ताडोबा मधले वाघोबा
- With Escape to Explore
- ८ ते ११ जून, २०२३

थोडं ह्या सहली विषयी
ताडोबात वाघ दिसतातच असं मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं पण गेली ४-५ वर्ष वेगवेगळ्या जंगालांमध्ये फिरूनही मी अजून तिथे गेलोच नव्हतो. नाही म्हणायला एकदा तिथल्या दूरच्या बफर क्षेत्रात वाघाची पिल्लं बघायला म्हणून गेलो होतो (मदनापूर ला) पण मुख्य भाग (मोहर्ली, कोलारा, वगैरे) बघितले नव्हते.
मग निखिल ने मला त्याच्या ताडोबा ट्रिप बाबत सांगितलं, तेव्हा मी फारच उत्सुक होतो, दीपा सुद्धा लगेचच तयार झाली. नुसतं तेवढंच नाही तर तिने आरतीला (तिची बहीण) विचारलं तर आरती आणि शिरीष पण लगेच तयार झाले. म्हणजे एका जिप्सी ची मंडळी जमली सुद्धा. थोड्याच दिवसात निखिल ने दुसऱ्या जिप्सी ची ही जमवाजमव केली..
लगेचच आम्ही रेल्वे चं बुकिंग, सफारी ची परमिट्स वगैरे तयारी सुरु केली. तेव्हा फेब्रुवारी चालू होता आणि आम्ही जून मध्ये जाणार असल्याने, ते सगळं तसं विनासायास झालं.
म्हणजे आता आम्ही ताडोबाला जाणार हे नक्की झालं. वर लिहिलेल्या उक्ती प्रमाणे माझ्या अपेक्षा फारच उंचावलेल्या होत्या (म्हणजे वाघांचे चांगले फोटो मिळण्याच्या).
पण त्याच झालं असं कि, ह्या ट्रिप च्या थोडंसं आधी मी नागझिरा आणि रणथंबोर येथे ६-६ सफारी केल्या आणि दोन्हीकडे मिळून फक्त एका वाघाचे आणि एका बिबळ्याचेच फोटो मिळाले, बाकी सगळा नन्नाचाच पाढा होता. बहुतेक सगळीकडे अवकाळी पावसामुळे घोळ झाला होता. एकतर तापमान नेहमीपेक्षा खाली आलं होतं (मागच्या वेळेस रणथंबोर ला ४८-४९ होत ते ह्या वेळेला जास्तीच जास्त ३५-३६) आणि पावसामुळे जंगलात बऱ्याच ठिकाणी पाणी होतं वाघांना. परिणामी, माझ्या अपेक्षा "ह्या वेळेस निदान वाघ दिसू देत" एवढ्या खाली आल्या होता.
ते झालं अपेक्षेचं, आता प्रवासाला निघण्याची वेळ आली तर रिक्षाच मिळेना स्टेशन वर जायला. घरून आधी उबर ऑटो चा प्रयत्न केला पण अर्धा तास थांबूनही पदरी निराशाच आली. मग खाली उतरून येणाऱ्या - जाणाऱ्या रिक्षांना विचारायचं ठरवलं, तर तेही कोणी तयार होईनात. चालत जायचं म्हटलं तर तेही सोयीस्कर नव्हतं. शेवटी एकदाचा एक रिक्षा वाला झाला तयार. मग तिथून तीन हात नाक्याचा ट्रॅफिक, तो संपल्यावर स्टेशन जवळचा गोंधळ. नाही म्हणायला प्लॅटफॉर्म नंबर एक चा सरकता जिना तेवढा व्यवस्थित चालू होता. ब्रिज वर थोडी गर्दी होती, पण खाली उतरायला तर तुफान गर्दी होती. जणूकाही सगळ्या माणसांना आजच प्लॅटफॉर्म नंबर ४-५ वर यायचं होत. शेवटी बॅग घेऊन कसे बसे शिरलो दोघेही त्या गर्दीत, आणि पोहोचलो खालपर्यंत एकदाचे (पोहोचलो कसले, त्या गर्दीनेच ढकललं खालपर्यंत). जेमतेम गाडीच्या वेळेआधी पोहोचलो आम्ही (तशी गाडी पण ५ मिनिटं उशिरानेच धावत होती म्हणा).

मोहर्ली गावातून सुरुवात
आमची गाडी (विदर्भ एक्सप्रेस) ९ च्या सुमारास (वेळेत) नागपूर ला पोहोचली. आमचा एक मित्र दुरांतो एक्सप्रेस ने आधीच येऊन तिथे थांबला होता, आणि बाकीचे आम्ही ८ जण एकाच डब्यात होतो. गाडीतल्या गप्पांमध्ये निखिल ने आम्हाला हि कल्पना दिली होती कि आपल्या पहिल्या ३ सफारी ह्या मोहर्ली च्या मुख्य भागातून असणार होत्या तर उरलेल्या ३ ह्या बफर झोन मधल्या. 0
पुढे जाण्याआधी थोडं कोअर आणि बफर झोन विषयी - कुठल्याही जंगलाचा मुख्य भाग असतो तो कोअर. इथे कुठली गावे असू शकत नाहीत किंवा कुठलेही उद्योग धंदे असू शकत नाहीत. ह्या कोअर झोन च्या आजूबाजूला असतो तो बफर झोन. इथे नियम थोडे शिथिल असतात (बरेचदा जंगल तेवढं घनदाट नसतं). इथे मनुष्यवस्ती असू शकते, काही प्रमाणात त्यांचे उद्योग धंदे असू शकतात (पण इंडस्ट्री वगैरे नाही). आणि कोअर जंगलातला फक्त २०% भागच आपल्यासाठी असतो, बाकीचे जंगल पूर्णपणे राखीव असते (वन्य प्राणी आणि वन खाते ह्यांच्यासाठी)
बरेचदा कोअर झोन मध्ये वाघ दिसायची शक्यता जास्त असते, पण ताडोबातले बफर झोन सुद्धा तेवढेच चांगले असल्याचं कळलं निखिल कडून. ते जाऊदे म्हणा, बफर काय किंवा कोअर काय, आम्हाला आपलं वाघ दिसण्याशी मतलब.
आमच्या गाड्या नागपूर स्टेशन बाहेर उभ्याच होत्या. मग लगेचच आधी न्याहारी उरकली (नागपूर शहरातच) आणि पुढे निघालो. मोहर्ली गावात पोहोचायला साधारण १ वाजला. आमचा होमस्टे सफारी गेट च्या अगदी जवळच होता. शहनाझ बेग आणि सुलेमान भाई आमच्या स्वागतासाठी तिथे सज्ज होते. शहनाझ ह्या तिथल्या गाईड सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला गाईड पैकी त्या एक आहेत असंही कळलं. दीड वाजता जेवायला यायचं असं ठरवून मग आम्ही खोलीचा ताबा घेतला. १:३० वाजता जेवण आणि मग ३ वाजता सफारी साठी निघायचं असा प्लॅन झाला. आमच्या खोल्या पहिल्या मजल्यावर होत्या आणि जेवणाची व्यवस्था तळमजल्यावर त्यांच्या घरातंच होती. रूम मध्ये AC, तसेच गरम पाण्याचीही सोय होती.
बरोब्बर ३:३० वाजता आम्ही मोहर्ली गेट मधून जंगलात प्रवेश केला. इथल्या कोअर झोन चे एक वेगळेपण म्हणजे, मोहर्ली, खुटवांडा, कोलारा हि कोअर झोन ची वेगवेगळी गेट असली तरीही आतून ती सर्व जोडलेली आहेत, म्हणजे ह्यातल्या कुठल्याही गेट ने येणारी जिप्सी कुठेही जाऊ शकते. त्यामुळे होतं काय, कि ज्या वाघांच्या ठरलेल्या जागा असतात, तिथे सर्व गेट वरील वाहने लगेचच पोहोचतात. आणि आधीच्या १-२ दिवसातल्या वाघांच्या हालचालींवरून गाईड आणि ड्राइवर ह्यांचे काही अंदाज असतात, त्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असते जिप्सी गाड्यांची.
आमच्या गाईड नेहि गाडी लगेचच तेलिया तलावाकडे वळवली. ते मोहर्ली गेट च्या अगदी जवळ आहे आणि गेल्या काही दिवसात तिथे सोनम नावाच्या वाघिणीचा नियमित वावर होता. शिवाय बाकीच्या गेट मधून येणाऱ्या गाड्यांना तिथे पोहोचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे आम्ही आधीच तिथे गेलो. साधारण १० मिनिटे तिथे थांबून अंदाज घेतला पण आज तिथे काहीच हालचाल जाणवत नव्हती, त्यामुळे मग पुढे निघालो तिथून.
तिथून निघून मग आम्ही बरंच जंगल फिरलो. मधे मधे भेटणाऱ्या जिप्सी ड्रायव्हर्स ना विचारत-विचारत ... पण वाघ कोणालाच दिसला नव्हता बहुतेक. अर्थात वाघ नाही तरी इतर प्राणी म्हणजे रानगवा, जंगली डुक्करं, सांबर आणि चितळ अशी हरणं हे सगळं बघून झालं. पक्षी सुद्धा होते बऱ्यापैकी (२ प्रकारचे कोतवाल पक्षी, हळद्या, नवरंग, पावश्या, साळुंक्या, आणि इतर अशी बऱ्यापैकी रेलचेल होती).
असं पुढे जात असतांना एका पाणवठ्याच्या ठिकाणी अचानक खूप सगळ्या गाड्या दिसल्या (एवढ्या गाड्या म्हणजे नक्कीच काहीतरी दिसलं असणार). तेथे विचारणा केल्यावर कळलं आम्हाला थोडासा उशीर झाला होता 😩. नुकताच एक बिबट्या तिथे पाणी पिऊन गेला होता. आणि तोही काळा बिबट्या (म्हणजे अगदी काबिनी मध्ये दिसतो तसा नाही, पण नेहमीच्या पेक्षा खूप गडद रंग आहेत त्याचे). बहुतेक एखाद्या जिप्सी लाच दिसला होता तो, बाकी सगळे जण त्याच्या परत पाण्यावर येण्याची वाट बघत होते तिथे (त्यात आमची दुसरी जिप्सी सुद्धा होती)
पण तो काही परत आला नाही. नाही म्हणायला त्याने दर्शन दिलं आम्हाला पण तेही दाट झाडीतून. त्यामुळे फोटो वगैरे काढणं शक्य नव्हतं, निदान बघायला मिळाला एवढंच. झाडीतून तो चालत असल्यामुळे त्याच्या चालण्याच्या दिशेप्रमाणे सगळ्या गाड्यांची धावपळ सुरू झाली लगेच, पण त्याने सगळ्यांना गुंगारा दिला आणि तो जंगलात दिसेनासा झाला.
इथे फिरताना आम्हाला खूप ठिकाणी पाणी दिसत होतं (म्हणजे छोटे पाणवठे, लहान-मोठी तळी वगैरे). ताडोबा तलाव हा त्यापैकी एक. चांगला मोठा वाटला त्याचा विस्तार. तिथे बरेचसे प्राणी आपली तहान भागवण्यासाठी आलेले होते. तळ्याच्या काठावर मग आम्हाला एक मोट्ठी मगर पण दिसली. पाण्याबाहेर येऊन पहुडली होती. मग गाईड ने सांगितलं कि तिची अंडी आहेत किनाऱ्यावर, त्यामुळे लक्ष ठेवण्यासाठी येते ती बाहेर.



