लडाख - एक वेगळं वाळवंट
- With NatureClicks (Abhay Kewat)
- Sep, 2023
            
        थोडं ह्या सहली विषयी
        
        लडाख ला जावं असं बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात होतं, ह्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे दिसणारे वेगळे पक्षी. जेवढं मी वाचलं किंवा ऐकलं (मित्रांकडून) होतं, त्यानुसार तिथला भूप्रदेश हा देशातील बाकीच्या भागांपेक्षा वेगळा होता. एकतर हिमालयाचा भाग, म्हणजे खूप उंचीवर आणि तेवढाच थंड देखील, त्यात तिथे म्हणे सगळं रुक्ष वाळवंट आहे बरंचसं. बर्फ सुद्धा असतो बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे तिथे टिकाव धरू शकतील असेच पक्षी तिथे दिसतात. 
            
            पण हे झालं पक्षी (किंवा इतर वन्य जीवांविषयी), त्याशिवाय मी सर्वात जास्त जे ऐकलं होतं ते तिथल्या  Acute Mountain Sickness (AMS) विषयी. आपण त्याला पर्वतीय आजारपण म्हणू शकतो.. अर्थात तसा काही शब्द मी मराठीत ऐकलेला नाही. महाराष्ट्रात अशी वेळच येत नाही आपल्यावर,  कारण इथे हिमालयाच्या उंची इतके पर्वतच नाहीत.  
            
            मग अभय ने ह्या सहली विषयी घोषणा केली. सुरुवातीला त्याने जुलै किंवा सप्टेंबर असा पर्याय ठेवला होता (आणि आम्ही सप्टेंबर निवडला). माझ्या मनात वरच्या दोनही गोष्टी होत्या पण नवीन पक्ष्यांविषयी आकर्षण जास्त प्रबळ होतं, त्यामुळे जायचं हे नक्की केलं. त्या वेळेस अभय (आमचा ग्रुप लीडर) धरून आम्ही सहा जणं होतो. लगेचच सर्वांचं विमान तिकीट काढलं (तिकिटांच्या किमती नंतर वाढतात, त्यामुळे लगेच केलं)    
        
            
            पूर्वतयारी
        
        एकदा येण्या-जाण्याचा तारखा ठरल्या म्हंटल्यावर मग मी लगेच अधिक माहिती जमवायला सुरुवात केली. प्रथम पक्ष्यांची माहिती. ह्या साठी सर्वात चांगला स्रोत म्हणजे eBird हि वेबसाईट. इथे कुठल्या भागात, कुठल्या महिन्यात, कुठले पक्षी दिसू शकतील ह्याची व्यवस्थित माहिती मिळते. तिथे कळलं कि साधारण ३०-३५ वेगळे पक्षी दिसू शकतात, अर्थात सगळे दिसण्याची शक्यता खूप कमी, त्यामुळे त्यातले २० जरी मिळाले तरीही खूपच छान होईल ट्रिप. 
            
            दुसरा विषय होता उंचीचा, म्हणजे हिमालयातल्या उंच पर्वतावर असणाऱ्या विरळ हवेचा. त्याबाबत मग तिथे आधी जाऊन आलेल्या लोकांना विचारलं. खूप वेगवेगळे अनुभव होते सर्वांचे. काहींना अजिबात त्रास झाला नव्हता, तर काहींनी त्यांच्या बरोबरच्या लोकांना इस्पितळात दाखल व्हायला लागलं असंही सांगितलं. मग असं कळलं कि सर्वात महत्वाचं असत ते म्हणजे तिथल्या विरळ हवेशी जुळवून घ्यायचं (acclimatization). त्यामुळे जे कोणी श्रीनगर किंवा मनाली हुन रस्त्याने प्रवास करून जातात त्यांना त्रास थोडा कमी होतो (पण तिथेही  मला घाट लागण्याचा त्रास झालाच असता म्हणा), इथे आम्ही तर विमानाने डायरेक्ट लेह (लडाख ची राजधानी) येथे जाणार होतो. इथे त्यातल्या तांत्रिक बाबी थोडक्यात मांडतो, म्हणजे समजायला थोडं सोपं होईल.   
            
            आपण समुद्रसपाटी वर राहतो तिथे हवेतल्या प्राणवायूचे प्रमाण साधारण २१% असतं. तेच लेह (जे ११००० फूट उंचीवर आहे) इथे ते प्रमाण १४% होतं. आणि आम्ही अजून काही उंचावरच्या ठिकाणी जाणार होतो (साधारण १५००० फूट, तिथे ते १२% असतं). खरंतरं, प्राणवायू चं प्रमाण तसं सगळीकडे सारखंच असतं, पण तिथे हवाच विरळ होत असल्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या प्राणवायूचं प्रमाण वर म्हंटल्याप्रमाणे कमी होतं.     
            
            ह्या कमी प्राणवायू चा परिणाम वेगवेगळ्या शारीरिक क्रियांवर होऊ शकतो. अगदी थोड्या हालचाली मुळे सुद्धा आपल्याला दमायला होतं, धाप लागते. त्या शिवाय होणारे परिणाम म्हणजे डोके दुखणे, भूक न लागणे, निद्रानाश, आपण आजारी असल्यासारखे वाटणे, इ. बहुतेक वेळा हि लक्षणे सुरुवातीला दिसतात पण जसजसं शरीर त्या हवेला सरावतं तसतसं हि लक्षणं कमी होत जातात. अगदी थोड्या जणांच्या बाबतीत परिस्थिती सुधारण्या ऐवजी बिघडते पण सहसा असं होत नाही. 
            
            मित्रांबरोबरच्या बोलण्यातून हे जाणवलं कि लेह ला पोहोचल्यावर २-३ दिवस तिथेच आराम करणं हे श्रेयस्कर. एकदा स्थिरता आल्यावर मग हळू हळू अजून वरच्या भागात जायचं. अजून काही सूचना मिळाल्या, त्या अश्या:
        
- तिथली हवा खूप कोरडी असते, त्यामुळे वरचेवर पाणी पीत राहावं लागतं. बरेचवेळा थंडी मुळे जास्त तहान लागत नाही, पण तरीही पाणी पीत राहणं आवश्यक ठरतं
 - इथल्या थंडीबरोबरच इथे दिवसा सूर्य खूप जास्त तळपत असतो आणि त्यामुळे गॉगल बरोबर ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर उन्हाचा खूप त्रास होतो.
 - बऱ्याच जणांनी इथे जाण्यापूर्वी Diamox नावाची गोळी सुरु करायचा सल्ला दिला. पण ह्याबाबत थोड्या मिश्र प्रतिक्रिया होत्या. आमच्या डॉक्टरांनी ते न घेण्याचा सल्ला दिला.
 - अजून एक सल्ला होता भीमसेनी कापूर बरोबर घेऊन जाण्याचा (त्यामुळे श्वास घ्यायला थोडी मदत मिळते)
 - आणि हो, इथे आपलं pre-paid सिम कार्ड चालतं नाही. त्यामुळे मी लगेचच मोबाईल अँप वर जाऊन माझं सिम postpaid करून घेतलं (पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कि असं केल्याने फायदा होत नाही.. इथे जाण्यापूर्वी पोस्टपेड सिम लागतंच पण ते रीतसर मोबाईल गॅलरी मध्ये जाऊनच करावं लागतं.)
 - सर्वात महत्वाचा सल्ला होता कि बरेचदा आपण आतून खंबीर असलो तर त्रास कमी होतो
 
अशी सगळी माहितीची जमवाजमव (आणि मनाची तयारी 😀) करून आम्ही लडाख ला जायला सज्ज झालो आणि तेवढ्यात एक धक्का बसला. आम्ही जाणार असलेल्या GoFirst कंपनीने विमान -उड्डाण रद्द केलं (बहुतेक त्यांनी दिवाळखोरींच कबुल केली आहे). आम्ही स्वस्त म्हणून आधी काढलेलं तिकीट गेलं कि डब्यात!! आता दुसरा पर्याय नव्हताच, त्यामुळे परत एकदा नव्यानं तिकीट काढलं. आधीचं तिकीट डायरेक्ट लेह चं होतं आणि हे आता दिल्ली तर्फे (म्हणजे प्रवासाचा वेळ पण वाढला आता).
            
            दिवस पहिला - लडाखच्या राजधानीत प्रवेश
        
        मुंबईहून आमचं विमान फारच आडनिड्या वेळेला म्हणजे पहाटे ५ वाजता होतं. त्यामुळे मग आम्ही १२ वाजताच एअरपोर्ट वर जाऊन थांबायचं ठरवलं (निदान तिथे जाऊन तरी थोडी झोप घेता येईल म्हणून).  आयत्या वेळेला आमच्या पैकी एकाला काही कारणामुळे ट्रिप कॅन्सल करावी लागली, आम्ही उरलेले ५ जण (त्यातले २ पुण्याहून आले होते) आमच्या निर्धारित गेट जवळ येऊन बसलो, पण कोणालाच झोप मात्र मिळाली नाही. ना तिथे, ना विमानात, ना दिल्लीच्या विमानतळावर.  
            
            साधारण १२ च्या सुमारास आम्ही लेह ला पोहोचलो. आमच्या गाड्या बाहेर १०० मीटर अंतरावर पार्किंग मध्ये होत्या, जायला थोडी चढण होती. हवा चांगली थंड होती तिथे, पण बॅगा घेऊन तिथपर्यंत जातांना धाप लागली थोडी. आमचा होमस्टे हा एअरपोर्ट पासून साधारण ८-१० किमी अंतरावर असणाऱ्या चोगलाम्सार नावाच्या गावात होता. बाहेर ट्रॅफिक नसल्याने आम्ही १२:३० ला तिथे पोहोचलो. 
            
            सामान खोलीत ठेऊन आम्ही लगेचच जेवणासाठी जमलो. रात्रभर नीट झोप न झाल्याने जेवून लगेच मस्त ताणून द्यायची असा बेत होता. तसंही आजचा दिवस नुसता आरामच करायचा होता आम्हाला (acclimatization म्हणजे वातावरणात जुळवून घेण्यासाठी ते आवश्यक होतं).  
            
            जेवल्यावर लगेचच आम्ही विश्रांती साठी गेलो, आणि तो पर्यंत श्वासही अगदी व्यवस्थित झाल्यासारखा वाटत होता. मधेच ३ वाजता मला जाग आली आणि पटकन उठून बाथरूम मध्ये गेलो, आत शिरलो आणि एकदम चक्कर आली. आधी काही कळलं नाही पण मग लक्षात आलं कि आपण लेह मध्ये आहोत. त्यामुळे सुरुवातीला सगळ्या हालचाली थोड्या स्लो-मोशन मध्ये करायला पाहिजे होत्या. नेहमीच्या सवयीने पटकन उठलो आणि बहुतेक त्यामुळेच चक्कर आली. पण मिनिटभर शांत राहिल्यावर थोडं ठीक वाटलं.  
            
            त्यानंतर मात्र पुढील हालचाली संथपणे केल्या. संध्याकाळी चहा घेऊन मग आम्ही जवळच्या मार्केट मध्ये एक फेरफटका मारून आलो. फार लांब गेलो नाही पण १०-१५ मिनिटे चालणं झालं.  
        
                
                ७:३० वाजता आमचं रात्रीचं जेवण झालं (इथे राहिलो त्या बहुतेक सगळ्या दिवशी आमची रात्रीच्या जेवणाची हीच वेळ होती) आणि ९ पर्यंत आम्ही निद्रादेवीच्या आधीन झालो देखील. पण त्याआधी आम्ही उद्याच्या सकाळची थोडी तयारी करून ठेवली होती (कॅमेरा/ ट्रायपॉड आणि कपड्यांची तयारी).
        
        दुसरा दिवस: लेह मधले पक्षी
        
        ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे जण ६ वाजता तयार होतो आणि लगेचच चहा-बिस्कीट खाऊन गाडीत जाऊन बसलो. आमच्या मोठ्या प्रवासासाठी आम्ही एका टेम्पो ट्रॅव्हलर ठरवला होता पण इथे अंतर कमी असल्यामुळे आम्ही २ छोट्या गाड्या घेऊन निघालो. इथे आमचे गाईड म्हणून आमचे होमस्टे चे मालक श्री. फुनचोक सेरिन्ग हे स्वतःच होते (ह्यांचा उल्लेख मी ह्या ब्लॉग मध्ये PT  अशा त्यांच्या नावाच्या initials  प्रमाणे केला आहे). 
            
