मिश्मी - एक पक्षी वैभव
- With JungleHike Tours
- मार्च, 2022
  Team Collage  
थोडं ह्या सहली विषयी ...
भारताच्या ईशान्येतील (म्हणजे सोप्या शब्दात आपलं North-East हो) राज्यांविषयी एक कुतूहल नेहमीच होतं. आणि त्यातही पक्षी-तज्ज्ञाकडून तिथल्या पक्षांविषयीसुद्धा बरच ऐकलं होत. जंगल-हाईक बरोबर मी बऱ्याच सहली करत असतो. तेव्हा डिसेंबर मध्ये क्लारा नि मला ह्या सहलीविषयो विचारलं होत. अर्थात तेव्हा मी अर्धवट होकार दिला होता कारण आमच्या दादांची (माझे वडील) तब्येत काही ठीक नव्हती आणि हे क्लारा ला माहित होत.
पुढे मी विसरून गेलो होतो पण फेब्रुवारी मध्ये अविनाश ला भेटलो तेव्हा तो म्हणाला ट्रिप तर फुल झालेय आता. ओह.. म्हणजे आता पुढच्या वर्षापर्यंत वाट बघावी लागणार तर.
पण माझ्या नशिबात हि ट्रिप लिहिलेली होती बहुतेक. कारण, क्लारा म्हणाली कि तुझा सहभाग मी गृहीतच धरलेला होता त्यामुळे तुझं नाव परमिट मध्ये आहे. झालं तर मग, आता फक्त विमानाचं तिकीट काढायचं. अशा तऱ्हेनं माझं मिशमी ला जाणं पक्कं झालं.
साधारण पणे ट्रिप च्या १-२ आठवडे आधीपासून मी थोडी तयारी सुरु करतो (म्हणजे नक्की कुठल्या भागात जाणार, तिथे कुठले पक्षी दिसण्याची किती शक्यता आहे, तिथलं तापमान काय, वगैरे वगैरे). ह्यबाबतीत eBird नावाचं एक mobile app खूप फायद्याचं आहे. पण त्याविषयी सविस्तर परत कधीतरी.
त्याच सुमारास जंगल हाईक चा WhatsApp ग्रुप पण तयार झाला. त्यावर मग हळू हळू ह्या चर्चा सुरु झाल्या.
आमच्या एकूण ७ रात्रीच्या मुक्कामापैकी दोन रात्री आम्ही कॉफी हाऊस नावाच्या ठिकाणी मायूदीया खिंडी च्या जवळ (खिंड म्हणजे Pass हो, जस कि खारडुंग-ला पास, रोहतांग पास, ई.) राहणार होतो. समुद्रसपाटीपासून साधारण ९००० फुटावर असल्याने इथे कायम थंडी असते आणि त्यात तिथे इलेक्ट्रिसिटी नाही. वीज पुरवठा नसला तरी २ तासांकरता generator च्या मदतीने २ तास बॅटरी चार्ज करायची सोय होते तिथे. त्याविषयी अजून थोडी माहिती अविनाश / क्लारा ह्यांनी दिली आणि थोडी गूगल बाबांच्या मदतीने मिळवली.
ह्याच्या जवळपास (म्हणजे ५-१० किलोमीटर दोनही बाजूस) दुसरी मनुष्यवस्ती नाही. सर्वात जवळच रोइंग हे गाव ५० किलोमीटर अंतरावर. खूप जुनं बांधकाम (बहुतेक ब्रिटिशांच्या काळातलं) असल्यामुळे, आणि नंतर कसलीही डागडुजी न झाल्याने बिल्डिंग अगदी कमकुवत आहे. कोणी तरी तिथल्या भूतांबद्दल सुद्धा उल्लेख केला होता.. असो काळोख्या भागामध्ये असल्या अफवा पसरणं काही विशेष नाही. पण तिथल्या पक्षीवैभवाबाबत कोणाचंच दुमत नव्हतं!
आता ह्यात भर म्हणून लीच सॉक्स पण घ्या अशी सूचना आली. आसाम मध्ये आम्ही ज्या जंगलात फिरणार होतो, तिथे म्हणे खूप जळवा असतात. आणि त्यात हल्ली पाऊस केव्हाही पडतो म्हणजे अजूनच दमट हवा (जळवांचा सुक्काळ असतो तेव्हा).
ह्या भागातले पक्षी हे बरेचदा शिकारीला बळी पडतात त्यामुळे साहजिकच ते झाडांमधून बाहेर येत नाहीत आणि शिवाय झाडा झुडपांमुळे प्रकाश कमीच असतो, म्हणजे ट्रायपॉड घ्यावाच लागणार फोटो काढण्यासाठी. सामानाची यादी अशी वाढत होती, त्यात परत विमानात फक्त १५ किलो ची मर्यादा. पण बसवलं सगळं त्यात (थोडे कपडे कमी घेतले, दुसरं काय) आणि निघालो २३ तारखेला.
दिवस पहिला - चलो दिग्बोई
आमचा पूर्ण ग्रुप ११ जणांचा होता (२ टूर लीडर्स सकट). ४ जण मुंबईहून, ५ नागपूर मधून आणि प्रत्येकी १ दिल्ली आणि मैसूर हुन. मैसूर मध्ये असणारे शिवप्रकाश जी हे काही दिवसांपूर्वीच मणिपूर ला गेलेले होते, त्यामुळे ते तिथून येणार होते दिब्रुगड ला, बाकीचे आम्ही सगळे दिल्ली विमानतळावरच भेटलो. नागपूर च्या मंडळींपैकी ४ जण प्रतिथयश डॉक्टर्स होते आणि बहुतेकांची हि पहिलीच birding ट्रिप असणार होती. त्यांच्या दृष्टीने ही सहल खूपच खडतर असणार होती पण त्यापैकी कोणीही तक्रार न करता पूर्ण सहल मस्त एन्जॉय केली. त्यांनी मोबाईल वर खूप सगळे फोटो सुद्धा काढले (त्यातले काही ह्या माझ्या ब्लॉग साठी सुद्धा उपयोगी पडले). आणि अजून एक महत्वाचे म्हणजे, त्यांच्या कडे सतत काहीनाकाही स्नॅक्स चा स्टॉक होताच, अशा ठिकाणी ते भलतेच फायद्याचे होते.
विमान प्रवास व्यवस्थित पार पडला आणि साधारण ३ चे सुमारास आम्ही दिग्बोई ला जायला निघालो. तसा दीड तासाचाच प्रवास होता अन इथे (अति पूर्वेला असल्यामुळे) खूप लवकर दिवस मावळतो (आणि उजाडतो देखील). त्यामुळे ५/५:३० वाजेस्तो अंधार व्हायला लागतो. वाटेत आम्हाला दुतर्फा चहाचे मळे दिसत होते (अर्थात आसाम मध्ये हे न दिसते तरच नवल). पण त्यातही मला २ lifers दिसले. पहिला Indochinese Roller आणि दुसरा Oriental Pied Hornbill. अर्थात हायवे असल्याने खाली उतरून फोटो काढणे शक्य नव्हते तिथे. त्यामुळे फक्त बघण्यात समाधान मानावे लागले, पण हीच वेळ पूर्ण ट्रिप भर येणार होतीच आमच्यावर. इथले पक्षी असे काही झाडीत लपतात कि त्यांना शोधणं मुश्किल होतं खूप. उदाहरणादाखल हा एक विडिओ बघा... आणि मी आपलं हे सुतोवाचं एवढ्यासाठी केलं कि बाबांनो ह्या वेळेस माझ्याकडून चांगल्या फोटोंची अपेक्षा ठेवू नका. इथे फोटो मिळणं महा कठीण.
आम्ही खरंतर लगेचच हॉटेल वर जाणार होतो पण आमचा गाईड पलाश वेगळ्या विचारात होता. त्याने गाड्या आधी मागुरी बील (बील म्हणजे बहुतेक इथल्या भाषेत पाणथळ जागा) कडे वळवल्या. प्रकाश नव्हता फारसा पण पुढल्या तासाभरात बरेच पक्षी बघायला मिळाले, आणि विशेष म्हणजे त्यात चार lifers सुद्धा होते.
आम्ही उतरलो तो रस्ता थोडा उंचावर होता आणि दोन्ही बाजूला खाली असणाऱ्या जमिनीवर उंच गवत वाढलेलं होतं . पटकन आम्ही आधी कॅमेरे बाहेर काढले आणि फोटोस साठी सज्ज झालो. न जाणो, लगेचच काही दिसलं तर !! आणि खरंच लगेच पक्षी दिसायला सुरुवात झालीच.
थोड्या लांबच्या गवताच्या एका उंच पात्यावर बसलेला Striated Grassbird पलाश ने आम्हाला दाखवला. जवळच एक खाटीक (shrike) होता. तो अगदी आपल्या नेहमीच्या Long-tailed Shrike सारखाच दिसत होता. मी कॅमेरा उचलला नाही, ते क्लारा च्या लक्षात आलं, तिने लगेच सांगितलं, "काढ फोटो ... हा Grey-backed Shrike आहे, आपल्या इथे दिसत नाही".
