पॅरट-फिंच च्या शोधात
- फेब्रुवारी - २०२६
पॅरट-फिंच म्हणजे?
२०२५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास दीपकने मला त्याच्या आणि संतोषच्या एका बर्डिंग ट्रिपबद्दल सांगितलं. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी हे दिवस ठरले होते, पण नेमकं कुठे जायचं हे अजून ठरलं नव्हतं.
बिनंदा हातीबारुआ हा ईशान्य भागातला (म्हणजे आपलं North-East हो) एक नावाजलेला गाईड आहे. त्याच्या तारखा मिळणं जवळजवळ अशक्यच. पण दीपकने चतुराईने पुढच्या २-३ वर्षांच्या तारखा आधीच ब्लॉक करून ठेवल्या होत्या!
त्यांचा ५-६ जणांचा एक ग्रुप आहे ठाण्यातला, पण नेहमी त्या सगळ्यांना वेळ असतोच असं नाही, त्यात ह्या वेळेस फक्त दीपक आणि संतोष दोघंच होते, आणि तिथेच माझा नंबर लागला.
ह्या वेळेपर्यंत कुठले पक्षी शोधायचे ह्या विषयी काहीच ठरलेलं नव्हतं आणि त्यात Pin-tailed Parrotfinch हे तर नाव सुद्धा मी ऐकलं नव्हतं.
योजना आखताना…
डिसेंबरमध्ये मग चर्चेला वेग आला. सुरुवात मागुरी तळ्यापासून करायची हे जवळजवळ ठरलं होतं. दिब्रुगड विमानतळापासून तासाभरावर असलेला हा भाग, गवताळ प्रदेश, पाणथळ भाग आणि दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान, असे विविध अधिवास अनुभवायला मिळणार होते.
तिथून दिहिंग-पटकाई, नामदफा, उदायक पास… आणि पुढे वॉलॉंगला जायचा विचारही सुरू होता. आम्ही तिघेही आधी या भागात गेलेलो होतो, पण अजून तिथले बरेच पक्षी बघायचे बाकी होते.
२० जानेवारीच्या सुमारास बिनंदाशी बोलताना पहिल्यांदा Pin-tailed Parrotfinch हे नाव समोर आलं. काही दिवसांपूर्वी त्याने नामदफामध्ये हा पक्षी पाहिला होता, आणि तो अजूनही दिसण्याची शक्यता त्याला वाटत होती.
नाही म्हणायला एक अडचण होती, आम्ही जेव्हा नामदफा भागात जातो, तेव्हा जिथे राहतो तिथून हा भाग खूपच लांब होता. आणि ह्यामुळे आमचा खर्चही थोडा वाढणार होता. पण नवीन पक्षी म्हंटल्यावर आम्ही तिघेही तयार झालो.
आम्ही पक्षिनिरीक्षणासाठी जातो तेव्हा आधी मियाओ गावात मुक्काम करतो आणि मग तिथून दोनेक तासाच्या अंतरावरील देबान कॅम्प (नामदफा मधील नेहेमीची, आणि एकुलती एक राहण्याची जागा) कडे जातो.
पण parrotfinch बघण्यासाठी आम्हाला नामदफा जंगलाच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजे जवळ-जवळ गांधीग्राम (इथून म्यानमार देशाची सीमा अगदी जवळ आहे) पर्यंत जावं लागणार होतं. अंतर म्हणाल तर फक्त १२० किमी आहे पण इथले रस्ते बघता हा प्रवास सहज ७-८ तासांचा होता, म्हणजे पूर्ण दिवसाचा प्रवास, तोही खतरनाक पाठ-मोडी रस्त्यांवरून.
इथे चित्रात त्यातल्या त्यात चांगल्या रस्त्याचा एक भाग दिसतोय, त्यावरून थोडी कल्पना करता येईल.
