गोष्ट एका पक्ष्याची
- मार्च - २०२६
पक्षी बघायला जातांना, बऱ्याचदा गोष्टी नशिबावरच अवलंबून असतात. म्हणजे, आपल्या परीने आपण मेहनत करतोच, पण प्रत्येक वेळी अपेक्षित फळ मिळेलंच असं मुळीच नाही. कधी कधी फार प्रयत्न न करता हवे ते पक्षी अगदी सहज दिसतात, आणि इतर वेळी मग ते आम्हाला बीच थिक-नी सारखी हुलकावणी देतात.
अंडमान (हो हो, हाच बरोबर उच्चार आहे, अंदमान नाही) प्रदेश लाखो वर्षांपूर्वी इतर भारतापासून वेगळा झालेला असल्याने, तिथे पक्ष्यांच्या खूप वेगळ्या प्रजाती दिसतात. त्यामुळे सहज नवे पक्षी (लाइफर्स) मिळवायचे, तर अंडमान अगदी बेस्ट जागा आहे. पण २०२२ मध्ये मी तिथे जाऊन आलेलो असल्याने, पहिल्यांदा जेव्हा ह्या ट्रिपचा विषय निघाला (संतोष कडून), तेव्हा माझं नक्की ठरत नव्हतं. पण मग खालील २ मुद्दे निर्णायक ठरले, आणि मी जायचं ठरवलं.
- ह्या वेळेस आम्ही लिटल अंडमान ला पण जाणार होतो. इथली विशेष आकर्षणं होती निकोबार कबुतर आणि बीच थिक-नी
- मागच्या ट्रिपमध्ये बरेचसे स्थानिक (endemics) पक्षी आम्हाला दिसले नव्हते, किंवा काही दिसले तरी त्यांचे चांगले फोटो मिळाले नव्हते.
आमची ट्रिप ही १ ते ९ मार्च असणार होती. आणि ह्यावेळेस आमच्याबरोबर विक्रम शिल नावाचा तिथला एक अभ्यासू आणि अनुभवी गाईड असणार होता. जायचं ठरवलं खरं, पण जानेवारी संपेपर्यंत पुढे काहीच घडत नव्हतं. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी आणि संतोष दुसऱ्या ट्रिप वर एकत्र होतो, तेव्हा थोडी ह्याविषयी चर्चा झाली. तो पर्यंत ट्रिपसाठी आम्ही चारही जणांचं जायचं नक्की झालं होतं.
बऱ्याचदा आमची विमानाची तिकिटं ही एक स्टॉप वाली असतात (साधं कारण आहे हो .. सहसा ती स्वस्त पडतात), पण ह्या वेळेस मात्र मी डायरेक्ट प्रवासाबाबत आग्रही होतो. कुठेतरी थांबायचं, म्हणजे एकतर मधल्या कुठल्यातरी विमानतळावर वेळ फुकट जातो, आणि शिवाय २ वेळा security चेक करावा लागतो. . प्रत्येक वेळेला आम्हाला कॅमेरे, लेन्सेस, बॅटऱ्या, टॉर्चेस, पॉवर बँक ई. सगळं बाहेर काढावं लागतं. परत सगळं जमवून आत ठेवतांना काही गोष्टी विसरण्याचीही शक्यता असते. हे मला ह्या वेळेस टाळायचंच होतं (अगदी तिकीट थोडं महाग असलं तरी). मुंबई हुन जातांना काही प्रश्न नव्हता. सकाळी वेळेत जाणार एक विमान होतं पण परत येतांना मला सकाळी ११ ची एक फ्लाईट सोयीस्कर वाटली. ह्यात आमचं शेवटच्या दिवसाचं सकाळचं बर्डिंग बुडणार होतं, पण मुंबईत आम्ही वेळेत (ऑफिस अवर्स च्या आधी) पोहोचणार होतो. थोड्या चर्चेनंतर तेच विमान नक्की झालं
मुंबई ते श्री विजयपुरम (पोर्ट ब्लेअर)
एक मार्चला आम्ही नेहमीप्रमाणे २/२:३० तास आधीच टर्मिनल १ वर पोहोचलो. आज इथे इंडिगो च्या प्रवाशांची अभूतपूर्व अशी रांग होती (काय होतं त्या दिवशी काय माहित, पण एवढी मोठी रांग मी आधी कधीच बघितली नव्हती). अर्थात लवकर आलेलो असल्याने आम्हाला तशी चिंता नव्हती. आणि तिथे काउंटर ची गर्दी सोडली, तर सेक्युरिटी साठी अजिबात गर्दी नव्हती.