जवळपासच्या झुडुपांमध्ये काही हालचाल जाणवत होती पण दिसत काहीच नव्हतं नीट. तेवढ्यात लालसर डोक्याचा एक पक्षी दिसतोय असं वाटलं, म्हणून पटकन फोटो काढून घेतला तर तो Chestnut-capped Babbler निघाला. बघता-बघता तीन lifers झाले की !!
मी हे आधीच्या ब्लॉग्स मध्ये पण सांगितलंय पण lifers म्हणजे आयुष्यात प्रथमच बघितलेला पक्षी !
थोडं पुढे गेल्यावर पलाशने एका झाडीत शोधाशोध सुरु केली. (म्हणजे पायवाट होती तिथे.. अगदी गवतात नाही). इथे त्याला पक्षांचे आवाज ऐकू येत होते. थोडं दूरवर पाण्याच्या काठापाशी एक Ruddy-breasted crake दिसला. पण अचानक एक पक्षी आमच्यापासून बऱ्याच जवळ असणाऱ्या गवतात येऊन बसला. आणि तो चक्क बराच वेळ तिथे स्थिर होता (फोटो साठी अजून काय हवं). हा होता Chineses Rubythroat. थोड्या वेळात Yellow-bellied Prinia आणि Striated babbler सुद्धा दिसले पण तो पर्यंत प्रकाश फारच कमी झाला होता (पण नशिबाने त्यांचे फोटो मला शेवटच्या दिवशी तरी मिळाले)
काळोख व्हायला लागला होता त्यामुळे पलाश ने मग अजून एक संधी घ्यायचं ठरवलं. त्याला जवळच (म्हणजे चालत जाण्यासारखं) एका ठिकाणी घुबड दिसू शकेल असं वाटत होत. आणि खरंच आम्हाला एक Brown Boobook (किंवा Brown Hawk-Owl) दिसलं. अजून थोडं थांबून कदाचित इतर घुबडं सुद्धा शोधता आली असती पण आम्ही सगळेच दमलो होतो (मी सकाळी २ वाजता उठलो होतो, लवकर असणार विमान मिळण्यासाठी) आणि आमचं निवासस्थान अजून एका तासाच्या अंतरावर होत.
आम्ही आमच्या खोल्यामध्ये स्थिर होतंच होतो तेवढ्यात मस्त गरम-गरम चहा आला (ह्याची गरज होतीच!). अजून जेवायला एक तासभर वेळ होता, त्यामुळे तोपर्यंत थोडा आराम केला.
जेवणानंतर प्रथम आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या आणि मग जंगल हाईक च्या प्रथेप्रमाणे आज बघितलेल्या पक्षांविषयी चर्चा सुरु केली. ह्या शिवाय जंगल हाइक हाईक ची कुठलीही सहल पूर्ण होत नाही.
देहिंग पटकाईतले २ दिवस
पुढचा दीड दिवस आम्ही देहिंग पटकाइ इथल्या जंगलात घालवणार होतो. ह्या पार्क चे २ मुख्य भाग आहेत. एक सोराईपंग जिथे आम्ही फिरणार होतो आणि दुसरा जेयपोर. (इथली भौगोलिक स्थिती बरीचशी सारखी असल्याने आम्ही एकाच भागात फिरायचं ठरवलं होतं)
आज आम्ही ५:३० ला निघालो आणि वाटेत मस्त चहा घेऊन जंगलाकडे कूच केलं. जाताना रस्त्यातच आम्हाला एक वेगळी मैना दिसली. म्हणजे थोडी आपल्या इथल्या साळुंकी सारखीच पण डोक्यावर छोटा तुरा होता. मग कळलं कि हि Great Myna.
वाटेत आम्हाला हि माहिती कळली कि गेल्या काही दिवसांपासून ह्या भागात जंगली हत्तींचा एक कळप वावरत होता आणि त्यांच्यापासून माणसांना धोकाही होता (त्यातल्या एका हत्तीने तर बऱ्याच माणसांना ठार मारलं होतं). आमच्या ग्रुप च सरासरी वय ६० च्या पुढे असल्याने आम्ही जरा जास्तच सावध असणं गरजेचं होत. त्यामुळे जंगलात शिरतानांच दोन बंदूकधारी रखवालदार आमच्या बरोबर होते. प्रत्येक वेळी पायी फिरतांना त्यातला एक सर्वात पुढे असायचा आणि एक सगळ्यात शेवटी. बंदूक म्हणजे अगदी शेवटचा पर्याय, पण त्यांना हत्तीच्या हालचालींची चांगली जाणीव होती, त्यामुळे एखाद्या धोकादायक भागात ते आम्हाला जाऊन देत नव्हते.
बरंचसं अंतर आम्ही गाडीतूनच जात होतो, पण मधून मधून छोटे अंतर पायी जावं लागत होत (पक्षी गाडीतून दिसं शक्य नव्हतं, त्यासाठी खालीच उतरावं लागणार होतं)
जंगलात शिरल्यावर लगेचच हेल्मेट बर्ड (long-tailed broadbill) दिसला, तो जणू आमच्या स्वागतासाठीच तिथे होता. तिथे खूप सगळे Minivets सुद्धा होते. अविनाश ने मग आम्हाला आमच्या डोक्यावरील फांदीवर असणारी plaintive cuckoo दाखवली. त्याशिवाय रस्त्यात मधोमध (पण आमच्या पासून खूप लांब) Kalij Pheasant दिसला. त्याला सत्ताल मध्ये मी आधी बघितलं होत पण अविनाश म्हणाला कि हि एक वेगळी पोटजात आहे त्याची (इथले पक्षी थोडे जास्त गडद रंगाचे असतात).
तिथून आम्ही Streaked Wren-Babbler च्या शोधात निघालो. त्यासाठी जंगलात एका बाजूला खाली उतरावं लागलं, बराच वेळ शोध घेतला उतरून पण फक्त आवाज ऐकू येत होता, पक्षी दिसला नाहीच.
पुढच्या दोन तासात आम्ही बरेच पक्षी बघितले तिथे. त्यातला सर्वात शानदार होता Sultan tit. त्याशिवाय तिथे White-throated bulbuls, आणि Blue-throated flycatchers सुद्धा होते. Sultan tit चा एक छोटा थवाच होता तिथे. सगळे अगदी मस्त बागडत होते एका फळ झाडावर. जंगलात फळ असणारं झाड असेल तरी सकाळच्या वेळी तरी पक्षी नक्कीच दिसतात.
त्याच्या थोडं आधी आम्हाला Hornbill ची एक वेगळी प्रजाती दिसली (Brown Hornbill). खूप दुर्मिळ पक्षी होता आणि तो फक्त इथल्या जंगलातच दिसतो (बाकी भारतात कुठेच नाही). त्याची बहुतेक जोडी होती. खूप उंच झाडावर होते ते, त्यामुळे कसेबसे २-३ फोटो मिळाले.
मग आमच्या गाईड्स ना Rufous-throated Fulvetta ची शीळ ऐकू आली, लगेचच आम्ही त्याचा शोध सुरु केला. हा पक्षी जवळच आल्याचं जाणवत होत (पानांमधून मधेच तो दिसत होता पण अजिबात बाहेर येत नव्हता) पण फोटो मिळत नव्हता. जवळ जवळ २० मिनिटं आम्ही त्याच्या मागे धावत होतो, शेवटी एक पुसटसा फोटो मिळाला त्याचा.
गाडी बरोबर असल्याने आम्ही जंगलाचा बराचसा भाग फिरू शकत होतो. एक ठिकाणी मात्र गाडी थांबवावी लागली. तिथे चांगला सिमेंट ने बांधलेला पूल होता पण त्याच्या दोनही बाजूला रस्ता पावसामुळे खराब झाला होता (जिथे सिमेंट आणि मातीचा सांधा असतो तिथे). मग आमचे गाईडस आणि ड्राइवर ह्यांनी आधी खाली उतरून रस्त्यात मातीची भर घालून जुजबी डागडुजी केली आणि मगच आम्हाला पुढे जात आलं.
दुपार होईपर्यंत आम्ही फिरत होतो, पण आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. तसं जंगलात आमची न्याहारी झाली होती (ब्रेड-बटर, अंडी, चहा, असं सगळं आम्ही बरोबरच घेतलं होत, त्यामुळे रस्त्यातच खाता आलं) पण त्यालाही आता खूप वेळ झाला होता. आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था जवळच्या एका गावात होती. आधीच सांगितलेलं असल्यामुळे तिथे थांबायला लागलं नाही. आसामी भोजनाचा आस्वाद घेऊन मग तिथून आम्ही पुढे निघालो.