आम्ही त्या मगरीचे फोटो काढत होतो तेवढ्यात शहनाझ जी समोरून येत होत्या (दुसऱ्या कुठल्यातरी जिप्सी च्या गाईड म्हणून). त्यांच्या मते आम्ही इथे थांबण्यापेक्षा लगेच तेलिया तलावाकडे जावं असं होतं कारण ह्या वेळेस तिथे सोनम दिसेल अशी त्यांना जवळ जवळ खात्रीच होती.
एवढ्या विश्वासाने सांगत आहेत म्हंटल्यावर आम्ही लगेचच निघालो. आम्ही तलावाच्या इथे पोहोचलो तर दूरवर काही गाड्या उभ्याच होत्या. अचानक समोर एक छान चितळ दिसलं, मग थोडा वेळ त्याचे फोटो काढण्यात गेला. पण मला असं जाणवलं कि उभ्या असणाऱ्या जिप्सीतले लोक काहीतरी फोटो काढत होते, मग लगेचच आम्ही तिथे गेलो. सोनम बाईंनी तोपर्यंत पाण्यातून बाहेर पडून चालायला सुरुवात केलेली होती (म्हणजे परत एकदा थोडा उशीरच झाला आम्हाला). ती वाघीण लांब होती पण अगदी मस्त रुबाबात चालत होती पाण्याच्या दुसऱ्या बाजूला. ती जशी चालत होती तश्या सगळ्या गाड्या समांतर रेषेत पुढे जात होत्या, एवढ्या लांबून तसे चांगले फोटो नव्हते मिळत, पण जंगलात प्रत्यक्ष वाघ बघण्यातली मजा हि वेगळीच.
तेवढ्यात मग आमच्या गाईड ने थोडं डोकं चालवलं. तिथे थांबण्यापेक्षा त्याने गाडी पुढे नेऊन बाहेरच्या डांबरी रस्त्याच्या इथे घेतली गाडी. त्यांच्या मते वाघीण जवळूनच रस्ता ओलांडण्याची खूप शक्यता होती. थोड्याच वेळात आमच्या आजूबाजूला इतर गाड्या पण जमा झाल्याच. पण गाईडचा अंदाज बरोबर होता, सोनम जंगलातून हळू हळू बाहेर येतांना दिसली आणि सगळ्यांचा उत्साह एकदम वाढला. तिने येऊन, एक नजर जमलेल्या गाड्यांवर टाकली, मग मधून जायचा रस्ता ठरवला आणि शांतपणे चालत रस्ता ओलांडून गेली सुद्धा. प्रकाश तसा कमीच होता तेव्हा पण सगळ्यांना जवळून दर्शन झालं वाघिणीचं. शिरीष च्या मते त्यांची सफारी सफल झाली. पहिल्याच सफारीत बिबळ्या आणि वाघ दोन्ही दिसले.



मोगली आणि रुद्र झिंदाबाद!
आजच्या आमच्या दोनही सफारी परत एकदा मोहर्ली गेट मधूनच असणार होत्या. निखिल च्या सूचनेप्रमाणे सगळे जण ५:१५ वाजता तयार होतो निघायला. सकाळी ५ ला मस्त आल्याचा चहा हि झाला होताच. आमच्या होमस्टे मध्ये चहा आणि जेवण दोनही एकदम छान होतं. एकतर घरगुती पदार्थ असल्याने पोटा साठी चांगले आणि चविष्ट म्हणजे जिभेसाठी सुद्धा मस्त.
निखिल च्या जिप्सी साठी शहनाझ जी स्वतःच गाईड होत्या तर आमच्या गाडीला एक अनुभवी गाईड होते आज. त्यांनी लगेचच व्यवस्थित माहिती सांगायला सुरुवात केली. म्हणजे नुसतं वाघ नाही तर इतर प्राणी-पक्षी, तसेच वनस्पती ह्यांचीही माहिती होती त्यांना छान. परत एकदा पहिल्यांदा तेलिया तलावाकडे फेरी झाली आणि तिथून मग पुढे बाकीचं जंगल.
जात जाता अचानक त्यांनी गाडी थोडी मागे घ्यायला लावली आणि आम्हाला आमच्या डाव्या बाजूला बघायला सांगितलं, तर तिथे एक Crested Hawk Eagle होता. तो आजूबाजूच्या परिसरात इतका एकरूप झाला होता कि आम्हाला लगेच दिसलाच नाही. आणि जेव्हा निरखून बघितलं, तेव्हा दिसलं कि नुसताच गरुड नाही, तर त्याने पायात एक भक्ष हि पकडलेलं आहे. एका सशाची शिकार झालेली होती तिथे. आणि तो सशावर ताव मारण्यात गुंग असल्यामुळे तिथे थांबला होता, अन्यथा आमची गाडी थांबल्यावर लगेच उडून गेला असता (विशेषतः तो जमिनीवर असल्यामुळे .. झाडावर असता तर कदाचित थांबलाही असता).
एक-दोनदा त्याने आमच्याकडे नजर टाकली पण ते सोडलं तर तो मस्तपैकी उदरभरणात मग्न होता. आम्हालाही तिथे चांगले फोटो आणि विडिओ मिळाले त्यामुळे. अजून एक म्हणजे तिथे दुसरी कुठलीही गाडी नव्हती, त्यामुळे त्याला जास्त त्रास नव्हता.