            आमचा आजचा दिवस सुद्धा acclimatization चाच भाग असल्यामुळे आम्ही फार लांब कुठे जाणार नव्हतोच. त्याच बरोबर आम्ही आज अजून उंचीवर कुठे जाणार नव्हतो. तसं पाहिलं तरं लडाख म्हणजे वाळवंट किंवा उघडे/बोडके डोंगर असलेला प्रदेश पण इथेही काही गवताळ/झाडे असलेले भाग आहेत (बहुतेक वेळा जवळून वाहणाऱ्या नद्यांमुळे). त्यातल्याच शेय ह्या भागात आम्ही निघालो होतो. आमचं मुख्य लक्ष्य होतं लांब चोचीचा आयबीसबिल (Ibisbill). इथल्या उथळ पाण्याच्या भागात ते बरेचदा दिसतात. ह्या उथळ पाण्यातल्या दगड-धोंड्यांमध्ये ते अगदी छान लपू शकतात. त्यामुळे जाता जाता २-३ ठिकाणी गाडी थांबवून PT ने खाली उतरून टेहळणी केली. पण आज ते कुठेच दिसत नव्हते.  
            
            थोडं पुढे गेल्यावर आम्ही सगळेच खाली उतरून एका गवताळ भागाकडे गेलो. इथे पक्ष्यांचे बरेच आवाज येत होते. छोटे-छोटे पक्षी दिसत होते पण इथल्या भागात काही नवे पक्षी दिसण्याची शक्यता असल्याने आम्ही थोडं फिरायचं ठरवलं. अगदी लगेचच आमची नजर पडली ती Chiffchaff ह्या चिमणी सारख्या पक्षावर. आपल्या इथे दिसतो तो कॉमन Chiffchaff पण इथे दिसतो Mountain Chiffchaff. थोडी अजून शोधाशोध केल्यावर असे ३-४ Chiffchaff नजरेस पडले. जवळच मग एक Bluethroat (निळकंठ) ची जोडी दिसली, २-३ Common Rosefinch दिसले. अचानक हवेत एक पाकोळी उडतांना दिसली. लगेच कॅमेरा सरसावला आणि २-३ फोटो काढले. बरं झालं, फोटो घेतलं कारण नंतर तज्ज्ञांना फोटो दाखवला तेव्हा त्यांनी Common Swift असल्याचं सांगितलं. चला तेवढेच २ lifers झाले सुद्धा.   
        
                
                
                
        इथे आम्ही साधारण अर्धा पाऊण तास फिरलो, तेवढ्यात PT  ला फोन वर कळलं (दुसऱ्या गाईड कडून) कि सिंधू घाटाच्या जवळ ४ Ibisbill  दिसत होते. आम्ही लगेचच गाडीत बसलो आणि त्या दिशेने निघालो. आम्ही गेलो तेव्हा तो गाईड तिथेच होता पण त्याच्याकडून कळलं कि पक्षी उडून अजून थोडे पुढे गेले होते. आम्ही थोडं थांबून अंदाज घेतला पण तिथे जास्त थांबून काही फायदा झाला नसता त्यामुळे तिथून पक्षी ज्या दिशेला गेले होते तिथे निघालो. आमचा गाईड इथला माहितगार असल्यामुळे त्याने गाडी मुख्य रस्ता सोडून एका कच्च्या रस्त्याकडे वळवली. त्यामुळे मग आम्ही त्या नदीप्रवाहाच्या बरोबरीने पुढे जाऊ शकलो (त्याला समांतर). 
            
            आमच्या गाईड ला साधारण अंदाज आला होता कि Ibisbill कुठे गेले असतील, पण तेवढ्यात आम्हाला त्याच दिशेने जाणारा एक ट्रक दिसला (कामगारांना घेऊन जाणारा). आता हे सर्व जण पण त्याच दिशेने जाणार असतील तर मात्र पक्षी तिथे थांबण्याची शक्यता नव्हती. पण नशिबाने त्यांच्या कामाची जागा थोडी आधीच होती. आम्ही पुढे गेलो आणि जवळच आम्हाला दगडांमध्ये मिसळून गेलेले Ibisbill दिसले. आधी १-२ फोटो सगळ्यांनी काढून घेतले आणि मग सावधपणे पुढे निघालो, त्यांच्या जेवढ्या जवळून फोटो घेता येईल तेवढं बरं. दर थोड्या पावलांवर आम्ही फोटो काढत होतो. एका ठिकाणी आल्यावर, अभय म्हणाला आता अजून जास्त पुढे जाऊ नका कारण मग ते उडून जातील.  मग जमतील तसे फोटो तिथे घेतले आणि आम्ही मागे फिरलो. 
        
                
                तिथून मुख्य रस्त्याकडे परत येतांना मधेच आम्हाला मस्त लाल रंग असलेला Common Rosefinch चा नर दिसला. जवळच अजून एक रेडस्टार्ट दिसला. तो नक्की कुठला पक्षी होता ह्यबाबत बरीच चर्चा झाली पण शेवटी असं कळलं कि ते Black Redstart चं पिल्लू असावं.
                
                
        तो पर्यंत ९ वाजले होते. आता आमच्यासमोर २ पर्याय होते. एक तर लगेच होमस्टे वर परत जायचं ब्रेकफास्ट साठी किंवा अजून थोडा वेळ भटकायचं पक्षांसाठी. आमच्या आजच्या लक्ष्यांपैकी २-३ पक्षी अजून बाकी होते पण ब्रेकफास्ट करून परत यायचं म्हंटल तर तो पर्यंत ऊन खूप वाढलं असतं आणि मग फोटोग्राफी नीट झाली नसती. आता खरंतर थोडी भूक लागली होती, पण तरीही आम्ही सर्वांनीच थांबायचं ठरवलं. 
            
            आम्हाला आता अपेक्षा होती ते दोन कावळे वर्गातले पक्षी बघण्याची. पहिला Carrion crow (नावाप्रमाणेच मेलेली जनावर हे त्याचं प्रमुख खाद्य). आणि दुसरा होता Eurasian Magpie. ह्याला खरंतर आम्ही सकाळपासून २-३ वेळा बघितलं होतं पण चांगले फोटो मिळालेलं नव्हते. Eurasian Magpie म्हणजे तिथे अगदी आपल्या कावळे-चिमण्यांसारखा सगळीकडे दिसणारा पक्षी. 
            
            आमचं नशीब जोरावर होतं, थोडी शोधाशोध करावी लागली पण फार धावपळ नं होता आम्हाला दोघांचेही बऱ्यापैकी फोटो मिळाले. त्यामुळे आम्ही १०:३० वाजेपर्यंत ब्रेकफास्ट साठी पोहोचलो देखील. 
        
                
                
                ब्रेकफास्ट नंतर संध्याकाळ पर्यंत आमच्याकडे आराम करण्याशिवाय दुसरं काही काम नव्हतं. पण आमच्या होमस्टे च्या आवारातच काही फुलझाडं होती, तिथे आम्हाला फुलपाखरं, भुंगे, चतुर अशी बरीच मंडळी बागडताना दिसली. खरंतर बाहेर ऊन खूप जास्त होतं पण तरीही जेवणापूर्वी आम्ही बाहेर जाऊन त्यांचे काही फोटो काढलेच.
                
                
                
        आमचा यजमान PT ह्याच आमच्या हालचालींकडे लक्ष होतं आणि त्याच्या मते आम्ही फक्त आराम करणं गरजेचं होतं. त्यामुळे मग आम्ही दुपारी ३:३० ऐवजी ४ वाजता निघालो. 
            
            आमचं संध्याकाळचं मुख्य लक्ष्य होतं Eurasian Hobby. आमच्या होमस्टे पासून साधारण वीस एक किलोमीटर अंतरावर एक उंच झाडांचा भाग होता तिथे गेल्या काही दिवसात Hobby दिसले होते. तिथे जात असतांना रस्त्यात एका ठिकाणी आपला हळद्या पक्षी उडतांना दिसला. इथे Eurasian Golden Oriole सुद्धा दिसू शकतो असं कळलं, त्यामुळे मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबायचं ठरवलं. 
            
            तिथे थांबलेलो असतांना आम्हाला एक cuckoo (कोकीळ वर्गातील) दिसली. आमच्या पासून लांब असणाऱ्या एका विजेच्या तारेवर होती, फोटो काढून बघितलं तर ती बहुतेक Common Cuckoo होती. तिथे २-३  Magpies पण दिसले. हे सगळं होईपर्यंत त्या oriole चा काहीच पत्ता नव्हता. तो पर्यंत आमचे गाईड्स हे गाडी घेऊन पुढे गेले होते (हॉबी च्या शोधार्थ). त्यामुळे अजून वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. 
            
            पण थोड्या वेळात ३ oriole आले तिथे. त्यातला एकही European नव्हता, त्यामुळे थांबून काही फायदा झाला नाही. नाही म्हणायला तिथे थोडी landscape फोटोग्राफी झाली म्हणा. 
        
                
                
                
                
        थोड्या वेळात आमचे गाईड परत आले, पण त्यांना एकही हॉबी दिसला नव्हता. आमच्याकडे तसा अजून वेळ होता (दिवस संपेपर्यंत) त्यामुळे मग आम्ही सर्वांनी मिळून परत प्रयत्न करायचं ठरवलं. 
            
            तिथे गेल्यावर आम्ही सगळा परिसर बारकाईने बघायला सुरुवात केली, आणि गंमत म्हणजे ह्या वेळेला आमच्या गाईडला लगेचच एक हॉबी दिसला. सगळ्यांचे फोटो काढून होतात-न-होतात तेवढ्यात अजून एक (थोडा मोठा) फाल्कन उडत येताना दिसला. आणि अजून एक हॉबी त्याचा पाठलाग करत होता. पटकन दुर्बीण काढून बघितलं तेव्हा दिसलं पुढचा पेरेग्रीन फाल्कन होता. थोड्या वेळाने आम्हाला अजून एक हॉबी (उंच झाडावर बसलेला) दिसला. 
        
                त्यानंतर अभय चा विचार होता कि आपण लेह मार्केट फिरून येऊ पण PT चं आमच्याकडे व्यवस्थित लक्ष होतं. त्याने आम्हाला त्या पासून परावृत्त केलं (जास्त दगदग करणं आमच्यासाठी धोक्याचं ठरू शकलं असतं म्हणून). आणि तसंही उद्या पहाटे ४ वाजता आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे झोप पूर्ण होणार नव्हतीच. जाताजाता आम्ही फक्त १-२ ठिकाणी थांबून सभोवताल दिसणारी विहंगम दृश्ये कॅमेरात टिपली. तिथे सभोवताली डोंगर तर होतेच पण एका छोट्या टेकडीवर असलेली सुंदर मोनॅस्टरी सुद्धा होती.
                
                
        अंधार पडायच्या आत आम्ही होमस्टे ला परत आलो. जेवण नेहमीप्रमाणे ७:३० ला झालं. सकाळी ४ वाजता निघायचा आमचा बेत होता, त्यामुळे लवकर झोपणं क्रमप्राप्त होतं. सकाळी आम्ही पॅंगॉन्ग सरोवराच्या (इथल्या स्थानिक भाषेत Tso म्हणजे सरोवर) जवळ असणाऱ्या मेराक ह्या गावात जाणार होतो. तिथली समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण १४५०० फूट, म्हणजे आम्ही अजून ४००० फूट वर जाणार होतो. 
            
            तिथे जाण्यासाठी आम्ही चांग-ला खिंड पार करणार होतो. त्याची उंची आहे १७६८८ फूट. आणि अशा उंचीवरचा डोंगराळ प्रदेश म्हणजे Snowcock ह्या पक्षांसाठी अगदी योग्य अधिवास (habitat).  इथले डोंगर जरी बहुतांशी उघडे/बोडके असले तरीही, त्यात थोडं खुरटं गवत मधेमधे उगवतंच. त्या गवत बियांवर ह्या पक्ष्यांची गुजराण होते. अर्थात डोंगरांवर जेव्हा बर्फ जास्त असतो, तेव्हा बहुतेक त्यांना थोडं खाली यावं लागत. पण सप्टेंबर महिन्यापर्यंत बराचसा बर्फ  वितळलेला असतो. सकाळच्या कोवळ्या उन्हातच हे Snowcocks दिसण्याची शक्यता जास्त असते. थोडं ऊन वाढलं कि मग शिकारी पक्षांचा (सोनेरी गरुड - Golden Eagle) धोका संभवतो, त्यामुळे मग हे कोंबडी वर्गातले पक्षी कुठल्यातरी  मोठ्या खडकाखाली आसरा घेतात (त्यामुळे मग ते दिसणं जवळजवळ अशक्य होतं). 
            
            त्यामुळे आमच्यासाठी तिथे दिवस उजाडतांना  पोहोचणं गरजेचं होतं. म्हणजे मग आम्हाला पुढचे तास-दोन तास Snowcocks ची शोधाशोध करायला मिळाले असते. आणि साडे-सहा वाजता तिथे पोहोचायचं तर निदान ४:३० ला तरी निघावं लागणार होतं (म्हणजे त्याच्या थोडं आधी उठावं लागणार होतं). त्यात आम्ही पुढे ३ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहणार होतो, त्यामुळे बॅग रात्रीच पॅक करून ठेवली आणि नेहमीप्रमाणे ९ वाजता झोपलो.   
        