जेवणानंतर आम्ही लगेचच White-winged wood duck च्या शोधार्थ निघालो. हा अजून एक धोकादायक स्थितीत असलेला दुर्मिळ पक्षी. पूर्वी झालेल्या शिकारीं मुळे ह्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे हि बदकं जंगलाच्या अगदी आतल्या भागात राहणं पसंत करतात (शक्य तेवढं माणसांपासून दूर). पलाश ला ती कुठे असू शकतील ह्याची थोडी कल्पना होती, त्यामुळे आम्ही गाडी त्या दिशेला नेली आणि एका विशिष्ट ठिकाणी आल्यावर गाडीतून उतरून पुढे पायी निघालो. दोन डोंगरांच्या मधोमध असलेल्या एका छोट्या तळयात ते दिसतात म्हणे. मग पलाश पुढे आणि आम्ही सर्व मागे, असे निघालो.
थोडं खाली गेल्यावर त्याने आम्हाला थांबायला सांगितलं आणि तो एकटाच पुढे निघाला. पुढचा रस्ता जरा जास्तच खडतर होता त्यामुळे सर्वांनी जाण्या पेक्षा आधी तो गेला आणि जर पक्षी असतील तरच तो आम्हाला बोलावेल असं ठरलं. खरं सांगायचं तर पुढे जावं कि नाही हा विचार माझ्या मनात डोकावून गेला एकदा (मागच्या वर्षीच्या लाटपंचर सहलीत मी असाच एकदा दरीत पडता-पडता वाचलो होतो) पण इतरांचा उत्साह बघून जायचं ठरवलं, अर्थात पक्षी असतील तर. पण आमच्यापैकी काही जणांनी तिथूनच परत फिरायचा निर्णय घेतला.
साधारण एक २० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर पलाश चं बोलावणं आलं .. "आहेत बदकं, चला .. पण अगदी हळू हळू, अजिबात आवाज करू नको.. बोलण्याचा नाही आणि पायांचाही नाही". आता बोलायचं नाही हे ठीक, पण वाळलेल्या पानांतून चालताना आवाज कसा टाळायचा? (हा विडिओ बघा, म्हणजे समजेल मी काय सांगतोय)
हळू हळू आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. किती लांब जायचं होत काहीच कल्पना नव्हती, फक्त अविनाश आणि पलाश च्या मागे जात होतो आम्ही. थोड्या वेळाने पानांमधून थोडं पाणी दिसायला लागलं, म्हंटल आता पोहोचलो. पण तिथून मग आम्ही कडे कडेने पुढे निघालो (पाण्याला समांतर), शेवटी एकदाचा संपला प्रवास. पण खरंतर समोर काही दिसत नव्हतं. मग आम्ही तिथेच जमिनीवर बसलो आणि झुडुपांमधून बघायला सुरुवात केली. ह्याच जागेवरून अविनाश ने दोन बदकं बघितली होती पण ती आता थोडी आतल्या बाजूला गेली असल्याने दिसत नव्हती. त्यामुळे आता वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता (ह्या आशेवर कि ती परत बाहेर येतील).
खूप वेळ आम्ही तिथेच बसून होतो. नशिबाने मी एक प्लास्टिक ची शीट बरोबर घेतली होती त्यामुळे त्याच्यावर बसता येत होतं (नाहीतर जमीन ओलसर होती आणि शिवाय जळवांचा धोका होताच)
खरंतर आमचा धीर आता सुटत चालला होता पण कसेबसे टिकून होतो आम्ही तिथे. पण आज आमचं नशीब जोरावर होतं. अचानक पाण्यात थोडी हालचाल जाणवली. एक बदक थोडं पुढे आलेलं होत, मी लगेच कॅमेरा सरसावला पण काय सांगू? ट्रायपॉड ने तेवढ्यात दगा दिला (कॅमेरा असलेला स्टॅन्ड, हातात निघून आला .. कधी लूज झाला होता काय माहित). तसेच कसेबसे २-३ फोटो काढले, मग दुसरं बदक सुद्धा दिसलं.. कॅमेरा अड्जस्ट करायलाही वेळ नव्हता.. जे काही दिसत होत, ते तसाच कॅमेरात टिपायचा प्रयत्न केला. दोन मिनिटात ती बदक पुन्हा दिसेनाशी झाली. आता अजून थांबण्यात काही अर्थ नव्हता, त्यामुळे मिळाले त्या फोटोंवर समाधान मानायचं ठरवलं आणि परत निघालो. मला निदान बदकं दिसली तरी, काहींना तेही नशिबात नव्हतं.
बाहेर गाडीपर्यंत येई पर्यंत ४ वाजलेले होते. त्यामुळे मग आम्ही परत फिरायचा निर्णय घेतला. एका ठिकाणी मग आम्ही चहासाठी थांबलो. इथे अशी चहाची टपरी असणं इतकं सहज नव्हतं. बरेचदा त्यांच्याकडे दूध नसत किंवा इतरही काही सामग्री नसते, त्यामुळे चहा मिळणं हेही विशेषच होत. ह्या इथे छोटा बाजाराचं भरला होता (त्याच नाव होतं "माया बाजार"). चहा-बिस्किट्स खाताना मग घुबड शोधाबाबत चर्चा झाली. पण हत्तीच्या धोक्यामुळे जंगलात जण सुरक्षित नव्हतं. त्यामुळे मग जंगलाच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरच फिरायचं ठरवलं.
अंधार पडल्यावर लगेच निघालो, पण काहीच आवाज नव्हते घुबडांचे आज. एकदा एका White-cheeked Partridge चा तेवढा आवाज आला (बहुतेक रात्रीचा आसरा शोधात असावा जंगलात).
गेस्ट हाऊस वर परत आल्यावर थोडा वेळ होता, त्यामुळे मी कॅमेऱ्यातले फोटो बघायला सुरुवात केली. अचानक मला जाणवलं, कि माझी मेमरी कार्ड असलेली छोटी बॉक्स कुठे दिसत नाहीये. लगेचच शोधाशोध चालू केली, सगळ्या बॅगा, खिसे परत परत बघितले पण नव्हतीच ती कुठे. आता दोनच शक्यता, एकतर मी कार्ड्स घरी विसरलो किंवा विमानतळावर security check च्या वेळी बाहेर काढलेला बॉक्स परत ठेवायला विसरलो.
मोठ्या birding ट्रिप ला यायचं आणि बरोबर मेमरी कार्ड्स नाहीत ह्यासारखी दुसरी घोडचूक नाही. लगेचच मी घरी फोन केला, मेमरी कार्ड्स घरीच होती. हुश्श.. म्हणजे विसरलो हा प्रॉब्लेम आहेच, पण निदान हरवली तरी नाहीत कुठे.
नशिबाने क्लारा कडे एक एक्सट्रा कार्ड होतं (जे मी नंतर शेवटच्या दिवशी घेतलं). पण त्याच बरोबर हे ठरवून टाकलं, कि विडिओ अजिबात घ्यायचे नाहीत ह्या ट्रीप ला (कारण त्याला मेमरी जास्त लागते) आणि फक्त नवीन पक्षी असेल तरच फोटो घ्यायचे . त्या दिवशी केलेले सगळे विडिओ पण लगेच डिलीट करून टाकले.
कालच्या अनुभवावरून आज आम्ही अर्धा तास आधी निघायचं ठरवलं (५ वाजता) आणि चहा साठी सुद्धा थांबलो नाही. बरोबर गरम पाणी (थर्मास मध्ये), चहाच्या पिशव्या, साखर असं घेऊन ठेवलं होत.
आज सकाळीच आमचं पाहिलं टार्गेट होतं Grey Peacock Pheasant. आणि त्याच्या करता परत एकदा दाट झाडीत शिरणं क्रमप्राप्त होत. आम्ही गाडीने ठरलेल्या जागी पोहोचलो तोपर्यंत तिथे अजून एक ग्रुप आलेला होता. आधीच आम्ही ११, त्यात हे ५ म्हणजे खरंतर खूप गर्दी होती तिथे पण काही इलाज नव्हता. त्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती.
परत एकदा आम्ही झाडाझुडुपातुन वाट काढून ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो, मिळेल तश्या जागा पकडून (बसून/टेकून/उभं राहून) प्रतीक्षेत होतो पक्षी येण्याच्या. सुरुवातीलाच त्याचा आवाज ऐकू येत होता त्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण बराच वेळ थांबून सुद्धा Pheasant पुढे आलाच नाही. शेवटी त्याच्या आवाजावरच समाधान मानुन आम्ही परत फिरलो
तिथून मग आमचं पुढचं लक्ष्य होतं वेग-वेगळी कबुतरं (म्हणजे आपल्या इथे दिसतात ती नाही हो.. इथे बरीच सगळी कबुतरं दिसतात). पण आज आम्ही सकाळी लवकर निघालो असल्याने आधी ब्रेकफास्ट उरकून घेऊया असं सर्वानुमते ठरलं.
भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे उघड्यावर ब्रेकफास्ट करणं शक्य नव्हतं. पण नशिबाने तिथल्या फॉरेस्ट ऑफिसर ला आमची दया आली असावी, त्याने ऑफिस चं एक दालन आम्हाला उघडून दिलं, त्यामुळे आमचा मोठा प्रश्न सुटला
न्याहारीनंतर आम्ही त्या कबुतरांच्या जागेकडे निघालो. पलाश च्या मते, पाऊसामुळे सगळी कबुतरं बहुतेक झाडावर एकत्र दिसतील (नाहीतर ती जमिनीवर विखुरलेली असतात, त्यामुळे थोडं जास्त फिरावं लागत). पण आज तसं काही झालं नाही. पावसामुळे घसरड्या झालेल्या रस्त्यावरून आम्ही आत गेलो खरे पण आमची पूर्ण निराशा झाली तिथेही. अगदी आपल्या इथे दिसणारी Rock Pigeons सुद्धा नव्हती तिथे.
तसंही आज आमच्याकडे अर्धाच दिवस होता कारण नंतर आम्हाला रोइंग ला जायचं होतं (रात्रीचा मुक्काम तिथे असणार होता). त्यामुळे आता थोडाच वेळ शिल्लक होता इथे. पण पलाश ने आशा सोडली नव्हती, त्याला अजून एक जागा माहिती होती जिथे कबुतरं दिसण्याची शक्यता होती, मग लगेच तिथे निघालो आम्ही. इथला ट्रेल फारच सोपा होता जायला आणि विशेष म्हणजे कबुतरं पण दिसली आम्हाला. तेवढंच नाही तर Black-backed Forktail सुद्धा दिसला तिथे. तिथे आम्हाला Pale-capped, Green imperial, Thick-billed Green, आणि Pin-tailed Green हि सगळी कबुतरं दिसली.
आता पावसाचा जोर सुद्धा थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता. बाहेर पडलो तर जवळच खूप सगळे पक्षी गात असल्याचे आवाज ऐकू येत होते. बहुतेक पाऊस कमी झाल्यामुळे सगळे आता खाणं शोधायला बाहेर आले होते. त्यात पहिला दिसला तो होता Dark-necked Tailorbird. त्याच्या पाठोपाठ मग भराभर इतर पक्षी दिसायला सुरुवात झाली. एवढे कि आता आमचा गोंधळ उडत होता कि कोणाचे फोटो काढू? उजवीकडे जाऊ कि डावीकडे? वर बघायचं कि समोर? ह्यातले काही आधी बघितलेलं होते, त्यांच्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं (उदा. Violet cuckoo जी मी मागच्याच महिन्यात अंदमान ला बघितली होती). पण तरीही Pin-striped tit-babbler असा काही समोर येऊन बसला कि त्याचे फोटो काढावेच लागले.
आमच्यापैकी काही जण मग डावीकडे असलेला रस्त्याकडे गेले (तिथे ट्रोगॉन चा आवाज ऐकू आला होता). आम्हीही मग तिथे निघालो आणि वाटेत Golden-fronted leafbird, Black-throated Sunbird, Lesser Racket-tailed Drongo, Yellow-vented flowerpecker, and Ruby-cheeked Sunbird, Chestnut-tailed starlings, Ashy Bulbul असे बरेच पक्षी दिसले. ३०-४० मिनिटात पक्षांचा (आणि lifers चा सुद्धा) अक्षरशः पाऊस पडला तिथे, आणि अशा पावसाला कोण नाही म्हणेल ! सगळ्यांचे काही चांगले फोटो नाही मिळाले पण असं दृश्य बघायलाही भाग्य लागतं.
इतक्या सुंदर अनुभवानंतर आम्ही हसत हसत हॉटेल वर आलो, पटकन बॅगा भरल्या आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पाऊस परत सुरु झाला होता पण आमचा उरलेला दिवस तसाही प्रवासातच जाणार होता, त्यामुळे फार काही बिघडणार नव्हतं पावसामुळे.
आसाम मधल्या दिग्बोई शहरातून आम्ही अरुणाचल प्रदेश मधल्या रोइंग शहरात चाललो होतो. बहुतेक सगळा रस्ता खूप छान होता. गेल्या काही वर्षात इथे रस्त्यांच्या बाबतीत खूप सुधारणा झालायचं ऐकलं होतं, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. चीन च्या आक्रमणाचा धोका असल्याने इथे सरकारने बरंच लक्ष घातलं आहे. इथे लोहित नदीवर एक खूप लांब पूल बांधला आहे, भूपेन हजारिका सेतू. हा सध्याचा पाण्यावरच सर्वात लांब सेतू आहे आणि त्याची रचना अशी मजबूत आहेत कि त्यावरून सैन्याचे रणगाडे सुद्धा प्रवास करू शकतात. पूर्वी जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा गाड्या फेरी बोटीतून न्याव्या लागायच्या आणि त्यात सगळ्यात प्रवासात खूप वेळ निघून जायचा.
पण अरुणाचल मध्ये शिरण्याआधीच आम्ही लंच साठी थांबलो साधारण २ तासांच्या प्रवासानंतर. स्थानिक आसामी जेवण मिळत होते ह्या छोट्या पण स्वच्छ अशा उपाहारगृहात. आणि जेवणानंतर मस्त चहा सुद्धा मिळाला तिथे. जेवण पटकन झालं आमचं पण म्हणून काही आम्ही तिथून लवकर निघू नाही शकलो. आणि हे पावसा-बिवसा मुळे नाही हं! झालं असं, कि आमच्या ३ गाड्यांपैकी एक गाडी लॉक झाली होती आणि किल्ली गाडीच्या आत होती!! आणि ह्या प्रश्नाचं कोणाकडेच काही उत्तर नव्हतं. सगळ्यांची डोकी मग चालायला लागली, आता इथे पाण्याचा नाही तर आयडियांचा पाऊस सुरु झाला एकदम.
जाऊदे, जास्त तपशिलात नाही शिरत मी, पण सुदैवाने तिथून जाणारा असाच एक प्रवासी आमच्या मदतीस धावून आला, त्याने काहीतरी करून passenger side चा दरवाजा उघडून दिला. तासभर गेला त्यात पण आमचा प्रवास एकदाचा परत सुरु झाला.
वाटेत आम्हाला अरुणाचल राज्यात प्रवेश करायचा होता, पण तिथे काही अडचण आली नाही. आमची ओळखपत्र (आधार कार्ड) बघितली ५-१० मिनिटात आणि लगेच निघता आलं.
रोइंग मधल्या यात्री निवास ला पोहोचायला बराच उशीर झाला आम्हाला (वाटेत ब्रेड, बटर हि उद्याच्या न्याहारीची सोय करायची होती आणि कोणालातरी ATM सुद्धा हवं होतं). पण तरीही आम्ही अर्ध्या तासात बाहेर पडून घुबड शोध घ्यायचं ठरवलं. Hodgson's Frogmouth सुद्धा दिसण्याची शक्यता होती इथे, भुर-भुरत्या पावसातंच निघालो पण परत एकदा निराशाच पदरी पडली. घाटात जवळ-जवळ २० किलोमीटर वर पर्यंत जाऊन आलो, पण काहीच दिसलं नाही.
रात्रीच्या जेवणापर्यंत आम्ही इतके दमून गेलो होतो कि मग रोजची पक्षी-गणना (दिवस अखेर आज काय काय बघितलं, त्याची उजळणी) सुद्धा करू शकलो नाही.
मिशमीतले पक्षी - दिवस ४,५, आणि ६
नेहमीप्रमाणे आम्ही ५ वाजता दिवस सुरू केला. आणि तडक मायूदीआ ला जाण्याऐवजी आधी रोइंग शहराबाहेरच्या गवताळ भागात birding करायचं ठरवलं. थोड्या वेगळ्या पद्धतिने बघितले पक्षी. प्रत्यक्ष गवतात जाण्याच्या ऐवजी आम्ही एका रुंद पुलावरून खाली दिसणाऱ्या गवताळ प्रदेशातले पक्षी बघितले.
अगदी पहाटे पोहोचलो होतो आम्ही तिथे आणि त्यात परत पावसाळी हवा, त्यामुळे प्रकाश नव्हता फारसा पण पक्षांचे आवाज मात्र ऐकू येत होते. गेल्या गेल्या लगेचच अविनाश ने एक Daurian Redstart दाखवला. पक्षी खूप लांब होते इथून, त्यामुळे नक्की कुठला पक्षी बघतोय हे फक्त अविनाश सारख्या एक्स्पर्ट लाच सांगणं शक्य होतं. लांबचे पक्षी बघत असताना अचानक एक Common Iora जवळच्या फांदीवर येऊन बसला. अगदी व्यवस्थित फोटो झाल्यावरच उडाला तिथून तो. मग दिसले ते २ Rufous-necked Laughingthrush (जोडी असावी बहुतेक). दुर्बिणीतून जास्त चांगले दिसत होते हे लांबचे पक्षी.
