इगलनेस्ट चं पक्षीविश्व
- (३ ते १० मे, २०२४)

थोडं ह्या ट्रिप विषयी ...
अरुणाचल प्रदेश मध्ये तसं तर मी ३ वेळा जाऊन आलोय (मिश्मी, पाक्के, वॉलॉंग + नामदफा) पण बऱ्याच पक्षी निरीक्षकांचे मत असे होते कि इगलनेस्ट सर्वात बेस्ट; आणि ते अजून राहिलंच होतं. इथलं हॅबिटॅट थोडं वेगळं (आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं) असल्याने इथे बरेच पक्षी दिसण्याची शक्यता होती.
पण मी ज्या ग्रुप्स बरोबर वारंवार ट्रिप करतो त्यांचे तिथे जाण्याचे काही प्लॅन्स नव्हते. मग जेव्हा क्लारा कडून ह्या ट्रीपची आखणी झाली, तेव्हा मी लगेचच होकार देऊन टाकला (हे ठरलं नोव्हेंबर '२३ मध्ये).
पूर्वतयारी
मग नेहमीप्रमाणे मी पूर्वतयारी करायला सुरुवात केली. म्हणजे काय, तर जिथे जायचं तिथे कुठले पक्षी ह्या दिवसात दिसण्याची शक्यता आहे (ह्यासाठी eBird हि सर्वात योग्य अशी वेबसाईट आहे), तिथे हवामान कसं असतं (म्हणजे पाऊस किंवा थंडी असते का वगैरे), त्याचबरोबर मग जे लोक आधी जाऊन आले आहेत त्यांच्याकडून मिळेल ती माहिती घायची, इ. मग असं लक्षात आलं, कि पक्षी विविधता तर खूप आहे तिथे, पण दाट आणि उंच झाडी असल्यामुळे फोटोग्राफी च्या दृष्टीने प्रकाश कदाचित पुरेसा नसेल. त्यात परत पावसाचीही शक्यता होती नेमकं आम्ही ज्या दिवसात जाणार होतो तेव्हा.
सुरुवातीलाच मला एक प्रश्न पडला होता, ह्या जागेला इगलनेस्ट हे नाव कसं पडलं. कारण eBird वर जेव्हा मी थोडा अभ्यास केला तेव्हा असं दिसलं कि इथे शिकारी पक्षी जास्त दिसत नाहीत. मग जर ईगल (गरुड) दिसत नाहीत तर हे नाव का? मग साहजिकच गुगल बाबांकडे विचारणा केली, त्यांनी मात्र अजिबात निराश केलं नाही. कारण असं होतं कि, ५० च्या दशकात त्या भागात सैन्याची एक तुकडी होती तीच नांव होतं Red Eagle Division, आणि त्यावरून मग इथे असलेल्या पक्षी अभयारण्याला तेच नाव दिलं गेलं.
साधारण १५ दिवस आधी आमचा व्हाट्सअँप चा ग्रुप बनला, ज्यावर मग ह्या ट्रिप संबंधात चर्चा / प्रश्नोत्तरे वगैरे सुरु झालं. अगदी पहिलाच बॉम्ब पडला तो म्हणजे बरोब्बर आम्ही जाणार असलेल्या दिवसात तिथे खराब हवामान असणार होतं (🤦♂️). बहुतेक सगळे दिवस पाऊस आणि ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज वर्तवला होता. अर्थात आता तारखा बदलणं शक्यंच नव्हतं (एकतर विमानाची तिकिटं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे गाईडच्या तारखा मिळाल्या नसत्या, तिथले सगळेच गाईड अगदी वर्षभर आधी तरी बुक झालेले असतात म्हणे). मग पावसापासून बचावासाठी लागणारे कपडे, प्लास्टिक वगैरे ची तयारी बरोबर घ्यायचं ठरलं.
पण पाऊस म्हणजे अजून एक प्रॉब्लेम, ओल्या जमिनीवर जळवा नक्कीच असणार. जेव्हा सगळी डिटेल्स चेक केली तेव्हा असं लक्षात आलं कि, आमच्या ७ रात्रीच्या ट्रिप मधल्या २ रात्री आम्ही बोम्पू कॅम्प येथे तंबूत राहणार होतो. आधी जाऊन आलेल्यांकडून कळलं कि तंबूत फक्त झोपण्यापुरती (आणि बॅग ठेवायला) जागा असते. टॉयलेट्स वगैरे तिथून ३०-५० फूट अंतरावर (त्यात तिथे इलेक्ट्रिसिटी नाही, त्यामुळे संध्याकाळ नंतर फक्त टॉर्च चाच प्रकाश). पाऊस पडला तर कधी कधी तंबूत ओल येते, म्हणजे मग बॅगा ठेवण्यासाठी खाली एक मोठं प्लास्टिक घ्यायला लागणार होतं.
आमचं विमान २ मे ला मध्यरात्री गुवाहाटी ला पोहोचलं आणि रात्री प्रवास करायचा नसल्याने आम्ही काही तासाकरिता शहरातच एका हॉटेल मध्ये राहिलो. दुसरा पर्याय होता एअरपोर्ट वरच वेळ काढण्याचा, पण त्यापेक्षा निदान काही तासांची झोप काढणं आम्ही पसंत केलं.
पहिला दिवस - गुवाहाटी ते तेंगा
सकाळी ठरल्याप्रमाणे सगळे जण ५ वाजता बॅगा घेऊन हॉटेलच्या आवारात होतो. तिथे आमचे गाईड लोबसांग सेरिंग हे २ गाड्या आणि ड्रायव्हर्स सकट तयार होते. बॅगा गाडीत भरून आम्ही लगेचच पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो.
तसं पाहिलं तर आमचा आजचा पूर्ण दिवस हा प्रवासात जाणार होता कारण तेंगा पर्यंत पोहोचायला निदान ३ तरी वाजणार होते आणि ह्या अति पूर्वेच्या भागात प्रकाश तेव्हा कमी होत असतो त्यामुळे चांगली फोटोग्राफी होत नाही. पण गुवाहाटी शहरातून बाहेर निघण्याच्या आधीच आमचा एक लाइफर (म्हणजे आज-पर्यंत न बघितलेला एखादा पक्षी) बघण्याचा प्लॅन होता. आणि त्यासाठी आम्ही निघालो होतो शहरातल्या एका मोठ्या डम्पिंग यार्ड कडे (हो हो, बरोबर वाचलंत तुम्ही, कचऱ्याकडेच निघालो होतो आम्ही).
आम्ही तिथे पोहोचताच प्रथम नजरेत भरले ते कचऱ्याचे मोठे डोंगर. पण जस-जसे आमचे डोळे स्थिरावले, तसं मग आम्हाला तिथे प्रचंड संख्येने असणारे Greater Adjutant नावाचे करकोचे दिसू लागले. सकाळची वेळ असल्याने थोडं धुकं होतं तिथे पण आम्ही अजिबात वेळ न दवडता, कॅमेरे सरसावले आणि फोटो काढायला सुरुवात केली.


Adjutant Storks म्हणजे खरेतर अगदी कुरूप/ओंगळवाणे दिसणारे पक्षी. त्यातले lesser adjutant हे भारतात बऱ्याच ठिकाणी दिसतात पण हे मोठे (Greater Adjutant) मात्र अगदी मोजक्याच ठिकाणी, आणि इथे ते खूप मोठ्या संख्येने दिसत होते. आम्ही त्यांच्या हालचाली टिपत असतांना आमचं लक्ष तिथे असलेल्या तळ्यातल्या पक्षांवर पडलं. एक करकोच्याने तोंडात काहीतरी शिकार पकडली होती. लांबून बघतांना ते भक्ष्य एखाद्या सापासारखे वाटत होते त्यामुळे आम्ही सर्वच तो क्षण टिपायला आतुर झालो होतो. पण ते फोटो जेव्हा मी घरी येऊन मोठ्या स्क्रीन वर बघितले तेव्हा असं लक्षात आलं कि तो बिचारा पक्षी एका रबरी स्लीपर चा बंद गिळण्याचा प्रयत्न करत होता. इथे त्याचा एक फोटो मुद्दाम दाखवत आहे. कल्पना करा, कि इथे कचऱ्याचा मोठ्ठा डोंगर होता, त्यात कितीतरी रबराच्या आणि प्लास्टिक च्या गोष्टी असतील. आणि त्यातल्या काही ह्या बिचार्या पक्षांच्या पोटात नक्कीच जात असतील.


साधारण ६:३० च्या सुमारास मग आम्ही तिथून निघायचं ठरवलं. अजून बराच प्रवास करायचा होता दिवसभर कारण आत्तापर्यंत आम्ही गुवाहाटी मध्येच होतो. तिथून निघून मग आम्ही थेट ब्रेकफास्ट साठी मांगदाई नावाच्या गावात थांबलो (जवळच पेट्रोल पंप सुद्धा होता, त्यामुळे तीही सोय झाली). इथे असलेल्या ढाबा NH५२ ह्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. हा बहुतेक सगळ्या इगलनेस्ट (किंवा सेला, तवांग इथे जाणाऱ्या) ला जाणाऱ्यांचा ठरलेला थांबा होता. इथे आत शिरताच मला आठवलं कि २०२२ साली मी पाक्के इथे गेलो होतो, तेव्हा देखील ह्याच रेस्टॉरंट ला थांबलो होतो. नंतर गाईड कडून कळलं कि, पाक्के, नामेरी ला जाणारेही इथेच थांबतात. तुम्ही जर ह्या वाटेवरून जाणार असाल, तर इथे नक्की थांबा. इथली सर्विस, पदार्थ मेनू, आणि स्वच्छता वगैरे खूप चांगलं आहे.
मध्यान्ही च्या सुमारास आम्ही भालुकपॉंग ला पोहोचलो. हे म्हणजे आसाम आणि अरुणाचल प्रदेश च्या सीमेवरच गाव. इथे अरुणाचल प्रदेशात शिरण्यापूर्वी चेकपॉईंट वर थांबावं लागतं. अर्थात लोबसांग ने सगळी तयारी आधीच करून ठेवलेली असल्याने आम्हाला तिथे फार थांबावं लागलं नाही. थोडं पुढे गेल्यावर मग आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबलो. हे हि रेस्टॉरंट बहुतेक फेमस असावं टुरिस्ट साठी (खरं सांगायचं तर, इथे हायवे असूनसुद्धा रस्त्यावर १-२ च रेस्टॉरंट आहेत, त्यामुळे त्यातल्या त्यात जे बरं असेल, तिथे सगळे टुरिस्ट थांबणारंच. इथलं जेवण मात्र अगदी मोजकंच (भात, आमटी, आणि काही लोकल भाज्या)
इथे प्रवास करतांना एक फरक जाणवला. आम्ही जो पर्यंत आसाम मध्ये होतो, तो पर्यंत रस्ते सरळ होते आणि जसे आम्ही अरुणाचल मध्ये शिरलो तसे लगेचच उंच-सखल, वळणावळणाचे रस्ते, आणि घाट सुरु झाले. पण त्याचबरोबर पक्षी दिसायलाही सुरुवात झाली.
आमचा गाईड लोबसांग हा इथला माहितगार होता. त्याला इथला परिसर आणि तिथे दिऊ शकणारे पक्षी ह्यांची चांगली जाण होती. थोड्याच वेळात त्याने सांगितले कि आता आपण Sikkim Wedge-billed Babbler च्या हॅबिटॅट जवळ आलो आहोत. हा खरंतर एक छोटासा पक्षी आणि त्यात परत इतका लाजरा कि एखादा सेकंदभर दिसतो-न-दिसतो तोच परत झुडुपात दडी मारतो. त्यामुळे फोटो काढणं महा कठीण. पण हा बहुतेकांचा लाइफर असल्याने सगळ्यांचा उत्साह वाढला.