७:१५ पर्यंत आम्ही खूप भटकलो, पण कुठेच वाघाची चाहूल नव्हती. (एकदा असा विचार हि येऊन गेला कि नागझिरा आणि रणथंबोर सारखं इथेही होणार कि काय !!)
अशाच एका पाणवठ्यावरून पुढे जात असतांना समोर ५-६ गाड्या थांबलेल्या दिसल्या, आणि तेवढ्यात आमचा गाईड ओरडला तो बघा, वाघ आहे झाडाजवळ. वाघ म्हंटल्यावर आम्ही लगेच उठून उभे राहिलो तर तिथे एक बलदंड वाघ झाडावर पंजांनी उकरत होता. हा मोगली नावाचा एक नर होता आणि बहुदा तो सध्या territory मार्किंग (सीमा निश्चिती) च्या कामाला लागला होता.
थोडं सीमा निश्चिती विषयी: वाघ हा नेहमी स्वतंत्र पणे राहणारा आणि शिकार करणारा प्राणी आहे (अपवाद फक्त, बरोबर पिल्ले असणारी मादी). प्रत्येक वाघाचं एक ठरलेलं क्षेत्र (त्याच राज्य म्हणूया सोयीसाठी) असतं. आणि अशा आपल्या राज्याच्या सीमा रक्षणासाठी त्याला काहीतरी उपाययोजना करावी लागते. त्यामुळे मग तो मूत्र शिंपडून किंवा पंजांच्या खुणा करून हा माझा प्रदेश आहे अशी खूण ठेवतो. जर तिथे बाहेरचा वाघ आला तर त्याच्यासाठी हा इशारा असतो. मग कधी कधी नवीन येणारा वाघ जर जास्त बलवान असेल तर त्यांचं भांडण/मारामारी अटळ आहे. त्यात परत नर वाघांचं राज्य हे मोठं असतं आणि साधारण एका नराच्या राज्यात, ३-४ माद्यांची उपराज्य असू शकतात
त्यामुळे, पुढची २५-३० मिनिटे तो मस्तपैकी रस्त्यावर चालत होता आणि त्याच्या पुढे मागे आम्ही सगळे जिप्सी वाले. दर थोड्या अंतरावर तो थांबत होता, झाडाजवळ जाऊन वास घेत होता, मूत्राचा फवारा उडवत होता, किंवा कुठेतरी झाडावर पंजांच्या खुणा करत होता.
जंगलात तसं पाहिलं तर नर वाघ दिसणं थोडं दुर्लभ असतं. त्यामुळे मोगली चे हे दर्शन आमच्यासाठी फारच विशेष होतं. एक थोडासा प्रॉब्लेम होता, बाकी सगळ्या गाड्यांतून समोर येणारा वाघ दिसत होता, तर आम्ही मागे असल्याने आम्हाला त्याचं तोंड दिसत नव्हतं. त्यामुळे आम्ही आमच्या ड्राइवर ला गाडी वाघाच्या पुढे न्यायला सांगत होतो. पण आमचा गाईड अगदी नियमानुसार चालत होता, त्याने स्पष्ट केलं कि, असा वाघ रस्त्यावर असतांना, त्यांचा बाजूने गाडी पुढे घेऊन जायला परवानगी नाही. पण त्याच बरोबर तो आम्हाला आश्वस्त करत होता कि आम्हालाही संधी मिळेल, फक्त थोडा धीर धरा.



आणि खरंच आम्हालाही अशी संधी मिळाली. एका ठिकाणी मोगली रस्ता सोडून थोड्या बाजूला (गवतातून) गेला. मग हिच संधी साधून आमची गाडी पुढे गेली (अर्थात असं काही होईल अशी बहुदा आमच्या गाईड ला खात्रीच होती). आता वाघ आमच्या मागून चालत येत होता, म्हणजे जणू फोटोसाठीच.



मग पुढच्या २०-२५ मिनिटात त्याने आम्हाला भरपूर पोझेस दिल्या. अगदी हवे तेवढे फोटो काढता आले. कधी समोरून, कधी बाजूने, कधी झाडाजवळ, तर कधी रस्त्यावर, नुसती धमाल ... इथल्या ड्राइवर गाईडस चा समन्वय खूप चांगला होता एकंदरीत, त्यामुळे अगदी सगळ्या गाड्यांना असे फोटो मिळाले असावेत. प्रत्येकालाच मागे पुढे राहण्याची संधी मिळत होती.



पुढचा फोटो जर नीट बघितलात तर मोगलीच्या मानेवर काही जखमा दिसत आहेत. अगदी ताजी जखम नसली तरी बहुदा गेल्या काही दिवसात त्याचा इतर कुठल्यातरी वाघाशी सामना झाला असावा. वन्य प्राण्यांना अशा प्रसंगांना सामोरं जावंच लागतं म्हणा, आणि बरेच वेळा अशा जखमांवर ते आपली जीभ फिरवतांना दिसतात (त्यामुळे बहुतेक त्या जखमा लवकर भरून यायला मदत होते). इथे जखम मानेवर असल्याने हा उपाय चालणार नाही म्हणा, पण मागे एकदा एका वाघिणीला अशीच इजा झालेली मी बघितली आहे, आणि बहुतेक वेळा ते त्यातून अगदी खडखडीत बरे होतात.

एवढ्या वेळात २-३ वेळा मोगली आमच्या गाडीच्या खूपच जवळ आला होता. एकदा तर एवढ्या जवळ कि, हात लांब करून मी त्याला स्पर्श हि करू शकलो असतो. माझ्या कॅमेरात फक्त त्याच तोंड मावत होतं त्यावेळी. पण त्या वेळेस आमचा गाईड थोडा चिंतेत पडला होता, त्याच्या मते वाघ थोडा बिथरला होता आणि अशा वेळी जर आपण जवळ जात राहिलो तर कदाचित तो चवताळायची शक्यता असते.


त्यामुळे मग आम्ही अजून आग्रह धरला नाही, त्याने ड्राइवर ला सांगून आमची गाडी हळू हळू वाघापासून दूर नेली. अर्थात ते होत असतांनाही आमचं फोटो काढत राहणं काही थांबलं नव्हतं म्हणा.


इतक्या मस्त अनुभवानंतर आम्ही सगळेच अगदी खुश होतो. आता व्याघ्र दर्शनानंतर आमचं लक्ष थोडं इतर प्राणी, पक्षी ह्यांच्याकडे वळलं. आमची सफारी संपता-संपता एका तलावाजवळ आम्हाला Oriental Honey Buzzard (मराठीत मोहोळ घार किंवा मधुबाज) ची जोडी दिसली (पिवळे डोळे असलेली मादी आणि गडद डोळे असणारा तो नर).


