेच सगळे हातातले खाद्यपदार्थ टाकून कॅमेरा घेऊन धावलो. जवळच Olive-backed Sunbird सुद्धा दिसला.
तेवढ्यात आमच्या गाईडला कोणाचा तरी फोन आला, तिने लगेच सर्वांना गाडीत बसण्याचा इशारा केला. अजून पुढच्या भागात म्हणे White-breasted Woodswallow दिसत होती. हाही एक दुर्मिळ पक्षी, त्यामुळे गाड्या भरधाव निघाल्या. साधारण ७-८ किलोमीटर गेल्यावर २ गाड्या आधीच थांबलेल्या दिसल्या (म्हणजे आम्ही बरोबर जागेवर पोहोचलो होतो). पण दुर्दैवाने आम्ही येईपर्यंत पक्षी उडून गेला होता. पुन्हा एकदा शोधाशोध चालू झाली. अचानक एका लांबच्या झाडावर Swallow बसलेली दिसली (दुर्बिणीतून). सगळ्यांनी तिथे धाव घेतली. आधीच्या अनुभवांवरून शहाणं होऊन मी लांबूनच एक फोटो काढून घेतला (परत एकदा तेच शहाणपणाचं ठरलं कारण तो पक्षी लगेचच उडाला).
आता बराच उशीर झालेला होता त्यामुळे गाईडस ची परतण्याची घाई चालू होती, पण तेवढ्यात एक सुतार पक्षी दिसला म्हणून परत थोडं थांबलोच.
आज दुपारच्या सत्रात (हे शेवटचंच होत) आम्ही परत एकदा चिडिया टापू कडे गेलो. पण ह्या वेळी नेहमीच्या जागी ना थांबता पुढे जो एक लोकप्रिय टुरिस्ट स्पॉट आहे तिथपर्यंत गेलो. पण तिथे एवढी गर्दी होती कि न थांबताच परत निघालो. पण गेलो ते बरं झालं कारण वाटेत एक मस्त बसलेला Andaman Serpent Eagle दिसला.
मग थोडा वेळ तिथल्या चहाच्या टपरीवर वेळ घालवला. समोर एक Collared Kingfisher ची जोडी बसली होती, त्यांचे फोटो काढले, सूर्यास्त बघितला.
काळोख झाल्यावर थोडाच वेळ घुबड शोधायचा प्रयत्न केला पण फार वेळ न थांबतो निघालो परत.
एकंदरीत पाहता, छान ट्रिप झाली इथली. खूप चांगले फोटो जरी नाही मिळाले तरी एक नवीन प्रदेश बघता आला, बरेच नवीन पक्षी दिसले, नव्या ओळखी झाल्या. आता पुढच्या वेळी येऊ तेव्हा सावरकर स्मृती ला भेट देण्यासाठी एक्सट्रा दिवस ठेवून यायचं हे पण नक्की झालं.
सकाळी आमचं विमान लवकर होतं. त्यामुळे पहाटे नेहमीच्याच वेळेला आम्ही बाहेर पडलो आणि संध्याकाळपर्यंत सिमेंट च्या जंगलात परतलो. एअर इंडिया चा विमान प्रवास देखील खूप चांगला वाटला येतांना.