आम्ही तब्बल अर्धा तास त्याची प्रतीक्षा केली, पण आज त्या पक्षाचा अजिबात मूड नव्हता आम्हाला दर्शन देण्याचा. नाही म्हणायला इतर २-३ पक्षी दिसले आम्हाला.


आम्ही साधारण ४ च्या सुमारास तेंगा ह्या छोट्याश्या गावात पोहोचलो (इथे आमचा २ रात्रीचा मुक्काम असणार होता). पण तिथे पोहोचेपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा गाडीतून चढ-उतार केली. दर थोड्या अंतरावर कुठलेतरी पक्षी दिसत होते आणि साहजिकच आम्ही थांबत होतो. इथल्या रस्त्यांवर रहदारी खूप कमी असल्याने, कुठेही थांबणं सहज शक्य होत होतं. पण जरका एखादा आर्मी कॉन्व्हॉय (खूप सगळ्या गाड्या) जात असेल, तर मात्र त्यांना प्रेफरेन्स द्यावा लागतो.


तेंगा एक छोटंसं गाव/शहर आहे इगलनेस्ट च्या जवळ. साधारण १०० मीटर च्या रस्त्यावर २-३ हॉटेल्स, restuarants, आणि काही दुकानं. बस, संपलं गाव. आम्ही इगलनेस्ट रेसिडेन्सी नावाच्या हॉटेल मध्ये राहिलो तिथे. वर जायच्या आधी छान दुधाचा चहा पण झाला. प्रवास करून दमलो होतो सगळेच, त्यामुळे चहा तर हवाच होता. पण महत्वाचं असं कि इथे बरेचदा बिन दुधाचाच चहा असतो, त्यामुळे छान दूध असलेला चहा मिळणं म्हणजे भाग्यंच. रूम्स बऱ्या होत्या, आतच चहा-कॉफी चं मशीन होतं, गरम पाण्यासाठी गिझर सुद्धा होता.


पण आमचा दिवस अजून संपला नव्हता. थोडा वेळ आराम करून आम्ही ५:३० वाजता परत खाली उतरलो. आता आमचं लक्ष असणार होतं Hodgson’s Frogmouth आणि Mountain Scops Owl. हे दोन्ही तसे रात्री दिसू शकणारे पक्षी. पण अरुणाचल अति पूर्वेला असल्याने, इथे आपल्यापेक्षा निदान २ तास आधीच अंधार होतो. आणि म्हणूनच आम्ही ५:३० ला निघायचं ठरवलं होतं. डोंगरात वर जाई-पर्यंत ६ वाजणार होते, तो पर्यंत अगदी दाट अंधार होतो इथे.
ह्या साठी आम्ही जाणार होतो त्या भागाचं नाव Singchung Bugun Village Community Reserve. इथेच आम्ही पुढचे २ दिवस भटकणार होतो. एवढं मोठं नाव लक्षात ठेवण्याऐवजी आपण त्याला सुटसुटीत बुगून एरिया असं नाव देऊया, कारण Bugun Liocichla अशा वेगळ्याच नावाचा पक्षी फक्त इथेच दिसू शकतो (पण त्याविषयी सविस्तर माहिती पुढे ..).
ठरवल्याप्रमाणे आम्ही तिथे पोहोचून पक्षी-शोध सुरु केला. बराच वेळ खूप भटकलो तिथे, पण दोनही पक्षांचे केवळ आवाज ऐकू आले, तेही दूरवरून. त्यामुळे मग आम्ही तसेच हॉटेल वर परतलो. ७:३० हि रात्रीच्या जेवणाची वेळ ठरली होती, उद्या सकाळी ५ वाजता निघायचं होत. त्यामुळे, जेवणानंतर अजिबात वेळ न दवडता आम्ही निद्राधीन झालो.
दुसरा दिवस - बुगून च्या राज्यात
आम्ही ठरल्याप्रमाणे ५ वाजता निघालो. साधारण अर्ध्या तासात आम्ही ग्लो बारी (बुगून एरिया) इथे पोहोचलो. आमच्या ट्रिप मध्ये बुगून Liocichla हे एक महत्वाचं लक्ष्य (टार्गेट) होत, त्यामुळे थोडं ह्या पक्षाविषयी.
इथे पूर्वापार बुगून नावाची एक आदिवासी जमात रहात होती. त्यांच्यामुळेच हे नाव पक्षाला देण्यात आलं. काही तज्ञांच्या मते, जगात ह्या जातीचे फक्त ५० च्या आसपास पक्षी आहेत. पण इथल्या लोकल गाईड्स च्या मते हि संख्या फक्त २० च्या जास्त वर नाही. एकतर हे पक्षी इथल्या एका डोंगराच्या एरिया च्या बाहेर कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे दिसले तर एवढ्या छोट्या भागातच दिसू शकतात. त्यामुळे ह्यांचं दर्शन हे खूपच दुर्लभ होत.
१९९५ साली हा पक्षी दिसल्याची पहिली नोंद झाली (म्हणजे त्या आधी हा पक्षी रेकॉर्डस् मध्ये कुठेही नव्हता). त्यानंतर हेही लक्षात आलं, कि ह्याचा अधिवास हा फारच छोटा आहे, त्यामुळे ह्या प्रजातीचं जतन करायचं तर हा अधिवास खूप सांभाळायला हवा. हे महत्व जाणून, ह्या बुगून आदिवासींनी त्यांच्या जमिनी वन खात्याकडे देण्याची तयारी दाखवली. त्यांचं मग तिथून पुनर्वसन करण्यात आलं आणि हा भाग अभयारण्य बनला. पुढे असलेल्या चित्रात ह्या विषयी जास्त माहिती आहे.

आम्ही तिथे पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी उजाडलेलं होतं. त्यामुळे लगेचच आम्ही जंगलात शिरलो. सर्वसहमतीने मग असा निर्णय घेण्यात आला, कि आज जास्त महत्व बुगून पक्ष्याला द्यायचं. म्हणजे इतर पक्ष्यांच्या फोटोसाठी जास्त धावपळ करायची नाही (जो पर्यंत बुगून दिसत नाही). अर्थात हे म्हणणं थोडं सोपं आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा एखादा नवीन पक्षी दिसतो, तेव्हा मग हे ठरवलेलं लक्षात राहत नाही


आम्ही अभयारण्याच्या गेट मधून आत शिरायच्या थोडं आधी, मला एक लाफिंग थ्रश दिसला. तो Streaked लाफिंग थ्रश वाटत होता पण जेव्हा त्याविषयी क्लारा जवळ बोललो तेव्हा तिच्या मते तो भूतान लाफिंग थ्रश असण्याची खूप शक्यता होती. त्यामुळे मग असं ठरवलं, कि अगदी सामान्य वाटणारा पक्षी असला तरी एखादा फोटो तरी काढायचाच. अर्थात अशीच चूक मी मागच्या वेळेस मिझोराम च्या ट्रिप ला केली होती (नेहमी दिसतो असं वाटून मी ग्रे सीबीया ह्या पक्षाचे फोटोच काढले नाहीत आणि नंतर कळलं कि हा फक्त त्याच प्रांतात दिसतो).
जंगलात चालायला सुरुवात केल्यावर लगेचच एका राखी कोतवालाने आमचे स्वागत केले, मग ३-४ Rusty-fronted Barwings दिसले. पण तेवढयात आमचं लक्ष वेधलं एका लालसर रंगाच्या पक्षाने. झुडुपात दडून बसले होते ते २ scarlet फिंचेस.


आम्ही एका पायवाटेवरून चालत होतो. आमच्या उजव्या बाजूला उंच डोंगर होता, तर डाव्या बाजूला छोटीशी दरी. अचानक एक छोटा रंगीबेरंगी पक्षी डोंगराकडून झपाट्याने दरीच्या दिशेला उडत गेला. आम्ही पूर्ण लक्ष ठेवून असल्याने तो कुठे बसतोय ह्याची लगेच नोंद घेतली. मग जरा जवळ जाऊन त्या हिरव्या शेपटीच्या शिंजीराचे फोटो काढले. मग परत एकदा आमच्या समोर एक Rusty-fronted Barwings चा थवा आला, आणि ह्यावेळी त्यांचेही फोटो मिळाले.


आम्ही फोटो काढण्यात मग्न होतो तोपर्यंत आमचा गाईड लोबसांग बराच पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही जरा भराभर पावलं उचलायला सुरुवात केली पण तेवढ्यात आमच्या समोर एक हिमालयन क्युटिया पक्षांचा थवा उडत आला. मग आमची परत एकदा फोटोसाठी झटापट सुरु झाली. ते पक्षी एका जागेवर राहत नव्हते, त्यामुळे बरेच वेळा फोटो पेक्षा दुर्बिणीतूनच त्यांना बघणं शक्य होत होतं. हे चालू होतं तेवढ्यात दीपक सरांनी सगळ्यांना बोलावलं कारण त्यांना २ White-breasted Parrotbills डोंगराच्या दिशेला एका झाडावर बसलेले दिसले.


आम्ही सुरुवातीला ठरवलं होत कि फक्त बुगून कडेच लक्ष द्यायचं पण आम्ही इतर पक्षांपाठी बराच वेळ घालवला होता. ७:३० वाजत होते आणि सर्वांनाच भुका लागल्या होत्या. आम्ही हॉटेल मधून निघतांना आमच्या न्याहारीचे सामान बरोबर घेतले होते. त्यामुळे तिथेच एका मोठ्या दगडाजवळ बसून (म्हणजे खरंतर उभं राहून) उकडलेली अंडी, पाव, केळ, आणि फ्रुट ज्यूस असं पटकन खाऊन घेतलं.
खाऊन झाल्यावर लगेचच आम्ही पुढे निघालो. एक Tickell’s Leaf Warbler जणू काही आम्हाला बोलावत असल्यासारखा गात होता. थोडं पुढे एक मस्त निळाशार Verditer Flycatcher पण दिसला.