आम्ही चारही जणं एकाच विमानात होतो, त्यामुळे अंडमान ला जाऊन कोणालाही वाट बघावी लागणार नव्हती. वाटेत आम्हाला क्लारा कडून कळलं, कि कदाचित पहिले २-३ दिवस विक्रम आपल्याबरोबर येऊ शकणार नाही. त्याचे वडील हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याने, त्याला तिथे थांबावं लागणार होतं. पण बरोबर हे ही सांगितलं कि आमचा ड्राइवर क्लेमंट हा सुद्धा तितकाच अनुभवी आहे. पुढे ट्रिप दरम्यान त्याची प्रचिती आम्हाला आलीच.
तो दिवस आणि पुढचा दिवस मग आम्ही क्लेमंट बरोबर मुख्य बेटावर (श्री विजय पुरम) फिरलो. त्यातली काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.
लिटल अंडमानकडे प्रयाण
अंडमान द्वीपसमूहांमध्ये छोटी-मोठी अशी जवळपास २०० बेटं आहेत. त्यातल्या काही ठिकाणी मनुष्यवस्ती आहे. लिटल अंडमान हे त्या पैकीच एक. बोटीने इथे पोहोचायला मूळ बेटापासून साधारण सहा तास लागतात. ह्या बोटी बहुदा २-३ दिवसाआड असतात, आमची बोट ही सकाळी ८ वाजता होती. आदल्या रात्री आम्हाला कळलं कि ह्या २ दिवसांसाठी विक्रम आमच्याबरोबर येणार होता (वडिलांबरोबर थांबण्यासाठी त्याने दुसरी काहीतरी व्यवस्था केली होती).
इथला बोटीचा धक्का, थोडा विमानतळासारखा वाटला. तशाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था, सामान, तिकीट, आणि ओळखपत्र तपासणी वगैरे. आम्ही वेळेआधीच हजर असल्याने, हे सगळे सोपस्कार करूनसुद्धा आमच्याकडे वेळ होता. तिथे मग मागच्या बाजूच्या डेक वर जाऊन आलो. बोट तशी खूप मोठी होती, त्यात जवळपास ६ मजले होते, त्यामुळे नक्की आपली केबिन कुठली वगैरे समजण्यात थोडा वेळ गेला. पण विक्रम इथे बराच प्रवास करत असल्याने, बोटीतले अधिकारी वगैरे त्याच्या ओळखीचे होते. बोटीतच २ रेस्टारंट सुद्धा होती, आजचा आमचा नाश्ता तिथेच झाला.
समुद्रप्रवासात पुढे एक मजेदार गोष्ट अनुभवायला मिळाली. अहो चक्क उडणारे मासे दिसले भर समुद्रात. अर्थातच तो दृष्टीभ्रम होता आमचा. एक प्रकारचे हे मासे, जे त्यांच्या समुद्री शिकार्यापासून बचाव करण्यासाठी, पाण्याच्या पृष्ठभागावरून इतक्या वेगात पुढे जातात (उडया मारत) कि जणू ते पाण्यावरून उडत आहेत असा भास होतो. अर्थात ते कधी दिसतील ह्याचा आधी अंदाज येत नाही, त्यामुळे त्यांचा विडिओ किंवा फोटो काढणं मात्र शक्य झालं नाही.
समुद्रप्रवासाबाबत मी आधीपासून थोडा साशंक होतो, कारण मला जमिनीवरून प्रवासात सुद्धा गाडी लागते (मोशन सिकनेस), त्यामुळे समुद्रात काय होईल ह्याचा नेम नाही. पण हा प्रवास अपेक्षेपेक्षा खूपच आरामाचा होता. आमच्या चौघांसाठी विक्रमने एक केबिन आरक्षित केलेली होती. लहानशी केबिन, त्यात बाथरूम सुद्धा होतं. शिवाय बंक बेड्स, बसायला खुर्च्या आणि सोफा, सामानासाठी खण अशी सगळी सोय होती.