आमच्या दोनही गाड्यांना आज अगदी मस्त व्याघ्र दर्शन झाल्याचा आनंद आम्ही दुपारच्या जेवणाबरोबर आईस-क्रिम खाऊन साजरा केला. खरंतर सगळ्यांकडे सांगायला भरपूर काही होतं त्यामुळे जेवणापेक्षा गप्पाच जास्त झाल्या त्या दिवशी.
परत एकदा ३ वाजता आम्ही दुपारच्या सफारी साठी निघालो. ह्या वेळी देखील शहनाझ जी च निखिल च्या गाडीच्या गाईड होत्या. पण आज ते आमच्या साठी न थांबता दुसऱ्या वाटेने पुढे गेले. आम्ही आपले नेहमी प्रमाणे तेलिया तलावाच्याच वाटेने गेलो (आणि परत एकदा तिथे पदरी निराशाच आली 😩).
मग पुढचा तास भर आम्ही जंगलात खूप भटकलो. मध्येच आमची पुढे गेलेली गाडी आम्हाला दिसली, त्यांनी मग आम्हाला दूर बसलेला एक वाघही दाखवला. पण तो इतका लांब होता कि अगदी दुर्बिणीतून बघून सुद्धा एक छोटा ठिपका दिसत होता. पण तरीही त्याचेही फोटो काढलेच आम्ही (तेवढाच वाघ बघितल्याचा पुरावा 😜)


तिथे आम्ही थोडा वेळ वाट बघितली. तसा तो वाघ अगदी निवांत झोपला होता म्हणा, पण न जाणो, आली लहर आणि उठला अचानक तर, म्हणून थांबलो थोडं. पण तशी काही लक्षण दिसत नव्हती. तिथून निघून आम्ही दुसऱ्या एखाद्या रस्त्याने त्या वाघाच्या जवळ जात येईल का तेही बघितलं. पण दुसऱ्या बाजूने फक्त झाडंच दिसत होती, त्यामुळे मग तोही नाद सोडला.
तसं तर आम्ही पक्षी बघण्यातही समाधानी होतो, पण दुपारच्या वेळात जरा कमीच दिसतात पक्षी. ५ वाजेपर्यंत असेच फिरून झाल्यावर अजून एका छोट्या पाणवठ्याजवळ आलो. तिथे काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. त्यांच्या नजरेचा वेध घेत पाण्याकडे बघितलं, तर एक वाघ छान पाण्यात डुंबत होता. तसा खूप लांब नव्हता पण त्याचीही काही पाण्यातून बाहेर येण्याची लक्षणं दिसत नव्हती. साधारण दुपारच्या उन्हाच्या वेळेला सगळेच वाघ असं डुंबणं पसंत करतात, आणि मग अगदी संध्याकाळच्या उन्हं उतरायच्या वेळेस उठतात (म्हणजे एकतर सफारी संपायची वेळ झालेली असते आणि प्रकाश सुद्धा इतका कमी असतो, कि फोटो काढणंही कठीण). पण इथे आम्ही थांबून राहायचा निर्णय एकमताने घेतला. मग आमच्या ड्राइवर ने त्यातल्या त्यात चांगली जागा बघितली आणि रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली (कडेला अशा करता कि आजू-बाजूने इतर जिप्सी ना जायला पुरेशी जागा ठेवलेली बरी, नाहीतर आयत्या वेळेला गडबड होते आणि मग वाघ समोर आला तरी, आपल्याला रस्त्यात आहोत म्हणून गाडी थांबवता येत नाही).
जस-जसा वेळ जात होता, तस-तश्या अजून गाड्या तिथे येत होत्या आणि प्रत्येक जण सोयीस्कर जागा बघून थांबत होता. वाघ पाण्यातून बाहेर येउदे असं सगळ्यांनाच वाटत होतं. मग फावल्या वेळात चर्चा सुरु झाल्या कि हा कुठला वाघ आहे. माया, रुद्र, किंवा युवराज ह्या ३ नावांची चर्चा झाली. अजून काही गाड्या तिथे येऊन थांबल्या, तसेच काही जणं कंटाळून निघूनही गेले म्हणा. पण थोड्याच वेळात सगळा रस्ता ब्लॉक झाला.
आमच्या आपापसात गप्पा, स्नॅक्स असं चालू असतांना अचानक थोडा गलका झाला. बघतो तर ३-४ जंगली कुत्र्याचं टोळकं तिथे आमच्या मागच्या बाजूने पाण्यावर येत होतं. लगेचच आमच्या आशा पल्लवित झाल्या. हे कुत्रे तसे बिनधास्त असतात, जास्त संख्येने असतील तर वाघाला पण घाबरत नाहीत असं ऐकलं होतं. म्हटलं आता त्यांच्या मुळे तरी वाघ बाहेर निघेल. एका कुत्र्याने पाण्यावर येऊन थोडा आवाज देखील केला, पण त्या वाघाने त्यांच्याकडे बघण्याचीही तसदी घेतली नाही. थोड्याच सेकंदात कुत्रे आल्या वाटेने गुपचूप परत गेले.


आता पुन्हा एकदा आम्ही द्विधा मनस्थितीत पडलो. इथे थांबूया कि तेलिया तलावावर जाऊन सोनम दिसते का ते बघूया? पण शेवटी थांबायचं ठरवलं. त्यावेळी मला आठवलं कि दोनच आठवड्यापूर्वी मी असाच रणथंबोर येथे थांबलो होतो. समोर झाडीत वाघ होता, पण पूर्ण २:३० तास थांबून सुद्धा तो बाहेर आलाच नाही. पण तरीही इथे थांबलोच आम्ही.
तेवढ्यात तिथे वन खात्याची एक गाडी आली, त्यांना जाण्यासाठी मग गाड्यांना जागा करून द्यावी लागली, मग आमच्यासारखे जे रस्त्याच्या कडेला होते ते राहिले, पण बाकीच्यांना एकतर निघावं लागलं किंवा थोडं दूरवर रस्त्याच्या कडेला जागा पकडून थांबावं लागलं. ह्या सगळ्या गडबडीत सुद्धा वाघ निवांत होता.
मग तासाभरानंतर वाघाने थोडी हालचाल केली एकदाची. खरं सांगायचं तर आम्हाला वाटलं होत कि वाघ थोडे आळोखे-पिळोखे देईल आणि मग समोरच्या बाजूच्या जंगलात निघून जाईल आणि तेवढ्या क्षणांचे फोटो मिळाले तरी पुरे. पण आज नशीब जोरावर होतं आमचं. त्याने थोडी हालचाल केली आणि पाण्यातून सरळ आमच्याच दिशेने आला कि तो!
अचानक सगळीकडे उत्साह सळसळला. ज्याला त्याला चांगला फोटो हवा होता, मग गाड्यांची थोडी हालचाल झाली, त्यात कोणीतरी कोणाच्यातरी बरोब्बर समोर येऊन थांबलं. मग त्यांच जोरदार भांडण सुरु झाले. आमचं लक्ष्य त्यांचा भांडणाकडे वळत-न-वळत तोच वाघ पाण्याच्या बाहेर आला. त्या बरोब्बर, माणसांचे आवाज बंद झाले आणि फक्त कॅमेऱ्यांच्या क्लीकस चा आवाज सुरु झाला. जसा वाघ बाहेर आला, तसं लगेचच गाईड लोकांनी त्याला ओळखून तो रुद्र असल्याचं जाहीर केलं. अर्थात त्यांनी इतर काही नाव सांगितलं असतं तरी आम्हाला काहीच फरक पडत नव्हता म्हणा.



रुद्र मग हळू हळू गवतावर आला. आधी सगळ्या गाड्यांकडे एक नजर फिरवली आणि शांतपणे आपल्या अंगावरच पाणी झटकून टाकलं. मग निवांतपणे त्याने आपला जायचा रस्ता ठरवला.


सुरुवातीची काही पावलं तो आमच्या अगदी समोर चालत होता (अगदी डोळे आमच्या कॅमेऱ्यात रोखत) पण आमच्या जवळपास खूप सगळ्या गाड्या होत्या. त्यामुळे विरुद्ध बाजूला जायला त्याला फारसा वाव नव्हता. मग त्याने दिशा बदलली आणि तो आमच्या उजव्या बाजूला वळला (त्याच्या डाव्या), तिथे असणाऱ्या गाड्यांचा बाजूने मग त्याने रस्ता ओलांडला आणि सावकाशपणे जंगलात निघून गेला.