रस्त्याचा बहुतांश भाग हा खडकाळ होता, त्यामुळे अक्षरशः गाडीचा कुठलातरी भाग पकडून बसावं लागतं होतं पूर्ण वेळ. आधी झालेल्या पाऊसामुळे काही ठिकाणी चिखल झाला होता, त्यामुळे टायर रस्त्यावरून घसरत होते.
ह्या प्रवासासाठी ४ व्हील ड्राईव्ह वाली गाडी अत्यावश्यक होती. अर्थात बिनंदा ला ह्याची जाणीव असल्याने त्याने Tata Yodha पिकअपची व्यवस्था केलेली होती. पुढील दोन दिवसांत मग हा निर्णय किती योग्य होता, हे स्पष्ट झाले.
मियाओकडे
२९ जानेवारी च्या मध्यरात्रीची फ्लाईट असल्याने, सुरुवातीलाच आमच्या झोपेचं खोबरं झालं. सकाळी आम्ही दिब्रुगड विमानतळावर पोहोचलो. दिवसभर मागुरी भागात बर्डिंग करून मग आम्ही रात्री मियाओ इथे राहणार होतो. परतीच्या वाटेत मग आम्ही मागुरी मध्ये मुक्काम करणार होतो (आधी लगीन कोंढाण्याचं, म्हणतात तसं पहिले parrotfinch करून मग मागुरी).
इथे आज आमच्याकडे फार वेळ नसल्याने आम्ही पाणथळ भागात प्रामुख्याने Falcated Duck (हा संतोष चा लाइफर होता), आणि Baikal Teal (आम्हा सर्वांसाठी लाइफर) ह्या २ बदकांचा शोध घेणार होतो. थोड्या प्रयत्नांनंतर आम्हाला खूप लांब अंतरावर Falcated Duck दिसलं. पण उथळ पाणी आणि त्यात वाढलेल्या वनस्पती ह्यामुळे तिथे बोट घेऊन जाण शक्य नव्हतं. मग लांबूनच जमतील तसे फोटो घेतले. खूप प्रयत्न करूनसुद्धा Baikal Teal मात्र दिसलं नाही.
दुपारी जेवणानंतर दुसऱ्या भागात बोट घेऊन जायचा विचार होता, पण गेल्या २-४ दिवसात इथे फार पक्षी दिसत नसल्याचे कळल्यामुळे मग तो बेत रद्द केला. त्याऐवजी तीन-एक तासांचा प्रवास करून संध्याकाळी ६ च्या सुमारास दफा लाँज वर पोहोचलो (इथे काळोख लवकर होत असल्याने, तो पर्यंत रात्र झालेली होती).
अनपेक्षित अडथळे
तिथे पोहोचल्यावर जराही उसंत न घेता बिनंदा ने पुढची तयारी सुरु केली. तेव्हा प्लॅन असा होता कि, सकाळी ५ वाजता निघून तडक गांधीग्राम जवळ पोहोचायचं. रात्री तिथे राहून मग सकाळी Parrotfinch चा शोध घेणार होतो आम्ही. मागच्या आठवड्यात झालेल्या बोलण्याप्रमाणे आम्ही गांधीग्राम मधल्या होमस्टे मध्ये राहणार होतो. पण गावात काहीतरी लग्नसमारंभ असल्यामुळे आता तिथे राहायला जागा मिळणार नव्हती. हा सगळा परिसर खूप विरळ वस्तीचा आणि जंगलाचा. त्यामुळे तिथे राहण्यासाठी पर्याय मिळणं महा-कठीण (“एक हॉटेल नाही, तर दुसरीकडे जाऊ” असं तिथे केवळ अशक्य).
पण हे बिनंदाला दोन दिवसांपूर्वी कळल्यामुळे त्याने आधीच तयारी (मनाची आणि सामानाची) करायला सुरुवात केली होती. त्यात मग sleeping बॅग्स, तंबू साठी कापड, स्वयंपाकासाठीची पूर्ण तयारी म्हणजे अन्नसाहित्य आणि मसाले, वगैरे. तसेच दोन दिवसांसाठी एक स्वयंपाकी व मदतनीस सुद्धा तयार केले होते (ह्यामुळेच आमचा खर्च थोडा वाढणार होता).