हवामान चांगलं असल्याने बोट अगदी वेळेत पोहोचली. आम्हाला घ्यायला एक खटारा जिप्सी गाडी आली होती, आणि आता हीच गाडी घेऊन आम्ही २ दिवस फिरणार होतो.
तिथून हॉटेल अगदी जवळ होतं आमचं, पण तयार होऊन बाहेर पडेपर्यंत साडेतीन वाजले होते. आता वेळ अगदी कमी असल्याने (कारण अंधार लवकर होतो इथे) आज बीच वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता (आणि तिथेच आमची दोनही टार्गेट्स असणार होती), त्याऐवजी थोड्या दाट जंगलाच्या भागात जायचं ठरलं.
दुर्मिळ पक्ष्यांच्या शोधात ...
ठरवल्याप्रमाणे आम्ही सगळे सकाळी ५ वाजता तयार होतो. आज आम्ही बीच जवळच्या जंगलात जाणार होतो, ते थोड्या जास्त अंतरावर असल्याने थोडं लवकर निघालो. हॉटेल बाहेरच्या रस्त्यावर एक चहाचं दुकान उघडं होतं त्या वेळेस. मग तिथे चहा-बिस्कीट घेऊन आम्ही पुढे निघालो.
निघालो खरे, पण लगेचच आमच्या खटारा जिप्सीने तिची लक्षणं दाखवायला सुरुवात केली. सुरूच होईना! मग कळलं बॅटरी पूर्ण उतरली होती. परत दुसरी गाडी शोधणं वगैरे शक्यच नव्हतं, त्यामुळे मग गुपचूप उतरून धक्का स्टार्ट चा मार्ग अवलंबला.
सुरुवातीला आम्ही छान डांबरी रस्त्यावरून जात होतो, पण थोड्या वेळाने, मुख्य रस्ता सोडून आम्ही जंगलाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वळलो. थोडं पुढे गेल्यावर तर रस्ता म्हणण्यासारखं काही उरलंच नव्हतं. नुसते खड्डे. फरक इतकाच कि काही छोटे होते आणि काही मोठे होते. अक्षरशः गाडीची फ्रेम (आणि जीव मुठीत) धरून प्रवास करावा लागतं होता.
त्यात गेल्या १-२ दिवसात तिथे पाऊस पडल्याने, पाणी साचलेलं होतं. गाडी खटारा असली, तरी आमचा ड्राइवर मात्र खूपच कुशल होता. त्याला ह्या रस्त्यांची चांगलीच सवय होती, त्यामुळे तो अगदी आरामात गाडी चालवत होता, त्यामुळे अगदी कुठेही न अडखळता झाला आमचा प्रवास. अर्थात तिथे जर काही कारणाने गाडी बंद पडली असती, तर मात्र गाडी ढकलतांना आमची वाट लागली असती!!
आम्ही जेव्हा रस्त्याविषयी चर्चा करत होतो तेव्हा क्लारा ने आम्हाला काही वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना दिली. पूर्वी, हा संपूर्ण रस्ता पायी चालावा लागत असे. म्हणजे आत्त्ता आम्ही जे अनुभवतोय, ती खूपच चांगली परिस्थिती म्हणायची.
थोडं अजून आत गेल्यानंतर मग आम्ही थांबलो. जंगल थोडं जास्त दाट झालं होत आणि इथून पुढे आम्ही निकोबार कबुतराच्या शोधात पायी जाणार होतो. आम्ही येतांना विक्रम बरोबर अजून एक माहितगार माणूस होता आज (किशोर नावाचा).
इथून पुढे किशोर वर एक वेगळी जबाबदारी होती. आम्ही जंगलाच्या मार्गाने जाऊन nicobar pigeon चा शोध घेणार होतो, आणि त्याच वेळेस किशोर हा समुद्रच्या दिशेने पुढे जाऊन, बीच थिक-नी वर लक्ष ठेवणार होता. खाली मी एक कच्चा नकाशा दाखवलाय. त्यात बघून मी नक्की काय म्हणतोय हे आपल्या लक्षात येऊ शकेल.