        
            
        दिवस तिसरा:  मुहुर्तालाच माशी शिंकली
        
        आम्ही अगदी मस्त प्लांनिंग करून ९ वाजता झोपायला गेलो खरे पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना नव्हती. बहुतेकदा मला अगदी गाढ झोप लागते, म्हणजे अगदी सकाळी उठेपर्यंत काही जाग-बिग येत नाही. पण इथे आल्यापासून झोप थोडी अनियमित होती, म्हणजे मधेच जाग येणं वगैरे. तसं ह्या रात्रीही १-२ वेळा झालं पण रात्री १ च्या सुमारास जी जाग आली, ती परत काही केल्या झोप येईना. थोडं सर्दी मुळे नाक बंद झाल्यासारखं वाटत होतं पण सहसा ह्याही परिस्थितीत मला नेहमीच झोप लागते. इथे मात्र काही केल्या झोप येतंच नव्हती. आणि इथे ना, नुसती कूस बदलायची झाली तरी थोडी धाप लागते (कदाचित इथल्या जाड ब्लॅंकेट मुळे असेल).  
            
            थोड्या वेळाने मी असंच उठून खोलीतच थोड्या फेऱ्या मारल्या, दीर्घ श्वसन करून बघितलं.. पण छे, काही फायदा नव्हता. थोड्या वेळात माझ्या असं लक्षात आलं कि गुरु (मी आणि गुरुनाथ एका खोलीत होतो) सुद्धा जागा आहे (किंवा कदाचित त्याला माझ्या हालचालींमुळे जाग आली असावी). पण त्याचीही तीच अवस्था झाली. झोप येत नाही म्हणून आम्ही मग दिवे लावून उगीचच काल काढलेले फोटो कॅमेऱ्यात बघितले. आदल्या संध्याकाळी आमच्या खोलीतच चहा आणून दिला होता, त्या थर्मास मध्ये अजून थोडा चहा होता, मग तो घेतला (बऱ्यापैकी गरम राहिला होता). 
            
            झोपतांना आम्हाला वाटत होत कि ३ वाजता उठणं म्हणजे कठीण होणार पण इथे आम्ही कधी ३ वाजत आहेत ह्याची वाटच बघत होतो. ४ ठरलं होत तरीही आम्ही ३:३० वाजताच तयार होऊन बसलो होतो (अगदी बॅग गाडीत ठेवण्याच्या तयारीत आणि आमचे सगळे गरम कपडे अंगावर चढवून) .
            
            पुढच्या ३ दिवसांकरता नुरबू हा आमचा गाईड असणार होता (तो PT चा सख्खा पुतण्याचं होता आणि हळू हळू त्याच्या तालमीत तयार होत होता). त्यामुळे ४ वाजता तो तयार होता, पण त्याच बरोबर PT सुद्धा लवकर उठला होता. इथला स्वयंपाकी (अन्वर) ह्याने तर भल्या पहाटे उठून आमच्यासाठी न्याहारीची (packed) सोय सुद्धा केली होती. 
            
            निघतांना मग PT ने सगळ्यांच्या तब्येतीची चौकशी केली. आमची झोप झाली नसल्याने तो थोडा काळजीत पडला, कारण पुढचे ३ रात्री आम्ही अजून खूप उंचावर राहणार होतो, त्यामुळे इथल्या हवेत जर आम्ही स्थिरावलो नसलो, तर ह्याहून वर जाण कदाचित त्याला रुचलं नसावं. त्याने मग आम्हाला थोड्या जास्तीच्या सूचना केल्या (म्हणजे काय खबरदारी घ्यायची, काय टाळायचं, वगैरे). त्याने आमच्या बरोबर एक प्राणवायू चा बाटला देखील दिला होता. आणि तशीच वेळ आली तर तो वापरायचा कसा ह्याची नुरबू ला माहिती होती. 
        
        मला जर हि ट्रिप नव्याने प्लॅन करायची संधी मिळाली, तर नक्कीच मी अजून एक दिवस लेह येथेच राहून इथल्या कमी प्राणवायूशी जुळवून घेईन आणि मगच पुढे (अजून उंचावर) जायचा विचार करेन. 
          
        
            
            तिसरा दिवस: मेराक ला प्रयाण (पॅंगॉन्ग मार्गे)
        
        ठरल्याप्रमाणे आम्ही ४:१५ वाजता निघालो त्यावेळेस बाहेर पूर्ण काळोख होता. चांग-ला खिंडीला पोहोचायला निदान २ तास तरी लागणार होते. मी निघतांना avomine (घाट न लागण्यासाठीची गोळी) घेतली होती, त्यामुळे तेवढ्या वेळात थोडी झोप मिळाली. 
            
            अचानक मला जाग आली ती कोणाच्यातरी ओरडण्यामुळे. बघतो तर समोर एक चुकर partridge ची फॅमिली रस्ता ओलांडत होती. काय मस्त दृश्य होत ते, पण कॅमेरा काढण्यात अर्थ नव्हता, कारण प्रकाश खूपच कमी होता. हं, कदाचित मोबाइलला वापरून काढता आला असता फोटो, पण ते सुचलं नाही तेव्हा. तिथून पुढे २-३ वेळा आम्हाला Chukar Partridge दिसले, पण अजूनही बाहेर बराच काळोख होता, त्यामुळे कोणालाही फोटो मिळाला नाही. अभय ने सर्वांना अश्वस्त केलं कि, हा खूप सहज दिसणारा पक्षी आहे, आपल्याला आरामात ह्याचे फोटो मिळतील नंतर (पण दुर्दैवाने हे पूर्ण ट्रीपभर कधीच झालं नाही).    
            
            थोडं उजाडल्यावर मग एक एक पक्षी दिसायला सुरुवात झाली. अगदी पहिला फोटो काढला रॉबिन accentor चा. हे हिमालयात राहणारे पक्षी मस्तपैकी तिथल्या खडकाळ डोंगरात फिरून खुरट्या गवतात आपले भक्ष्य शोधत होते. थोड्याच वेळात आमच्या गाईडने एक हिमालयन स्नोकॉक शोधला. आम्ही लगेच फोटो काढायला सरसावलो, पण अभय च्या मते तो खूप उंचावर असल्याने फोटो नीट मिळाले नसते. त्याच्या मते "आपण ह्या वळणा-वळणाच्या घाट रस्त्याने थोडे वर जाऊ, म्हणजे आपल्याला समोर फोटो मिळेल". त्यामुळे आम्ही तिथे न थांबता पुढे वर निघालो, पण वर जाईपर्यंत तो पक्षी तिथून गायब झाला होता. मग थोडा वेळ शोधाशोध करून आम्ही पुन्हा खाली आधीच्या जागी जायचं ठरवलं पण नंतर आम्हाला कुठेही त्याचं दर्शन झालं नाही. माझं नशीब एवढच कि, कि मी आधीच एक फोटो चालत्या गाडीत काढून घेतला होता (आपला नेहमीचा विचार - न जाणो, नंतर नाही मिळाला तर!!) .    
        
                
                हे सगळे आम्ही गाडीच्या आत राहूनच करत होतो, कारण तिथे गाडी थांबण्याइतका रस्ता रुंद नव्हता. आणि तसंही, खाली उतरल्यावर पक्षीही समोर थांबले नसते. गाडीतूनच आम्ही थोडी landscape फोटोग्राफी सुद्धा केली. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला गवतात काही हालचाल जाणवली, नीट बघितल्यावर तिथला ससा (Woolly Hare) दिसला. तो अगदी सावधपाने सगळीकडे नजर ठेवून होता आणि मधेच आमच्याकडे सुद्धा बघत होता.
                
                पुढे ८ वाजेपर्यंत आम्ही snowcock चा शोध घेतला पण त्यांचं एकदाही दर्शन झालं नाही. त्यांचा रंग आजूबाजूच्या परिसरात इतका छान एकरूप होतो कि बरेच वेळा तर ते समोर असले तरी दिसत नाहीत. आता आम्ही चांग-ला खिंडीच्या सर्वात वरच्या पॉईंट वर पोहोचलो होतो. त्याची उंची १७६८८ फूट (असं समोरच्या दगडावर लिहिलेलं होतं). हा बहुतेक सर्वच प्रवाशांचा ग्रुप फोटो पॉईंट असावा. आम्ही खाली उतरलो तेव्हा एक ग्रुप तिथे होताच. थोडं थांबून मग आम्हीही फोटो घेतले. खाली उतरल्यावर अचानक खूप थंडी जाणवली. नशीब, आम्ही लोकरीचे हात मोजे बरोबर घेतले होते. फोटो काढण्याकरता सुद्धा ते हातातून काढायची हिम्मत होत नव्हती.
                
            थोडं थांबून आम्ही त्या थंडीची मजा घेतली,  आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढ्या उंचावर उभा होतो (आमच्या पैकी बहुतेक सगळेच). पण थंडी फारच बोचरी होती, त्यामुळे मग गुपचूप परत गाडीत बसलो. 
            
            चांग-ला खिंडीपासून मग आमचा खाली उतरण्याचा प्रवास सुरु झाला. आमचं गंतव्य स्थान हे खाली १४५०० फुटांवर होतं ना. साधारणतः खाली उतरताना घाट लागण्याचा त्रास जास्त होतो, पण सुदैवाने इथे तसं काही झालं नाही. थोडं उतरल्यावर आम्हाला एक पठारासारखा सपाट प्रदेश लागला (भोवताली डोंगर होतेच पण इथे बराच सपाट रस्ता होता). इथे परत एकदा पक्षी दिसायला सुरुवात झाली. मग इथे आम्ही White-winged Redstart चे फोटो काढले. हा बराचसा सत्ताल वगैरे भागात दिसणाऱ्या White-capped Redstart सारखाच होता, फक्त पंखांवर पांढरा  दिसणारा भाग हा वेगळा होता. इथे खूप सगळे रेडस्टार्ट आणि accentors होते. 
        
                
                
        आता ९ वाजले होते आणि तशी भूकही लागली होती.  मग एक छोटं रेस्टॉरंट कम टी स्टॉल असं बघून आम्ही तिथे थांबलो. आमच्याकडे तसाही packed ब्रेकफास्ट होताच. इथेही थंडी होती पण चांग-ला खिंडी पेक्षा बरीच कमी, आणि त्यात थोडा गरम चहा पोटात गेल्यावर अजून बरं वाटलं. आमचं टेबल तसं मोकळ्यावरच होतं त्यामुळे आमचा गाईड आजूबाजूला लक्ष ठेवून होता. त्याने आम्हाला खूप उंचावरून जाणारा शिकारी पक्षी दाखवला, पटकन कॅमेरा घेऊन १-२ फोटो काढले. खूप उंचावर होता पण ते गिधाड होतं  Lammergeier नावाचं (त्यालाच  Bearded Vulture किंवा दाढीवालं गिधाड असंही म्हणतात)   
            
            त्या चहाच्या टपरीला लागून शेणाच्या गोवर्यांनी रचलेली एक छोटी भिंत होती. तिथे जवळपास काही पक्षी दिसत होते म्हणून मग आम्ही आता तिथे मोर्चा वळवला. एक पक्षी थोडा वेगळा वाटत होता (म्हणजे तसे इथले सगळेच पक्षी वेगळे होते म्हणा, पण हा आत्तापर्यंत बघितलेल्यांपेक्षा वेगळा वाटत होता). मग फोटो काढून त्यावरून ओळखण्याचा प्रयत्न झाला. बहुतेक ते आधी दिसलेल्या Robin Accentor चं पिल्लू असावं. थोड्या वेळाने जेव्हा त्याला एका पालक पक्षाने भरवलं, तेव्हा मग खात्रीच पटली.  
            
            तेवढ्यात त्या दाढीवाल्या गिधाडाने परत एन्ट्री घेतली. आत्ताही ते खूपच वर होतं. आम्ही आशेवर होतो कि ते कुठेतरी खाली उतरेल पण तसं काही झालं नाही. घिरट्या घेत घेत ते गिधाड मागच्या वेळेसारखंच डोंगराच्या आड गेलं. 
        
                
                
        आमची नजर त्या गिधाडाकडे होती तेव्हा तिथे अजून २ काळे पक्षी उडतांना दिसले (डोंगराच्या बॅकग्राऊंड मध्ये ते लपून जात होते).  एवढ्या लांब (आणि छोटे) दिसत होते कि फोटो काढण्यात काही अर्थ नव्हता. मग दुर्बिणीतून बघून ते Red-billed Chough आहेत असं कळलं.  
            