तसं बऱ्यापैकी पक्षी-दर्शन होत होतं आत्तापर्यंत पण बुगून लिओसीचला चा कुठेही ठाव-ठिकाणा लागत नव्हता. आम्ही सगळ्या पायवाटेवरून २ वेळा मागे-पुढे फिरून आलो. त्याच-बरोबर इतर बर्डर्स ना हि विचारणा करून झाली (निदान ३-४ तरी वेगवेगळे ग्रुप्स तिथे आलेले होते). पण त्यांच्याही पदरी अजून पर्यंत निराशाच पडली होती.
आम्ही आपले लोबसांग कडे आशेने बघत होतो, हा आता काही शोधेल म्हणून पण काही चिन्हच दिसत नव्हती कुठे त्याला तो तरी काय करणार. पण मग त्याने, थोडं खाली दरीत उतरून जायचं ठरवलं, त्याच्या मागोमाग आम्हीही उतरलो. अगदी कठीण उतार नव्हता पण खाली जाणं थोडं कष्टाचं काम नक्कीच होतं. पूर्वी १-२ वेळा त्याला ह्या भागात बुगून दिसला होता म्हणे
हळू-हळू करत आम्ही बरेच खाली आलो होतो. तिथे लोबसांग ने आम्हाला छोटासा पक्षी दाखवला जो एका मोठ्या झाडाच्या बुंध्यावर सरकत होता. हा होता सिक्कीम ट्री-क्रीपर. हे ट्री-क्रीपर असेच बुंध्यावर वावरत सालीखाली असणारे किडे टिपत असतात.
मग आम्हाला एक मधूर पक्षी-गान ऐकू आलं, हा आवाज होता Beautiful Sibia चा. खरंतर सगळ्या सीबीआ मध्ये हि काही सर्वात सुंदर दिसणारी प्रजाती नाही, पण बहुतेक त्याच्या आवाजामुळे त्याला हे नाव मिळालं असावं.



आता आम्ही अजून थोडं खाली उतरलो पण बुगून चा मात्र अजून पत्ता नव्हता. दुपारची वेळ झाली कि पक्षी जास्त बाहेर पडत नाहीत, त्यामुळे आमचा धीर सुटत चालला होता. तेवढ्या दीपक ना एका पानामागे काहीतरी हालचाल दिसली, आणि ते लगेच उदगारले "बुगून" (खरेतर ओरडलेच). आम्ही सगळ्यांनी त्या दिशेला बघितलं, पण नक्की काही कळत नव्हतं. मी फक्त कॅमेरा त्या दिशेला वळवला आणि साधारण अंदाजाने २-३ फोटो काढले. आणि बरं झालं मला हे सुचलं, कारण त्या आवाजामुळे सावध झालेला तो एकुलता एक बुगून आतल्या बाजूला उडून गेला.
नंतर आम्ही बरीच शोधाशोध केली, पण पुन्हा काही त्याचं नख सुद्धा दिसलं नाही आम्हाला. मला जो एक फोटो कसाबसा मिळाला होता, त्यावरच मग समाधान मानावं लागलं आम्हाला.

तिथून निघून मग आम्ही परत वर मूळ पायवाटेवर आलो. वर आलो तर तिथे २ ग्रुप्स आतुरतेने बसले होते. त्यांनी बुगून चा आवाज ऐकलं होता थोड्या वेळापूर्वी. मग आम्ही पण थांबलो त्यांच्या बरोबर. जवळ-जवळ एक तास काढला आम्ही तिथे पण बुगून काही दिसला नाही. शेवटी १०:३० वाजता आम्ही निघायचं ठरवलं. तो पर्यंत इथे दुपार झालेली होती (आपल्या १२, १ वाजल्यासारखी).
हॉटेल वर परत आलो आणि छानपैकी आराम केला. सकाळी मी टोपी घालून जायला विसरलो होतो आणि त्या उन्हाचा मला त्रास झाला होता. अगदी सन-स्ट्रोक नाही तरी डोकं दुखायला लागलं होतं, त्यामुळे तासभर झोप अगदी गरजेची होती. १२:३० हि जेवणाची वेळ होती (इथलं जेवण-खाण खूप चांगलं होतं) आणि त्यानंतर ३ वाजता आम्ही परत बर्डिंग साठी बाहेर पडलो.
परत एकदा आम्ही बुगून चा शोध घ्यायचं ठरवलं. सकाळी तो पक्षी आम्हाला दिसला होता पण अगदी ओझरता, त्यात परत सर्वांना फोटो देखील मिळाले नव्हते. आत शिरताच आमचं स्वागत Square-tailed Drongo Cuckoo च्या मधुर गाण्याने झालं. आवाज अगदी मस्त ऐकू येत होता पण पक्षी दिसायला मात्र आम्हाला बरीच शोधाशोध करावी लागली. परत एकदा दीपक जीं ची शोधक नजर कामी आली. एकदा दिसल्यावर मग आम्हाला चांगले फोटो देखील मिळाले पक्षाचे. ह्या ट्रिप ला मी ट्रायपॉड घेतला नव्हता त्यामुळे विडिओ शक्य झाला नाही, नाहीतर इथे अगदी गाताना मिळाला असता आम्हाला हा पक्षी.
ह्या संध्याकाळच्या सत्रात आम्हाला मग अजून थोडे पक्षी दिसले (White-tailed Nuthatch and Drongos) पण ह्यात सर्वात एक warbler वेगळा वाटत होता, फोटो काढल्यावर हा Brownish-flanked Bush Warbler असल्याचं निदर्शनास आलं (म्हणजे लाइफर). ह्या व्यतिरिक्त मात्र आमचा बराचसा वेळ परत एकदा बुगून शोधण्यातच खर्ची पडला. इथे आमची एका प्रसिद्ध व्हिडिओग्राफर (विजय बेदी) बरोबर गाठ पडली. त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा देखील झाल्या. ते सुद्धा तिथे बुगून च्याच शोधात आले होते.



आज दुपारभर चांगला प्रकाश होता पण ४ च्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यामुळे मग आम्ही परतायचं ठरवलं. पण लगेच हॉटेलवर न जाता आम्ही लोबसांग च्या घरी चहासाठी गेलो. त्याचं घर हे ह्याच पहाडावर, अभयारण्याच्या थोडं आधी होतं. ह्यामागे अजून एक कारण होतं, ते म्हणजे अंधार पडल्यावर आम्हाला घुबडांचा शोध घ्यायचा होता (म्हणजे तेव्हा पाऊस नसेल तर), त्यामुळे खाली हॉटेल वर जाऊन परत येणं तेवढं सोयीचं नव्हतं.
आम्ही तिथे थांबलेलो असतांना अचानक माझं नशीब फळफळलं. थोड्या अंतरावर मला २ कावळ्यांसारखे पक्षी उडतांना दिसले, पण त्यांची शेपटी थोडी पांढरी वाटत होती त्यामुळे मी इतरांचे लक्ष त्या पक्षाकडे वेधलं. ती Eurasian Nutcracker ची जोडी निघाली. प्रकाश थोडा कमीच होता पण मला त्यांचे काही फोटो मिळाले तिथे


असे हे अनपेक्षित लाइफर मिळाल्यामुळे, मला तिथला बिन दुधाचा चहा देखील सुसह्य झाला. तेवढ्यात लोबसांग ला कुणाचा तरी फोन आला. मग असं कळलं कि त्याच्या वडिलांची तब्येत थोडी बिघडली आहे (ते खाली गावात रहात होते, तेंगा च्या थोडं पुढे) आणि आमची परवानगी असेल तर त्याला त्यांना भेटून यायचं होतं. आम्ही कोणीही हरकत घेण्याचा प्रश्नच नव्हता म्हणा, पण त्याला काळजी होती कि काळोखातलं बर्डिंग (घुबडांसाठी) आमचं आम्हालाच करावं लागणार होतं. पण खरं सांगायचं तर माझी काळजी वेगळीच होती, जर त्यांना जास्त बरं नसेल, तर कदाचित लोबसांग ला आमच्या बरोबर पुढे येत येणार नाही, म्हणजे मग आमची सगळी ट्रीपचं धोक्यात येणार. (पण दुसऱ्या दिवशी सकाळी लोबसांग कडून कळलं कि त्याचे वडील आता ठीक आहेत. त्यामुळे तो ठरल्याप्रमाणे आमच्याबरोबर प्रवास करू शकणार होता)
कालच्या पेक्षा आम्ही आज थोडे जास्त नशीबवान ठरलो कारण Hodgson’s Frogmouth ह्या पक्षाने एकदाच का होईना पण दर्शन दिलं (तेही फक्त उडताना बरंका, म्हणजे फोटो मिळायची काही शक्यता नव्हतीच). पण ते सोडलं तर आजही नन्नाचाच पाढा होता.
रात्री जेवतांना आम्ही पुढच्या काही दिवसाच्या हवामान अंदाजांविषयी थोडं बोललो. पण पुढच्या सगळ्याच दिवसांचा अंदाज फारसा चांगला नव्हता. अर्थात ट्रिप ६ महिने आधी प्लॅन करतांना हे कळण शक्य नव्हतं, त्यामुळे त्याविषयी जास्त विचार करण्यात अर्थ नव्हता. उद्या परत एकदा आम्ही ४:३० वाजता निघणार होतो आणि ह्यावेळी आमच्या बॅग्स सुद्धा भरायच्या होत्या. सकाळच्या ग्लो बारी च्या सत्रानंतर आम्ही लगेचच बोम्पू कॅम्प कडे जाणार होतो (पुढच्या २ रात्रींचा मुक्काम तिथे असणार होता).
तिसरा दिवस: मुक्काम पोस्ट - बोम्पू कॅम्प
सकाळी उठल्या-उठल्याच बाहेर आकाश ढगाळ होत. पण आम्ही वेळेवर निघायचं ठरवलं, पुढचं पुढे बघू. आता २ दिवस आम्ही बोम्पू कॅम्प ला टेन्ट मध्ये राहणार होतो. हा कॅम्प अगदी भर इगलनेस्ट अभयारण्याच्या जंगलात होता. आणि तिथले रस्ते सुद्धा तसेच असणार होते. म्हणजे जरी आम्ही गाडी घेऊन जाणार असलो, तरी तिथे फक्त झाडं मोकळी करून केलेला कच्चा रस्ताच होता. बोम्पू कॅम्प हा साधारण २००० मीटर उंचीवर आहे आणि तिथे जातांना इगलनेस्ट खिंड पार करावी लागणार होती (२८०० मीटर वर). तिथेच रस्त्यात लामा कॅम्प चे टेन्ट सुद्धा आहेत (फरक इतकाच कि इथे निदान इलेक्ट्रिसिटी आहे, बोम्पू ला तेही नाही). आम्ही जसं तेंगा गावात राहिलो, तसं काही जण लामा कॅम्प ला राहणं पसंत करतात. त्यात फायदा असा, कि गावातून जंगलात येण्या-जाण्याचा वेळ वाचतो.
आम्ही आधी ठरवल्याप्रमाणे लगेच बोम्पू ला जाणार नव्हतो. सकाळ चा वेळ आम्ही परत एकदा बुगून साठी द्यायचं ठरवलं होतं. हो आणि ह्या वेळेस आम्ही न चुकता भूतान लाफिंगथ्रश चा फोटो घेतला. जसं आम्ही अभयारण्याच्या गेट जवळ आलो, तसं आम्ही जय्यत तयारीत होतो, आणि त्या पक्षानेही आम्हाला निराश केलं नाही.
परत एकदा आम्ही ग्लो बारी च्या ट्रेल वर निघालो. आता हि तिसरी वेळ असल्याने तेच तेच पक्षी परत दिसत होते (अर्थात बुगून सोडून). अरे हो, आज lesser Cuckoo पण दिसली आम्हाला. एक नव्हे २ दिसल्या आणि एकीचे थोडे बरे फोटोही मिळाले. पण आजचा विशेष होता Purple Cochoa.
त्याच झालं असं कि बुगून च्या शोधात फिरता-फिरता लोबसांग ला Purple Cochoa चा कॉल ऐकू आला. (खरं सांगू का? अहो इतक्या वेळा जंगलात जातो पण पक्षांचे आवाज ओळखणं मला अजिबात जमत नाही.. इतके आवाज येत असतात जंगलात, त्यातला कुठला कोणाचा हे काही केल्या कळत नाही). मग खूप वेळ प्रयत्न केल्यावर त्या आवाजाची दिशा एकदाची समजली (तो पर्यंत आम्ही सगळ्यांनीच खूप सगळे अंदाज केले होते पण पक्षी दिसत नव्हता), मग पक्षी दिसला. खूप लांब होता तो, पण लाइफर म्हंटल्यावर फोटो काढलाच. अर्थात जंगलात हे असं बरेच वेळा होतं म्हणा (पक्षी दिसतो, पण फोटो काही काढता येत नाही).