नकाशाप्रमाणे, आम्ही साधारण "A" पासून सुरुवात केली. किशोर बीच वरून आणि आम्ही जंगलातल्या रस्त्याने पुढे निघालो. लाईटहाऊस पाशी आम्ही परत भेटणार होतो (म्हणजे एकाच वेळेला आम्ही दोनही पक्ष्यांवर लक्ष ठेवणार होतो).
आमचा प्रवास अगदी संथपणे करायचा होता, आणि एकीकडे जंगलात चौफेर नजर ठेवायची होती. हा पक्षी अतिशय लाजरा (म्हणजे माणसांची चाहूल लागताच तो दूर पळतो), त्यामुळे शक्य तेवढ्या शांतपणे आम्ही चालत होतो.
अंतर म्हणाल तर साधारण दोन किमी चाललो असू आम्ही, पण आज जंगल तसं शांतच होतं. नाही म्हणायला एकदा आम्हाला त्या कबुतराने अगदी ओझरतं दर्शन दिलं, मला अगदी कसाबसा १ फोटो मिळाला तेवढ्यात.
आम्ही लाईटहाऊस पर्यंत पोहोचायच्या आधीच किशोर समोरून आमच्या दिशेने आला. रस्त्यात त्याने सगळा बीच अगदी काळजीपूर्वक न्याहाळला होता, पण थिक-नी चा पत्ता नव्हता कुठेही. अर्थात हा फक्त बीचचा अर्धा भागच बघून झाला होता, लाईटहाऊस ते पॉईंट "बी" हा भाग अजून बघितला नव्हता. आणि विक्रम ला खात्री होती कि इथे किंवा तिथे पक्षी हा असणारच.
तिथून मग आम्ही समुद्राच्या बारीक वाळूतून चालायला सुरुवात केली. विक्रम अगदी झपाझप पुढे निघाला होता, पण वाळूतून भराभर चालणं तेवढं सोपं नसतं. त्यात उन मी म्हणत होतं तो पर्यंत. कसंबसं आम्ही त्याच्या बरोबर पुढे जात होतो. रस्त्यात Pacific Reef Herons आणि इतर काही पाणथळी पक्षी दिसले, पण थिक-नी चा मात्र कुठेही पत्ता नव्हता.
त्या टोकापर्यंत जाऊन मग पुन्हा लाईटहाऊस कडे परतलो. हा परतीचा प्रवास जास्तंच त्रासदायक होता. एकतर ऊन अजून वाढलं होतं, त्यात पक्षी न दिसल्याने झालेली निराशा, आणि भरीस भर म्हणजे आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे गाडीजवळ आल्यावर पहिले खाऊन घेतलं. आणि अश्यावेळी काहीही गोडच लागतं.
पोटोबा झाल्यावर मग आम्ही परत एकदा पॉईंट "A" कडे निघालो. पण ह्या वेळी हे अंतर गाडीतून गेलो, अर्थातच आधी धक्का मारून गाडी सुरु केल्यानंतर. एवढ्या उशिरा कबुतर दिसण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच, त्यामुळे चालत जाण्याचा प्रश्नच नव्हता.
पहिली निराशा
आम्ही उतरलो तिथून बीच साधारण दोन-तीनशे मीटर अंतरावर होता, आणि तिथपर्यंत दाट झाडीतून जायचं होतं (किशोर सकाळी ह्याच रस्त्याने गेला होता, त्याच्यासाठी अर्थातच तो सहज रस्ता होता, पण आम्हाला मात्र काळजीपूर्वक चालावं लागत होतं).
आम्ही हळूहळू बीच जवळ पोहोचेपर्यंत विक्रम आणि किशोर पुढे गेले होते, दोनच मिनिटात, ते परतले देखील. त्यांना पक्षी नक्की दिसला होता, त्यामुळे अगदी उत्साहात धावत ते आमच्यापर्यंत आले.
तोपर्यंत पाणी अगदी खारफुटीच्या (mangroves) झाडांमध्ये शिरलेलं होतं. त्यामुळे मग मुळं/फांद्या ह्यांच्यातून वाट काढत पुढे जावं लागणार होतं (खुल्या समुद्रात गेलो असतो, तर आमच्या चाहुलीने कदाचित तो पक्षी उडून गेला असता). आणि इथे पाण्यातून जावं लागणार असल्याने बूट काढून अनवाणी जाणं भाग होतं.