रात्री जेवणासाठी बसलो असतांना बिनंदा ने अजून एक वाईट बातमी सांगितली. नामदफा च्या जंगलात प्रवेश मिळण्यासाठी परवाना आवश्यक असतो, आणि बिनंदा आधीच्या ट्रिप्स मध्ये व्यस्त असल्याने, परवाना अजून मिळालेला नव्हता. अर्थात त्याची वन-खात्यात ओळख असल्याने सकाळी ऑफिस उघडताच लगेच आम्हाला परवाना मिळणार होता. पण म्हणजे सकाळी निदान ७ वाजेपर्यंत तरी आम्हाला प्रवास शक्य नव्हता.
ह्या परिस्थितीत ५ वाजता निघून काहीच फायदा नव्हता. मग आम्ही असं ठरवलं कि सकाळी ५ वाजता निघूया आणि जवळच्या भागात दिसतील तेवढे पक्षी बघू, ७ पर्यंत परत येऊन मग पुढच्या प्रवासाला लागू. तोपर्यंत वन खात्याची परवानगी मिळेल ह्याची बिनंदा ला खात्री होती.
प्रवास — एक परीक्षा
सकाळी ५ वाजता आम्ही तयार होतो पण आमचा पिकअप ट्रक अजूनही आलेला नव्हता. पण अगदीच काही नाही तर तेव्हा छान गरम चहा आणि बिस्कीट तरी मिळाले. सगळी तयारी (sleeping bags, जेवणाचे साहित्य, ई.) पूर्ण करून आमची योध्दा गाडी आली, तेव्हा ६:४० वाजले होते. अजूनही परवानगी-पत्र मिळालेल नसल्याने, आम्ही एका छोट्या ट्रेल वर जायचं ठरवलं.
अर्धा-पाऊण तास भटकलो आम्ही पण White-tailed Flycatchers ची एक जोडी आणि एक Blue Rock Thrush सोडला तर बाकी काहीही दिसलं नाही. बरं, जे दिसले त्यांचेही काही चांगले फोटो मिळाले नाहीत.
८ वाजेपर्यंत आम्ही परत आलो, तेव्हा मग ब्रेकफास्ट करूनच निघू असं सर्वानुमते ठरलं. प्रवासात खूप वेळ जाणार होता, त्यात मध्ये ब्रेकफास्ट साठी थांबण्यात अजून जास्त वेळ गेला असता.
बिनंदा कडे तो पर्यंत नामदफा जंगलात जाण्याचा परवाना आला होता. ५ वाजता निघणारे आम्ही शेवटी ८:४५ ला तिथून निघालो. ह्या ट्रक मध्ये पुढच्या भागात बसण्यासाठी दोन रांगा होत्या, तिथे आम्ही बसलो होतो. आमचे कुक आणि हेल्पर ह्यांना मात्र मागच्या मोकळ्या भागात बसावं लागल. तिथेच आमच्या सामानाच्या बॅगा, कॅमेरा बॅगा, स्वयंपाकाचं सामान, हे सुद्धा होतं. त्या भयंकर उबडखाबड रस्त्यावरून जातांना, त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी होती. स्वतःचा तोल सांभाळत न पडता बसायचं तर होतंच, शिवाय आमचं सामान पडणार नाही, ह्यकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार होतं.