दोनेक तास तिथे घालवल्यावर आम्ही थांबायचं ठरवलं कारण अजून खूप प्रवास करायचा होता आणि जमल्यास संध्याकाळचं सत्र हे बोम्पू जवळच्या जंगलात फिरायचं होतं. आमचा ब्रेकफास्ट बरोबर आणलेला होताच, शिवाय ह्या वेळेला लोबसांग नि बरोबर फोल्डिंग च्या खुर्च्या आणि टेबलं सुद्धा घेतलं होतं बरोबर (बोम्पू च्या जंगलात बसायला योग्य जागा मिळण्याची शक्यता कमी होती, त्यामुळे हि विशेष तयारी).

आम्ही पुढे निघालो खरे पण लगेचच पहिल्याच वळणावर थांबलो. डोंगराच्या ह्या भागात दोनही बाजूंनी विविध पक्षांचे आवाज जाणवत होते, त्यामुळे थांबणं भागच होतं.
पण इथे थांबायचं मुख्य कारण होतं Collared Owlet चा ऐकलेला आवाज. जंगलातलं एक सीक्रेट म्हणजे, ह्या पक्षाचा आवाज. ह्याचे रेकॉर्डेड आवाज वाजवले कि बरेच छोटे-छोटे पक्षी बाहेर पडतात (ते सगळे येतात, कारण त्यांना ह्या छोट्याश्या शिकारी पक्षाला हुसकून लावायचं असतं तिथून.. पण त्यामुळे त्यांच्या निरीक्षणाची आणि फोटो काढण्याची संधी मिळते). ह्या कारणामुळे, ह्या घुबडाचा आवाज मी आत्तापर्यंत बरेच वेळा ऐकला आहे, पण अजून त्याचा फोटो काढायची संधी मिळाली नव्हती मला. आम्ही सगळ्यांनी मिळून बराच वेळ त्या आवाजाचा शोध घेतला, पण पक्षी काही दिसतं नव्हता (आवाज मात्र सतत ऐकू येत होता .. जणू तो आम्हाला शोधून काढायचं आव्हानच देत होता).
पण हे सगळं होत असतांना आम्ही इतर पक्षांचेही आवाज ऐकत होतो, त्यामुळे थोडं पुढे चालत जाऊन इतर ४-५ पक्षांचे फोटो काढले. त्यातले २ महत्वाचे होते Grey-cheeked Warbler आणि Indian Cuckoo. अर्थात आम्ही जरी पुढे सरकलो असलो, तर लोबसांग ने त्याचा प्रयत्न सोडला नव्हता. खूप लांबून मग त्याने Collared Owlet चा शोध घेतलाच. त्या झाडात वरच्या बाजूला पानांच्या आडोशाला होतं ते छोटंसं घुबड. त्याची योग्य जागा आम्हाला समजावताना त्याला बरेच कष्ट पडले, पण अखेरीस आम्हा सगळ्यांना दर्शन झाले (आणि मला फोटो देखील मिळाले).



तिथून निघालो, आणि १५ मिनिटात परत एकदा थांबलो. ह्या वेळेस लोबसांग ने Shrike-babblers चा आवाज ऐकलं होता. थांबलो ते बरंच झालं, कारण २ वेगवेगळे Shrike-babblers बघायला मिळाले तिथे.


तिथून थोडं पुढे गेल्यावर थोड्याच वेळात डांबरी रस्ता गायब झाला आणि त्याची जागा कच्च्या रस्त्याने घेतली. तिथून पुढचे २ दिवस मग आमची कंबर-तोड सफर (खरंतर suffer) झाली. जंगल सुद्धा जास्त घनदाट वाटत होतं, हवेतला दमट पणा सुद्धा वाढला होता. त्याचबरोबर इथल्या सगळ्या झाडांवर शेवाळ्याचे थर होते (नुसती पानं नाहीत, तर झाडांची खोडं सुद्धा हिरवीगार). अशा वातावरणात जळवांचा सुळसुळाट असणार हे नक्कीच. तशी मानसिक तयारी सर्वांनी ठेवलीच होती म्हणा.
पुढच्या तासाभरात, आम्हाला थोडे पक्षी दिसले, पण नवीन किंवा वेगळं असं काही नव्हतं त्यात.


ह्या भागात Wards Trogon असण्याची खूप शक्यता वाटत होती आणि लोबसांग ला अशी काही ठिकाणे ठाऊक होती कि जिथे पूर्वी हा पक्षी दिसला होता. मग तिथे गाडीतून उतरून आम्ही सर्व एका रांगेत झाडीत घुसलो (पायवाट इतकी छोटी होती, कि शिस्तीत एका रांगेत जाण्याशिवाय काही पर्याय देखील नव्हता). इथल्या दाट झाडीतून, पाना-फांद्यांमधून वाट काढतं-काढतं आम्ही बरेच अंतर गेलो, पण ट्रोगॉन दिसणं तर दूरच, त्याचा आवाज सुद्धा ऐकू आला नाही. एक हिरव्या शेपटीचा Sunbird तेवढा दिसला, छान पिसं साफ करत बसला होता फांदीच्या आडोशाला.


तिथून पुढचा प्रवास मात्र आम्ही न थांबता केला. त्या भयंकर खडबडीत रस्त्यावरून जात असूनदेखील मला मस्त झोप लागली होती (गाडी लागू नये म्हणून घेतलेल्या गोळीचा परिणाम). साधारण बारा वाजता आम्ही बोम्पू कॅम्प वर पोहोचलो. लगेचच लोबसांग ने सूचना दिली कि अर्ध्या तासात लंच तयार असेल आणि थोडा वेळ थांबून २ वाजता आपण परत बाहेर पडू.
तंबूत घुसून मग बॅगमधून लगेच लागणार सामान काढून ठेवलं (रात्री अंधारात टॉर्च च्या प्रकाशात कितपत दिसेल माहित नाही, त्यामुळे आत्ताच बॅगमधून गोष्टी बाहेर काढल्या. तंबूमध्ये अर्थात फार जागा नव्हती म्हणा, त्यामुळे सामान काढून परत बॅगेवरच ठेवलं. २ बेड, पायापाशी बॅग ठेवायला जागा आणि बेड च्या मध्ये एक छोटासा टीपॉय, बास, संपला तंबू. प्रत्येक तंबूबाहेर एक सोलर लॅम्प ठेवलेला होता (रात्री वापरण्यासाठी). जेवणासाठी चा भाग मात्र छोटासाच पण व्यवस्थित बांधलेला होता. इथे एका टेबलावर खूप सगळ्या चार्जिंग केबल्स ठेवलेल्या दिसत होत्या.


एक वाजेपर्यंत आम्ही जेवण संपवून परत तंबूत आलो, पण तो पर्यंत आकाश पूर्ण ढगाळ झालेलं होतं, थोडे पावसाचे थेंब सुद्धा पडले अंगावर. आणि थोड्याच वेळात पाऊसाचा जोर वाढला. झालं, म्हणजे हवामान अंदाजाप्रमाणे आता आमचं संध्यकाळच बर्डिंग बोंबलणार वाटतं. पण तासाभरात पाऊसाचा जोर थोडा कमी झाला. हवा मात्र पूर्ण कुंद झाली होती, प्रकाश देखील नव्हता पाहिजे तसा.
आम्ही २:३० च्या सुमारास बाहेर निघालो खरे, पण अश्या हवामानात पक्षी सहसा बाहेर पडत नाहीत. त्यामुले बराच वेळ फिरून सुद्धा काहीही हाती लागत नव्हतं. अगदीच काही पक्षी नव्हते असं नाही म्हणा, त्यात एक तर लाइफर सुद्धा निघाला.


आता पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे आम्ही नाईलाजाने तंबूकडे परत फिरलो. संध्याकाळी (काळोख साधारण ५/५:३० लाच होतो इथे) घुबडांच्या शोधात परत बाहेर पडलो (अगदी मस्त पैकी रेनकोट आणि कॅमेरा कव्हर घालून) पण पाऊस थांबायचं नाव काढत नव्हता. त्यामुळे तसेच परत आलो (नशीब एवढंच कि कोणालाही जळवांचा त्रास झाला नाही).
रात्रीचं जेवण ७:३० वाजता होतं. हा भाग बाकी मनुष्यवस्ती पासून खूप दूर असला तरी इथे जेवणाची व्यवस्था ठीकठाक होती, रात्रीतर डबाबंद असे गुलाबजाम सुद्धा होते जेवणात.
दिवस क्रमांक ४ - बोम्पू च्या आसपास भटकंती
दिवसभराच्या दगदगी नंतर रात्री झोप छान लागली, पहाटे गजर लावून ४:१५ वाजता उठलो. डाईनिंग एरिया मध्ये चहा आणि बिस्किट्स तयार होतीच. तंबूच्या जवळच इथे ४ बाथरूम्स आणि ४ टॉयलेट्स होती (पत्र्याच्या शेड होत्या, पण निदान कमोड होते .. अर्थात फ्लश / जेट स्प्रे वगैरे चैनीच्या गोष्टी असण्याची शक्यता नव्हतीच). इथली बाकी व्यवस्था चोख होती. आम्ही तयार व्हायच्या आधीच त्यांनी ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण बांधून तयार ठेवलं होतं. तिथे आमच्यासाराखे इतर ४-५ ग्रुप्स होते, सगळ्यांसाठी व्यवस्थित पॅकिंग करून डबे तयार होते वेळेत. सकाळी सगळेच ४/४:३० वाजता बाहेर पडत असल्याने इथला स्टाफ पहाटे २/२:३० पासून उठून तयारीला लागतो.
परत एकदा सकाळ ढगाळ होती पण आम्ही ठरवल्याप्रमाणे निघालो. कालच्या अनुभवावरून असं वाटत होतं कि पाऊस बहुतेक दुपारपासून सुरु होईल, त्यामुळे तो पर्यंत निदान ४-५ तास मिळाले तरी बर्डिंग चांगलं होण्याची शक्यता होती.
सुरुवात चांगली झाली, १० मिनिटातच आम्ही एका ठिकाणी थांबलो. आमच्या आधीच एक ग्रुप तिथे येऊन थांबला होता Sikkim Wedge-billed Babbler साठी. हा पक्षी पहिल्या दिवशी आम्हाला दिसता-दिसता राहिला होता, त्यामुळे आज थांबणं भागच होतं. पक्षी जवळच्या झुडुपात हालचाल करत होता पण तो बाहेर येऊन दर्शन द्यायला तयार नव्हता. जवळ-जवळ अर्धा तास होतो आम्ही तिथे पण शेवटी दुर्बिणीतून बघण्यावरच समाधान मानावं लागलं आम्हाला. कसाबसा एखाद दुसरा फोटो मिळाला पण समाधानकारक नाही.