अविनाश तोपर्यंत थोडा पुढे गेला होता, त्याने सगळ्यांना बोलावले कारण तिथे ३-४ Black-breasted Parrotbills मस्त बागडत होते. पुलाच्या दुसऱ्या बाजूला मग काही warblers दिसले (Smoky आणि Dusky Warblers). थोड्या वेळातच आम्हाला ३ तऱ्हेचे Drongo सुद्धा दिसले (Ashy, Bronze, and the Lesser Racket-tailed Drongos)
ह्या ब्रिज वर आम्ही अक्षरशः बागडत होतो त्या दिवशी, नशीब कि तिथे फारच थोड्या गाड्या ये-जा करत होत्या. साधारण तासभर थांबून मग आम्ही तिथून निघालो, वाटेत गावातल्या एका घराजवळ आम्हाला मग Eurasian tree sparrow दिसल्या.
साधारण ९ च्या सुमारास आम्ही मायूदीआ / मिशमी कडे जायला निघालो. त्या आधी गाडीत पेट्रोल/डिझेल भरून घेतलं (कारण वर गेल्यावर जवळपास पेट्रोल पंप असण्याची शक्यता खूपच कमी होती). पाऊस चालूच होता दिवसभर, पण अधून मधून काही मिनिटांची उसंत मिळत होती. कॉफी हाऊस (जिथे आम्ही राहणार होतो) ते साधारण ५० किलोमीटर वर होतं, पण आम्ही दर थोड्या अंतरावर थांबणार होतो (पक्षी बघण्यासाठी) त्यामुळे थोडं उशिरा दुपारच्या जेवणासाठी तिथे पोहोचू अशी अपेक्षा होती.
४-५ किलोमीटर जातो न जातो तोच पहिला स्टॉप आला. गाड्या थोडा मोकळा रस्ता बघून पार्क केल्या आणि आम्ही रस्त्याच्या कडेने पायीच निघालो. इथेही तशी फारशी रहदारी नव्हती, नाही म्हणायला एखाद-दुसरी सैन्याची गाडी पण दिसायची.
आम्ही रस्त्याच्या एका हेअर-पिन वळणापाशी होतो. खाली दरी होती आणि समोरच्या बाजूचा रस्ता दिसत होता. त्या भागाजवळ पक्षांची हालचाल दिसत होती (पक्षी पण बरोबर आपल्यापासून लांबच्याच भागात बागडत असतात) अगदी छोटे पक्षी, त्यामुळे दुर्बिणीतून पण दिसायची मारामार, नुसत्या डोळ्यांनी तर काहीच कळत नव्हतं. पण नजर स्थिरावल्यावर एक कापसा सारखं डोकं असलेला एक पक्षी दिसला (White-hooded Babbler). थोडं जवळ Beautiful Sibia आणि Long-tailed Sibias ह्यांचा एक छोटा थवा पण होता.
बरं, हि जी काय मी भराभर पक्षांची नावं सांगतोय ह्यात माझं ज्ञान शून्य! त्यासाठी आम्ही पूर्णपणे अविनाश, क्लारा आणि पलाश ह्यांच्यावर अवलंबून होतो. आणि हो, शिवप्रकाश जी सुद्धा (खरंतर birding चा त्यांचा अनुभव ३० पेक्षा जास्त वर्षांचा.. बाकी सर्वांपेक्षा जास्त).
पुढच्या २-३ दिवसात आम्ही बरेच वेळा "mixed hunting party" हे शब्द ऐकले. ह्याविषयी मी आधीही ऐकलं होत, पण इथे हे बरेच वेळा दिसलं. थोडक्यात सांगायचं तर भिन्न जातीचे काही पक्षी एकत्र शिकारीला निघतात, बरोबर असल्याने त्यांना कीटकांची शिकार करणे सोपे जाते (एकट्या पक्षापासून बचाव करणं थोडं सोपं पण एकदम सगळे आल्यावर कुठे जाणार कीटक). ह्या अशा थव्यालाच म्हणतात mixed hunting party (मराठीत आपण त्याला मिश्र शिकारी ताफा अस म्हणूया). आणि असाच एक ताफा आमच्या गाईड मंडळींना दरीच्या समोरच्या बाजूस दिसला होता. त्या ताफ्यात White-hooded Babblers, white-breasted parrotbills, some warblers, आणि yuhinas अशी बरीच मंडळी होती.
थोड्या अंतरावर एक लाल फुलं असणारं झाड दिसत होत, तिथं पक्षांची हालचाल जाणवत होती. रस्त्याच्या कडेकडेने तिथपर्यंत पोहोचता आलं असत असं लक्षात आलं म्हणून मी एकटाच पुढे निघालो, समोर हि पक्षी दिसत असल्याने बाकी कोणीही येण्याची घाई केली नाही. जवळ गेल्यावर दिसलं कि, एक Streaked Spiderhunter (माझा lifer) मस्तपैकी मध चाखत होता त्या फुलांमधला. त्याला अजिबात घाई नव्हती आणि आमच्यापासून लांब असल्याने तसा धोकाही नव्हता.
मग थोड्या थोड्या अंतरावर असे बरेच स्टॉप घेत आम्ही पुढे निघालो. पाऊस थांबलेला नव्हता, पण तरीही आमचा उत्साह काही कमी झाला नव्हता. जस जसे वर जात होतो, तशी हवाही थोडी थंड होऊ लागली होती आणि निसर्ग आपल्या रंगांची उधळण करायला लागला होता.
पुढच्या वेळी थांबलो तिथे Grey-headed Canary Flycatcher, Yellow-bellied Warblers, थोड्या Sibias (Beautiful & Long-tailed), आणि सुंदर रंगाचे Minivets होते. अचानक एक White-naped Yuhina आमच्या बऱ्यापैकी जवळ येऊन बसली, सगळे कॅमेरे लगेच त्या दिशेला वळले. तेवढ्यात एक थोडा मोठा पक्षी तिथे उडताना दिसला, हा होता सुंदर असा Great Barbet. हा मी सत्ताल मध्ये खूप जवळून पाहिलेला आहे त्यामुळे त्याचा लांबून फोटो काढण्यात मला काहीही रस नव्हता. पण तो झाडावर बसला तोच मुळी एका Streaked Spiderhunter च्या बाजूला. हि संधी कशी सोडायची. अगदी मेमरी कार्ड नसलं तरी इथे मिळत होते एका दगडात दोन पक्षी (म्हणजे फोटोत हो).
प्रत्येक थांब्यावर कुठलेतरी मिनिव्हेट्स (Scarlet, short-billed, long-tailed, किंवा Grey-chinned) नक्की दिसायचे. एका झाडावर मग आम्हाला Grey-chinned minivet चे नर आणि मादी दोघेही दिसले. ते जरी एका फोटोत मिळवता आले नाहीत तरी, सोयीसाठी मी त्यांना इथे एकत्र दाखवतो आहे.
असं करत करत, आधी तिवारी-गाव आलं. तो पर्यंत पावसाचा जोर परत वाढला होता आणि खरं सांगायचं तर भूक पण लागली होती. त्यात इथे असणारी एकुलती एक चहाची टपरी पण आज बंद होती, त्यामुळे गंतव्य स्थानी पोहोचेपर्यंत काहीही मिळणार नव्हतं
असं असलं तरी, प्रत्येक वेळेस पक्षी दिसले, कि परत आमचा उत्साह जागा होत होता. पुढच्या प्रवासात आम्ही Sibias, Golden-fronted leafbirds, Olive-backed Pipits, आणि Striated Bulbuls बघितले. मग दिसले ३ प्रकारचे Scimitar babblers (Coral-billed, Red-billed, आणि Spot-breasted Scimitar-Babbler). Scimitar म्हणजे एक प्रकारची एकधारी तलवार. ह्या पक्षांची चोच अशी तलवारीसारखी असते म्हणून त्यांना हे नाव पडलं आहे. पण हे फक्त दिसले, त्यातल्या Coral-billed एक अस्पष्ट फोटो मिळाला
दुपारी २ च्या सुमारास आम्ही एकदाचे Coffee House ला पोहोचलो. तिथली व्यवस्था बघणारे १-२ कर्मचारी आमची वाटच बघत होते, त्यांनी गरम जेवण तयार ठेवले होते (सूप, आमटी-भात आणि बटाट्याची भाजी). आम्हीही बॅगा वगैरे न घेता आधी जाऊन जेऊन घेतलं. इथे काहीही हवं असेल तर सर्वात जवळच शहर म्हणजे रोइंग, हे ५० किमी अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही येतांना बरोबर त्यांच्या साठी काही वाणसामान पण आणलं होतं (तसा त्यांचा आदल्या रात्री मेसेज आला होता पलाश ला). भूक लागलेली असताना आणि त्यातही अशा थंड हवेत, ते जेवण इतकं मस्त लागलं. जेवणानंतर एक मस्त गरम गरम कॉफी सुद्धा मिळाली (अगदी व्यवस्थित दूध आणि साखर घालून).