            इथली एकूणच पक्ष्यांची हालचाल बघून आम्ही तिथे अजून थोडा वेळ थांबायचं ठरवलं. जवळच्या गवताळ भागात आम्ही चालत फिरलो तेव्हा आम्हाला चंडोल (lark)  जातीतला एक नवा पक्षी दिसला.  हा होता Horned Lark. इतर चंडोल पक्षांप्रमाणे हा सुद्धा गवतात चालत आपलं भक्ष्य शोधत होता. थोड्या वेळात आम्हाला ३ Horned Lark दिसले. त्यातलं एक बहुतेक पिल्लू होतं आणि बाकी दोन वयस्क. एका ठराविक कोनातून  बघितलं (वयस्क पक्ष्याला) तर डोक्यावरची पिसं थोडी शिंगांसारखी वाटतात म्हणून हे नाव. 
        
                
                
        त्यांचे फोटो झाल्यावर आम्ही पुढे निघालो. आम्हाला मेराक पर्यंत जायला अजून बरंच अंतर कापायचं होतं. आत्ता पर्यंत रस्ते बरेच चांगले होते. खूप रुंद नव्हते तसे, पण इथे फारशी रहदारी सुद्धा नव्हती, त्यामुळे कुठेही ट्रॅफिक लागला नाही. इतका वेळ आमच्या बाजूला फक्त डोंगर रांगा होत्या पण आता एक नदी आमच्या बाजूने वाहत होती. नदी म्हणण्यासारखं मोठं पात्र नव्हतं पण वाहतं पाणी होतं आणि दगड-धोंड्यातून वाहणारा प्रवाह होता. हा म्हणजे डीपर पक्षांसाठी अगदी योग्य परिसर होता. अभय च्या मते इथे White-throated Dipper दिसायची खूप शक्यता होती. पण नुरबू (आमचा गाईड) ला मात्र आज पर्यंत ह्या भागात White-throated Dipper दिसले नव्हते. 
            
            नदीचा प्रवाह आमच्या पासून थोडा खाली होता (साधारण ४०-५० फुट खाली). तिथे आम्हाला एका पक्षाची हालचाल जाणवली. पण एवढं खाली उतरून बघायला  जायचं म्हणजे तेवढं परत चढून यावं लागणार कि! आणि इथे कमी oxygen मधे तर ते खूपंच कठीण. पण नुरबू आणि ओंकार ह्यांनी तयारी दाखवली, ते लगेच निघाले देखील. आम्ही वरूनच त्या भूभागाची पाहणी केली आणि मग असं ठरवलं कि पुढच्या वळणावरून उतरलो तर एवढं खाली पायी उतरावं लागणार नाही.  मग गाडी घेऊन आम्ही तिथे गेलो आणि तिथून हळू हळू खाली उतरलो. 
            
            एवढी मेहनत केली, पण त्याचं फळं मिळालं. एक White-throated Dipper चं पिल्लू दिसलं आम्हाला त्या पाण्याजवळ. जिथे पाणी असतं तिथे थोडी हिरवळ असते बहुदा आणि तसं इथेही होतं. त्या बॅकग्राऊंड वर एक रेडस्टार्ट चा हि चांगला फोटो मिळाला. 
        
                
                तिथून पुढे निघाल्यावर थोड्याच वेळात आमच्या गाईडला अजून एक डीपर दिसला. इथला पाण्याचा प्रवाह रस्त्यापासून जरा जवळ होता. लगेचच सगळे जण परत खाली उतरले (पण मी मात्र गाडीतच थांबलो, तो पर्यंत मला थोडं बरं वाटतं नव्हतं.. अंगात ताप असल्याप्रमाणे). थोड्याच वेळात एक पिल्लू आणि त्याचा एक पालक पाण्याजवळ दिसले. ते आपल्यातच मग्न होते, आणि त्यांचं आमच्या खाली उतरलेल्या पार्टीकडे अजिबात लक्ष नव्हतं, त्यामुळे अगदी जवळून फोटो मिळाले.
                
                
        इथला आमचा रस्ता बराचसा ओसाड होता, म्हणजे रस्त्याच्या बाजूला कुठलीही वस्ती नव्हती. पण साधारण १:३० च्या सुमारास एक छोटं गाव लागलं आणि तिथे एक छोटं हॉटेल (रेस्टॉरंट) दिसलं. तिचे जेवायला थांबलो तेव्हा मला पर्वतीय आजारपणाचं अजून एक लक्षण जाणवलं. काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती. तिथे मी फक्त २-३ ग्लास लिंबू सरबत पिऊ शकलो (दुपारचं जेवण म्हणून).    
            
            दुपारच्या जेवणानंतर आम्ही पॅंगॉन्ग कडे निघालो. अर्थात आम्ही काही त्या प्रसिद्ध जागेपाशी थांबणार नव्हतो (३ idiots ह्या पिक्चर मुळे प्रकाशात आलेलं ठिकाण) पण आम्हाला त्याच मार्गाने पुढे जायचं होतं. इथे काही भागात रस्ता खूपच खराब होता. काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू होती तर काही भागात रस्ता असा नव्हताच. त्यामुळे मग आम्हाला पुढे जायला जास्त वेळ लागला.  
            
            जसं-जसं आम्ही पॅंगॉन्ग तलावाच्या जवळ आलो, तसं भरपूर टुरिस्ट गाड्या (आणि लोकं सुद्धा) दिसायला लागले. एका ठिकाणी "Marmot Point" अशी पाटी होती, आणि तिथे लोक खाली उतरून मार्मोट च्या जवळ जाऊन फोटो घेत होते. मार्मोट म्हणजे इथे सहज दिसणारा उंदीर वर्गातला एक सस्तन प्राणी, पण हा आकाराने बराच मोठा असतो (उंदीर वर्गातला असला तरी मांजरी पेक्षाही मोठा असतो). इथले मार्मोट हे माणसांना खूपच सरावलेले होते. 
            
            एखादा मुक्त (जंगली) मार्मोट दिसला तर आम्ही लगेच फोटो काढायला गेलो असतो, पण इथले बहुतेक पाळल्यासारखेच होते. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक मार्मोट छान हवा खात बसलेला दिसला. अभय वगैरे लगेच खाली उतरले, आणि हळू हळू त्याच्या दिशेला गेले (शक्य तितक्या जवळून फोटो मिळावा म्हणून). पण आश्चर्य म्हणजे त्यांना बघून पळून जाण्या ऐवजी तो मार्मोट चक्क त्यांच्याच दिशेने आला (त्याला बहुतेक काहीतरी खायला देतील अशी अशा असावी). बहुतेक हा पण त्या मार्मोट पॉईंट चाच राहणारा असणार
        
                
                आम्ही जरी पॅंगॉन्ग जवळ थांबलो नाही तरीही वाटेत जातांना आम्हाला पाण्याचे आणि जवळच्या डोंगरांचे चांगले फोटो मिळाले. ज्ञानेश्वर आणि गुरुनाथ दोघांनाही landscape फोटोग्राफी मध्ये खूप रस होता, पण त्याकरता पाण्याच्या जवळ जावं लागलं असतं आणि त्यात बराच वेळ गेला असता. आम्हाला मेराक ला लवकर पोचायचं होत कारण तिथले काही पक्षी संध्याकाळच्या आत शक्य झालं तर बघायचे होते. त्यामुळे मग आम्ही landscape साठी थांबलो नाही. अभय ने त्यांना थोडा दिलासा दिला कि उद्या सकाळी आपण थोडा वेळ त्यासाठी देऊ शकतो, कारण मेराक सुद्धा त्याच तळ्याच्या काठावर आहे.
                
                पुढे मेराक कडे जातांना एका छोट्या टेकडीपाशी आम्हाला खूप सगळी कबुतरं उडत आलेली दिसली. आम्ही तर कबुतरं समजून दुर्लक्ष करणार होतो, पण अभय ने गाडी थांबवायला सांगितली. ती सगळी पर्वतीय कबुतरं (Hill Pigeons) होती. मग मात्र आम्ही सगळ्यांनी कॅमेरे सरसावले. अभय च्या मते त्या थव्यात एक snow pigeon होतं पण फोटो बघून किंवा दुर्बिणीत सुद्धा तसं दिसलं नाही.
                
        आम्ही ४ वाजण्याच्या सुमारास मेराक ला पोहोचलो, पण तिथल्या होमस्टे मध्ये न जाता आम्ही आधी पक्षी बघायला जायचं ठरवलं. तिथलं लक्ष्य होतं Chinese Rubythroat. आम्ही जात होतो तो रस्ता गावात असणाऱ्या एका शेतातून जाणारा होता, त्यामुळे शेवटपर्यंत आमचा टेम्पो ट्रॅव्हलर जाऊ शकला नाही. त्यामुळे मग तिथून पुढे पायी चालत जायचं असं ठरलं. माझी तर अजिबात चालायची तयारी नव्हती, शक्य तेवढ्या लवकर होमस्टे ला जाऊन विश्रांती घ्यावी असं मला वाटत होतं. आणि त्यातून मी  Rubythroat आधी आसाम मध्ये बघितला होता, त्यामुळे मग मी गाडी पाशीच थांबलो. ज्ञानेश्वर सुद्धा माझ्याबरोबरच होता (त्यालाही थोडा त्रास झाला होता).  
            
            थोड्या वेळानंतर गाडीत बसून सुद्धा कंटाळा येत होता, त्यामुळे मग खाली उतरून तिथेच काही पक्षी दिसतात का ते बघितलं. तिथे एक Horned Lark दिसला. बहुतेक तो संध्याकाळ होण्यापूर्वीचं खाण गोळा करण्यात मग्न होता. त्यामुळे मला बऱ्याच जवळ जाऊन फोटो घेता आले.  
            
            तेवढ्यात मला अभय आणि गुरुनाथ ची हाक ऐकू आली. त्यांना तिथे Tibetan Partridges दिसले होते. हा मात्र माझा लाइफर (आत्तापर्यंत ना पाहिलेला पक्षी) होता, त्यामुळे मग मी तिथे जायचं ठरवलं. थोडा वेळ तिथे वाट बघितली पण ते कोंबडी फॅमिलीतले पक्षी झाडीत लपलेले होते. आत्ता पर्यंत, नुरबू Rubythroat च्या शोधात अजून पुढे गेला होता. त्याला तेथे Rubythroat दिसला होता, मग सगळी पार्टी तिकडे निघाली (परत एकदा मी होतो तिथेच थांबलो). ह्या वेळी मात्र माझ्या थांबण्याचा फायदा झाला. जरा वेळाने ३-४ Partridges थोडे बाहेर आले. अगदी समोर नव्हते, पण तेवढ्यात काही फोटो काढून घेतले. 
            
            आणि त्या पक्ष्यांनी फक्त तेवढी एकच संधी दिली फोटो साठी. सगळे जण परत आल्यानंतर आम्ही बराच वेळ वाट बघितली पण बहुतेक ते झुडुपांखालून लांब निघून गेले असावेत. मग मात्र आम्ही होमस्टे वर जायचा निर्णय घेतला. 
        
                
                दिवस संपता संपता आम्ही आमच्या होमस्टे ला पोहोचलो. खोलीत गेल्यावर थोडं उबदार वाटत होतं (बाहेर बराच गारठा होता). इथेही आमच्या खोल्यांबाहेर एक सीटिंग रूम सारखा एरिया होता आणि आम्हाला वाटलं कि लेह सारखं इथेही डिनर वगैरे इथेच ठेवत असावेत. पण दुर्दैवाने त्यासाठी बाहेर २०-३० मीटर वर असलेल्या डायनींग हॉल मध्ये जावं लागणार होतं. म्हणजे अंतर फार आहे अशातला भाग नाही, पण त्या थंडीत एवढं चालायला सुद्धा कठीण वाटत होतं, तिथे जायची वाट खूपच उंच-सखल होती, दोन छोटे नाले सुद्धा उडी मारून पार करावे लागत होते (त्यात आणखी बाहेर लाईट ची काही सोय नव्हती).
                
        खरंतरं तेव्हाच खूप दमायला झालं होत पण आम्ही डिनर करून मगच झोपायचं ठरवलं. डिनर म्हंटल खरं, पण परत एकदा भुकेचा प्रश्न होताच. गेलो तिथे तर जेवणात खीर होती. आता गोड म्हणजे माझ्या आवडीचं, त्यामुळे बाऊलभर खिरीचं जेवण झालं. पोळी/भाजी घेऊन बघितली, पण घश्याखाली काहीच अन्न जात नव्हतं. 
            
            तिथे बसून उद्या सकाळी काय करायचं ह्याची थोडी चर्चा झाली. Rubythroat दिसला असल्याने परत तिथे जायची गरज नाही असं सर्वानुमते नक्की केलं. त्यामुळे मग असं ठरलं कि सकाळी थोडं उशिरा ब्रेकफास्ट करून लगेच चेक-आउट करून हानले ला (पुढचा थांबा) निघायचं.
            