इथे जास्त चर्चेला वावच नव्हता कारण पक्षी किती वेळ तिथे थांबेल हे काही आमच्या हातात नव्हतं. त्यामुळे मग आम्ही तिघे जण पाण्यात उतरलोच.
पण पुढचा मार्ग काही सोपा नव्हता. एकतर अनवाणी चालायची सवय नाही, एकीकडे खारफुटीची मुळ पायाला टोचत होती, आणि दुसरीकडे लाटांबरोबर येणारे शंख-शिंपले त्रासदायक ठरत होते. पण कसेबसे एकमेकांच्या मदतीने आम्ही हळूहळू पुढे गेलो.
आम्ही ह्या अडथळ्यांना पार करून खुल्या वाळूवर आलो, तेवढ्यात समोरून दोन मासेमार तरुण आमच्या दिशेने चालत येतांना दिसले. .
काय झालं असेल ह्याचा अंदाज आल्याने विक्रम धावतच पुढे गेला, पण त्या दोघांनी पक्षी आधीच उडवून लावलेला होता. अर्थात मुद्दाम नाही म्हणा, पण त्यांच्या येण्यामुळे घाबरून थिक-नी उडून गेला होता.
आमचं काय झालं असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकाल कदाचित पण आमच्या पेक्षा जास्त विक्रम स्वतः वैतागला होता. एवढी मेहेनत केलेली सगळी पाण्यात !! अर्थात नशिबाला दोष देण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता, ते बिचारे मासेमार त्याच्या पोटापाण्याच्या धंदयासाठी आले होते तिथे मासे पकडायला, त्यांना काय माहित आम्ही तिथे कशाकरता आलो आहोत.
शेवटचा प्रयत्न
अख्खी सकाळ वाया गेल्याने, आम्हाला आता फारशा आशा उरल्या नव्हत्या.
पण विक्रम ने अजूनही हार मानली नव्हती. इतक्या वर्षांच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे, तो पक्षी याच भागात कुठेतरी असायला हवा होता. तो जर इथून उडून गेला असेल, तर नक्कीच तो लाईटहाऊस च्या पुढच्या भागात गेला असणार. आणि तसं असेल, तर परत एकदा त्या भागात चक्कर मारणे हे अनिवार्य होते. कितीही दमायला झालं, तरी हा एक चान्स घ्यायला आम्ही सगळे तयार होतो (तसंही दुसरं काय करणार होतो म्हणा आम्ही, कारण उद्या दुपारी आमची परतीची बोट होती, त्यामुळे उद्या फक्त सकाळचाच वेळ होता आमच्याकडे, त्यात अजून ते Nicobar Pigeon पण शोधायचं होतं).
परत एकदा आम्ही लाईटहाऊस पर्यंत गेलो आणि तिथून वाळूतून पुढे. ह्या वेळपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता.
पक्षिनिरीक्षणाच्या दृष्टीने सकाळची वेळ ही सर्वात योग्य, आणि ती वेळ केव्हाच टाळून गेली होती. त्यामुळे मला स्वतःला फारशी आशा वाटत नव्हती. त्यामुळे, ह्या वेळेस मी भराभर विक्रम च्या मागे जाण्याऐवजी मागेच राहणं पसंत केलं. तसंही पुढे जर त्याला पक्षी दिसला, तर बोलावेलच तो. आणि नाही मिळाला, तर माझे चालण्याचे श्रम थोडे वाचतील.
इथे चालतांना संतोष ने मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवली. ह्या वेळेपर्यंत ओहोटीला सुरुवात झाली होती बहुतेक, त्यामुळे खूप मोठा वाळूचा किनारा आता दिसायला लागला होता (म्हणजे पाणी बरंच आतपर्यंत ओसरलं होतं). आणि इथे वाळूत जे शिंपले दिसत होते, ते चक्क वाळूवरून व्यवस्थित हालचाल करत होते. आणि ह्याचं कारण होतं आत असलेले संन्यासी खेकडे (Hermit Crabs). आपापल्या आकाराप्रमाणे ह्या खेकड्यांनी शिंपल्यांमध्ये घर केलं होतं. शिंपल्याच टणक कवच ही जणू त्यांची संरक्षक ढाल होती.