कॉफी हाऊस तसं वर वर बघता छान दिसत होतं, सगळी कडे मस्त डोंगर आणि एका बाजूला खोल दरी. इमारत खूप जुनाट दिसत होती अर्थातच. पण धुकं, ढग आणि पडणारा पाऊस वातावरण मस्त बनवत होता.
आमची जेवणाची जागा थोडी वर होती रस्त्यापासून (२ खोल्या तिथे होत्या) पण आम्ही राहणार असणारी इमारत अजून वर होती. निदान ५०-६० फूट तरी वर असावी. आपल्या इथे त्याच काही वाटत नाही पण इथे उंचावर प्राणवायूची कमतरता जाणवते. जेवण झाल्यावर जाणीव झाली कि आपली बॅग अजून वर न्यायची आहे. मी शक्यतो माझं सामान कोणाला उचलू देत नाही (जेवढं आपण उचलू शकू तेवढंच सामान बरोबर घ्यायचं) पण इथे मात्र कोणीतरी असतं मदतीला तर खूप बरं झालं असतं (पण इथे कोणीही नव्हतं .. हॉटेल चे कर्मचारी म्हणजे फक्त एक स्वयंपाकी आणि एक म्हातारे आजोबा). आता काहीच पर्याय नव्हता, शेवटी बॅग डोक्यावर घेतली आणि निघालो, पण सगळं अंतर एका दमात पार करणं केवळ अशक्य होतं .. २ वेळा थांबून मग पोहोचलो शेवटी आमच्या अंधाऱ्या, दमट खोलीत. तोपर्यंत नशिबाने अंधार झाला नव्हता म्हणा पण रात्री कसं असेल ह्याची कल्पना आली (शिवाय पाऊस होताच सोबतीला)
थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही परत birding साठी निघायचं ठरवलं. थोडं पुढे मायूदीआ खिंडी पाशी गेलो देखील, पण पाऊस आणि धुकं इतकं जास्त होत, कि बाहेर काही दिसणंही शक्य होत नव्हतं. मग नाईलाजास्तव तिथूनच परत फिरलो आम्ही.
हळू हळू काळोख पडू लागला आणि लक्षात आलं कि आता करायला काहीच नाहीये आपल्याला, मोबाइलला सिग्नल हि नाही. मग तिथेच बसून आम्ही पक्षी नोंदींचा आढावा घायचा ठरवलं (गेल्या २-३ दिवसात दिसलेल्या प्रजातींची नोंद), ते तसंही गेल्या २ दिवसात राहिलंच होतं. इथे मी आणलेल्या LED टॉर्च चा चांगला उपयोग ही झाला.
७/७:३० ला आमची रात्रीची जेवणं पार पडली आणि ८:३० पर्यंत जनरेटर सुद्धा बंद झाला (५:३० ते ८:३० ह्या वेळेत आमचं चार्जिंग करून झालं फोन आणि कॅमेऱ्या च). मग काय, दिली ताणून लगेचच. १०:३० च्या सुमारास अचानक पायात गोळे येऊ लागले (थंड हवेत मला हा त्रास होतो तसा) आणि हळू हळू पूर्ण डावा पाय त्रास देऊ लागला (पोटरी, मांडी, अगदी पायाची बोट सुद्धा वळायला लागली गोळे येऊन). थोडा वेळ काय करावं काही समजत नव्हता. पण हळू हळू त्रास कमी झाला आणि झोप लागली नीट गाढ.
कडक उन्हाचा एक दिवस
नेहमीप्रमाणे ४ चा गजर झाला पण आज उठल्यावर समोर पूर्ण काळोख होता. चाचपडत आधी टॉर्च शोधला आणि तयारीला लागलो. पाऊसाचा आवाज तरी येत नव्हता तेव्हा, मग बाहेर येऊन बघितलं तर आकाश निरभ्र होतं आज. चला, म्हणजे सकाळ तरी चांगली असेल आज. रस्त्यात जातांना आज बर्फाच्छादित डोंगर अगदी मस्त दिसत होते, आणि ढग चक्क आमच्या पेक्षा खालच्या उंचीवर दिसत होते तिथे.
सकाळचं पाहिलं लक्ष्य होतं Blyth’s Tragopan. मायूदीआ खिंडी च्या थोडं पुढे गेल्यावर आम्ही थांबलो. पलाश च्या माहितीप्रमाणे, तिथेच जवळपास हा पक्षी रोज सकाळी दरीतुन येऊन रस्ता क्रॉस करतो आणि वरच्या डोंगराकडे जातो. गाडीतून उतरून आम्ही मग रस्त्यावरच बसकण मारली. पलाश पुढे जाऊन पक्षी दिसतोय का त्यावर लक्ष ठेवत होता. Tragopan चा आवाज तर सतत येत होता पण बराच वेळ झाला तो वर येण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. शेवटी कंटाळून आम्ही गाडयांना पुढे यायला सांगितलं. पण तेवढ्यात दरीत काहीशी हालचाल जाणवला आणि पलाश ला Tragopan दिसला. लगेच सगळे परत उत्साहात आलो, पण ह्या वेळी सगळेच दरीच्या दिशेने (आणि आशेने) बघत होतो. आणि आम्हा बहुतेकांना त्याने दर्शन दिलं . इतकं मस्त वाटलं बघायला पण दुर्दैवाने मी माझा कॅमेरा २ मिनिटांपूर्वी पलाश कडे दिला होता!!
Tragopan दिसल्याचा आनंदात मग आम्ही हनली गावाकडे पुढे निघालो (मायूदीआ च्या एका बाजूला रोइंग आणि दुसऱ्या बाजूला हे हनली गाव). थोडासच पुढे green-tailed sunbird आणि Streak-throated Fulvetta ह्याचंही दर्शन झालं.
थोडं पुढे गेल्यावर आम्ही ६५ किलो नावाच्या भागात आलो. हे असं नाव पडण्याचं कारण म्हणजे हे गाव रोइंग पासून ६५ किमी अंतरावर आहे. इथे येईपर्यंत ७:३० वाजले होते आणि आमचा न्याहारीसाठीचा थांबा इथेच होता.
इथे एक छोटासा ढाबा आहे रस्त्याच्या कडेला. ३-४ बायका काम करत होत्या तिथे. त्यांनी अगदी व्यवस्थित ठेवली होती ती जागा. स्वच्छ आणि आटोपशीर. बर्याचश्या पक्षी-निरीक्षकांसाठी आणि ट्रक ड्राइवर साठी हे अगदी ठरलेलं ठिकाण होतं नाश्ता आणि जेवणासाठी. तिथे मॅग्गी नूडल्स आणि ऑम्लेट असा चविष्ट ब्रेकफास्ट झाला आमचा. पण हो, त्यापूर्वीच आम्हाला त्या धाब्याच्या छोट्याश्या खिडकीतून खाली एक lifer सुद्धा दिसला होता. अगदी दरीच्या टोकावर असलेल्या ह्या ढाब्यातून उरलेले अन्न बहुतेक खाली टाकत असावेत, तिथे पक्षी नियमितपणे ये-जा करतात असं जाणकारांकडून कळलं. मग आम्ही तिथेच थोडं पक्षी-निरीक्षण करायचं ठरवलं.
खिडकीतून दिसलेला पक्षी होता White-collared Blackbird. पण त्याच्या शिवाय आम्हाला थोड्याच वेळात तिथे Eurasian Jay, २-३ Black-faced Laughingthrushes, आणि Olive-backed pipits सुद्धा दिसले. थोड्या वेळात एक Eurasian Wren सुद्धा आली तिथेच. असं सगळं पक्षी-वैभव असल्यामुळे आम्ही तिथे बराच वेळ घालवला.
तिथून मग परत आम्ही हनली च्या दिशेने कूच केलं. समोर दिसणाऱ्या डोंगर रांगा इतक्या सुंदर होत्या कि आम्हाला तिथे थांबून १-२ वेळा फोटो काढणं अगदी भागंच होत. इथे दुसरा फोटो बघाल, तर नागमोडी वळणांचा रस्ता किती मस्त दिसतोय, आम्ही तिथूनच खाली जाणार होतो आज (आता सांगायला चांगलं वाटतंय पण त्यावेळी मात्र मला थोडं टेन्शन होतं गाडी लागण्याचं)
आज खूप साऱ्या Sibia दिसत होता सगळीकडे (कॉमन असाव्यात इथे बहुतेक). मग एक White-tailed Nuthatch दिसला. हे Nuthatch पक्षी सहसा झाडांच्या बुंध्यावर असतात पण हा मात्र अगदी मोकळ्या फांदीवर बसला होता. आत्तापर्यंत माझी तक्रार होती कि इथे प्रकाश खूप कमी पडतोय फोटोसाठी आणि आज अचानक खूपच जास्त प्रकाश आहे असं म्हणायची वेळ आली होती.