            परत एकदा दुसऱ्या दिवशीची तयारी करून आम्ही ९ वाजता झोपलो.   
        
            
            चौथा दिवस - हानले चा प्रवास
        
        ९ ला आम्ही झोपलो खरे पण दोन तासात मला जाग आली, आणि परत एकदा झोप उडालेली होती. निद्रानाश एवढा वाईट असतो हे मला पहिल्यांदाच कळत होतं. गुरुनाथ ची हि काही वेगळी अवस्था नव्हती. निद्रानाशाबरोबर आम्हाला एकदम घुसमटल्यासारखं पण वाटतं होतं, एवढं कि आम्ही सरळ खोलीची खिडकी उघडून ठेवली (बाहेरच्या थंडीचा विचार न करता). नक्की काय होतंय ते कळत नव्हतं पण हे सगळे त्या कमी प्राणवायू असण्याचेच परिणाम होते.    
            
            मग आम्ही बाहेरच्या कॉमन एरिया मध्ये गेलो आणि तिथेच झोपण्याचा प्रयत्न केला (वर दाखवलेल्या चित्रातली खोली). तीनच्या सुमारास बाहेर आलो आणि सहा पर्यंत तिथेच होतो, नशिबाने त्यात माझी थोडी झोप सुद्धा झाली. पण ६ ला मात्र उठलोच (आज लवकर जायचं नव्हतं तरीही). 
            
            खरंतरं आम्ही ९ पर्यंत निघायचा विचार करत होतो पण बघितलं तर सगळेच लवकर उठलेले होते (हा झोपेचा प्रॉब्लेम सर्वव्यापी होता). बाहेर चौकशी केली तेव्हा कळलं कि ब्रेकफास्ट ७:३० पासून मिळणार होता. मग आम्ही ठरवलं कि तो पर्यंत सगळं यावरून घेऊ, आणि ब्रेकफास्ट करून लगेच प्रवासाला निघू. 
            
            मेराक पासून हानले गाव साधारण दीडशे किलोमीटर वर आहे. तिथल्या रस्त्यांवर हे अंतर आम्ही बहुदा ४ तासात पार केलं असतं पण आमचे पक्षी-निरीक्षण थांबे विचारात घेतले तर संध्याकाळ पर्यंत तिथे पोहोचू असा आमचा अंदाज होता. 
            
            आमचं होमस्टे (खरंतरं सगळं मेराक गावंच) हे पॅंगॉन्ग तळ्याला अगदी लागून होतं. त्यामुळे आम्ही तळ्याच्या काठाने समांतर प्रवास चालू केला. पाचच मिनिटात आम्हाला २ कावळे डोंगराकडून (तलावाकडे) उडत येतांना दिसले (बहुतेक ते मोठ्या आकाराचे कावळे म्हणजे Raven होते). मग आम्ही गाडीतून उतरून तिथे थोडं थांबायचं ठरवलं. लांबून आम्हाला Raven चे फोटो मिळाले पण थोड्याच वेळात आम्हाला त्यांचे जवळून फोटो सुद्धा मिळाले.    
            
            आम्ही तिथे फिरत असतांना नुरबू ने एका वेगळ्या पक्षाचा आवाज ऐकलं, त्याचा मागोवा घेत तो खुरट्या झाडीच्या दिशेने गेला आणि आम्ही तळ्याकडे जात होतो. पण नुरबू ने लगेचच आम्हाला बोलावून घेतलं कारण त्याला तिथे Tickell’s Leaf Warbler दिसला होता. आम्ही गेलो तिथे पण तो पक्षी इतका चंचल होता कि फोटो काढणं हे महाकठीण काम झालं. तेवढ्यात आम्हाला एक Red-billed Chough दिसला, त्याचे मात्र फोटो त्यातल्या त्यात सहज मिळाले.  
        
                
                
                
        आम्ही इथे warbler चे फोटो काढत होतो, तो पर्यंत अभय आणि ज्ञानेश्वर हे अगदी तळ्याच्या जवळ पोहोचले होते. त्या खाजण जमिनीवरून एवढं अंतर खरंतर खूपच होतं त्यामुळे आम्ही ड्राइवर ला गाडी तिथे न्यायचा आग्रह करत होतो, पण त्याला खात्री नव्हती. न जाणो, कुठे भुसभुशीत जमीन असेल, तर गाडी अडकली असती. पण थोड्या वेळाने झाला तो तयार (थोड्या लांबच्या रस्त्याने गेलो, पण गाडीतून जायचं असल्याने आम्हालाही काही प्रॉब्लेम नव्हता). 
            
            तिथे गेल्यावर लगेचच एक सुंदर असं  Great-crested Grebe नावाचं बदक दिसलं. ते एकटंच तळ्यात विहरत होतं (बहुतेक पूर्ण वाढ झालेला पक्षी नव्हता). निळसर अश्या पाण्याच्या बॅकग्राऊंड मुळे त्याचे फोटो काढायला मजा येत होती,  मग आम्हाला ७ मोठ्या पक्षांचा थवा पाण्यावरून उडतांना दिसला, ती बदक आमच्यापासून साधारण किलोमीटर भर अंतरावर उतरली (तळ्याच्या आमच्याच बाजूला). मी आणि ओंकार हळू हळू चालत त्यांच्या बऱ्यापैकी जवळ गेलो, थोडे बरे फोटो सुद्धा मिळाले. ती सर्व पट्टकादंब (Bar-Headed Geese) होती.
        
                
                
        तिथे थोडे इतर फोटो (ग्रुप फोटोस, सेल्फी, वगैरे) काढले आणि मग आम्ही पुढे निघालो. काल दुपारपासून आमचा प्रवास हा बराचसा पॅंगॉन्ग तळ्याच्या काठाकाठाने होत होता. पण आता मात्र आम्ही दिशा बदलली. पॅंगॉन्ग हे प्रचंड मोठंअसं खाऱ्या पाण्याचं तळ आहे आणि त्यातला २/३ भाग हा चीन मध्ये आहे. त्यामुळे साहजिकच आम्हाला दिशा बदलावी लागली. आता हे तळ खाऱ्या पाण्याचं कसं? तर त्याचं उत्तर हिमालयाच्या जडणघडणीत आहे. युरोप ज्या भागावर आहे त्या, आणि आशिया खंड ज्यावर आहे त्या दोन भागांची टक्कर झाली आणि त्या भूकंपातून पुढे हिमालय निर्माण झाला.  त्या वेळी समुद्राचा जो भाग वर उचलला गेला, त्याचाच परिपाक म्हणजे अशी खाऱ्या पाण्याची तळी. 
            
            पुढे चुशुल ह्या गावापर्यंत रस्ता ठीकठाक होता पण त्यानंतर पुढचा जवळजवळ ५० किलोमीटर चा रस्ता म्हणजे अजिबातच रस्ता म्हणण्याच्या लायकीचा नव्हता. वाळवंटात माती आणि दगडधोंड्यातून आधी गेलेल्या वाहनांमुळे जे काही पट्टे निर्माण झाले होते, तोच रस्ता. इथे आम्हाला मोटारसायकल वरचे बरेच प्रवासी दिसले, कदाचित त्यांनी हे रस्ते मुद्दाम निवडले असावेत (off-roading experience घेण्यासाठी).  
            
            हा सगळा भाग सपाट पठाराचा होता (तसे लांबवर डोंगर दिसत होते म्हणा). तिथे काही गवताळ भाग सुद्धा होता, आणि काही ठिकाणी जरा पाणी पण दिसलं. हा परिसर म्हणजे लडाख मध्ये दिसणाऱ्या जंगली गाढवाचं राज्य. त्यांना इथे किआंग असं म्हंटल जातं. कच्छ च्या रणात दिसणाऱ्या जंगली गाढवांपेक्षा हे थोडे मोठे वाटले, जास्त चकचकीत सुद्धा होते.  
        
                
                
                इथे आमचं नशीब अचानक फळफळलं. ह्या ओसाड अश्या भागात ओंकार ला थोडी हालचाल जाणवली आणि त्याने ताबडतोब गाडी थांबवायला सांगितलं. त्याचा आत्मविश्वास बघून मग आम्ही खाली उतरून निरीक्षण करायचं ठरवलं. बरं झालं उतरलो, तिथे १० पेक्षा जास्त Tibetan Sandgrouse चा थवा होता. हे खरंतर अजून उंचावर म्हणजे त्सो कार भागात, जिथे आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो, तिथे दिसतात पण आमचं नशीब (आणि ओंकार ची नजर) चांगलं, म्हणून इथेच दिसले. आम्ही अगदी सावकाश त्यांच्या दिशेने पुढे गेलो (पक्षांना शक्यतो कळू न देता) आणि काही चांगले फोटो मिळवण्यात यशस्वी झालो.
                
                
        परत आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर कडे आलो तर आत रस्त्यावरच समोर एक मुंगुसा सारखा प्राणी रस्ता ओलांडून गेला. समोरच्या काचेतूनच मी पटकन २-३ फोटो काढून घेतले. नुरबू ने तो Mountain Weasel असल्याचं सांगितलं. हाही सहज न दिसणारा प्राणी असल्याने मग सगळे जण परत खाली उतरून त्याच्या शोधात निघाले. मी मात्र गाडीतच थांबायचं ठरवलं (काचेतून मिळालेल्या फोटोवर मी समाधान मानून होतो).  
            
            सगळ्यांनी खाली उतरून भरपूर शोधाशोध केली खरी पण weasel ने त्यांना अजिबात दाद दिली नाही. चार जणांनी चार बाजूने नाकाबंदी केली तेव्हा बहुतेक त्याने पटकन एका बिळात घुसून सर्वांना गुंगारा दिला. तो पर्यंत ऊन सुद्धा खूप कडक झालं होतं, त्यामुळे नाईलाजाने सर्वजण हात हलवत परत आले. 
        
                
                
        पुढे थोड्या अंतरावर आम्हाला रस्त्यात मधोमध थांबलेली एक गाडी दिसली. ४ प्रवासी आणि ड्राइवर सगळे जण गाडीच्या बाहेर होते. त्यांच्याकडंच प्यायचं पाणी संपलं होतं आणि गादीचे २ टायर पंक्चर झाले होते. त्यांच्याकडे एक spare tyre होता पण ते दुसऱ्या टायर च्या शोधात होते (तशीच एखादी गाडी आली कि त्याच्याकडचा spare tyre घेण्यासाठी). आपल्या शहरात असा प्रसंग आला तरी फार काही वाटलं नसत पण इथे म्हणजे सगळाच ओसाड प्रदेश. त्यात आम्ही निदान १४००० फूट उंचीवर होतो, त्यामुळे चालत फार लांब जाणंही तेवढं सोपं नव्हतं. वर सूर्य आग ओकत होताच. जवळपास कुठे गाव असण्याचीही शक्यता दिसत नव्हती.  आमच्याकडच्या २ पाण्याच्या बाटल्या आम्ही त्यांना दिल्या पण त्या पलीकडे काही मदत शक्य नवहती. 
            
            सुदैवाने त्यांच्या ड्राइवर ने म्हणे काहीतरी डोकं चालवून गाडी चालू केली थोड्या वेळात. पुढे आम्हाला ते जेवणासाठी थांबलो होतो तिथे दिसले, तेव्हा कळलं. 
            
            आमचा इथला रस्ता तसा चीन च्या सीमेपासून फार लांब नव्हता (अगदी ५-१० किलोमीटर), त्यामुळे रस्त्यात गावे दिसली नाहीत तरी आर्मी चे कॅम्प मात्र होते मधून मधून. थोडा गवताळ भाग सोडला तर अगदीच ओसाड जमीन होती सगळीकडे पण त्यातही आम्हाला एक छोटं रेस्टॉरंट दिसलं. तो पर्यंत दुपारचे २ वाजत आलेले होते त्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. इथेही मला काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती, त्यामुळे मी परत एकदा लिंबू सरबतावर निभावलं. 
            
            इथल्या प्रवासात फार पक्षी नाहीत, पण आम्ही खूप सारे किआंग, जंगली घोडे, आणि याक बघितले.   
            
            जेवल्यावर लगेचच पुढचा प्रवास चालू केला. आत्तापर्यंत आम्ही खूपच दमलो होतो आणि त्यात कडक उन्हात बाहेर बघणंही कठीण होत होतं. पण आमच्या गाईड चं मात्र बारीक लक्ष होत बाहेर. आणि त्याचा चांगलाच फायदा झाला आम्हाला. त्याच्या सतर्कतेमुळे २ वेगळे पक्षी बघायला मिळाले. 
            