हा प्रवास म्हणजे एक प्रकारची परीक्षाच होती. एका पक्षासाठी (अर्थात तो हि दिसेल ह्याची खात्री नाहीच) आम्ही किती त्रास सहन करू शकतो ह्याची परीक्षा. आम्ही ठरलेल्या वेळेच्या बऱ्याच उशिरा सुरुवात केलेली असल्याने आम्हाला रस्त्यात पक्षी बघण्यासाठी थांबणं शक्य नव्हतं (अन्यथा आम्ही दर दोन-पाचशे मीटर वर थांबलो असतो). ह्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची बिनंदा ची तयारी नव्हती. त्याच मुख्य कारण हे होतं कि आम्हाला तिथे जाऊन राहण्यासाठी जागा शोधायची होती (कुणाचं घर नाही मिळालं तर निदान स्लीपिंग बॅग्स ठेवण्यासाठी एखादी ओसरी वगैरे). आणि अंधारात हे शक्य झालं नसतं, त्यामुळे दिवस-उजेडी पोहोचणं अत्यावश्यक होतं.
रस्त्यात आम्ही एकदाच थांबलो ते फक्त जेवणासाठी. आम्ही बरोबर उकडलेली अंडी, भात-आमटी, आणि गाजर, टोमॅटो, काकडी घेतलेलं होतं (दफा लॉज मधून निघतांना). जवळपास दीड वाजले होता, पोटात कावळे ओरडत होतेच, त्यामुळे अगदी भराभर जेवण झालं आमचं. आवरेपर्यंत २ वाजले होते. अजूनही आम्हाला २५-३० कि मी चा पल्ला गाठायचा होता (अर्थात नक्की किती अंतर जावं लागेल, हे आमची राहण्याची व्यवथा कुठे होईल ह्यावर अवलंबून होतं)
पुढे रस्त्यात आम्ही १-२ ठिकाणी थांबलो. पूर्ण रस्ताभर उजव्या हाताला उंच डोंगर आणि डाव्या बाजूला दरी. त्या दरीच्या काही भागात खालून वाहणारं नदीचं पात्र दिसत होतं, इथे White-bellied Heron दिसण्याची शक्यता होती, त्यामुळे आम्ही थांबून दुर्बिणीतून बघितलं पण आज कुठेही एकही पक्षी नव्हता पाण्याजवळ.
मग पुढे आम्हाला एक छोटी, अगदी ५-६ घरं असणारी, वस्ती दिसली. आमचा ड्राइवर कुणाल हा इथे काही लोकल आदिवासींना ओळखत होता (त्याचं नाव आता पहिल्यांदा इथे आलं असलं तरी इथून पुढे आमच्या साठी कुणाल जास्त महत्वाचा ठरणार होता). त्याने मग खाली उतरून जरा चौकशी केली. एक छोटी मुलगी आणि तिचा लहान भाऊ एवढेच होते घरात. त्यांचे आई-वडील बहुतेक कुठेतरी जंगलात/शेतात कामासाठी गेले होते. बाहेर बोलावल्यावर त्यांना आधी वाटलं कि आम्ही त्यांच्या छोट्या स्टॉल वर काहीतरी घ्यायला आलो आहोत.
आमच्या नशिबाने त्यांच्याकडे वॉकीटॉकी होता (इथे मोबाईल कनेक्शन नसल्याने त्याचा वापर जास्त होतो), त्यावरून मग कुणालने त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांचं घर फारच छोटं होतं, पण अगदीच कुठे नाही झाली व्यवस्था तर त्यांच्या बाजूला एक चौथऱ्यासारखी सपाट जागा होती, तो वापरायला त्यांनी परवानगी दिली असती. पण त्याआधी त्यांनी थोडं पुढे एका ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकेल असं सांगितलं. त्यामुळे मग आम्ही परत प्रवासाला लागलो.