पुढे गाडीतून जात असताना अचानक अविनाश ला काहीतरी दिसलं. लगेच खाली उतरून आम्ही त्या दिशेने पाहायला सुरुवात केली. जरा काही हालचाल दिसली, कि अंदाजाने काढा फोटो असं करत होतो आधी, पण नंतर ती Black-throated Prinia बऱ्यापैकी बाहेर दिसली. जवळच एक Yellow-throated Fulvetta सुद्धा होता तिथे.
मजल दरमजल करत आम्ही आता बरेच पुढे आलो होतो (मायूदीआ पासून) त्यामुळे तिथे आम्ही परत फिरायचं ठरवलं. येताना रस्त्यात मग White-naped yuhina, Orange-bellied leafbird, Yellow-cheeked tit, Fire-breasted Flowerpecker हि सगळी मंडळी दिसली.
आता पर्यंत खूप फिरलो होतो त्यामुळे दुपारचे जेवण अगदी सावकाश केलं (खरंतर थोडी वामकुक्षी झाली असती तर अजून बरं झालं असतं 😜). निवांत निघालो आणि लगेचच दोन प्रकारचे Sunbirds अगदी छान समोर आले. जणूकाही त्यांचं फोटो session होतं तिथे असे मस्त बसून होते.
परत कॉफी हाऊस कडे येतांना आधी दिसलेल्यांपैकी काही पक्षी पुन्हा दिसले पण काही वेगळे देखील होतेच. त्यात जास्त लक्षात राहिलेले दोन म्हणजे Rufous-gorgeted Flycatcher आणि Rufous-vented Yuhina. आणि हो, एक Ashy-throated Warbler सुद्धा होता तिथे.
मायूदीआ खिंडी पाशी येई पर्यंत ४ वाजत आले होते. दिवस संपत आला होता पण तरीही तिथे आम्हाला पक्षांची हालचाल/ आवाज जाणवत होते. नेहमीप्रमाणे Dark-rumped Rosefinch होतेच. मग दिसला तो सुंदर असा Ludlow’s Fulvetta. इतके छोट्या आकाराचे पक्षी पण त्यांचे रंग इतके मोहक असतात कि काही विचारू नका. काही काही पक्षांवर तर निसर्गाने त्याचे रंग अगदी मुक्त पणे उधळलेले दिसतात. हा Fulvetta दिसेनासा होईतो मग एक Chestnut-tailed Minla आमच्यासमोर आला. जणू काही निसर्गाच्या रंगमंचावर येणारे एक एक कलाकारच. मग आला दुर्मिळ असा Bar-winged Wren-babbler, तो मात्र काहीसा नाराज असल्यासारखा थोडा फांदी/पानांच्या आडच दडून बसला होता.
कॉफी हाऊस ला येईपर्यंत ५:३० वाजले आम्हाला, अगदी छान गरमा-गरम चहाची वेळ. ह्या फोटोत आम्ही राहत असलेल्या वरच्या बाजूची इमारत सुद्धा दिसते आहे.
आता परत एकदा आम्ही अंधाराच्या राज्यात शिरलो होतो. पण आमच्या डॉक्टर मित्रांनी त्यांचे वाककौशल्य पणाला लावून, २ तास जास्तीची वीज मिळवली होती (काही पैसे अधिक देऊन, आम्हाला १ तास रात्री आणि १ तास पहाटे निघण्यापूर्वी, अशी जादा इलेक्ट्रिसिटी ची तजवीज झाली होती).
आज पाऊस नसल्याने आम्ही काळोखात घुबड शोधासाठी बाहेर पडायचं ठरवलं. परत एकदा भरपूर फिरलो पण तरीही निराशाच पदरी पडली आमच्या. एकंदरीत घुबडांच्या बाबतीत आमचं नशीब काळोखं होत तिथे. परत येतांना अचानक एका ड्राइवर ला altitude sickness चा त्रास झाला. मग त्याला विश्रांती देऊन अविनाश ने पुढे गाडी चालवली (असा अष्टपैलू तज्ञ बरोबर असला कि कुठलाही प्रॉब्लेम येत नाही प्रवासात) .
पुन्हा एकदा रोइंग
आज आम्ही डोंगर उतरून परत रोइंग ला जाणार होतो. पण त्याआधी, आम्ही परत एकदा ६५ किलो च्या दिशेने जायचं ठरवलं. ट्रॅगोपन साठी परत एकदा प्रयत्न करून पाहणार होतो तिथे.
आज परत एकदा पावसाळी दिवस होता आणि त्यातच ट्रॅगोपन ने पूर्ण निराशा केली. दिसणं तर दूर, आज साधा आवाज देखील आला नाही त्याचा. अर्थात हीच तर पक्षी बघण्यातली मजा आहे, कधी नशीब जोरावर तर कधी नाही. जर सगळ्यांनाच सगळं दिसलं असतं तर काय गम्मत.
पुढे परत एक मिश्र शिकारी ताफा समोर आला आमच्या. पाऊस पडत होता आणि ह्या वेळेस पक्षी थोडे लांब होते पण तरीही Rufous-winged Fulvetta, Black-eared shrike-babbler, असे काही कलाकार आम्हाला ओळखता आले. थोड्या वेळाने एक Green-tailed Sunbird दिसला (हा बहुतेकदा एकटाच दिसला).
७:१५ ला परत एकदा आम्ही कालच्या ढाब्याजवळ येऊन पोहोचलो. मग पटकन ब्रेकफास्ट करून घेतला आणि तिथेच जवळपास पक्षी बघण्यास सुरुवात केली. असं लक्षात आलं, कि हि जागा आपली निराशा करत नाही. काहीतरी वेगळं दिसतच. आज आम्हाला Maroon-backed & Rufous-breasted Accentors दिसले. शिवाय बाकीचे नेहमीचे कलाकार होतेच (Blackbird, Laughingthrushes, Pipit, वगैरे.).
आज पाऊस जवळ-जवळ सतत पडत होता अन तरीही थोडी पक्षांची हालचाल होती दिवसभर. आज आम्ही ६५ किलो च्या जास्त पुढे गेलो नाही. परत येतांना मायूदीआ खिंडीपाशी असलेल्या देवळात आम्हाला अचानक मराठीत भजन ऐकू आलं. कुतूहलाने थोडं थांबलो (तसंही ह्या खिंडीपाशी एक ग्रुप फोटो घ्यायचा राहिलाच होता आमचा) आणि विचारणा केली तर कळलं कि जवळच असलेल्या आर्मी कॅम्प मध्ये मराठा infantry चे काही सैनिक होते. मग थोडा वेळ त्यांच्या बरोबर गप्पा झाल्या तिथे. जवानांनाही थोडं वेगळं वाटलं फक्त पक्षी बघायला आलेला ग्रुप बघून. मग त्यांना क्लारा ने तिथे १-२ पक्षी दाखवले सुद्धा.
मग तिथे आमचा ग्रुप फोटो झाला. नेहमीप्रमाणे Dark-rumped Rosefinch ची जोडी जवळपास होतीच
परत एकदा आम्ही पुढे निघालो. आता समोर Ashy-throated Warbler व Yellow-browed tit आले होते. नेहमीप्रमाणे ते एका मिश्र शिकारी ताफ्याचाच भाग होते. थोडं पुढे, चांगल्या मूड मध्ये असलेला Golden-breasted Fulvetta समोर आला (म्हणजे लगेच झाडीत न शिरता, बऱ्यापैकी पोझेस दिल्या त्याने). त्या मागोमाग आले Black-faced warbler आणि Whiskered Yuhina.
पुढे जाताना, रस्त्याच्या कडेलाच एक Dark-breasted Rosefinch दिसला. हा असा रस्त्यात होता कि जास्त पुढे गेलो असतो तर उडून गेला असता पण तिथेच थांबलो त्यामुळे मागच्या गाड्यांना नीट बघता आलं नाही. त्यानंतर कॉफी हाऊस ला परतेपर्यंत एक Streak-throated Barwing तेवढा दिसला.
इथून निघताना जेवण करूनच निघावं लागणार होतं कारण मध्ये रस्त्यात साधा चहा सुद्धा मिळाला नसता. मग दीड-दोन च्या सुमारास आम्ही कॉफी हाऊस चा निरोप घेतला. अजून साधारण २ तास प्रकाश असणार होता त्यामुळे वाटेत काहीतरी दिसेल अशी अशा होतीच.
पण ह्या खेपेस परत एकदा निराशाच आली पदरी, फार काही दिसलंच नाही. एक-दोनदा मिश्र शिकारी ताफे दिसले तसे पण ह्यावेळेस ते पक्षी अजिबात बाहेर येत नव्हते. अगदीच काही मिळालं नाही असं नाही म्हणा. सुरुवातीला Black-eared Shrike-babblers आणि White-tailed Nuthatch (पुन्हा एकदा) दिसले. आज आम्ही Red-headed trogon साठी एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. थोड्याच वेळात त्याचा आवाज ऐकू आला, आणि आमच्या आशा परत एकदा पल्लवित झाल्या. तिथेच थांबून थोडा वेळ वाट बघायचं ठरवलं. अगदी थोड्या वेळा करता का होईना, शेवटी ट्रोगॉन ओझरता दिसला आम्हाला.