तसं बघितलं तर रुद्र पाण्यातून बाहेर आल्यावर फक्त ३-४ मिनिटेच दिसला, पण बघायला खूपच मजा आली. त्याच्यावर छान प्रकाश होता आणि कॅमेऱ्यात बघत असलेले फोटो सुद्धा मिळाले. अजून काय हवं?
एका क्षणी असं वाटलं कि आता पुढच्या तीनही सफरीत वाघ अजिबात दिसला नाही तरीही चालेल! पण तुम्ही चाणाक्ष वाचकांनी हे नक्कीच ओळखलं असणार कि असे विचार हे नेहमीच क्षणभंगुर असतात 😜. तिथून निघालो आणि लगेच निघालो तेलिया तलावाकडे (म्हणजे काय, सोनम दिसते का ते बघायला नको?)
वाटेत ताडोबा तलावाजवळ काही गाड्या थांबलेल्या दिसल्या, परत एक वाघ आहे कि काय? पण तिथे गेल्यावर कळलं कि एक जंगली कुत्र्यांचा कळप होता तिथे आणि जवळच काही हरणं पण. हे कदाचित त्या वाघाजवळ आलेल्या कुत्र्यांपैकी सुद्धा असतील? तिथे पाणी नाही मिळालं म्हणून इथे आले असतील.
खरं तर ते थोडे लांब होते आमच्या पासून (कारण सगळ्या मोक्याच्या जागा इतर गाड्यांनी अडवल्या होत्या) पण आम्हीही तरीही तिथे थांबलो.
आम्ही निघण्याचा विचार करतच होतो, तेवढ्यात तिथे एक अजब घटना घडली. कुत्रे तिथे पाणी पिण्यासाठी आले होते आणि जसे ते पाण्याकडे सरसावले, तसं लगेचच एक सांबर अचानक आक्रमक झालं आणि त्याने कुत्र्यांना पळवलं देखील. कदाचित कुत्रांच्या दृष्टीने हे अनपेक्षित होतं त्यामुळे ते दचकून मागे गेले, पण एक एक करत परत फिरू लागले. सांबर सुद्धा मागे हटायला तयार नव्हतं, त्याला बहुतेक आपल्या पाण्यात वाटेकरी नको होता. परत ते कुत्र्यांवर धावलं आणि परत कुत्रे मागे गेले. हे असं २-३ वेळा झालं. पण कितीही झाले तरीही ते कुत्रे. त्यांचा मूळ शिकारी स्वभाव कसा सोडतील. ५-६ कुत्रे परत एकत्र आले, मग मात्र सांबर मागे गेलं (त्याने बहुतेक परिस्थितीचा आढावा घेतला असावा .. एकतर कुत्रे धोकादायक, त्यात परत इतर सांबर हरण चुपचाप मजा बघत होती, कोणीही मदतीला पुढे आलं नव्हतं).






ह्या सगळ्या प्रकरणात बराच वेळ गेला. मध्ये रस्त्यात एक-दोन पक्षांचे फोटो काढायला देखील थांबलो, त्यामुळे मग तेलिया तलावावर जायला आम्हाला उशिरच झाला. आम्ही जाईपर्यंत सोनम बाई निघून गेल्या होत्या. आमच्या दुसऱ्या जिप्सी ला तिचे चांगले फोटो मिळाले तिथे. लांबून मिळाले, पण पाण्यातून बाहेर येतांना आणि गवतात चालत जातांना बघता आलं त्यांना.


बाहेर निघतांना असं जाणवलं कि आता पुढच्या ३ सफारी वेगळ्या गेट मधून असल्यामुळे आम्ही मोहर्ली गेट वर परत येणार नव्हतो. त्यामुळे खाली उतरून तिथे माया आणि बच्चे ह्यांचा एक मस्त पुतळा बनवलाय, त्याचे १-२ फोटो घेतले.


बफर कि बंपर ? (१०-जून-२३)
आज सकाळची सफारी हि अगरझरी नावाच्या बफर भागात असणार होती. हे गेट थोडं होमस्टे पासून लांब होतं त्यामुळे आज सकाळी १५ मिनिटे लवकर निघावं लागलं. त्यामुळे होमस्टे पासून गेट पर्यंत जायला वेगळी गाडी करावी लागली (अर्थात ते सगळं निखिल ने आधीपासूनच ठरवून ठेवलेलं होतं .. तो गेली १२ वर्ष येतोय ताडोबा मध्ये). इथे फक्त ८-१० जिप्सी असतात ह्या झोन मध्ये (अर्थातच हा भागही तसा लहानच आहे कोअर पेक्षा). ह्या गेट च्या बरोब्बर समोर देवाडा गेट सुद्धा आहे. हाही बफर जंगलाचाच भाग आहे आणि आमच्या पुढच्या २ सफारी असणाऱ्या जुनोना गेट शी आतून जोडलेला आहे.
गेट मधून आत शिरल्यावर आमच्या गाईडने गाडी लगेचच एका छोट्या तलावाजवळ नेली. इथे एक रानगवा मरून पडलेला होता. तो बहुतेक १-२ दिवसांपासून असावा तिथे, कारण जवळ गेल्यावर भयंकर दुर्गंध जाणवत होता (जास्त वेळ तिथे थांबणं कठीण होतं). मग आमच्या गाईड कडून कळलं, कि ती काही वाघाची शिकार नव्हती तर २ गव्यांच्या आपसातल्या मारामारीत ह्या गव्याचा मृत्यू ओढवला होता. पण असा जवळपास १००० किलो वजनाचा गवा म्हणजे मेजवानीच होती वाघांसाठी. ह्या भागात म्हणे ३ वाघांचा वावर आहे. तारू, आणि शंभू असे २ नर आणि छोटी मधू नावाची एक वाघीण. त्यातला कुठलाही वाघ तिथे येण्याची शक्यता होती.
पण एकतर तिथे असणारा घाणेरडा वास आणि आमचं कालचं व्याघ्रदर्शन, ह्यामुळे आम्ही सकाळचा वेळ पक्षी बघायला द्यायचा असं ठरवलं. तिथून निघून आम्ही एका मोठ्या तळ्यापाशी गेलो (हा बहुतेक तिथल्या धरणाचा पाणी साठा होता). सकाळची वेळ असल्याने तिथे आम्हाला बरेच पक्षी बघायला मिळाले. त्यातली काही नावे म्हणजे Indian Rollers (नीलपंख), Yellow-footed Green Pigeons (हरोळी) , Grey-headed Swamphens (जांभळी पाणकोंबडी), many ibises (शराटी), drongos (कोतवाल), starlings (काही प्रकारच्या मैना), lesser whistling ducks (अडई), egrets (बगळे), storks (करकोचे), आणि शिवाय 3 grey-headed fish eagles (राखी डोक्याचा मत्स्यगरुड). तिथे आम्हाला एक Cinnamon bittern (बदामी तापस) हा काहीसा दुर्मिळ पक्षी सुद्धा दिसला.