            त्यातला पहिला होता एक छोटासा  twite नावाचा पक्षी. मी खरंतरं हे नावंच पहिल्यांदा ऐकलं होतं. असं कळलं कि त्याच्या विशिष्ट आवाजामुळे त्याला हे नाव पडलं आहे. जास्त वेळ ना दवडता आम्ही पटकन काही फोटो काढून घेतले तिथे. 
            
            पुढचा होता मंगोलियन फिंच. ह्याने मात्र तसा बराच त्रास दिला (म्हणजे फोटो काढण्याच्या दृष्टीने). आम्ही सगळे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलो होतो पण तो फिंच फारच चपळ होता. कधी आमच्या जवळ बसून परत उडून जायचा ते कळायचंच नाही. कसेबसे २-३ फोटो मिळाले, मग त्यावर समाधान मानून आम्ही पुढे निघालो.   
        
                
                हानले गाव २०-३० किलोमीटर अंतरावर असतांना, अभय ला एका इलेक्ट्रिक च्या खांबावर एक मोठा शिकारी पक्षी दिसला. पण ते ड्राइवर ला सांगून त्याने थांबेपर्यंत आम्ही बरेच पुढे निघून आलो होतो. ह्या रस्त्यांचं एक बरं आहे, इथे फारशी रहदारी नसते, त्यामुळे गाडी सहज मागे घेता आली. बऱ्यापैकी जवळ पोहोचल्यावर अभय ने तो upland Buzzard आहे हे ओळखलं. लगेच आम्ही सर्व खाली उतरलो, रस्त्यापासून पक्षी तसा खूप लांब नव्हता पण प्रकाश त्याच्या मागच्या बाजूने येत असल्याने फोटो साठी योग्य नव्हता. मग आम्ही चालत चालत वाळवंटात पुढे गेलो (पक्षी क्रॉस करून) आणि मग तिथून फोटो काढले. आमच्या नशिबाने तो buzzard तिथून उडाला नव्हता.
                
        अंधार व्हायच्या थोडं आधी आम्ही हानले जवळ पोहोचलो. पण परत एकदा, लगेच होमस्टे कडे न जाता आम्ही Eurasian Eagle Owl च्या शोधार्थ पुढे निघालो. हे गाव अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील मोठी अशी एक खगोल अभ्यासक वेधशाळा (Astronomical Observatory) इथे आहे.  
            
            आता प्रकाश खूप कमी झाला होता पण नशिबाने आम्हाला ते घुबड लगेचच दिसलं. एक छोट्या टेकडीवर बसून मस्त पैकी आमच्याकडे बघत होतं. रात्र होताच त्यांचं भक्ष्य पकडण्याचं काम सुरु होतं, त्यामुळे बहुतेक ते सतर्क असावं. हळू हळू गाडीतून बाहेर येऊन आम्ही काही फोटो घेतले. आमच्या येण्याने त्या घुबडाला बहुतेक काहीच फरक पडला नव्हता, त्यामुळे मग ट्रायपॉड काढून हवा तो अँगल बघून सर्वांना फोटो/ विडिओ काढता आले.   
        
                
            आता अंधार पडू लागल्याने आम्ही Pallas’ cat शोधण्याचा विचार रद्द केला आणि होमस्टे कडे वळलो. मी चेक-इन करून लगेच ५ मिनिटं झोप काढली. 
            
            तो पर्यंत, सगळ्यांनाच थोडा-फार त्रास होत होता. डोकेदुखी, निद्रानाश, थकवा, असं काही ना काही जाणवत होतं. आम्ही लेह इथे ११००० फुटावर होतो आणि तिथे पूर्ण स्थिरस्थावर न होताच इथे १४५०० फुटांवर आलो होतो (मेराक आणि हानले दोन्हीही साधारण ह्याच उंचीवर आहेत). कदाचित एवढ्या पटकन एवढी उंची गाठणं आमच्या साठी जरा जास्त झालं, त्यामुळेच हि लक्षण दिसायला लागली होती. त्यात आम्ही कोणीही diamox च्या गोळ्या घेतल्या नव्हत्या (आमच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून .. . पण बरेच पर्यटक ह्या गोळ्या नियमित घेतात तिथे). तसं आम्ही बरोबर एक Oxygen सिलेंडर घेतला होता. पण आमच्या गाईड ने हे ही सांगितलं कि त्याचा वापर फक्त अत्यावश्यक असेल तेव्हाच करता येईल. आपल्याला हॉस्पिटल मध्ये जो Oxygen देतात त्यात इतर हवा योग्य प्रमाणात मिसळलेली असते, पण जर आम्ही pure oxygen जास्त वेळ घेतला असता, तर त्याने कदाचित फुफुसात पाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मी फक्त एक मिनिटा करता oxygen घेतला (पण त्याने फार काही फरक पडला नाही).         
            
            रात्री जेवेपर्यंत मला थोडी भूक लागली होती, त्यामुळे मी जेवतांना थोडं काहीतरी खाऊ शकलो. तो पर्यंत, आमच्या सगळ्यांच्या तब्येतीचा विचार करून अभय ने असं ठरवलं कि आपण  उद्या Tso Kar ला न जाता, लेह इथे परत जाऊया. Tso Kar हे अजून वर, म्हणजे साधारण १५५०० फुटांवर आहे. ह्या निर्णयाला सर्वांचीच अनुमती होती, मग अभयने आमच्या मुख्य संयोजकाला (लेह इथल्या) फोन करून ह्या बदलाची कल्पना दिली. 
            
            जेवणाच्या वेळी आमचा गाईड नुरबू हा एक Oxymeter घेऊन आला, मग सर्वांनीच oxygen पातळी आणि हृदयाचे ठोके मोजले. माझा Oxygen होता ७८. आपल्याकडे, जर हि पातळी ९५ च्या खाली असेल, तर लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात पण इथे मात्र ७८ म्हणजे सर्व ठीक असावं. आमचा गाईड म्हणाला कि जर हि पातळी ६० च्या खाली आली तरच धोकादायक ठरू शकतं, ७८ वगैरे ठीकच आहे. इथे प्रत्येकाचेच हृदयाचे ठोके मात्र वाढलेले होते (८० च्या पुढेच). ह्याचं कारण असं कि oxygen कमी प्रमाणात असल्याने हृदयाला जास्त वेळा पंप करावं लागतं. शिवाय इथल्या वातावरणात रक्तात लाल पेशींचं प्रमाण वाढतं, त्यामुळे रक्त थोडं घट्ट ही होत.       
            
            हानले हे अवकाश फोटोग्राफी साठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथल्या स्वच्छ हवेत (आणि उंचीमुळे) इथून आकाशगंगेचे खूप चांगले फोटो मिळू शकतात (जेव्हा आकाश ढगाळ नसतं). ज्ञानेश्वर आणि गुरुनाथ दोघांनाही त्यासाठी उत्साह होता, त्यामुळे ते जेवणानंतर लगेचच बाहेर पडले. फार लांब न जाता, बाहेरच्या रस्त्यावरूनच त्यांना काही फोटो घेता आले.    
        
                नेहमीप्रमाणे ९/९:१५ पर्यंत आम्ही झोपायची तयारी केली. तो पर्यंत मी paracetamol ची एक गोळी देखील घेतली होती.
            
            पाचवा दिवस – पुन्हा एकदा लेह
        
        आज सुद्धा झोपेचं खोबरंच झालं. पहाटे १ वाजेपर्यंत मी ठक्क जागा झालो. आणि मग लक्षात आलं कि इथे एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. खोलीत पूर्ण काळोख होता (सहसा आम्ही अनोळखी ठिकाणी गेल्यावर एक छोटा लाईट चालू ठेवतो रात्रीत). आणि माझ्या बाजूला असलेल्या खिडकीतून बाहेर बघितलं तर तिथेही मिट्ट काळोख. मोबाइल जवळ असल्याने त्या प्रकाशात मग उठून बघितलं तर इलेक्ट्रिसिटी नव्हतीच तिथे. रात्री झोप न लागणं हे एक, त्यात परत एवढा काळोख थोडा भीतीदायक वाटायला लागला (कमी oxygen मध्ये म्हणे मन सुद्धा स्थिर राहत नाही). परत एकदा थोडी घुसमट जाणवायला लागली, गरम व्हायला लागलं. लाईट नसल्याने, इतर काही करणंही शक्य नव्हतं.  गुपचूप पडून राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. सकाळी चौकशी केली तेव्हा कळलं, कि इथे फक्त संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंतच इलेक्ट्रिसिटी असते.  
            
            थोड्या वेळाने असं जाणवलं कि बहुतेक गुरु सुद्धा जागाच आहे. मग थोडा वेळ गप्पा मारल्या (काळोखातच). पहाटे केव्हातरी थोडी झोप लागली बहुतेक पण ५ वाजता उठलोच. तसंही ६ पर्यंत निघायचं असा विचार होताच आमचा. बाहेर आल्यावर कळलं कि ज्ञानेश्वर सुद्धा रात्रभर जागाच होता, त्याला बर वाटत नसल्याने मग तो आमच्याबरोबर सकाळच्या फेरी साठी आला नाही.  
            
            सकाळच्या सत्रात आमची २ मुख्य लक्ष्य होती,  Black-necked Crane आणि Pallas’ cat. पहिल्या अर्ध्या तासातच मग आम्हाला क्रेन दिसले. खूप लांब होती ती जोडी आमच्यापासून पण दर्शन तरी झालं त्यांचं (दिवसाची सुरुवात चांगली झाली). मग थोड्या वेळातच ह्या ट्रिप चं मुख्य आकर्षण आमच्या समोर आलं (म्हणजे अगदी शब्दशः समोर नाही पण जवळच्या डोंगरावर आम्हाला ती मांजर दिसली). आमच्या गाईड ला थोडी कल्पना होती कि सहसा हि मांजर कुठल्या भागात दिसते, त्यामुळे तिथे पोहोचल्यावर त्याच अगदी बारीक लक्ष होतं बाहेर. त्याने एक ठिकाणी गाडी थांबवली आणि सगळ्यांना हळूच खाली उतरायला सांगितलं. 
            
            त्या छोट्याश्या टेकाडावर मग आम्हाला ती मांजर दिसली. मस्त दगडावर बसून होती. वर बसून ती जणू आपल्या अधिपत्याखालील असलेल्या सर्व प्रदेशावर लक्ष ठेवून होती. सगळे कॅमेरे लगेचच तिथे रोखले गेले, पण थंडी खूप जास्त होती. हातमोज्याबाहेर हात काढायला हि त्रास होत होता. त्यामुळे मग थोडे फोटो काढून झाल्यावर मी गाडीत जाऊन बसलो. आत गेलो तरी माझंही लक्ष बाहेरच होतं. थोड्याच वेळात मला सगळ्या कॅमेऱ्यांच्या क्लिक-क्लिक चा आवाज ऐकू आला, बघितलं तर आता कॅमेऱ्यांची दिशा थोडी वेगळी वाटली. पटकन बाहेर आलो, तो पर्यंत मांजरीने खाली उतरायला सुरुवात केली होती. 
            
            हळू हळू करत ती आमच्या समोर रस्त्या पर्यंत खाली आली. मध्ये मध्ये थांबून ती आजूबाजूला नजर ठेवत होती, त्यामुळे ती थांबली कि आमचे कॅमेरे चालू व्हायचे (तसे चालतानाही काही बंद नव्हते म्हणा).  तिच्या पावित्र्यावरून आम्ही असा अंदाज बांधला कि तिला बहुतेक काहीतरी सावज दिसलं असावं, म्हणून ती दबक्या पावलांनी पुढे जात होती. मग रस्त्यावरून ती खाली असलेल्या गवताळ भागाकडे गेली. भक्ष वगैरे काही नाही, तिथे तिने फक्त आपला प्रातर्विधीचा कार्यक्रम उरकला आणि आल्या पाउली परत डोंगराकडे निघाली.  पण ह्या सगळ्यात आम्हाला खूप चांगले फोटो मात्र मिळाले. नाही म्हणायला अजून थोडं उजाडलेलं असतं तर बरं झालं असतं, पण हे म्हणजे न संपणारं आहे. 
        
                
                
                
                दोनही प्रजाती लगेच दिसल्यामुळे मग आम्ही थोडे निर्धास्त झालो, आता जे काही दिसेल तो बोनस. सकाळच्या वेळात गवताळ भागात जशी पक्षांची खूप हालचाल असते, तशीच ती इथेही होती. त्यात मग लार्क, प्लोव्हर, चिमण्या हे बऱ्याच प्रमाणावर दिसत होते. पण सर्वात जास्त संख्या होती ती हुदहुद म्हणजे Common Hoopoe ची. अजून दोनदा आम्हाला Black-necked Crane च्या जोड्या दिसल्या पण याही वेळेस आमच्यापासून खूप लांब होते आणि त्यांच्या जवळ पोहोचायला काही मार्ग नव्हता. इथे आम्हाला एक ससा (Wolly Hare) उड्या मारत पळतांना दिसला.
                