इथून पुढे मग आम्ही चालतच निघालो (गाड्या थोड्या अंतरावर आमच्या मागे-पुढेच होत्या तश्या). पायी फिरतांना पक्षांचे आवाज जास्त व्यवस्थित ऐकता येतात किंवा त्यांची हालचाल सुद्धा जाणवू शकते. पण आज बहुतेक आमचा दिवस नव्हता. जवळ-जवळ सगळं दिवसभर पुढे हेच होतं होत. पक्षी बाहेरच पडत नव्हते. कदाचित ह्या ढगाळ हवेमुळे त्यांना काहीतरी पूर्वसूचना मिळत असावी (कि हवा अजून खराब होऊ शकते, वगैरे).
अर्थात अगदीच एकही पक्षी दिसला नाही असं नाही, पण आम्ही जेवढं ह्या जंगलाबद्दल ऐकलं होत त्यामानाने इथे काहीच दिसत नव्हतं. आमचं नशीब, दुसरं काय? इथे आम्हाला एक छोटा थवा दिसला, सगळेच Yellow-throated Fulvettas होते. त्यातल्या एकाच्या पायात रिंग सुद्धा दिसली (पक्षांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पायात अशी रिंग अडकवली जाते). त्यांचे फोटो काढत असतांना अचानक मला जंगलातून काहीतरी येऊन जवळच्या फांदीवर बसल्याच जाणवलं. काय आहे ते कळायला (दिसायला) थोडा वेळ लागला पण नीट बघितल्यावर ते छोटंसं घुबड दिसलं. हे तर Collared Owlet. आधी त्याचं दर्शन होत नव्हता आणि आता अचानक लगेच दुसऱ्या दिवशी परत दिसलं. ह्या वेळेस मस्त फोटो पण मिळाले.


जंगलात मधेच एका ठिकाणी आम्ही मग न्याहारी साठी थांबलो, इथे आम्ही बरोबर आणलेल्या फोल्डिंग च्या खुर्च्यांचा चांगलाच उपयोग झाला.


दुपारपर्यंत मग आम्ही बरेच फिरलो. थोडा वेळ गाडीतून आणि बाकी सगळा वेळ चालत. आम्हाला जे मोजकेच पक्षी दिसले, त्यात होते Beautiful Nuthatch (अगदी नावाप्रमाणेच सुंदर दिसतो हा पक्षी), Striated Bulbul, आणि इतर काही.


दुपारच्या जेवणासाठी आम्ही ह्या अभयारण्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो होतो. इथे वन खात्याचं एक तात्पुरतं ऑफिस वजा घर होतं. थोडी लाकडी बाकडी आणि १-२ खोल्या, जरा उंचावर बांधलेल्या. इथे म्हणे आधी चांगलं बांधकाम होतं, पण जंगलातल्या हत्तींनी त्याची मोड-तोड केली होती. तिथे असणाऱ्या एका बोर्ड वरून वाचून असंही कळलं, कि ह्या जागी पूर्वी एक छोटं गाव होत, पण जेव्हा हे अभयारण्य बनलं तेव्हा इथल्या लोकांना मग भालुकपॉंग इथे हलवण्यात आलं.
दुपारच्या वेळेस तसेही पक्षी फार बाहेर निघत नाहीत (आज तर सकाळी पण निघाले नव्हते म्हणा), त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच आराम करायचं ठरवलं (म्हणजे एकत्र बसून गप्पा-टप्पा वगैरे). पण जेवत असतांना अचानक आम्हाला एक खूप मोठं फुलपाखरू उडतांना दिसलं. बहुतेक birdwing असावं (भारतातलं सर्वात मोठं फुलपाखरू). जेवण पटापट संपवून आम्ही लगेच कॅमेरे काढले आणि त्याचा शोध घेतला. एक मोठ्या पानांमागे ते दडून बसलं होत. फोटो काढतांना कळलं कि हे फुलपाखरू नाही तर सर्वात मोठ्या अश्या पतंगाची (Atlas Moth ची) एक प्रजाती होती.


दीड वाजता आम्ही परत निघालो (परतीचा प्रवास आणि बरोबर बर्डिंग). पाऊस अजून चालू झाला नव्हता पण जंगल अजूनही खूप शांतच होतं. आम्ही परत एकदा चालायला सुरुवात केली (काहीतरी दिसेलच ह्या आशेवर) आणि सकाळी आम्ही खाली उतरत होतो, आता मात्र चढून जायचं होत. थोड्याच अंतरावर २ हेल्मेट वाले पक्षी (म्हणजे Long-tailed Broadbills) दिसल्याने आम्हाला थोडा हुरूप आला. पण तेवढंच. पुन्हा एकदा एक लांब चाल आमच्या नशिबी होती. कंटाळून आम्ही आमच्या गाडीच्या ड्राइवर ना बोलावणार इतक्यात एका सुतारपक्षाचा आवाज ऐकू आला. लोबसांग च्या मते हा Pale-headed Woodpecker चा आवाज होता. मग ह्या दुर्मिळ पक्ष्याचा प्रतीक्षेत आम्ही पुढचा अर्धा तास घालवला. त्याचा आवाज तर पूर्णवेळ ऐकू येत होता पण एकदा पुसटसं दर्शन सोडलं तर पुन्हा काही तो बाहेर आला नाही. इथे इतर काही पक्षांचे आवाज हि ऐकू येत होते, पण कोणीही बाहेर यायला तयार नव्हतं आज.
पाच वाजता आम्ही आमच्या तंबूत परतलो, वाटेत एका ठिकाणी आम्हाला Rufous-necked Hornbill चं पुसटसं दर्शन झालं.


कालच्या अनुभवावरून शहाणे होऊन आज आम्ही काळोखातलं बर्डिंग टाळलं. सर्वांनीच त्यापेक्षा थोडा आराम करायचं पसंत केलं. उद्या आम्ही अजून लवकर म्हणजे ४ वाजता निघणार होतो. एक तर जमल्यास आजची थोडी भरपाई (म्हणजे आजच्यापेक्षा बरं बर्डिंग) आणि दुसरं कारण म्हणजे दिरांग इथे रात्री मुक्कामाला पोहोचायचं म्हणजे बराच प्रवास होता. आम्ही प्लॅन्स केले खरे, पण उद्याच्या हवामानाचा अंदाज देखील काही चांगला नव्हता.
रात्री जेवणाच्या वेळी लोबसांग ने परत एकदा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, ४ ऐवजी ४:३० वाजता निघायचं ठरवलं.
पाचवा दिवस - बोम्पू ते दिरांग
पहाटे 4 चा गजर होता पण मला 3:30 लाच जाग आली. परत झोप येत नव्हती, मग तसाच एक हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात टूथ ब्रश घेऊन बाहेर आलो. डाईनिंग एरिया मध्ये प्रकाश दिसला, म्हणजे चहा मिळण्याची शक्यता होती लगेच. पटापट आवरून तिथे जाणार, तोच अचानक पाऊस सुरु झाला.
ठरलेल्या वेळेला आम्ही सर्वच जण निघायला तयार होतो (सामानाची बांधाबांध करून .. कारण आम्ही इथे आता परत येणार नव्हतो) पण पाऊस थोडा कमी होईपर्यंत ५ वाजले.


आमचं पाहिलं लक्ष होतं Temmincks Tragopan. लामा कॅम्प च्या जवळ असणाऱ्या एका वॉच टॉवर वरून त्याच दर्शन गेले २-३ दिवस होत होतं. त्यामुळे तिथे ७:३० पर्यंत पोहोचायचं ठरवलं होतं, वाटेत बर्डिंग करत गेलो तरी आम्ही तिथे व्यवस्थित पोहोचलो असतो. पण विधात्याच्या मनात वेगळंच होतं. पाऊस तर थांबला नव्हताच, पण रात्रभरातल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती. बऱ्याच ठिकाणी पाणी साठलं होतं. इथे तसंही गाडी चालवणं कठीण होतं, त्यात आता साचलेलं पाणी. थोड्याच अंतरावरआमची गाडी खूप आवाज करू लागली (सायलेन्सर चा पाईप फुटला होता .. इतक्या वेळा दगडांवर आपटून त्याने शेवटी जीव टाकला होता).
बरं, पाऊस एवढा होता कि थांबून पक्षी बघणंही शक्य नव्हतं. आणि पुढचे निदान १५-२० किलोमीटर पर्यंत कुठलंही गॅरेज असण्याचीही शक्यता नव्हती, त्यामुळे मग गाडी तशीच पुढे दामटली. वॉच टॉवर च्या आश्रयाला थोडं थांबलो पण पाऊस चालूच होता, मग आम्ही आधीच ब्रेकफास्ट करायचं ठरवलं.
थोड्या वेळाने पाऊस जरा कमी झाल्यासारखं वाटलं, त्यामुळे आम्ही जय्यत तयारीत (रेनकोट, छत्री, कॅमेऱ्याला कव्हर वगैरे तयारी) बाहेर पडलो. ट्रॅगोपन ची वेळ तर निघून गेली होती, पण इतर कुठले पक्षी तरी दिसतील अशी अशा होती.