मग ७:१५ च्या सुमारास आम्ही गेट जवळ परत आलो (कारण स्वच्छतागृहे तिथे होती). थोडा वेळ आम्ही तिथे थांबून परत निघालो पण अगदी थोडं अंतर आत गेलो-न-गेलो एवढ्यात आमच्या गाईड ला गेट जवळ वाघ दिसल्याचं कळलं, मग काय परत आम्ही गेट वर. खाली उतरून दोन्ही गेट मधल्या (देवडा आणि अगरझरी गेट्स) रस्त्यावर गेलो तर तिथे लोकांची अक्षरशः गर्दी उसळली होती. एक वाघ देवाडा भागातून रस्त्याच्या दिशेने गेलेला दिसला होता काही जणांना, त्यामुळे तो रस्ता क्रॉस करून अगरझरी भागात जाण्याची शक्यता होती. आणि त्याचीच वाट बघत थांबले होते सर्व जण. काय गम्मत आहे बघा हं, वाघ म्हणजे एक जंगली जनावर, पण लोक अश्या पद्धतीने तिथे थांबले होते कि जणू एखादी मांजरच जाणार होती तिथून.
आम्हीही बराच वेळ थांबलो तिथे पण मला तरी तिथे थांबण्यात काही अर्थ वाटत नव्हता. समजा गेलाच वाघ तिथून रस्ता ओलांडून, तरी तिथे आम्हाला तो धड बघायलाही मिळाला नसता, फोटो काढणं तर दूरच राहिलं. पण थांबलो होतो तेवढ्यात आमचे ग्रुप फोटो मात्र काढून झाले.




आमचे ग्रुप फोटो नीट बघितलेत तर त्यात तुम्हाला आमचा छोटा डायनासोर म्हणजे मितांश दिसला असेलच. त्याच्याविषयी लिहिल्याशिवाय हा ब्लॉग पूर्ण होऊच शकत नाही. पूर्ण ट्रिप भर तो सगळ्यांच्यात इतका मस्त मिसळला होता. त्याला असलेली जाण, हजरजबाबी पणा ह्यामुळे सगळेच त्याच्यावर खूप खुश होते. फक्त एक क्षण असा होता कि तो थोडा बिथरला होता. त्याने अगदी प्रांजळपणे हे कबुल केलं कि, मोगली जवळ आल्यावर तो जाम घाबरला होता. अर्थात त्याच्या वयात कोणाचंही असंच होणार हे नक्की. पण विशेष म्हणजे तेव्हाही तो अजिबात रडला किंवा ओरडला नाही. एक गुपित सांगतो तुम्हाला इथे.. त्याच्या जगात तो एक T-Rex नावाचा मोठ्ठा डायनासोर होता पण फक्त आमच्या करता तो इन्सानि रूपात वावरत होता 😜.
इथे आमच्या सांगण्यावरून आम्ही निघालो खरे, पण गाईड मात्र म्हणत होता कि थांबायला पाहिजे होतं, नक्की दिसला असता वाघ,
आत शिरून आम्ही परत एकदा त्या गव्या पाशीच जायचं ठरवलं. बाकी कुठे वाघांच्या काही खाणा खुणा तशाही नव्हत्याचं. तेव्हा ७:४५ वाजले होते, त्यामुळे असं ठरलं कि आता सफारी ची वेळ संपेपर्यंत (साधारण ९:३०) इथेच थांबायचं, मग वाघ येवो अथवा न येवो. आम्ही तिथे गेलो तर आमच्या आधीच ४ जिप्सी तिथे थांबलेल्या होत्या (त्यात आमची दुसरी गाडी पण होतीच). सकाळच्या पेक्षा इथे जाणवणारा दुर्गंध कमी होता (कदाचित वारा ह्या वेळी आमच्या इथून गव्या कडे वाहत असावा). त्या वेळेस काही बगळे येऊन त्या गव्या वर ताव मारत होते (सहज मिळणारं प्रोटीन).
पुढच्या १०-१५ मिनिटातच आमच्या गाईड ला कळलं कि वाघाने रस्ता क्रॉस केलाय आणि तो आगरझरी मध्ये शिरलाय. गाईडनेही लगेच म्हणून घेतलं "आपण थांबलो असतो तर दिसला असता वाघ". असो... पण आता आमच्या आशा थोड्या वाढल्या होत्या कारण जर तो इथे आलाय तर नक्कीच ह्या आयत्या शिकारीवर येऊ शकेल. थोड्या वेळात आमच्या गाईड ला समोरच्या झाडीत काही हालचाल जाणवली आणि ते ऐकून आमची धडधड अजून वाढली.


आमच्या ५-६ जिप्सी पाण्याच्या ह्या बाजूला होत्या पण एक जिप्सी समोरच्या बाजूला होती, जिथून तो वाघ चालत येण्याची शक्यता होती. आमच्या गाईड च्या मते ते अगदी चुकीचं होतं. त्याच्या मते जिप्सी बघून वाघ कदाचित परत फिरू शकेल, अर्थात मला त्या तर्कात काहीही तथ्य वाटलं नाही. इथल्या वाघांना जिप्सी बघायची नक्कीच सवय असणार, त्यामुळे केवळ तेवढ्या कारणाने तो येणार नाही, असं मला तरी वाटत नव्हतं. तरीही, समोरच्या गाडी वाल्याला आमच्या गाईडने सांगून बघितलं, पण त्याने काही दाद दिली नाही.
त्याने पाण्याकडे पावलं वळवली आणि मस्तपैकी पाण्यात जाऊन बसला तो. त्याच्या हालचाली पूर्णवेळ सावध होत्या, चौफेर नजर होती त्याची. तो पर्यंत गाईड्स ना कळलं होतं कि हा तारू नावाचा वाघ होता. आणि मग त्याच्या चौफेर नजरेचा उलगडा झाला. शंभू हा दुसरा वाघ जरा जास्त ताकदवान होता, म्हणून तारू सावध नजरेने तो कुठे जवळपास नसल्याची खात्री करून घेत होता. म्हणूनच तो कदाचित लगेच भक्ष्याकडे वळला नसावा.



त्या-नंतर पुढचा तासभर तारू आमच्या संयमाची जणू परीक्षाच बघत होता. पाण्यात बसल्या बसल्या १-२ वेळा एकडे तिकडे कूस बदलण्यापलिकडे त्याची काहीही हालचाल नव्हती. बरं, आम्हाला ९:३० च्या आत निघावंच लागणार होतं, त्यामुळे तो पर्यंत जर तो शिकारी पाशी आला तर ठीक, नाहीतर आम्हाला असंच हात हलवत परत जावं लागणार होतं. तो पर्यंत त्या झोन मधल्या सगळ्या जिप्सी तिथेच येऊन थांबलेल्या होत्या.
शेवटी एकदाचा तारू उठल्यासारखा वाटलं. पाण्यातून सावकाश चालत तो गव्याच्या दिशेने निघाला... लगेचच सर्वत्र उत्साहाचं भरतं आलं (जो तो त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होता). आमच्या इथून वाघ गवताच्या काड्यांमुळे थोडा झाकला जात होता, त्यामुळे मग मी सीट वर उभे राहून फोटो काढायला सुरुवात केली. इथे एक धोक्याची सूचना:
अति उत्साहात बरेचदा आपण असे सीट वर किंवा टपा वरून बघायला जातो खरे पण त्याच वेळेस ड्राइवर हि आपल्याला अगदी परफेक्ट अँगल मिळवून देण्याच्या प्रयत्नात गाडी पुढे-मागे घेतात. मी अशा २-३ घटना ऐकल्या आहेत कि असेच हौशी टुरिस्ट वाघ समोर असतांना तोल जाऊन गाडीतून खाली पडले.. सुदैवाने त्यातल्या कुठल्याच वेळेला वाघाने हल्ला केला नाही, पण हे असं होऊ नये, ह्याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
पाण्यातून बाहेर येऊन तो शांतपणे गव्या कडे गेला. त्याला सगळ्या बाजूने बघितलं आणि मगच पहिला घास घेण्याचा विचार केला.





त्यांनंतर मग पुढची १५ मिनिटे फक्त सगळ्यांचे कॅमेरे बोलत होते (म्हणजे चकार शब्द न उच्चारता सगळे दुर्बीण किंवा कॅमेऱ्यातून बघण्यात गुंगले होते).
अगदी सुरवातीला तारूने त्या गव्याला ओढण्याचा प्रयत्न केला. हे वन्य प्राणी बहुतेकदा भक्ष्याला थोड्या दाट झाडीत घेऊन जाऊन मगच त्याला खाणं पसंत करतात पण हे धूड एवढं वजनी होतं कि पूर्ण जोर लावून देखील फार फार तर २-४ इंच हलला तो गवा. त्यामुळे त्याने लवकरच तो प्रयत्न सोडून दिला.