                
        ८ वाजेस्तोवर आम्ही होमस्टे वर परतलो देखील. बॅगा तर तयारच होत्या, त्यामुळे मग ब्रेकफास्ट करून आम्ही लगेचच लेह कडे निघालो. आजचा प्रवास हा साधारण २५० किलोमीटर चा असणार होता, त्यामुळे लेह ला पोहोचायला परत एकदा संध्याकाळ उजाडेल असा अंदाज होता. 
            
            रस्त्यात सगळ्यांचंच लक्ष आजूबाजूला असलेल्या पक्षांकडे होतं. त्यामुळे काहीही दिसलं कि लगेच आमची खाली उतरण्याची तयारी होती. पहिला नंबर लावला तो Upland Buzzard ने. ह्या वेळी तो जमिनीवर बसलेला होता. आम्ही थोड्या जवळ गाडी घेऊन जायचा प्रयत्न केला, पण त्यात फार यश न आल्याने मग उतरून चालत जायच ठरवलं पण ह्या सगळ्यात तो पक्षी उडून अजून लांब जाऊन बसला. 
            
            मग थोड्या वेळाने आम्हाला जमिनीवर असलेला सोनेरी गरुड (Golden Eagle) दिसला. हाही रस्त्यापासून खूप लांब होता पण तरीही काही फोटो घेतले आम्ही (पहिल्यांदाच बघितलेला पक्षी).  
            
            मग आम्हाला Black-necked Cranes चे जवळून फोटो घेण्याची एक संधी मिळाली. आत्तापर्यंत ते आमच्यापासून खूप लांब होते पण ह्या वेळी परिस्थिती जरा बरी होती आणि शिवाय तिथपर्यंत चालत जाणंही शक्य होतं (म्हणजे पक्ष्यांना सजग न करता हळू हळू पोहोचलो तर). अंतर तसं खूप असल्याने मी परत एकदा जाणं टाळलं (पण गेलो असतो तर खरंच बरं झालं असत). इथे अजून एक फायदा होता कि आमच्या आणि पक्ष्यांच्या मध्ये थोडी खुरटी झुडुपं होती आणि त्यांच्या आडोशाने लपून पुढे पुढे जाणं शक्य होत, त्यामुळे मग आमच्या मंडळींना अगदी जवळून फोटो घेण्याची संधी मिळाली. आणि बहुतेक त्यांचं घरटंही कुठे तरी जवळपास असावं, अशा वेळीही पक्षी तिथून दूर जाण्याचं टाळतात.  
        
                
                
                
        दुपारच्या वेळेस आम्ही एका थोड्या मोठ्या गावाजवळून जात होतो, इथे चक्क ४-५ रेस्टॉरंट जवळ-जवळ होती, म्हणजे आज आम्हाला थोडा चॉईस होता. तो पर्यंत मला थोडी भूकही लागली होती, त्यामुळे मस्तपैकी दही-पराठ्याचा आस्वाद घेता आला. 
            
            दुपारच्या जेवणानंतर आमच्या रस्त्याच्या बाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला. पुढच्या बऱ्याच अंतरापर्यंत आमच्या बाजूने एक नदी वाहत होती. तिथे मग काही पाण्यावरचे पक्षीही दिसले. जवळच्या एका विजेच्या तारेवर बसलेली एक कोकिळा वर्गातली Common Cuckoo सुद्धा दिसली. 
        
                
                लडाख मध्ये बहुतेक सगळीकडेच अगदी सुंदर देखावे असतात. डोंगर, पाणी आणि मध्ये मध्ये बर्फाच्छादित पर्वत. त्यामुळे जरी वाळवंटी भाग असला तरीही फोटो काढायला खूप मजा येते.
                
                आमचा लेह मधला होमस्टे हा चोगलाम्सार गावात होता, तिथे पोहोचताना वाटेत आम्हाला ठिकसे मोनास्टरी लागणार होती. मग आम्ही तिथे थोडा वेळ थांबायचं ठरवलं. तिथे गेल्यावर असं लक्षात आलं, कि इथे बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागणार होत्या, त्यामुळे मग आम्ही तो बेत टाळला. गुपचूप खालूनच थोडे फोटो काढले आणि परत निघालो.
                सहा वाजेपर्यंत आम्ही आमच्या होमस्टे मध्ये पोहोचलो. इथे आल्यावर लगेचच आम्हा सर्वांनाच अगदी relaxed वाटलं. जणू काही घरी परत आल्यासारखं. उंचावरून खाली आल्यामुळे oxygen थोडा जास्त मिळत होता, त्यामुळे तोही त्रास थोडा कमी झाला. येऊन लगेच एक छान चहा घेतला आणि मग आराम केला.
            
            सहावा दिवस - लेह मधे आराम
        
        आज आम्ही फक्त अर्ध्या दिवसाचाच प्लॅन केला होता. लेह च्या जवळ असलेल्या एका डोंगराकडे आम्ही जाणार होतो. आत्तापर्यंत फोटो न मिळालेले चुकार partridge हे आमचं मुख्य लक्ष असणार होतं. 
            
            आमचा प्रवास असा फार नव्हता त्यामुळे आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर ऐवजी २ छोट्या गाड्या घेऊन निघालो. एका गाडीचा चालक आमचा होमस्टे चा मालक PT आणि दुसरी गाडी हि ज्ञानेश्वर ने चालवली. 
            
            आणि हो, आज आम्हा सर्वांचीच बऱ्यापैकी चांगली झोप झाली होती. त्यामुळे सगळे जणच छान ताजे-तवाने होतो. चहा आणि बिस्कीट घेऊन आम्ही साडे सहा वाजता बाहेर पडलो. 
            
            सात वाजेपर्यंत आम्ही त्या डोंगरावर पोहोचलो होतो आणि गेल्या गेल्या लगेचच एक नवा पक्षी बघायला मिळाला, तो होता Fire-fronted Serin. हे अगदी चिमणी पेक्षा पण छोटे असे पक्षी, त्यामुळे ते नक्की कुठे आहेत ते शोधणंहि कठीण होत होतं. मग आम्ही गाडीतून उतरून फोटो काढायचे ठरवले. इथून आता जरा चांगले फोटो मिळाले, त्यांच्या डोक्यावरचा लाल रंग नीट दिसत होता आता. आम्ही फोटो काढत असतांना PT ने आमचं लक्ष एका इलेक्ट्रिक टॉवर कडे वेधलं.  तिथे एक सामान्य खरूची (Common Kestrel) दिसला. नीट लक्ष देऊन जेव्हा बघितलं तेव्हा तिथे चक्क ७ केस्ट्रेल दिसले. 
            
            आता आम्ही आमचं लक्ष जवळच्या झुडुपांकडे वळवलं कारण तिथेही पक्ष्यांची हालचाल जाणवत होती. तिथले Mountain Chiffchaffs लगेचच दृष्टीस पडले (त्यांची संख्या ह्या भागात खूप आहे बहुतेक) तिथे अजून एक छोटासा पक्षी (शेपटी खूप आखूड होती त्याची) दिसला. अगदी पानांमागे लपत होता बराच वेळ पण मग बाहेर आल्यावर त्यानेही छान फोटो दिले आम्हाला. तो होता Eurasian Wren. 
        
                
                
                
                
        तिथे अजूनही काही पक्षी होते पण एवढ्या सगळ्यांमध्ये चुकार partridge मात्र अजिबात दिसले नाहीत. PT ने सगळीकडे शोध घेतला, त्यांचे आवाज करून बघितले त्याला खरंतरं अगदी खात्री होती कि तो आम्हाला partridge दाखवेलच, पण सगळीकडे नन्नाचाच पाढा होता. 
            
            शेवटी ८ वाजता आम्ही तिथून निघायचं ठरवलं. आता प्रकाश सुद्धा थोडा जास्त प्रखर व्हायला लागला होता आणि एवढ्या प्रकाशात partridges बाहेर येतील ह्याची शक्यता पण कमी होती. परत येतांना आम्हाला अतिशय सुंदर अशी शांती स्तूपाची इमारत दिसली. पांढऱ्या शुभ्र हिमाच्छादित डोंगरांपुढे त्याची शान वेगळीच वाटत होती. 
            
            इथे आम्ही एक मोकळं मैदान बघितलं, जे बहुतेक त्या मोठ्या मोटारसायकल (dirt bikes) ना चालवण्यासाठी बनवलं होतं (थोडं खडबडीत, आणि वळणावळणाचे रस्ते असणारं). सध्या तिथे कोणीही नव्हतं पण ते गेट मात्र उघडं होतं. अचानक PT ने गाडी तिथे वळवली, आत गेल्यावर त्याने सांगितलं वर त्याने एक गरुड उडतांना बघितला आणि बहुतेक तो सोनेरी गरुड होता. आणि त्याचा अंदाज बरोबर होता थोडं थांबून आम्हाला तिथे चांगले फोटो मिळाले. ९:३० पर्यंत आम्ही ब्रेकफास्ट साठी परतलो. 
        
                
                
        आज आमचा इतर कुठलाही प्लॅन नसल्याने, आम्ही थोडी भटकंती करायचं ठरवलं. लेह च्या जवळ मॅग्नेटिक हिल नावाची एक जागा आहे साधारण २० किमी अंतरावर. ह्या जागेचं वैशिष्ठ्य असं सांगतात कि इथे म्हणे बंद केलेली गाड्या आपोआप चढावर जातात (म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध). अर्थातच ह्यात काही तथ्य नाहीये म्हणा, थोडा दृष्टीभ्रम आणि बाकी अफवा.  
            
            ब्रेकफास्ट करून लगेचच आम्ही बाहेर पडलो. जेवायच्या वेळेपर्यंत परत यायचा प्लॅन होता. आमच्या इथून जाताना रस्त्यात आधी लेह शहर लागलं आणि तिथून पुढे कारगिल कडे जाणारा रस्ता. इथून मग सुंदर देखावे दिसायला सुरुवात झाली. २-३ ठिकाणी आम्ही गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला उभे राहून मीही मोबाईल फोटोग्राफी केली (landscape साठी माझ्याकडे वेगळे लेन्स नसल्याने).  
            
            मॅग्नेटिक हिल वर पोहोचलो खरे पण तिथे आम्हाला काही विशेष असं वाटलं नाही. पण थोडं पुढे गेल्यावर आम्हाला सिंधू (Indus) आणि झंस्कार नद्यांचा संगम दिसला. झंस्कार च गढूळ पाणी आणि सिंधू नदीचं स्वच्छ पाणी हे तिथे एकमेकात मिसळलं जात होतं. थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग परत थोडे फोटो. परत येतांना गाडी मॅग्नेटिक हिल जवळ थांबवून काही वेगळं (म्हणजे उतारा ऐवजी गाडी आपोआप चढा वर जाणं) होतंय का तेही बघितलं 😜. परत जातांना आम्ही थोड्या वेगळ्या रस्त्याने गेलो (लेह चं मार्केट बघण्यासाठी), इथे आम्हाला एक मराठमोळं उपहारगृह दिसलं (खाणावळ नावाचं). आम्ही इथेच दुपारचं जेवण करूया असा विचार करत होतो, पण आमच्या होमस्टे मध्ये आमचं जेवण तयार होतं त्यामुळे मग संध्याकाळी इथे परत यायचं ठरवलं.        
            
            लंच नंतर आम्ही आरामात लोळत पडलो थोडा वेळ. दुपारी चहा घेऊन मग लेह मार्केट मध्ये शॉपिंग साठी जायचं असा प्लॅन होता, आणि खाणावळ मध्ये पण जायचं होतं. निघाले सगळे पण मी गेलो नाही. तसंही शॉपिंग ह्या गोष्टीत मला कधीच फारसा उत्साह नसतोच, म्हणून मग आराम करत पुस्तक वाचत पडावं असा विचार केला.  
            
            संध्याकाळी सगळी मंडळी भरपूर शॉपिंग करून आली. त्या शॉपिंग च्या कथा मग चहाबरोबर ऐकल्या. आता मला व्यवस्थित भूक लागायला लागली होती, आणि रात्री झोप सुद्धा नीट झाली.
        
            
            सातवा दिवस - वारी-ला खिंडीची वारी
        
        आज आमचा दौरा वारी-ला खिंडीकडे असणार होता. चुकर Partridge हे तर लक्ष्य होतंच पण त्याच बरोबर २ प्रकारचे बर्फातले कोंबडे (Snowcocks) दिसतील अशीही अशा होती.  
            