आज रोइंग ला परतायच्या आधी परत एकदा घुबड आणि Frogmouth ह्यांचा शोध घेतला पण परत एकदा नन्नाचाच पाढा!
दिवस ७: राम राम अरुणाचल ..
आज सकाळी खरंतर आम्ही रोइंग मधल्या गवताळ भागाला भेट देणार होतो, पण सकाळीच अचानक अविनाश ने प्लॅन बदलला आणि आम्ही परत एकदा तिवारी-गाव रस्त्यावर (घाटातून) निघालो. आमच्या डॉक्टर मित्रांनी मात्र हॉटेल मधेच थांबून आराम करायचं ठरवलं (सकाळ च्या सेशन नंतर आम्ही परत हॉटेल वर येणारच होतो checkout साठी.
२-३ वेळा ह्याच रस्त्यावर ये-जा केल्यामुळे आम्हाला हा रस्ता आता माहितीचा झाला होता. परत एकदा नेहमीच्या ठिकाणीच थांबलो. लगेचच White-breasted Parrotbills व Red-billed Scimitar Babbler दिसले. मिनिव्हेट सुद्धा खूप होतेआज. थोडं पुढे एक जरा मोठा पक्षी उडताना दिसला, नक्कीच शिकारी पक्षी होता तो. मग जरा पुढे जाऊन बघितल्यावर हिमालयन बझर्ड पक्षाची जोडीच दिसली. एक Streaked Spiderhunter सुद्धा होता जवळच.
यात्री निवास ला साधारण ११ च्या सुमारास परत आलो, बॅगा तर भरलेल्याच होत्या त्यामुळे पटकन निघालो तिथून.
रोइंग मधला गवताळ भाग हा आमच्या तिनसुकिया च्या वाटेवरच होता त्यामुळे थोडा वेळ तरी तिथे जाऊन येऊ असं ठरलं. तसंही जेवणासाठी आम्ही आसाम मध्ये जाऊन थांबणार होतो आणि त्याला थोडा वेळ होता अजून. आणि बरं झालं तिथे गेलो ते. अगदी थोडाच वेळ गेलो खरंतर पण तिथे Jerdon’s babbler हा दुर्मिळ पक्षी दिसला. तिथे फुलपाखरं सुद्धा होती जवळपास, पण मेमरी कार्ड अभावी मी जास्त लक्ष तिथे देऊ शकलो नाही. नाही म्हणायला एक Common Map नावाचं फुलपाखरू तेवढं टिपलं मी.
ह्या वेळेस भूपेन हजारिका पूल ओलांडताना आमच्या गाइडचं दोन्ही बाजूला बारीक लक्ष होतं (अविनाश च्या अपेक्षेप्रमाणे इथे १-२ पक्षी दिसणार होते). त्या मोठ्या पुलावर आम्ही दोनदा थांबलो मग. एकदा Lesser Adjutant Stork साठी आणि नंतर Black stork साठी (हा माझा लाइफर होता)
जेवायला आम्ही आसाम मधल्या एका रेस्टॉरंट मध्ये थांबलो. अगदी highway वरच होत ते आणि अगदी नीटनेटकं होत, साधंच असलं तरी जेवण देखील चांगलं होतं
संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही तिनसुकिया शहराच्या जवळ पोहोचलो. वाटेत आमच्या ड्राइवर नि २००९ साली झालेल्या तेल-खाणीच्या आगीची जागा दाखवली (आणि त्यात त्याचं घर पूर्ण जमीनदोस्त झालं .. तेही अवशेष दाखवले त्याने). काळोख होत आलेला होता त्यामुळे मग आधी घुबड शोध आणि मग हॉटेल checkin असं ठरलं. आज मात्र आमचं नशीब जरा बर होतं. पाऊस होताच थोडा थोडा पण लवकरच आम्हाला एकदम ४-५ Brown Hawk Owls दिसली. मग थोड्या वेळाने Oriental scops owl ने पण दर्शन दिलं. राहता राहिलं Collared Scops Owl. ते फक्त दिसलं, फोटो नाही मिळाले. बरेच फिरलो त्याच्या मागे, लांब गावापर्यंत गेलो अगदी पण तेवढ्यात पावसाचा जोर वाढला आणि आम्हाला परत फिरावं लागलं.
तिथून आमचं हॉटेल फार लांब नव्हतं पण त्यातहि आमच्या ड्राइवर नि रस्ता चुकवला आणि १० मिनिटे जास्त लागली आमच्या गाडीला पोहोचायला. पण इथलं हॉटेल म्हणजे एक (सुखद) धक्काच होता आम्हाला. आत्ता पर्यंत यथा-तथा ठिकाणी राहून आल्यावर हे ३-४ स्टार हॉटेल म्हणजे फारच चांगलं होतं. बऱ्याच दिवसांनी मग शॉवर च्या गरम पाण्यात अंघोळ झाली. इथे दिवस संपतांनाची birding list करायला सगळे आनंदाने तयार झाले (बसायला जागा छान होती आणि शिवाय जेवण हि अगदी मस्त झाले होते).
शेवटचा दिवस
छान विश्रांती घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे ५ वाजता उठून birding साठी बाहेर पडलो. आज आम्ही मागुरी बील भागातल्या गवताळ प्रदेशात जाणार होतो. पलाश ने त्यासाठी एक बेट निवडलं होत (दिब्रू सैकोवा राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ). आम्ही किनाऱ्याला पोहोचेपर्यंत २ छोट्या होड्या आम्हाला बेटावर घेऊन जायला सज्ज होत्या.
ह्या बेटावर आम्ही मग उंच गवतातून चालत निघालो. मधून पक्षांचे आवाज आले कि थांबून अंदाज घेत होतो. थोडीशी मोकळी जागा दिसली तर तिथे देखील थांबत होतो. खूप चाललो तिथे आम्ही पण बहुतेक सगळा भाग सपाट होता त्यामुळे जास्त कष्ट करावे लागले नाहीत. अगदीच नाही असं नाही, कारण पावसाची रीप-रीप कमीजास्त प्रमाणात चालूच होती, आणि इथे मधे कुठे आडोश्याला थांबणंही शक्य नव्हतं.
आज आमचं मुख्य लक्ष्य होतं Spotted Bush Warbler, Marsh Babbler, and the Swamp Prinia. त्यांच्या करता आम्ही भरपूर वेळ दिला आणि नशिबाने तीनही पक्षी दिसले आम्हाला. बोनस म्हणून Lesser Coucal सुद्धा दिसला.
होडीवाल्यांना आम्ही ८ वाजता बोलावलं होतं पण प्रत्यक्षात मात्र ९ नंतर परत फिरलो आम्ही. अजून थोडं पक्षी निरीक्षण बाकी होत आमचं, ह्या बाजूच्या किनाऱ्यावर असलेल्या भागात मग आम्ही थोडा वेळ घालवला (योगायोग म्हणजे, पहिल्या दिवशी आम्ही पक्षी निरीक्षणाची सुरुवात इथूनच केली होती). परत एकदा आम्हाला Striated Grassbird आणि Grey backed Shrike दिसले. ह्या वेळेस Striated Babbler सुद्धा छान समोर येऊन बसला. निघता-निघता मग Swamp Francolin आमच्या समोरून उडून जवळच्या शेतात घुसली (पण नंतर अजिबात बाहेर फिरकली नाही, त्यामुळे फोटो नाही मिळाले)
आमची अजून थोडा वेळ थांबण्याची इच्छा होती पण मग जोरात पाऊस सुरु झाला आणि आम्ही नाईलाजाने परतायचा निर्णय घेतला. पटकन बॅग्स भरल्या, १-२ ग्रुप फोटोस काढले आणि परतीच्या प्रवासास सुरुवात केली. परत एकदा आम्ही दिल्ली मार्गच जाणार होतो. ह्या प्रवासात तसं विशेष काहीच घडलं नाही पण दिब्रुगड ते दिल्ली ह्या प्रवासात विमानातून एक सुंदर दृश्य बघायला मिळालं. काही बर्फाच्छादित शिखरे, ढगांच्या वर डोकं काढत होती.. इतके उंच कि अगदी ३५००० फुटापेक्षा जास्त उंच उडणाऱ्या विनामातून सुद्धा दिसत होती.
टिप - ह्या वेळच्या ब्लॉग मधले काही फोटोस हे मी बरोबरच्या साथीदारांकडून घेतलेले आहेत. अर्थात पक्षांचे फोटो माझेच आहेत, पण ग्रुप फोटोस हे इतरांकडून घेतलेले आहेत.