इथून जवळच एका भागात डोंगराच्या कडेला भरपूर बांबूचं बन होतं. इथेच गेले काही दिवस बिनंदा ने Parrotfinch बघितले होते. बांबू च्या झाडांना ठराविक कालावधीनंतरच (७ वर्ष वगैरे) फुले येतात आणि ह्या फुलांचा/बियांचा समाचार घ्यायला हे Parrotfinch येत असावेत हा अंदाज होता. खरतर आत जंगलात असे फुलं असणारे बांबू खूप असत असतील, पण आत कोणी बघायला कशाला जातंय? त्यामुळे आजपर्यंत हे पक्षी इथे कोणाला दिसले नव्हते. अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या बांबूंवर आल्यामुळे त्यांच्यावर नजर गेली. असो, जे काही असेल ते, पण त्यामुळे आम्हाला दुर्मिळ पक्षी बघायची संधी निर्माण झाली होती. पण आत्ता मात्र आमची निराशाच झाली, कारण आज तिथे Parrotfinch नव्हते. मग बिनंदा ने आम्हाला आश्वस्त केलं कि, बहुतेकदा ते फक्त सकाळी ह्या फुलांवर येतात, त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी ते दिसू शकतील इथे.
पण तिथून निघतांना अचानक बिनंदा ला पानांमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. Parrotfinch नव्हते पण Parrotbills (Rufous-headed Parrotbill) दिसले तिथे. आणि मी तर हे पक्षी पहिल्यांदाच बघत होतो (माझ्यासाठी लाइफर). पण तरीही तिथे जास्त वेळ न थांबता, पटापट थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
इथे परत एकदा आम्हाला कुणाल ची मदत झाली. इथल्या दुर्गम भागात इतर साध्या गाड्या फारश्या टिकाव धरत नाहीत, त्यामुळे त्याच्या गाडीला चांगली मागणी असते इथे. असाच २-३ वेळा तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन ह्या भागात आला होता. त्या वेळेस त्यांची राहण्याची सोय त्याने इथेच एका घरात केली होती. त्यामुळे तो निर्धास्त होता, कि आमची काहीतरी सोय नक्की होणार (खरंतर आम्हाला तशी खात्री वाटतं नव्हती, पण दुसरा पर्यायही नव्हता).
बरोबर साडेचार वाजता आम्ही त्या गावात पोहोचलो. पण आम्ही सगळे न उतरता फक्त बिनंदा आणि कुणाल गाडीतून उतरले (तिथल्या घरमालकाशी संवाद साधण्यासाठी). त्यांनी मग तिथल्या आदिवासी जोडप्याला पटवून दिल कि आमचा काही उपद्रव नाही, आम्ही फक्त पक्षिनिरीक्षणासाठी इथे आलेलो आहोत आणि फक्त उद्या सकाळपर्यंतच आम्हाला राहायला जागा हवी आहे. आमचे वाण-सामान आम्ही बरोबर ठेवल्यामुळे आमच्या जेवणा-खाण्यासाठी सुद्धा त्यांना काही करावे लागणार नव्हते.
आमचं नशीब इथे जोरावर होतं, त्यांचं बोलणं यशस्वी झालं आणि एकदाची आमची राहायची सोय झाली तिथे, हे कळल्यावर आम्ही सगळे बॅगा घेऊन खाली उतरलो.
अगदी साधं लाकडाचं बनलेलं घर होतं ते, पण तसं ऐसपैस होतं. इथल्या पद्धतीप्रमाणे जमिनीपासून थोडं उंचावर होतं (म्हणजे कधी पूर-पाऊस झालाच तर घर थोडं वर असत). आम्हाला झोपायला व्यवस्थित जागा होती. स्वयंपाकासाठी मागच्या बाजूला एक वेगळी खोली होती, तिथेच आमच्या मदतनीसांची सुद्धा सोय होणार होती. अर्थातच एवढ्या दुर्गम भागात वीज असण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. संडास वगैरे बाहेर अंगणात होते, आणि तिथे जायची सोय म्हणाल तर २ मिणमिणते सोलर वर चालणारे टॉर्च होते. बाकी अंगण स्वच्छ होत, त्यामुळे रात्री बाहेर जावं लागलं तरी तशी पायाखाली जनावर येण्याची शक्यता कमी होती.