मग परत एकदा सगळ्या बाजूने फिरून तारूने खाण्यायोग्य भाग निवडला (बहुतेक त्यातल्या त्यात मऊ आणि चरबी युक्त भागाची निवड केली असावी त्याने). पण त्यासठी त्याला बरीच मेहनत करावी लागलं होती.



खाता-खाता बहुतेक तो दमत असावा, त्यामुळे मधून मधून तो छान विश्रांती घेत होता. त्या वेळेचाही तो बरोबर सदुपयोग करून घेत होता. बसल्या बसल्या तो चारही बाजूंना व्यवस्थित नजर ठेवत होता. न जाणो, कुठून तरी शंभू आला तर? प्रतिकार करायचा कि पळून जायचं, ह्या पैकी जो काही त्याचा डावपेच असेल, त्याचा त्याने विचार करून ठेवला असावा बहुतेक.



हे सगळं समोर घडत असताना आम्ही भान विसरून गेलो होतो. पण मग आमच्या गाईडने आम्हाला जणू स्वप्नातून सत्यात आणलं. आमची निघायची वेळ झाली होती. त्यामुळे नाईलाजाने सर्व जण परत निघालो. तसं पाहिलं तर आम्हाला फक्त १५-२० मिनिटाचा अवधी मिळाला होता पण तेवढ्यातही मेमरी कार्ड भरून जायची पाळी आली. घरी गेल्यावर ह्यातले कुठले फोटो ठेवायचे आणि कुठले डिलीट करायचे, हे ठरवताना नाकी नऊ येणार होते हे निश्चित.
सगळ्याच्या सगळ्या गाड्या एका धुंदीतच गेट बाहेर आल्या. हे म्हणजे आपण जसं एखादं भव्य नाटक (किंवा सिनेमा) बघून भारावून बाहेर पडतो, तसं काहीसं झालं होतं.
उन्हाळ्यात पावसाळी सफारी ची मजा
आज आमची दुपारची (एकूण पाचवी) सफारी हि जुनोना गेट मधून असणार होती. हा बफर जंगलाचा भाग आहे, तरीही मोहर्ली च्या कोअर ला अगदी लागून आहे, त्यामुळे बरेच वेळा तिथे दिसणारे वाघ इथेही दिसू शकतात. इथल्या गेट मधून बहुतेक ६ च जिप्सी ची परवानगी होती, पण हा भाग देवाडा गेट मधून सुद्धा जोडलेला होता, त्यामुळे तिथून येणाऱ्या जिप्सी अधिक इथल्या ६ अशा सर्वच ह्या भागात फिरू शकतात.
इथे शिरल्यावर लगेचच आम्ही एका छोट्या पाणवठ्यावर गेलो. इथे आदल्या दिवशी एक नवीन वाघ दिसला होता, त्यामुळे बहुतेक सगळ्या जिप्सी आधीच तिथे येऊन दाखल झाल्या होत्या. परत एकदा गाईड च्या मते आम्ही तिथे थांबायला हवं होत पण आम्हाला त्यात रस नव्हता. एकतर आत्तापर्यंत चांगलं sighting झालं होतं आणि शिवाय माझ्या मते, इथे वाघ आला जरी असता तरीही एवढ्या जिप्सीच्या गर्दीतून काहीही नीट दिसू शकलं नसतं (मला असं वाटतं कि बहुतेकदा गाईड च्या दृष्टीने तुम्हाला कसाही एकदा वाघ दाखवला कि त्यांचं काम होतं).
आम्ही होमस्टे मधून निघतांना आज खूप गरम होत होतं पण इथे अचानक आकाशात काळे ढग जमले. थोडा गडगडाट देखील ऐकू येत होता. मग बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली. आम्ही लगेचच कॅमेरे प्लास्टिक पिशव्यात बंद केले, मी तर अशा वेळी अजिबात रिस्क घेत नाही. फोटो नाही मिळाले तरी चालतील, पण कॅमेऱ्याला धोका नको (एकदा वाईट अनुभव घेतल्यापासून मी हे नक्की केलय).
पाऊस तसा कमी होता त्यामुळे आम्ही पुढे जात राहिलो. मग तो ड्राइवर आम्हाला आधीच्या काही sightings बाबत सांगत होता तोच मला समोरून एक बिबळ्या रस्ता ओलांडतांना दिसला. "अरे लेपर्ड आहे समोर" मी जवळ जवळ ओरडलोच त्याला बघून, नाहीतर आमची गाडी त्या बिबळ्याच्या अंगावरच गेली असती. तो बिबळ्या पण बहुतेक शॉक मध्ये असेल, काही क्षण तो फक्त आमच्याकडे बघत होता, मग भानावर आला असावा बहुतेक आणि हळू हळू चालत जंगलात गेला (अर्थातच एक नजर आमच्यावर ठेवत). कॅमेरा बंद करून ठेवलेला असल्याने फोटो काढण्याचा काही प्रश्नच नव्हता म्हणा. आणि तो बिबळ्या थोडा दूर जातो-न-जातो तोच पावसाचा जोर एकदम खूप वाढला.
पावसाचा जोर अचानक एवढा वाढला, कि आमच्या ड्राइवर आणि गाईडला गाडीला छप्पर घालायला लगेच खाली उतरावं लागलं. तो बिबळ्या सुद्धा अजून फार लांब गेला नव्हता खरंतर. त्या छप्परामुळे आमचं पाउसापासून रक्षण झालं पण त्यामुळे बाहेर काही दिसणं खूप कठीण झालं.
एवढ्या पावसात गाडी चालवणं कठीण होत, त्यामुळे मग आम्ही एक थोडा आडोसा (झाडाखाली) बघून थांबलो. १५-२० मिनिटं झाली पण पावसाचा जोर वाढतंच होता. आता तर सफारीच्या रस्त्यात पण पाणी साठायला लागलं. नंतर असंही कळलं कि १-२ ठिकाणी झाडं पडून रस्ते बंद झाले होते. आम्ही थोडा वेळ विचार केला आणि मग सफारी तिथेच संपवून परत फिरायचा निर्णय घेतला.
परत जातान पूर्ण मागे जुनोना गेट पर्यंत जायच्या ऐवजी आम्ही जवळ असलेल्या देवाडा गेट वर जाण्याचा निर्णय घेतला. आणि काय नशीब पण महाराज, गेट च्या जवळ पोहोचतो तोच समोर एक वाघ. आमच्या पासून १५-२० फूट पुढे छोटी मधू रस्ता ओलांडत होती. म्हणजे ऊन असो वा पाऊस, वाघ दिसायचा असेल तर काहीही करा, दिसतोच.
ती वाघीण रस्ता ओलांडून गेली म्हंटल्यावर आमचा बाहेर पडायचा विचार लगेच बदलला. तिच्या दिशेने मग आमची गाडी परत जंगलाकडे वळली. तो पर्यंत बातमी गेट वर पोहोचली होती, त्यामुळे लगेचच ३-४ जिप्सी जमा झाल्याच. आमच्या गाईड च्या अंदाजाप्रमाणे मग आम्ही एका जागी थांबलो, त्याच्या मते छोटी मधू इथूनच परत एकदा रस्ता ओलांडेल. आणि खरंच २-३ मिनिटात वाघीण तिथे आली. पण तोपर्यंत इतर गाड्याही पुढे आल्या होत्या, त्यामुळे तिला जायला वाट मिळत नव्हती. त्यात मग आमच्या गाईड आणि ड्राइवर ह्यांचा थोडा वाद झाला (आपण थांबलो ती जागा बरोबर कि नाही, ह्यावर). पण त्यांच बोलणं चालू असताना वाघिणीने आमच्या गाडीच्या मागूनच रस्ता ओलांडायचं ठरवलं. आणि मग आमच्याकडे बघत-बघत ती गेली सुद्धा.
इतकं छान वाटलं तिथे. मस्त पाऊस पडत होता, वातावरण थंडगार झालं होत आणि त्या हिरव्या जंगलातून ती वाघीण रुबाबात बाजूने चालत गेली. कॅमेरा बंद केल्याचं अजिबात दुःख झालं नाही, काही गोष्टी कॅमेऱ्यात नाही तर डोळ्यात साठवायच्या असतात हे जाणवलं.
माझा कॅमेरा नसला तरी आरती कडे कॅमेरा होता, तिने पटकन १-२ फोटो घेतले तिथे.