जसं जसं बघत गेलो, तसं तसं खूप सगळे खेकडे (आणि शिंपले) दिसायला लागले. वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे हे प्राणी वाळूत सर्वत्र अक्षरशः बागडत होते. पक्षी नाही तर नाही, निदान ह्यांचे तरी फोटो काढता येतील असा विचार करून मी तिथेच थांबलो. एक वाळलेल्या लाकडाचा ओंडका तिथे पडलेला होता, त्यावर बसून मग मी बरेच फोटो काढले तिथे.
त्यात मला एक मजेशीर घटना सुद्धा बघता आली. ती म्हणजे, ह्या खेकड्यांच भांडण. एक खेकड्याला बहुतेक त्याचा शिंपला आवडला नसावा (किंवा अपुरा पडत असावा), त्याने एका मोठ्या शिंपल्यातल्या खेकड्यावर आक्रमण केलं.
ते सगळेच वाळूवर होणाऱ्या माझ्या हालचालींमुळे सावध होत होते, त्यांची हालचाल थांबवत होते (त्यांना माझ्या पावलांची वाळूवर होणारी कंपनं जाणवत असावीत). आणि मी एका जागी उभा राहिलो, कि त्यांची हालचाल परत चालू होत होती.
इथे मी फोटो काढण्यात गुंगलेलो असतांना अचानक एका हाकेने माझी तंद्री मोडली. आधी विक्रम चा आवाज आणि मग संतोष चा, ते खूप लांबून मला बोलावत होते, त्यांना बीच थिक-नी दिसला होता!!
एक क्षणात सगळा क्षीण विसरलो मी!! दमून भागून चालणं सोडा, चक्क धावत होतो मी वाळूवरून!
विक्रम अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आला. जातांना त्याला काही दिसलं नाही, पण परत येत असतांना त्याला समुद्राच्या दिशेला हा पक्षी दिसला. ओहोटी असल्याने, समुद्रात खूप आतपर्यंत असणारे दगड आता दिसायला लागले होते, तिथेच (पण खूप लांब अंतरावर) त्याने दुर्बिणीच्या साहाय्याने पक्षी शोधला.
तिथे जाऊन मी तो बघत असलेल्या दिशेला (अंदाजाने) कॅमेरा वळवला. पण खूपच लांब होता पक्षी. अगदी आमच्या झूम कॅमेऱ्यात सुद्धा छोटा ठिपका दिसत होता फक्त.
पण शेवटी तो लाइफर होता, त्यामुळे एवढ्या लांबवरून काढलेल्या फोटोवर आम्ही खुश होतो. पण विक्रमच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. त्याने परत एकदा आम्हाला बूट काढायला सांगितले.
त्याचं म्हणणं होत कि अशी संधी काही आम्हाला परत मिळणार नव्हती. जर आपण सावधपणे पुढे गेलो, तर जवळून फोटो मिळण्याची खूप शक्यता होती. ओहोटी असल्याने पाणी वाढण्याची शक्यता नव्हती. फक्त इथे दगड आणि वाळूच्या मिश्र भागातून चालायचं होतं. काही ठिकाणी दगड गुळगुळीत होऊन चालतांना घसरण्याची शक्यता असते, आणि काही ठिकाणी सतत च्या पाण्याचा दबावामुळे दगड जास्त धारदार होतात. ह्या सगळ्यात बरोबर कॅमेरा घेऊन लाटांमधून जायचं म्हणजे तारेवरची कसरत होती.
पण जवळून फोटो काढण्याचा मोह टाळणं अशक्य होतं. त्यामुळे फार विचार न करता आम्ही पुढे निघालो.
विक्रमच्या मागोमाग सावकाश पावलं टाकत आम्ही पुढे निघालो. एक तिरकी नजर तर त्या पक्ष्यावर पण होतीच, न जाणो मधेच उडून गेला तर!! त्यामुळेच दर १५-२० फुटांवर थांबून आम्ही काही फोटोस घेत होतो.