२-३ प्रकारचे पक्षी दिसले तिथे पण विशेष असं काही नाही. पाऊसाचा रंग बघता, इथे अजून थांबण्यात काही अर्थच नव्हता त्यामुळे मग आम्ही परत एकदा बुगून साठी प्रयत्न करायचं ठरवलं (इथे वर जरी पाऊस असला तरी थोडं खाली कदाचित पाऊस कमी असेल ह्या आशेवर). तसंही आज आमचं दुपारचं जेवण हे लोबसांग च्या घरीच असणार होतं, त्यामुळे बुगून साठी प्रयत्न करणंच योग्य होतं (त्याच घर तिथून जवळंच असल्यामुळे).
९ च्या सुमारास आम्ही ग्लो बारी भागात पोहोचलो खरे, पण इथेही पावसाने आमची पाठ सोडली नव्हती. पण अगदी जोरात पडत नव्हता इतकंच. नाईलाजास्तव मग आम्ही पावसातंच फिरायचं ठरवलं. एवढ्या पावसात प्रॉब्लेम असा होतो कि एखादा पक्षी जरी दिसला, तरी कॅमेरा बाहेर काढता येईलच असं सांगता येत नाही. अर्थात ते नंतरचं, कारण एवढ्या पावसात पक्षी बाहेर येण्याची शक्यताही विरळच होती. सीबीया, drongo, असे काही नेहेमीचे कलाकार दिसले, पण फोटो काढण्यासारखं काही नाही. नाही म्हणायला, आत शिरता-शिरताच Bhutan Laughingthrush चा एक चांगला फोटो मिळाला.


आम्ही १२ पर्यंत जेवणासाठी येऊ असं लोबसांग च्या घरी सांगितलेलं होतं पण आम्ही १०:३० लाच तिथे जाऊन थडकलो. एवढ्या पावसात आमच्या समोर काही पर्यायही नव्हता. त्यांची खूपच घाई झाली असेल, पण तासाभरातच आमचं स्वादिष्ट जेवण तयार झालं. नुसतं घरी बनवलेलं असं नाही तर बरेचसे पदार्थ (भाज्या, तांदूळ) हे त्यांच्या शेतातलेच होते. सर्वानी मग जेवणावर व्यवस्थित ताव मारला (ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा.. त्या न्यायाने कदाचित पोट भरल्यावर नशीब उजाडेल).


आरामात जेवून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो (तो पर्यंत आमच्या गाडीची तात्पुरती डागडुजी सुद्धा झाली होती). दिरंग ला पोहोचायच्या आधी आम्हाला २ वेगळे पक्षी दिसण्याची अशा होती (म्हणजे लोबसांग च्या प्लानिंग नुसार). त्यातला पहिला Long-billed Plover. हा प्लोव्हर इथल्या नदी काठी दिसू शकतो, पण त्या वाळू आणि दगडात तो इतका छान लपून असतो, कि समोर असला तरीही त्याला शोधणं कठीण होतं.
कुठेही न थांबता आम्ही रूपा गावातल्या नदीवर गेलो. लोबसांग च्या मते पक्षी तिथे असण्याची शक्यता खूप होती, पण तरीही त्याला शोधणं अवघड काम होतं. हे का ते समजण्यासाठी हा खालचा फोटो बघा. पण लोबसांग ची नजर खूपच चांगली असल्याने त्याने पक्षाला बरोब्बर शोधला. एकदा दिसल्यावर मग त्याच्यावर लक्ष ठेवणं थोडं सोपं होतं, पण त्यातही "नजर हटी दुर्घटना घटी" वाला प्रकार होता. लांबून का होईना, पण ह्याचे चांगले फोटो मिळाले.


आता ह्या पुढचं लक्ष असणार होतं Black-tailed Crake पण तिथे पोहोचण्याआधी आम्ही अजून एक स्टॉप घेतला. रस्त्यापासून खूप जवळ एक कोकिळा दिसली आम्हाला. हे ठिकाण म्हणजे Sera Wanghoo Road वर कुठलंसं टेकाड होतं. तिथे असं सांगण्यासारखं विशेष काही नव्हतं, पण थांबलो ते बरं झालं कारण तिथे मला अजून एक लाइफर दिसला, तो होता Dark-sided Flycatcher. इथंसुद्धा पाऊस होताच पण नशिबाने त्याचे फोटो काढता आले.


तिथून मग आम्ही सरळ बर्चीपाम गावात क्रेक साठी गेलो. गावातच रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून आम्ही खाली उतरलो आणि लोबसांग च्या मागे तिथल्या शेताडीत उतरलो. इथली सगळी शेती अशी डोंगराळ उंच-सखल भागातली त्यामुळे शेतांच्या जणू पायऱ्या होत्या तिथे. १५-२० मिनिटे शांतपणे उभे राहिलो खाली पोहोचून पण कुठेच काही हालचाल किंवा आवाज जाणवत नव्हता. पण तेवढ्यात लोबसांग ला एक पुसटसा आवाज ऐकू आलं, मग आम्ही लगेच त्या दिशेला मोर्चा वळवला. चिखलातून वाट काढत गेलो, पण ह्या वेळेस मात्र आमचं नशीब जोरावर होतं. तिथे असणाऱ्या क्रेक च्या जोडीचे बऱ्यापैकी फोटोही मिळाले सगळ्यांना.


त्यानंतर आम्ही त्याच भागात थोडं अजून फिरलो. तिथे आधी कधी न पाहिलेला असा Russet Bush warbler एकदा दिसला, पण ओझरताच. फोटो काही मिळू शकला नाही. पुढच्या वाटेवर एके ठिकाणी आम्ही वॉलक्रीपर नावाच्या एका पक्षाचा शोध घेण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
४:३० च्या सुमारास आम्ही आमच्या संडुप खांग नावाच्या हॉटेल वर पोहाचलो (४:३० म्हणजे इथे संध्याकाळ झालेली असते). इथे आम्ही ३ रात्र राहणार होतो आणि इथल्या खोल्या सुद्धा छान प्रशस्त होत्या, त्यामुळे बॅग उघडून वस्तू बाहेर ठेवू शकलो व्यवस्थित. ह्या हॉटेल च लोकेशन अगदी मस्त आहे. म्हणजे पुढच्या बाजूला साधासरळ रस्ता आहे पण मागच्या बाजूला खळाळत वाहणारी नदी आणि सभोवताली मस्त डोंगर रांगा असा छान देखावा दिसतो.

संध्याकाळी निवांत बसून मग आम्ही पुढच्या दोन दिवसांचं थोडं नियोजन केलं. आम्हाला मंडला आणि सेला पास (म्हणजे सेला खिंड) अशा दोन ठिकाणी जायचं होत. सेला खिंड थोडी जास्त अंतरावर असल्याने तिथे जाण्याच्या दिवशी पहाटे ४/४:३० ला निघावं लागणार होतं. इथे अजून एक प्रॉब्लेम होता. आमच्या गाड्यांमधलं डिझेल कमी झालं होत आणि आज इथल्या पेट्रोल पंपावर वीज नसल्याने ते भरता आलं नव्हतं. आम्ही सकाळी निघतो, त्या वेळेस कुठलेच पेट्रोल पम्प उघडलेले नसतात, त्यामुळे मग आधी जवळच मंडला करून मग परवा सेला ला जाऊ असंच शेवटी ठरलं.
सहावा दिवस - मंडला टेकडीवरचे पक्षी
सकाळी आम्ही थोडं वेळेत म्हणजे ५ वाजता (बरोबर packed ब्रेकफास्ट घेऊन) निघालो. पण लगेच मंडला कडे न जाता आम्ही कालच्याच भागात परत गेलो. Russet Bush Warbler शोधायचा हे मुख्य कारण होत, पण त्याचबरोबर सकाळच्या वेळेत इथे इतर पक्षी दिसण्याचीसुद्धा शक्यता होती. पुढचे २ तास मग तिथेच गेले. आजही Warbler आसपास होता पण झुडुपाच्या जाळीमागून इकडून-तिकडे फिरत होता (अर्थात त्याचं किडे शोधण्याचं काम चालू असेल पण आमच्यासाठी मात्र फक्त त्याची उलट-सुलट पळापळ दिसत होती. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर कसेबसे त्याचे फोटो मिळाले. पण सकाळचा स्पेशल शो होता एका सनबर्ड चा. त्याच नाव Mrs. Gould’s Sunbird. आमच्या छान जवळ येत होता तो, आणि सकाळच्या प्रकाशात त्याचे फोटो देखील चांगले मिळाले.

एवढा वेळ गेला ह्या सगळ्यात कि मग आम्ही तिथेच थांबून ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. इथे एक मजेदार घटना घडली. अनवधानाने आमच्या हातून एक उकडलेलं अंड खाली रस्त्यावर पडलं. जवळून एक छोटासा पाळीव कुत्रा घेऊन २ जण चालले होते. त्या कुत्र्याला बहुतेक अंड्याचा वास आला, त्याने येऊन, ते पूर्ण अंड एका झटक्यात मटकावलं.
तिथून पुढे जाताना, एका ठिकाणी आम्ही थांबलो. परत एकदा कोकीळ वर्गातलाच एक पक्षी होता आणि त्याचे फोटो काढत असतांना अचानक दुसरा कोकीळ पक्षी रस्त्याच्या समोरच्या बाजूच्या तारेवर येऊन बसला.


साधारण ८:३०/९ वाजता आम्ही मंडला इथे बर्डिंग चालू केलं. आज दिवसभर आम्ही त्या डोंगरांमध्ये बरेच फिरलो. काही वेळ गाडीतून आणि बाकी चालत. पहिल्या सत्रांत २-३ warbler पक्षी दिसले (Buff-throated and Brownish-flanked). थोडेफार पक्षी दिसत होते, पण एकंदरीत आमचा गाईड पण थोडा हिरमुसला होता, अर्थात ह्यात त्याची काही चूक नव्हतीच, तो तर व्यवस्थित प्रयत्न करत होताच. पण परत एकदा हवामान आम्हाला साथ देत नव्हतं. एकतर पूर्ण वेळ आकाश ढगाळ होतं आणि त्यात दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.


जसं आम्ही डोंगरात थोड्या उंचावर गेलो तसं वेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसायला लागल्या. त्यामुळे इथेतरी जरा वेगळे पक्षी दिसतील अशा आमच्या अशा पल्लवित झाल्या. लगेचच एक यूहीनांचा थवा आमच्या दृष्टीस पडला (Stripe-throated Yuhina आणि Rufous-vented Yuhina अशा दोन्ही प्रजातींचा मिश्र थवा होता तो). त्यांचा जवळच्या ऱ्होडोडेंड्रॉन वर छान खेळ रंगला होता. दिवसभर वेगवेगळ्या कोकिळांचे (Cuckoos) आवाज येत होते पण आता एका सुतारपक्षाचा आवाज ऐकू आला. मग थोड्या शोधानंतर आम्हाला Rufous-bellied Woodpecker दिसला. जवळच एक Eurasian Nutcracker सुद्धा उडतांना दिसला.
इथेच अजून एका छोट्या पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतलं. तो होता Rufous-fronted Bushtit. त्या angry बर्ड ह्या फेमस कार्टून्स सारखा छोटासा होता तो. जवळच होता आमच्या पण पटापट एका फांदीवरून दुसरीकडे उद्या मारत होता (मध्येच आवाज सुद्धा करत होता).