आत जाऊन, कपडे बदलून आम्ही जरा स्थिर-स्थावर होतो तोच, चक्क गरमागरम (आणि शिवाय दुधाचा) चहा आला. बरोबर बिस्किटं पण होती. अर्थातच हि किमया बिनंदाची. त्याने जेवणाच्या सामानासोबत चहा, साखर, आणि दूध सुद्धा घेतलं होतं. तिथल्या थंडीत, वर प्रवासातून दमून-भागून आल्यावर असा चहा मिळाला तर त्याची गोडी काय सांगू महाराजा!! AC रूम वाल्या हॉटेल मध्ये बसून नाही कळणार हे सुख.
थोड्याच वेळात सर्वत्र अंधार पसरला (५:३० वाजेपर्यंत पूर्ण काळोख होतो तिथे). आम्हाला करायला काहीच काम नव्हतं. इंटरनेट नसल्यामुळे मोबाइलचाही काही उपयोग नव्हता. मग बाहेर पडून थोडे पाय मोकळे करून आलो (फार लांब चालत जायला बिनंदाने मनाई केली होती, त्यामुळे फार-फार तर १०० मीटर पर्यंतच जाऊ शकलो)
महत्वाचा दिवस
सकाळी बरोब्बर ५ वाजता आम्ही तयार होतो. बॅगा सुद्धा भरून तयार ठेवल्या होत्या. परत एकदा छान चहा घेऊन आम्ही निघालो. आत्ता फक्त कुणाल आम्हाला बर्डिंग स्पॉट पर्यंत सोडायला आला होता. आम्हाला सोडून मग तो बॅगा आणि आमचे मदतनीस ह्यांना घ्यायला गेला. त्याने २ गोष्टी साध्य झाल्या. एकतर त्यांना ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण बनवण्यासाठी थोडा वेळ मिळाला. आणि तिथे न थांबता आम्ही पक्षी निरीक्षणासाठी जास्त वेळ देऊ शकलो.
आम्ही अगदी वेळेत पोहोचलो होतो तिथे. जंगलात अजून उजाडत होतं, म्हणजे पक्षी यायच्या आधीच कॅमेरे, दुर्बिणी घेऊन आम्ही तयार होतो. पुढच्या तब्बल अर्ध्या तासात काहीही घडलं नाही (जास्त आवाज होऊ नये म्हणून आम्हीही फक्त दबक्या आवाजातच बोलू शकत होतो). बिनंदा बांबूंवर अगदी व्यवस्थित नजर ठेवत होता. त्याने खूण केल्यावर आम्ही लगेचच आमचे कॅमेरे सरसावले. पण परत एकदा फक्त Parrotbills होते. ह्या वेळेस Rufous-headed Parrotbills बरोबर त्याचे भाऊ-बंद, म्हणजे Pale-billed Parrotbills सुद्धा होते (ह्यांनाच Lesser Rufous-headed Parrotbill असंही म्हणतात)..
आम्ही त्यांचे फोटो काढत असतांनाच बिनंदाने आमचं लक्ष एक छोटीशी टाळी वाजवून वेधलं. त्याने बांबूंच्या शेंड्यावर ३ Pin-tailed Parrotfinches येतांना बघितले होते. त्यांचं फुल/बिया खाण्याचं काम अगदी गुपचूप चालू झालं होतं (कुठलीही पूर्वसूचना न देता). बहुतेक तरी सगळेच मादी पक्षी होते (किंवा पिल्लं), कारण नर पक्षी खूपच जास्त रंगीबेरंगी असतो. ते तीनही पक्षी अगदी वरच्या भागात होते, आणि खूप वेळ थांबून सुद्धा ते अजिबात खाली येत नव्हते. त्यामुळे खूप खटपट करूनसुद्धा बरे फोटो मिळालेच नाहीत, साधारण आठवड्यापूर्वी बिनंदा दुसऱ्या ग्रुप ला घेऊन आला होता, तेव्हा इथेच ८-१० पक्षांच्या थवा (ज्यात नर देखील होते) आला होता आणि त्यांनी अगदी छान फोटो पोझेस दिल्या होत्या (असतं एकेकाचं नशीब). पण आम्हाला मात्र फक्त ह्या ३ पक्षांवर (आणि तेही खूप उंचावर) समाधान मानावं लागलं.