तिथून आम्ही परत एकदा देवाडा गेट जवळ गेलो. तोपर्यंत आमची दुसरी जिप्सी पण तिथे आली होती. मग सर्वानुमते असं ठरलं कि अजून थांबण्यात काही अर्थ नाही, जर वन-अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर देवाडा गेट मधूनच बाहेर पडूया. पाऊसाचा जोर बघून त्यांनीही ते ऐकलं.
अर्थात बाहेर पडल्यावरही आम्ही लगेच परत गेलो नाही. बाहेरच्या बाजूने वाट असलेल्या एका पाणवठ्यावर जायचं ठरलं दोन्ही गाड्यांचं. गेलो तिथे, पण तिथेही पावसाचा जोर होताच. परत यायला निघालो तर वाटेत एका रानगव्याने जणू आमची वाटच अडवली. तो सफारी च्या रस्त्यातच उभा होता, त्यामुळे आम्हाला थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. २ वेळा त्याने पुढे पावले टाकली, त्यामुळे आम्हाला गुपचूप मागे जावं लागलं. पण नशिबाने तो जास्त वेळ मध्ये थांबला नाही, आणि आम्हाला निघता आलं.
आज आम्ही लवकर परत आल्यामुळे थोडा जास्त वेळ होता आमच्याकडे, त्यात परत पावसाळी वातावरण, साहिजकच मग भज्यांचा बेत आखला गेला नसता तरच नवल. रस्त्यात गरमा-गरम भज्यांचा आस्वाद घेऊन मग झाला आमच्या होमस्टे मधला आलं घातलेला वाफळदार चहा. (तसा चहा रोजचाच होता पण आज त्याची मजा काही वेगळीच).
कपडे बदलून मग आम्ही गेलो मोहर्ली गेट जवळ असणाऱ्या दुकानांकडे. सफारी विशेष टोप्या, स्कार्फ, असली खरेदी सुद्धा झाली तिथे. तिथे गेल्यावर लक्षात आलं कि आम्हाला जरी खूप पाऊस लागला, तरीही कोअर जंगलात पावसाचा काही मागमूस नव्हता, त्यांची सफारी अगदी विनासायास पार पडली होती.
शेवटची सफारी
आज हि आमची शेवटची सफारी, परत एकदा जुनोना गेट मधून. पण कालच्या सारखे आम्ही वाघ दिसलेल्या पाण्यावर न जाता जंगल फिरायचं ठरवलं. कालच्या पाऊसामुळे बरेच रस्ते आज बंद झाले होते (मुख्यतः झाडं आडवी पडल्यामुळे). बऱ्याच ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं होतं. अशा हवेत वाघ बाहेर येण्याची शक्यता कमीच होती.
मग आम्ही पक्षांकडे लक्ष द्यायचं ठरवलं. थोड्याच वेळात आम्हाला एक मोहोळ घार (Oriental Honey Buzzard) दिसली. पण तिला एक ट्रीपाय पक्षी त्रास देत होता. एक दोन वेळा त्याने घारीवर हल्ला केल्यासारखं केलं पण घारी ने काही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. थोडं पुढे एका झाडावर आम्हाला ४ पिंगळे (spotted owlets) दिसले. फोटो मात्र त्यातल्या एकाचाच मिळाला.


पक्षी बघायचे असल्याने मग आम्ही एका मोठ्या तळ्याकडे गेलो (बहुतेक जवळच्या धरणाचा पाणीसाठा होता तो). इथे खूप सगळे पक्षी दिसत होते. त्यात संख्येने सर्वाधिक होते ते उघड्या चोचीचे करकोचे (Asian Openbills). एका मोठ्या झाड्यावर बऱ्याच करकोच्यांनी त्यांची घरटी बांधलेली दिसत होती. काही करकोचे घरटं बनवण्याचे साहित्य घेऊन उडतांना दिसत होते.


इथे एक टिटवी खूप आवाज करत होती, जरा जवळ गेल्यावर लक्षात आलं कि तिची ३ छोटी पिल्लं होती तिथे. तिथेच मग आम्हाला एका चातकाच्या (Jacobine cuckoo) जोडीचे दर्शन झाले. सहसा हे चातक पक्षी जवळ दिसत नाहीत पण आज आमच्या नशिबाने ते बऱ्यापैकी जवळ होते आणि शिवाय प्रकाश हि चांगला होता, त्यामुळे तिथे थोडा जास्त वेळ फोटो काढले.
त्यानंतर दिसला एक कुरूप असा करकोचा (Lesser Adjutant). हा खरा खूप जवळ दिसला आम्हाला पण फोटो काढायच्या आत तो लांब उडून गेला. पण हा तसा नेहमी दिसणारा पक्षी नाही त्यामुळे त्याचे लांबून सुद्धा फोटो घेतलेच. आमचे कॅमेरे करकोच्या कडे वळलेले असतांना शिरीष ला जवळच एक गरुड दिसला. तुरेवाला सर्प गरुड (Crested Serpent Eagle) होता तो.




त्या शिवाय आम्हाला इतरही काही सामान्यतः दिसणारे पक्षी दिसले तिथे (गाय बगळे, जांभळा बगळा, मैना, पाणकोंबड्या, ई.) .
अशा तऱ्हेने आमची शेवटची सफारी वाघ्रदर्शनाशिवाय झाली पण भरपूर पक्षी दिसले त्यामुळे मजा आली.
परतीचा प्रवास
१० वाजे परंत आम्ही होमस्टे मध्ये परत आलो. आज न्याहारी आणि दुपारचं जेवण ह्या ऐवजी एकदाच ११:३० वाजता जेवण उरकायचं असं ठरलं होतं. त्यामुळे मग चहा-बिस्कीट खाऊन आम्ही लगेच बॅगा भरायला घेतल्या. आमचा प्लॅन होता १२:३० ला तिथून निघण्याचा पण आमच्या नागपूरला नेणाऱ्या गाड्या नेमक्या तासभर उशिरा आल्या. त्यामुळे मग रस्त्यात कुठेही न थांबता थेट नागपूर स्टेशन वरच गेलो. तिथेच असलेल्या हळदीराम च्या दुकानातून नागपूर स्पेशल संत्रा बर्फी ची खरेदी झाली. तिथेच मग आम्ही रात्रीचे जेवण सुद्धा घेऊन ठेवलं (वाटेत कुठे काय मिळेल माहित नसल्यामुळे).
परतीचा प्रवास तसा बिनबोभाट पार पडला. २-३ दिवस लवकर उठून आणि दिवसभर सफारीतल्या खडबडीत रस्त्यांवरून प्रवास करून सगळे जण दमलेले होते, त्यामुळे गाडीत झोप सुद्धा चांगली झाली सर्वांची.
इथे ब्लॉग चा शेवट करतांना मी सुरुवातीचं एक वाक्य परत उद्धृत करतो "ताडोबात वाघ दिसतातच". हे आमच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं ठरलं. एक मस्त जंगल बघायला मिळालं आणि वाघांचे खूप सगळे फोटो सुद्धा मिळाले. निखिल ने केलेली सर्व व्यवस्था अगदी उत्तम होतीच त्यामुळे सर्वानुमते त्याला विनंती केली, कि आता पुढची ट्रिप लवकरात लवकर ठरव.
टीप: ह्या ब्लॉग मधले बहुतेक सगळे फोटो मी काढलेलेच असले तरी काही फोटो मी इतरांकडून घेतले आहेत.