त्या दिवशी आमच्या सारखेच तिथे इतरही निसर्गप्रेमी मंडळी होती. एका ठिकाणी आम्हाला २-३ ग्रुप आणि त्यांचे गाईड हे रस्त्यात थांबलेले दिसले. काहीतरी इंटरेस्टिंग असल्याशिवाय सगळे थांबणार नाहीत, त्यामुळे मग आम्हीही थांबलो तिथे (थोडा पाऊस असल्याने कॅमेऱ्या साठी प्लास्टिक कव्हर वगैरे घेऊन). ते सगळे तिथे Temminck’s Tragopan साठी थांबले होते. थोड्या वेळापूर्वी त्याने दरीच्या बाजूने वर येऊन डोंगरकडे जायला रस्ता ओलांडायचा प्रयत्न केला होता, पण भरधाव जाणाऱ्या एका ट्रक च्या आवाजामुळे तो मागे फिरला होता. तो पुन्हा वर येईल ह्या अपेक्षेने तिथे सगळे जण थांबलेले होते.
आम्हीही त्यांना जॉईन झालो खरे पण मला तेवढा उत्साह नव्हता. एकतर संततधार पाऊस होताच, शिवाय मला असं आतून वाटत होतं, आता तो Tragopan काही एवढ्यात परत येणार नाही, त्यामुळे त्याच्या मागे लागण्यापेक्षा दुसरे पक्षी शोधलेले बरे. थोडा वेळ थांबल्यानंतर मग इतरांनाही तसंच वाटायला लागलं, त्यामुळे आम्ही पुढे निघालो.

इथे दुपारच्या जेवणासाठी काही जास्त पर्याय नव्हते. २ छोटी हॉटेलं (रेस्टॉरंट) होती आणि दोन्ही कडे फक्त मॅग्गी आणि ऑम्लेट हाच चॉईस असणार होता, त्यामुळे मग लोबसांग ने निवडलेल्या उपाहारगृहात बसलो. आमचं जेवण होईपर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढला होता.

पण त्या पावसात देखील लोबसांग ने आम्हाला Hodgson's treecreeper दाखवायला नेलं. त्याचा अंदाज अगदी बरोबर होता. त्या ठिकाणी गेल्यावर उतरून त्याने फक्त २-३ झाडे तपासली आणि लगेचच आम्हाला यायला सांगितलं. त्याचे चांगले फोटो हि मिळू शकले तिथे (मी मात्र त्या पावसात गाडीतून उतरलो नाही, हा पक्षी मी हल्लीच मिझोराम मध्ये बघितलेला होता).
तिथून पुढे आम्ही परत एकदा Tragopan साठी थांबलो. पण तो काही परत रस्त्याकडे फिरकला नाही. पुढच्या अर्ध्या तासात आम्हाला white -collared Blackbird, Nutcrackers, आणि काही Minlas दिसले, पण वेगळं असं काही नाही.



पाऊस कमी होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती, त्यामुळे मग आम्ही लवकर परत जायचा निर्णय घेतला. घाटातून अर्धा रस्ता उतरून येतांना एका वळणावर बऱ्याच पक्षांचा आवाज येत होता, इथे पाऊस देखील नव्हता. त्यामुळे मग खाली उतरून दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करायला सुरुवात केली. इथे अचानक ५-६ प्रकारचे पक्षी दिसले आणि काहींचे फोटो देखील मिळाले (Barbets, bulbuls, yellow-cheeked tit, nuthatch, some warblers, आणि flycatchers).


हॉटेल वर जाताना आम्ही परत एकदा wallcreeper साठी प्रयत्न केला. पण त्याने आजही गुंगारा दिला आम्हाला. आज नशिबाने पेट्रोल पम्प चालू होता. चला, म्हणजे उद्याची सेला खिंडीची सहल होणार नक्की (अर्थात अश्या पावसात काय दिसेल ते माहित नाही, पण निदान तिथे जाऊन तरी येऊ आम्ही). परत येतांना आज आम्ही दिरांग गावातून आलो, आणि मधे एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन चहा आणि भज्यांचा आस्वाद हि घेतला. ह्या छोट्या रस्त्यात म्हणे कधीकधी खूप ट्रॅफिक जाम होतो, पण सध्या टुरिस्ट सिझन नसल्याने आम्हाला काही त्रास झाला नाही.
सातवा दिवस - सेला खिंड आणि बर्फातले पक्षी
आज पहाटे आम्ही ४ वाजताच बाहेर पडलो. विशेष म्हणजे इथे सुद्धा आम्हाला ३:३० वाजता गरमागरम चहा आणि बिस्किटे मिळाली निघण्या पूर्वी. सेला ला पोहोचायला साधारण दोन तास लागणार होते त्यामुळे तोपर्यंत मी मस्तपैकी झोप काढली.
अरुणाचल प्रदेश मध्ये तवांग हे एक महत्त्वाचं टुरिस्ट attraction आहे आणि तिथे जायचा रस्ता हा सेला खिंडीतून जातो. त्यामुळे ह्या रस्त्यावर थोडी जास्त रहदारी असते. पण हल्लीच BRO (Border Roads Organization) ने तिथे जाण्यासाठी एक नवीन रस्ता बांधलाय (३ बोगद्यांच्या मदतीने), त्यामुळे तवांग ला पोहोचायचा वेळ वाचतोच शिवाय सेला खिंडीत (जी १२,७०० फूट उंचीवर आहे) जावं लागत नाही.
अर्थात आमचं गंतव्य हे सेला खिंडच असल्यामुळे आम्ही तो बोगद्याचा रस्ता टाळला आणि सरळ घाटाकडे वळलो. आम्ही वर चढायला सुरुवात सुरुवात केली तेव्हा थोडं-थोडं उजाडायला लागलं होतं. हवेतली थंडी पण खूप वाढली होती इथे, रस्त्याच्या दुतर्फा आता बर्फ दिसायला लागला होता. आम्ही थंडीची तयारी केली होती (ग्लोव्हस, जॅकेट्स वगैरे) पण एवढ्या थंडीत कॅमेरा बाहेर काढून फोटो काढणं सोपं नव्हतंच. एकतर हातमोजे काढून जास्त वेळ राहता येत नाही आणि ते घालून कॅमेरा वापरता येत नाही.
अजून थोडं वर आल्यावर एका वळणावर आमच्या गाड्या थांबल्या. बाहेर खूप धुकं असल्यामुळे फार लांबचं दिसत नव्हतं पण तरीही आम्हाला झाडांच्या शेंड्यांवरती पक्षांची हालचाल जाणवली. जरा वेळाने लोबसांग ने आम्हाला Red-headed आणि Grey-headed दोन्ही प्रकारचे Bullfinches दाखवले
त्या धुक्यात मग एक Fire-tailed Sunbird सुद्धा दिसला. सूचिपर्णी वृक्षांच्या टोकावर त्याची पळापळ चालू होती.


धुक्याबरोबरच इथे खूप वारा देखील होता आणि त्यामुळे मधेच कधीतरी धुक्याची चादर बाजूला सरकून आम्हाला बर्फाच्छादित डोंगरांचं दर्शन घडत होतं.


इथून मग आम्ही चालतच वर जायचं ठरवलं कारण थोड्या थोड्या अंतरावर आम्हाला पक्षी दिसत होते. कमी प्रकाशामुळे फोटो काढणं थोडं कठीण होत होतं पण २-३ दिवसांनंतर आज जरा पक्षी दिसायला लागले होते त्याचा आनंद जास्त होता. Bullfinches नंतर आम्हाला तिथे Accentors,Warblers आणि इतर काही पक्षी दिसले.


लोबसांग ने मग तेवढ्यात काही rosefinches शोधले (Himalayan Beautiful Rosefinches आणि Himalayan White-browed Rosefinces).


२-३ दिवसांच्या दुष्काळानंतर आम्ही इथे अजूनही थांबू शकलो असतो पण अजून बऱ्याच प्रजाती शोधायच्या होत्या त्यामुळे निघावं लागलं. वर खिंडीत पोहोचून आधी ब्रेकफास्ट करायचा असा विचार होता. आणि हो, आमच्याकडे बर्फात चालण्याकरता म्हणून घेतलेले गमबूट होते (काश्मीर ट्रिप च्या वेळेस फेब्रुवारी मध्ये घेतलेले), तेही तिथे घालायचं ठरवलं. गाड्या थांबवून आम्ही आमचा प्लॅन अमलात आणत होतो तेवढ्यात मोठा गलका ऐकू आला. तिथे दुसऱ्या ग्रुपला बर्फात Snow Partridges दिसले होते. मी घाईघाईत कसेबसे गमबूट चढवले होते, त्यामुळे लगेच तिथे धावत सुटलो. सर्वांचा उत्साह इतका दांडगा होता कि आमच्या शकुन्तला मॅडम तर एका पायात बूट आणि दुसऱ्या पायात गमबूट घालून धावत आल्या.



सेला खिंडी जवळंच एक तळ आहे. त्याच्या चहूबाजूला बर्फ असला तरी तळ्यात अजूनही पाणी होतं (गोठलं नव्हतं). आम्ही तिथपर्यंत चालताच गेलो. तिथे बरेचदा ग्रॅण्डला पक्षांचा थवा असतो, पण आज मात्र एकही नव्हता आणि Grandala हे तर ह्या ट्रिप च वैशिष्ठ्य असणार होतं. पण तेवढ्यात लोबसांग ला दुसऱ्या गाईडचा फोन आला Himalayan Monals दिसल्याचा. अक्षरशः धावतच आम्ही गाडीत बसून सुसाट निघालो (अर्थात बर्फाच्छादित रस्त्यांवरून जमेल तेवढंच). मिळालेल्या माहितीप्रमाणे जागेवर गेलो, पण आम्हाला उशीर झाला होता. मग थोडं खाली-वर सगळीकडे फिरलो. तेवढ्यात लोबसांग ने वर डोंगरातल्या धुक्याकडे बोट दाखवलं. तिथे १-२ पक्षी झाडीत धावत असल्यासारखं जाणवलं (धुक्यामध्ये अजून काही दिसणं शक्यंच नव्हतं). पण तरीही कॅमेरा त्या दिशेला वळवून मी पटकन २-३ फोटो काढले.
मोनल वरच्या दिशेने जात होते त्यामुळे लोबसांग ने आम्हाला लगेच गाडीत बसायला सांगितलं आणि आम्ही थोडं वरच्या बाजूला गेलो (घाटातल्या नागमोडी रस्त्यांमुळे थोडं पुढे जाऊन मग वळावं लागतं होतं). आमच्या २ गाड्या होत्या आणि मी आज मागच्या गाडीत होतो, अचानक आमच्या पुढच्या गाडीने ब्रेक मारला. त्यांच्या अगदी पुढ्यात होता मोनल पण गाडीच्या आवाजाने तो भरकन उडून गेला. आम्हाला फक्त उडतांनाची हालचाल दिसली मागच्या गाडीतून. आणि त्यानंतर आम्ही पुढचा अर्धा तास घालवून देखील परत काही तो दृष्टीस पडला नाही


सेला खिंड ओलांडून आम्ही आता अजून पुढे जात होतो. रस्त्यात परत एकदा तळ्यावर नजर टाकली, पण एकही ग्रॅनडाला नव्हता तिथे. थोडं पुढे आम्हाला आपल्या शहरातल्या कबुतरांचे हिमालयातले भाऊबंद दिसले (Snow Pigeons). त्यांच्या उडण्याचा मागोवा घेत आम्ही त्यांना शोधलं आणि काही फोटो मिळवले. आता रस्त्याचा दुसया बाजूला आम्हाला एका काळसर, छोट्या पक्षाची हालचाल दिसली. आणि ह्या Wren ने आम्हाला जास्त तंगवल नाही. उजेडही चांगला होता तिथे, जवळच एक white-capped redstart सुद्धा मिळाला आम्हाला.