हे सगळं होईपर्यंत आमची गाडी (ब्रेकफास्ट घेऊन) आलेली होती. चांगले फोटो न मिळाल्याने आमची थोडी निराशा झाली खरी, पण हे समाधान सुद्धा होतं कि निदान एक नवीन पक्षी बघायला तरी मिळाला (नाहीतर असंही होऊ शकलं असतं कि आज एकही पक्षी इथे फिरकलाच नाही .. कारण जंगलात त्यांना कुठे-ना-कुठे बांबूची फुले मिळतंच असतील कि).
गांधीग्राम पर्यंत केलेल्या ह्या प्रवासाचं चीज झालं ह्यात शंका नाही. केलेला खडतर प्रवास, राहण्याची थोडी गैरसोय बाजूला ठेवून, मिळणारं समाधान लाख मोलाचं होतं ह्यात शंका नाही.
Pin-tailed Parrotfinch हे आता आमच्याकरता फक्त एक नाव राहिलं नव्हतं. त्या नावाबरोबर आता आमच्या प्रवासाच्या आठवणी सुद्धा जोडल्या गेल्या होत्या.
पुढे?
तसं पाहायला गेलं तर Parrotfinch साठी केलेली हि वळणवाट आमच्या संपूर्ण ईशान्य ट्रिप चा एक छोटा भाग होती. त्याशिवाय सुद्धा कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेतच कि. मागुरीतले पाण-पक्षी, Jerdon's Bushchat साठी केलेली दिवसभराची पायपीट, उदायक खिंडीतले पक्षी, वगैरे विषयी पुन्हा कधीतरी.
Leave a Comment
Comments
अतिशय सुरेख प्रवास वर्णन! तुमची भाषाशैली व लेखणी जशी इंग्रजीमध्ये, त्याहूनही अधिक सुंदर आपल्या मायबोली मध्ये.. वाचकाला अगदी खिळवून ठेवणारी.. वाचता वाचता माझी पण नामदफाची सैर झाली.. तीही तुमच्या इतके श्रम न घेता व पैसा न खर्च करता.. कॅमेरा मधून टिपलेली पक्षी व प्राण्यांची छायाचित्रे पाहायला व न्याहाळायला आपल्याला सर्वांनाच आवडतात, पण त्यांच्या मागच्या कलाकारांची, सपोर्ट सिस्टीम ची कहाणी सहसा बाहेर येत नाही.. त्यामुळेच असे सुंदर प्रवास वर्णन वाचताना अनेक रोमहर्षक क्षणांचा अनुभव घ्यायला मिळतो.. वाचकाला त्या चित्रांच्या मागच्या परिस्थितीशी व त्या क्षणांशी समरस होण्याची संधी मिळते.. धन्यवाद उदय सर! 🙏💐
looking forward to your next birding photo Blog ❤️
अप्रतिम
Wonderful experience.. swataha na jata trip karun aale..
Excellent narration!
Detailed description. मस्त लिहिलंय. Photos wow as always
खूप छान, सुंदर अनुभव कथन. एवढे कष्ट घेतले, पण चीज झालं त्याचं.
फार छान👍 एका lifer साठी खूपच कष्ट घेतलेत.
Nehmi pramane.....sundar varnan......aamhi pan trip enjoy keli
हे वाचता वाचता घर बसल्या माझी ईशान्येच्या गावी सहल झाली
छान लिहिलंय! अभिनंदन!
Engaging and captivating