आम्ही बरेच पुढे आलो होतो आता. तेवढ्यात संतोषमधला एक्स्पर्ट फोटोग्राफर जागा झाला. नाहीतरी आपण पुढे जातोच आहोत, तर मग थोडी दिशा बदलून (थोडं लांबून) जाऊ, जेणेकरून प्रकाश आपल्याला पाहिजे तसा पक्ष्यांवर येऊ शकेल (सूर्य आपल्या मागे ठेवून फोटो काढले, तर जास्त चांगले फोटो येतात).
आम्ही खूप हळूहळू पुढे सरकत होतो (प्रत्येक वेळी पाऊल सावरत) पण मागे वळून पाहिल्यावर जाणवलं कि खूप अंतर चालून आलोय आपण.
पण ह्या सगळ्या धावपळीचं चीज झालं. पहिल्यापेक्षा खूपच चांगले फोटो मिळाले इथून.
इथपर्यन्त येऊन मस्त फोटो मिळाल्यामुळे आम्ही विक्रमचे आभार मानत होतो, त्याने आग्रह धरला नसता तर कदाचित आम्ही लांबून काढलेल्या फोटोवर समाधान मानून परत गेलो असतो. पण निसर्गाच्या मनात वेगळंच होतं.
तिथे आम्हाला त्या पक्ष्यांने जणूकाही बोनस दिला. इतका वेळ शांत असणारा तो पक्षी अचानक हालचाल करू लागला, आणि थोड्याच वेळात त्या हालचालीमागचं कारण आम्हाला कळलं. खडकातल्या कपारींमध्ये चोच खुपसून त्याने एक मोठा खेकडा बाहेर काढला होता.
मग शांतपणे त्याने भक्ष्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मग काय, आमच्या कॅमेऱ्याची क्लिक-क्लिक थांबेचना.
वाह! काय क्षण होते ते!
सकाळपासूनची धावपळ, पक्ष्याची हुलकावणी, बीच वर उन्हात चालायचा त्रास, हे सगळं अगदी फिकं वाटलं तेव्हा. परतीची वाट जरी तेवढीच लांबलचक असली, तरी आता ती त्रासदायक वाटत नव्हती.
जाता जाता ...
दुसऱ्या दिवशीची सकाळ फारच आनंददायी ठरली. अगदी काही मिनिटात झालेलं Nicobar Pigeon चं दर्शन आणि त्याबरोबर इतर काही पक्षी... पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी.
मागे वळून पाहतांना असं वाटतं, पक्षीनिरीक्षण म्हणजे काही फक्त वेगवेगळे पक्षी बघणे (किंवा त्यांचे फोटो काढणे) नव्हे. त्यासाठीची केलेली धावपळ, कधीकधी येणार अपयश ह्या सगळ्यामुळे तिथपर्यंतचा प्रवास हा जास्त रंगतदार होतो. खरी मजा ही त्या प्रवासात आहे.
Leave a Comment
Comments
खूपच सुंदर वर्णन... Andman ची ट्रीप करवून आणलीस
खूपच सुंदर वर्णन... Andman ची ट्रीप करवून आणलीस
खूपच सुंदर वर्णन आणि पक्षांचे फोटो नेहमी प्रमाणेच मस्त 👌👌
अंडमान येथील पक्षी निरीक्षण करताना आलेल्या अनुभवाचं ओघवत वर्णन वाचताना आपण स्वतः तुमच्या सोबत आहोत असं वाटलं.
मजा आली.
धन्यवाद!
फोटो पक्षी आणि वर्णन... त्रिवेणी संगम.
अतिशय सुंदर लिहिले आहेस उदय !!!👌👍
भारी वर्णन केलंय सर 👍🏻👍🏻
अंडमानला जाऊन पक्षी पाहून आल्यासारखं वाटलं
ओघवतं वर्णन 👌
Dear Team
After long time read some thing very nice
Khup chaan and as usual Magic hands clicks
Uday Great one
Regards Vivek Mohile
एकदम बहार दार वर्णन.सराईत लेखकाप्रमाणे.कष्ट पण खूप घ्यावे लागले, फोटो साठी.पण एकंदरीत झकास.हौसेला मोल नाही.असं म्हणतात.शास्त्र असतं ते.
Wonderful
मस्त मस्त मस्त लेखन
फोटो पण सुंदर