            लेह मधून नुब्रा खोऱ्याकडे जायला तसे २ रस्ते आहेत. एक म्हणजे प्रसिद्ध अश्या खारडुंग-ला खिंडीतून आणि दुसरा वारी-ला खिंडीतून. दोन्ही ची उंची बऱ्यापैकी सारखीच आहे त्यामुळे साधारण परिसर (पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने) हा सारखाच आहे. पण खारडुंग-ला चा रस्ता वारी-ला पेक्षा खूप चांगला असल्याने, बहुतेक सगळे प्रवासी तोच रस्ता निवडतात. त्यामुळे आमच्या दृष्टीने वारी-ला खिंडच योग्य होती (जेवढी रहदारी कमी, तेवढी पक्षी दिसण्याची शक्यता जास्त).   
            
            प्रवासाचा वेळ साधारण २ तास असणार होता. आणि snowcocks साठी आम्हाला दिवस उजाडतांनाच पोहोचायला पाहिजे होतं. तीच वेळ त्यांची सकाळचं खाणं शोधायची असते आणि उशीर झाला तर मग त्यांना शिकारी पक्ष्यांची भीती असते, त्यामुळे मग ते आडोशाला लपून बसतात. त्या दृष्टीने आम्ही ४:३० वाजता चोगलाम्सार हुन निघायचं ठरवलं. आम्ही दही-पराठा बरोबर घेतले होते, त्यामुळे ब्रेकफास्ट साठी कुठे थांबायची गरज नव्हती. आजही आम्ही २ छोट्या गाड्यांतूनच प्रवास करणार होतो.   
            
            मागच्या वेळच्या चांग-ला खिंडीच्या थंडीचा अंदाज असल्यामुळे ह्या वेळेस मी योग्य खबरदारी घेतली होती (वारी-ला खिंड सुद्धा १७४०० फुटावर आहे).  घाटात ह्या वेळेसही मला काही त्रास झाला नाही. इथले घाटातले रस्ते जरी वळण-वळणाचे असले तरी हि इथली वळणं थोडी जास्त अंतरावर आहेत बहुतेक (म्हणजे प्रत्येक वळणातलं अंतर थोडं जास्त आहे, आपल्या इथल्या घाटांपेक्षा). कदाचित त्यामुळेच त्रास कमी झाला असावा. 
            
            आम्ही खिंडीकडे जात असतांना थोडं उजाडल्यावर खाली दिसणारा वस्तीचा भाग आणि दूरवरचे डोंगर खूपच सुंदर दिसत होते. जरी आम्हाला तिथे वेळ घालवायचा नव्हता तरीही आम्ही पटकन २-३ फोटो काढून घेतलेच.  
        
                
        एका ठराविक उंचीवर पोहोचल्यावर आमच्या गाईड ने सर्वांना सतर्क राहण्याची सूचना केली. त्याच्यामते आता हा snowcocks चा भाग होता आणि इथून पुढे ते कधीही दिसू शकतील. तसं पाहिलं तर snowcock हा काही लहान पक्षी नाही पण आजूबाजूच्या परिसरात ते एवढे एकजीव होतात, कि त्यांनी जर हालचाल केली नाही तर समोर असूनही ते आपल्याला दिसत नाहीत. आम्ही १-२ वेळा गाडी थांबवून बाहेर उतरून टेहळणी केली, पण अजूनही त्यांचा पत्ता नव्हता. पण थोडं पुढे, चालत्या गाडीतूनच PT ला थोडी हालचाल जाणवली. इथे रस्त्यात कुठेही गाडी थांबवता येत होती आम्हाला, कारण रहदारी अजिबात नव्हती. तिथल्या ४-५ तासात आम्ही अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच गाड्या बघितल्या.   
            
            इथे मात्र आम्हाला एकदाचे Himalayan Snowcocks दिसले. म्हणजे PT ला आधी दिसले आणि मग त्याने सांगितलेल्या खुणांवरून आम्हालाही दिसले. इतक्या थंडीत हातमोजे काढून फोटो काढणंही एक कसरतच आहे. जसं जसं आम्ही तिथे स्थिरावलो, तसं आम्हाला जाणवलं कि इथे चांगले ६-७ Snowcocks जवळ-जवळ होते.  एवढंच नाही, तर असाच एक थवा अजून थोड्या अंतरावर देखील होता. आमच्या पासून दोनही थवे तसे लांब होते आणि शिवाय अजून पूर्ण प्रकाश देखील नव्हता, त्यामुळे फोटो तसे ठीक-ठाक च मिळाले. थोड्या वेळात बहुतेक त्या पक्षांना आमची चाहूल लागली असावी, ते सर्वच पक्षी मग खाली दरीकडे उडून गेले.  
        
                
                
        चांग-ला खिंडीतल्या पेक्षा बरे फोटो इथे मिळाल्याने आम्ही खुश होतो.  पण अजूनही तिबेटी Snowcocks दिसणं बाकी होतं. तिबेटी Snowcocks हे त्यांच्या हिमालयन भावंडांपेक्षा आकाराने थोडे लहान असतात, पण तेही साधारण ह्याच प्रकारच्या भूभागात दिसतात (कदाचित थोड्या जास्त उंचीवर). पुढे जातांना आमचं शोधकाम चालूच होतं, आता आम्ही रस्त्यातल्या सर्वात उंच भागाजवळ पोहोचलो होतो. तिबेटी Snowcocks च्या शोधात मग आम्ही २-३ वेळा खाली-वर फिरलो (गाडीतूनच). सगळा प्रदेश अगदी बारकाईने नजरेखालून घालत होतो आम्ही (हि आमची शेवटची संधी होती, कारण उद्या आमचा परतीचा प्रवास होता).    
            
            साधारण तासाभराच्या प्रतीक्षेनंतर एकदाचं आमच्या प्रयत्नांना यश आलं. आम्हाला Tibetan Snowcocks चा मोठा थवा दिसला. आणि ते बऱ्यापैकी जवळ देखील होते, तो पर्यंत सूर्य थोडा वर आल्यामुळे इथे आम्हाला चांगले फोटो घेता आले. 
        
                
                
        साडेसात वाजेपर्यंत आमचे दोनही snowcocks बघून झाले होते. पण Chukar Partridges नि मात्र परत एकदा निराशाच केली होती. पण आम्ही परत फिरण्या-ऐवजी दुसऱ्या बाजूला खाली उतरायला सुरुवात केली. तेव्हा अभय ने सांगितलं, ह्या भागात आपल्याला अजून एक पक्षी शोधायचा आहे, तो म्हणजे White-browed Tit-warbler. आणि त्यासाठी आपल्याला वारी-ला खिंडीतून थोडं खाली उतरावं लागणार आहे. इथे उतरतांना बऱ्याच ठिकाणी रस्ते बांधणीच सामान दिसलं (दिवस उजाडल्यावर बहुतेक हि कामं सुरु होणार असावीत, आणि तसं असलं तर परत येतांना आम्हाला त्यांचा अडथळा होऊ शकतो).  
            
            इथे एका वळणावर आमचा गाईड PT काहीतरी एकदम जोरात बोलला.  पण आम्हाला बाहेर काहीच दिसतं नव्हतं. त्याने पटकन खाली उतरायला सांगितलं. आणि मग खुणेने खाली धावत जाणारा एक Himalayan Red Fox दाखवला. आम्ही कॅमेरे सरसावे पर्यंत तो बराच लांब गेला होता पण जाताना त्याने एकदा थांबून मागे वळून आमच्याकडे बघितलं आणि तेव्हा आम्हाला १-२ फोटो घेता आले.  
        
                
        इथून आमचा पुढचा स्टॉप हा warbler साठी होता. ह्या भागात साधारण ४-५ फूट उंचीची झुडुपं होती आणि त्यांना भरपूर पानं होती. इथे विविध पक्षांचे आवाज येत होते पण त्या दाट पानांमधून काहीही दिसणं थोडं कठीणच होत. 
            
            थोड्या वेळातच आम्हाला अपेक्षित warbler दिसले. पण ते इतकी भराभर हालचाल करत होते कि कॅमेऱ्यात टिपण शक्यंच होत नव्हतं. एखाद दुसरा फोटो मधेच मिळत होता पण पाहिजे तसा नाहीच. साधारण तासभर हा खेळ चालू होता. तिथे ४ warblers होते पण शेवटी फोटो मात्र फार चांगले मिळाले नाहीत. मग आमचं लक्ष वर उडणाऱ्या कावळ्यांकडे गेलं. एखादा Yellow-billed Chough दिसतोय का ते बघितलं पण सगळे लाल चोचींचेच होते.  
        
                
                
        मग आम्ही एका थोड्या मोठ्या झाडाच्या आडोशाला बसून ब्रेकफास्ट उरकला. दही-पराठे तर होतेच, पण PT ने एका थर्मास मध्ये गरम चहा सुद्धा आणला होता (इथल्या थंडीत गरम चहाची मजा वेगळीच). Snowcocks बरोबरच फॉक्स पण दिसल्याने आम्ही आनंदात होतो (फक्त Partridge ने काही दर्शन दिल नव्हतं).   
            
            इथून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. आता सूर्य चांगलाच वर आलेला होता त्यामुळे partridges दिसण्याच्या आमच्या आशा जवळजवळ संपल्याचं होत्या. त्यामुळे शक्य तितक्या लवकर होमस्टे वर पोहोचायचं हाच विचार होता. पण आत्ता पर्यंत रस्त्यांची कामं सुरु झाली होती. आणि रस्ते अगदीच अरुंद असल्याने कामासाठी आलेल्या ट्रक/ ट्रॅक्टर ह्यांच्यामुळे रस्ता अडलेला होता. एकूण ४ ठिकाणी आम्हाला असं थांबावं लागलं (त्यात एक तासापेक्षा जास्त वेळ गेला). 
            
            खाली उतरत असतांना आम्ही जरी अशा सोडली होती, तरीही PT मात्र पूर्ण वेळ आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेऊन होता (आणि एकीकडे गाडी पण चालवत होता). त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला अखेर फळ आलं. एक १५-२० partridges चा मोठा थवा आम्हाला दिसला. त्यात बरीचशी पिल्लं सुद्धा होती. अर्थातच तो पर्यंत प्रकाश खूपच प्रखर झाला होता त्यामुळे फोटो चांगले मिळाले नाहीत पण निदान दाखवायला तरी आता आमच्याकडे फोटो होते. 
        
                
                
        इथून पुढचा २ तासाचा प्रवास हा खूपच थकवणारा / कंटाळवाणा ठरला. डोळ्यांवर गॉगल असूनदेखील उन्हाचा त्रास होत होता. खाली उतरेपर्यंत डोकंही दुखायला लागलं होत. 
            
            मग २:३० च्या सुमारास आम्ही होमस्टे ला पोहोचलो. जेवण तयारच होतं. आज संध्याकाळी कुठेही बाहेर जाण्याचा विचार नव्हताच, तेवढी ऊर्जा पण नव्हती कोणाची. सकाळचं सत्र (पहाटे ४ तो दुपारी २) खूपच दमवणारं झालं होत. उद्या आम्ही परत निघणार होतो, त्यामुळे आमच बर्डिंग इथेच संपल्यात जमा होतं.       
            
            एकंदरीत पाहिलं तर Mountain sickness वगळता, आमची ट्रिप खूपंच चांगली झाली होती. मला स्वतःला ३० नवीन पक्षी बघायला मिळाले होते आणि त्यातल्या बहुतेकांचे चांगले फोटो देखील मिळाले होते. ह्या तीस मुळे भारतात मी आत्तापर्यंत बघितलेल्या पक्ष्यांची संख्या आता ८६७ झाली.  
        
            
            शेवटचा दिवस - भरपूर oxygen कडे
        
        आमचं विमान ११ वाजता असल्याने सकाळी काही घाई नव्हती. ६ वाजता उठून आम्ही आरामात आवरून घेतलं. बॅग आधीच भरून ठेवलेल्या होत्या. ब्रेकफास्ट करून मग ठरवल्याप्रमाणे ८ वाजता विमानतळाकडे निघालो. ह्या वेळेला आमचं विमान मध्ये कुठे ना थांबता मुंबईत पोहोचणार होत. विमानतळावर आम्हीथोडे ग्रुप फोटो घेतले आणि सर्वांचा निरोप घेऊन आत गेलो. 
            
            ठाण्याला घरी पोहोचल्याबरोबर पाहिलं काम मी काय केलं, तर oxymeter वर प्राणवायूची पातळी बघितली. ११ पर्यंत आम्ही लेह मध्ये होतो, तिथे ७८-८० असणारी पातळी आता दुपारी ३ वाजता लगेच ९८ झाली होती. आपल्या हवेतील प्रदूषणाबाबत टीका करण्याऐवजी पहिल्यांदाच मुंबईच्या हवेचे आभार मानावेसे वाटले.
        
                
                
        
        
         टीप: ह्या ब्लॉग मधले काही फोटो हे माझ्या मित्रांनी काढलेले आहेत.