आता आम्हाला डोंगराच्या दिशेला थोडंसं वर पक्षांची हालचाल दिसली, जरा निरखून बघितल्यावर ग्रॅनडालाचा मस्त निळा रंग लगेच लक्षात आला. ग्रॅनडाला ची एक जोडी तिथे बर्फात गवताची पाती शोधत होती, आणि आम्हाला फोटो काढण्यासाठी वेळ देत होती. तेवढ्यात लोबसांग चा फोन परत वाजला. ह्यावेळेला त्याला Tibetan Blackbird दिसल्याचा निरोप आला होता (त्या तळ्याच्या काठावरच). हा एक दुर्मिळ पक्षी असल्याने आम्ही लगेच गाडीत बसून निघालो.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे आधीपासून ४-५ जण कॅमेरे घेऊन फोटो काढत होते. त्यामुळे मग पक्षी कुठे दिसतोय वगैरे गाईडला विचारावं लागलं नाही. सगळे जण blackbird च्या मादीचे फोटो काढत होते, तेवढ्यात नर पण आला तिथे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बर्फावर मग ग्रॅनडाला पण दिसले (हे आधीच्या पेक्षा खूप जवळ होते). आता इकडे जावं कि तिकडे असा प्रश्न निर्माण झाला (problem of plenty). पण दोन्हीकडच्या पक्षांना काही घाई नव्हती त्यामुळे सर्वांना व्यवस्थित फोटो मिळाले. थोड्या वेळात आजून थोडे ग्रॅनडाला तिथे आले, मग आले Plain & Black-headed Mountain Finches, पाठोपाठ होते Alpine आणि Rufous-breasted Accentors, आणि हो, White-browed Rosefinches राहिलेच कि. अचानक तिथल्या पक्षीमित्रांमध्ये उत्साह संचारला. कोणाचे आणि किती फोटो काढू असं झालं आमचं.




ह्या ट्रिप मधला बहुतेक हा एक तास सर्वात जास्त लाभदायक होता. लाइफर्स पण मिळाले आणि चांगले फोटो सुद्धा. त्या उत्साहात मग आम्ही एक बर्फातला ट्रेक करायचं ठरवलं. भर बर्फात गाड्या थांबवून आम्ही खाली उतरून लोबसांग च्या मागे चालायला सुरुवात केली. थोड्याश्या बर्फातून आता आम्ही पूर्ण बर्फात चाललो होतो. पांढराशुभ्र बर्फ आणि त्यात आजू-बाजूला असणारं धुकं, त्यामुळे थोड्याश्या अंतरापलीकडे काहीही दिसत नव्हतं. आम्हाला इथे Gould’s Shortwing शोधायचा होता. १२,७०० फूट उंचीवर ऑक्सिजन खूप कमी असतो, त्यात परत बर्फातून चालायचं, एवढं सोपं नव्हतं पण आम्ही अगदी हळू-हळू चालत होतो.
अशा वातावरणात पक्षी दिसणं खूपंच कठीण वाटत होतं. पण आश्चर्य म्हणजे, इथल्या ह्या जाड बर्फात सुद्धा आम्हाला Snow Partridges ची एक जोडी दिसली. निवांत बसलेलं होते दोनही पक्षी. पण ते सोडलं तर (आणिआम्ही) दुसरी कुठलीही सजीव हालचाल जाणवली नाही. अजून जास्त फिरण्यात काहीच अर्थ वाटत नव्हता, त्यामुळे आम्ही परत फिरायचं ठरवलं.




तिथून परत आल्यावर लोबसांगने आम्हाला अजून एका पक्षाबाबत सांगितलं (White-browed Tit-Warbler). पण त्याकरता आम्हाला डोंगरात एक छोटा ट्रेक करावा लागणार होता (बर्फ नव्हता इथे पण सरळ डोंगर-दगडातून वर जायचं होतं). मी तो ट्रेक न करण्याचा निर्णय घेतला (एकतर हा पक्षी माझा लाइफर नव्हता, आणि दुसरं म्हणजे बर्फात चालून आल्यावर मला चांगलंच दमायला झालं होतं.
माझा न जाण्याचा निर्णय अगदी योग्य होता कारण थोड्याच वेळात माझं डोकं गरगरायला लागलं. काय होतंय ते नक्की समजत नव्हतं. डोकं दुखत होतं, चक्कर येत होती, सगळी लक्षणं altitude sickness (उंचावर कमी ऑक्सिजन मुळे होणारा त्रास) ची होती. लोबसांग ने मग थोडं खाली उतरून जायचा निर्णय घेतला (कमी उंचीवर ऑक्सिजन ची पातळी थोडी वाढणार म्हणून). तो पर्यंत दुपार झालेली होती, त्यामुळे मग जेवणासाठी थांबायचं ठरलं (म्हणजे मला अजून थोडा वेळ विश्रांती).
परत एकदा मॅग्गी आणि ऑम्लेट चाच पर्याय होता. पण मी जास्त काही खाऊ शकलो नाही. थोडं गरम पाणी प्यायल्यावर जरा बरं वाटलं मात्र. तोपर्यंत इथेही पावसाला सुरुवात झाली होती.
लोबसांग च्या मते इथे अजून २-३ प्रजाती दिसण्यासारख्या होत्या, त्यामुळे मग त्यांचा शोध सुरु झाला. पहिल्यांदा आम्ही Solitary Snipe साठी थांबलो. पण अगदी नीट निरखून पाहून सुद्धा तो पक्षी कुठेही दिसला नाही, तेच मग Blood Pheasant च्या बाबतीत पण झालं. पाऊस पडत असल्याने जास्त वेळ बाहेर राहून शोधणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळे आम्ही परत फिरायचा निर्णय घेतला. वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबलो फक्त. इथे समुद्रसपाटीपासून उंची थोडी कमी असल्याने प्राणवायूचा त्रास नव्हता आणि पाऊस देखील फारसा नव्हता. पण पक्षी मात्र वरच दिसू शकणार होते.
परतीच्या प्रवासात परत एकदा थोडी झोप काढली. साधारण ४:३० वाजता आम्ही हॉटेल ला परतलो. उद्या सकाळी निघून आम्ही बोमडिला खिंडीमार्गे गुवाहाटी ला जाणार होतो. प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे लवकर निघणं गरजेचं होत. शिवाय रस्त्यात १-२ ठिकाणी पक्षी बघत थांबण्याचाही विचार होताच. चार वाजेपर्यंत विमानतळावर पोहोचायचं तर सकाळी ४ वाजताच निघूया असा निर्णय झाला. जर सगळं वेळेत झालं तर गुवाहाटी शहराजवळ एका ठिकाणी Malayan Night Heron साठी जायचं असंही डोक्यात होतं.
शेवटचा दिवस आणि अनपेक्षित लाभ
काल रात्री जेवतांना ४ ऐवजी ४:३० वाजता निघूया असं लोबसांग ने सुचवलं (आमच्या ड्रायव्हर्स नाही थोडी विश्रांतीची गरज होतीच). मग ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व वेळेत तयार होतो (बॅगा तर रात्रीच आवरलेल्या होत्या). तिथून निघून बोमडिला खिंडीपर्यंत बाहेर काळोख असल्याने कुठेही थांबलो नाही पण थोडंसं उजाडल्यावर २-३ ठिकाणी (जिथे पक्षी दिसण्याची शक्यता होती) थांबलो. इथल्या रस्त्यावर Large Blue Flycatcher दिसू शकेल असं आमच्या आधी आलेल्या काही पक्षिनिरीक्षकांकडून कळलं होतं. पण तो दिसण्याआधी आम्हाला Silver-eared Mesias, Yuhinas, आणि काही कोकीळ वर्गातील पक्षांचे फोटो सुद्धा मिळाले.
तिसऱ्यांदा आम्ही जिथे थांबलो, तिथे दीपक ना एक निळसर पक्षी दिसला. आम्ही अगदी ओझरता पहिला. पण फोटो बघून लोबसांग ने तो Large Blue Flycatcher असल्याचं नक्की केलं. तेवढ्यात तिथे अजून एका पक्षाचा आवाज आला, आणि मग त्याच्या मागे सगळे जण धावले. विशेष म्हणजे, ह्या Buff-chested Babbler ने सर्वांना चांगले फोटो देखील घेऊ दिले.
फार अपेक्षा नसतांना अचानक दोन लाइफर्स मिळून गेले इथे.




पण ह्या सगळ्यात खूप वेळ गेला. त्यामुळे जेवणासाठी जेव्हा आम्ही थांबलो, त्यावेळी Heron साठी जाण्याचा प्लॅन रद्द केला आणि त्यापेक्षा जमलं तर विमानतळावर थोडं लवकर पोहोचू असं ठरवलं.
आज विमान वेळेवर होतं आणि मुख्य म्हणजे कुठे न थांबता डायरेक्ट मुंबई लाच जाणार होत. मुबंईत नेहमीप्रमाणे ट्रॅफिक होताच, त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत मध्य रात्र झालीच. वाढदिवसाच्या दिवसात घरी पोहोचेन कि नाही अशी शंका होती, पण थोडं आधीच पोहोचलो (तसंही क्लारा आणि मंडळींनी एक छोटंसं सेलिब्रेशन पहाटेच केलं होतं म्हणा).
जाता जाता निरोपाचे २ शब्द
एकंदरीत आमची ट्रिप छान झाली. हं, जर पाऊस नसता, तर नक्कीच अजून जास्त पक्षी दिसले असते, आणि चांगल्या प्रकाशात फोटोदेखील चांगले मिळाले असते. पण ते तर चालायचंच. सहप्रवासी समविचारी असल्याने ८ दिवस मस्त मजेत गेले, एवढं मात्र नक्की.
अजून एक गोष्ट कळली, कि पुढच्या वेळेस इथे येतांना मे ऐवजी एप्रिल मध्ये यायचं. त्या वेळेस पावसाची शक्यता थोडी कमी असते (म्हणजे जळवा पण कमी)!

ह्या ब्लॉग मधले काही फोटोस मी बरोबरच्या मित्रांकडून घेतलेले आहेत.